मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग तिसरा|
अभंग २७०१ ते २७२०

कथेकरी - अभंग २७०१ ते २७२०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


२७०१

सर्व महाराजाचा रावो । विटेवरी पंढरीरावो ॥१॥

तया न जाती हे शरण । दीना घालिती लोटांगण ॥२॥

तारा म्हणतीं आम्हांसी । ऐसें अभागी ते दोषी ॥३॥

एका जनार्दनीं नाहीं भाव । तया अवघेंचि वाव ॥४॥

२७०२

स्वप्नामाजीं नेणें देवा । करी सेवा भूतांची ॥१॥

नाना साधन ते चेष्टा । तेणें कष्टा भरीं भरला ॥२॥

जे जे करी ते उपाधी । मंत्र जपे तो अविधी ॥३॥

सकळ मंत्रा मंत्रराज । एका जनार्दनीं नेणें निज ॥४॥

२७०३

शिकलासे टाणटोणा । तेणें ब्रह्माज्ञाना तुच्छ मानी ॥१॥

बोले बहु चावट वचन । वेदां म्हणे तो अप्रमाण ॥२॥

सिद्धान्त धातांतांसी म्हणे । हें तो पाषांडी बोलणें ॥३॥

ऐसा पामर दुराचारी । वाचे न वदे कधीं हरी ॥४॥

एका जनार्दनीं मन । ज्याचें पाषाणचि जाण ॥५॥

२७०४

गायत्री मंत्राचा मानुनी कंटाळा । जाय तो वेताळा पूजावया ॥१॥

देवाचें पूजन करितां वाटे दुःख । आवडीं देख भांग घोटी ॥२॥

ब्राह्मणासी पाणी देतां मानीं शीण । वेश्येचें धूवण वस्त्रें धूई ॥३॥

कीर्तनीं बैसतां म्हणे निद्रा येत ।खेळतसे द्यूत अहोरात्रीं ॥४॥

पुराण श्रवणीं मानीत कंटाळा । नटनाट्य खेळा पाहों जाय ॥५॥

एका जनार्दनीं ऐसा तो गव्हार । चंद्रअर्कवर नरक भोगी ॥६॥

२७०५

हरिकथा परिसोनि जरी देखसी दोष । भुजंगा तेंचि परतले विष ॥१॥

हरिनाम ऐकतां जरी न वाटे सुख । अंतरीं तुं देख पाप आहे ॥२॥

कस्तुरीचे आळां पेरिला पलांडु । सुवास लोपोनि कैसा वाडे दुर्गधु ॥३॥

धारोष्णा पय परी ज्वरितांचें मुख । थुंकोनि सांडी म्हणे कडु वीख ॥४॥

पान लागलिया गूळ न म्हणे गोडु । गोडाचे गोड तें झालें कडु ॥५॥

एका जनार्दनीं भाव नुपजे नरा । नरदेहीं आयुष्य तेंही केला मातेरा ॥६॥

२७०६

सचेतनी द्वेष अचेतनीं पूजा । भक्ति गरुडध्वजा केवीं पावे ॥१॥

व्यर्थ खटाटोप नाथिला पसारा । गोविंद गव्हारा केवीं कळे ॥२॥

हरिदासाचेनि गुणें शिळा दैवतपणें । त्या शिळा पुजोनि त्याचें द्वेषा ॥३॥

एका जनार्दनीं नाथिलाची दावी । सजीव निर्जिवों गोंवियेलें ॥४॥

२७०७

मत्सर ज्ञानीयातें न सोडी । मा इतर कायसीं बापुडीं ॥१॥

शिणताती मत्सरवेधे । भोगिताती भोग विविधें ॥२॥

निर्मत्सर भजनीं गोष्टीं । ऐसा कोण्ही नाहीं सृष्टीं ॥३॥

एका जनार्दनीं मत्सर । तेणें परमार्थ पळे दूर ॥४॥

२७०८

जाहला बहु दीन । मग म्हणे नारायण ॥१॥

तया हीन पामरासी । ब्रह्महत्या घडल्या राशी ॥२॥

जें न करावें तें केलें । मग राम म्हणोनि डोले ॥३॥

काय तयाचें तें गाणें । जैसें मोलाचें रडणें ॥४॥

शुद्ध भावांवांचुनी निका । एका जनार्दनीं नाहीं सुटका ॥५॥

२७०९

कामधेनु देउनी पालटा । अजा घे जैसा करंटा ॥१॥

तैसा ठकला कीर्तनीं । निशिदिनीं गाय गाणीं ॥२॥

दवडोनियां हिरकणीं । वेंची आनंदें गारमणी ॥३॥

ऐसा अभागी पामर । एका जनार्दनीं म्हणे खर ॥४॥

२७१०

ज्ञान ध्यान वर्म शाब्दिक कवित्व । हे तो न कळे अर्थ मूढाप्रती ॥१॥

राम सुखें गावा राम सुखें गावा । वाचे आठवावा कृष्ण सदा ॥२॥

एका जनार्दनीं राम कृष्ण मनीं । भजा आसनीं शयनीं सर्वकाळ ॥३॥

२७११

भजन तें साचें भोळ्या भाविकासी । पैं अभाविकासी नरकवास ॥१॥

भोळियाचा देव अंकित भोळा । अभाविका चांडाळा जवळीं नसे ॥२॥

एका जनार्दनीं भावाचें कारण । अभाविका जाण दुःख पीडा ॥३॥

२७१२

गजाचें तें वोझें गाढवासी न साजे । भाविकाचे भजन अभाविका न विराजे ॥१॥

पतिव्रतेची रहाटी सिंदळीसी न साजे । श्रोतियाचें कर्म हिंसक लाजे ॥२॥

एका जनार्दनीं कवित्व सर्वांसी साजे । वाचे श्रीगुरु म्हणतो कदा न लाजे ॥३॥

२७१३

जया अनुताप वैराग्य । तया म्हणती पहा अभागी ॥१॥

वरे अरी दांभिक आचार । तया म्हणती पवित्र नर ॥२॥

जया बोले मनुष्य मरे । तया म्हणती सिद्धत्व खरें ॥३॥

एका जनार्दनीं बोध । अभाविकासी हाचि खेद ॥४॥

२७१४

अविश्वासी वाडेंकोडें । जेथें जाय तेथें सांकडें ॥१॥

अंगोअंगीं कष्ट सदा । ऐसी तयासी आपदा ॥२॥

जिकडे जाय तिकडे कष्ट । नोहे परमार्थी वरिष्ठ ॥३॥

एका शरण जनार्दनीं । अविश्वास त्यागा झणीं ॥४॥

२७१५

अभाविक यासी न रुचे भजन । सदा पिशाच्चपण देह त्याचा ॥१॥

असोनि संसारीं प्रेतवत देहे । काळ मुखा वाहे भार सदा ॥२॥

जगीं अपकीर्ति फजितीचें जिणें । सदा तें लपणें श्वानापरी ॥३॥

एका जनार्दनीं ऐसें तें पामर । भोगिती अघोर कल्पकोटी ॥४॥

२७१६

गर्दभाचे अंगीं चंदनाची उटी । व्यर्थ शीण पोटीं लावूनियां ॥१॥

श्वान तो भोजनीं बैसविली अढळ । परी वोकावरी ढाळ जाऊं नेदी ॥२॥

सूकरा लेपन कस्तुरीचें केलें । परी तो लोळे चिखलां सदा ॥३॥

एका जनार्दनीं अभाविकाचे गुण । व्यर्थ शीण जाण प्राणियासी ॥४॥

२७१७

केलिया कर्मा येत असे वांटा । अभागी करंटा मतिमंद ॥१॥

जेथें राहे उभा दिसे दैन्यवाणा । चुकला भजना गोविंदाच्या ॥२॥

एका जनार्दनीं नामाच्या उच्चारा । न करितां अघोरा जाती प्राणी ॥३॥

२७१८

ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोठा । प्रेमें पितो घोटा घटघटा ॥१॥

हातें मोर्‍या उपशी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कंटाळतो ॥२॥

गाईस देखुनी बदबदा मारी । घोड्याची चाकरी गोड वाटे ॥३॥

एका जनार्दनीं ऐसें झाले प्राणी । जन्मोनियां जनीं व्यर्थ आले ॥४॥

२७१९

शुद्रादिक वर्ण त्याचे पाय धुती । उपदेश घेती तयाचे गा ॥१॥

वेदशास्त्रांलागीं अव्हेर करती । आपुलाले मती पाषांडी ते ॥२॥

आचार सांडोनी होती शब्दज्ञानी । व्यर्थ अभिमानी पडताती ॥३॥

एका जनार्दनीं ऐसिया पामरा । केवीं विश्वंभरा पावसील ॥४॥

२७२०

नित्य हाटपाय आचार सपाट । कारभार दाट असत्याचा ॥१॥

कैंचे सोवळें कैंचें ओवळें । प्रातःकाळीं शिळें भक्षिताती ॥२॥

कैंचे चोखटपण अंतरीं मळीन । दिसे कळाहीन पापिष्ठ तो ॥३॥

एका जनार्दनीं अवघा अनाचार । दाविती आचार वरीवरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP