मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय २८

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय २८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नम : ॥

॥ भीष्मासि ह्मणे कुंतीनंदन ॥ आतां गोदानविधी विस्तारोन ॥ मज सांगा तंव नंदन ॥ सांगता होय गंगेचा ॥१॥

कीं उद्दालकोपारव्यान पाहें ॥ इयेअर्थी प्रसिध्द आहे ॥ तें सांगत असें राहें ॥ सावधान ॥२॥

कोणेएके समयीं जाण ॥ उद्दालकें दीक्षा घेवोन ॥ नासिकेतसुता ह्मणे आपण ॥ माझी सेवा कीजे त्वां ॥३॥

मी दीक्षा पुरश्वरणादी ॥ तुज सांगेन बरवियाविधीं ॥ तें वाक्य मानिलें सुबुध्दी ॥ नासिकेतं ॥४॥

ऐसा नियम चालिला ॥ तंव ऋषी पुत्रासि बोलिला ॥ कीं मी स्नानार्थ गेलों वहि्ला ॥ होतों नदीतीरासी ॥५॥

तेथें इध्मदर्भकलश ॥ विसरोनि आलों परियेस ॥ ते घेवोनि येई सर्वश: ॥ ऐकोनि येरु चालिला ॥६॥

पाहे तंव नदीवेगांतीं ॥ ते पदर्थ वाहावलेती ॥ यास्तव नदेखतां पितयाप्रती ॥ येवोनि सांगे ॥७॥

ह्मणे तेथ नदेखों पदार्था ॥ ऐसें ऐकोनियां पिता ॥ प्राह्लीं क्षुधातुर होता ॥ कोपला ह्मणोनी ॥८॥

ह्मणे तूं यम पाहीं वहिला॥ ऐसा पितें पुत्र शापिला ॥ बाळ विनविता जाहला ॥ कर जोडोनी ॥९॥

प्रसन्न व्हावें जी स्वामी ॥ तंव नासिकेत पडिला भूमीं ॥ ऐसें पितें पुत्र देखोनि वर्मी ॥ पश्वात्ताप पावला॥१०॥

ह्मणे म्यां अनर्थ काय केला ॥ मग पुत्रावरी पडिला ॥ सर्वदिवस अतित्र्कमल ॥ आणि रडतां रात्रीही ॥११॥

पुत्र होता गतप्राण ॥ तो नेत्रोदकें सचेतन ॥ होवोनियां उठिला जाण ॥ दुजे दिनीं प्रात: काळीं ॥१२॥

पिता पाहे तंव दिव्यमाळा ॥ परिमळालंकृत देखिला ॥ मग पुत्राप्रति बोलिला ॥ देखिला कीं यमलोक ॥१३॥

बाळा माझे भाग्येंकरुनी ॥ परावर्तलासि मागुतेनी ॥ परि तेथें जें देखिलें नयनीं ॥ तें विस्तारोनि सर्व सांग ॥१४॥

यावरी नासिकेत बोलिला ॥ ताता तुमचिये आज्ञें वहिला ॥ म्यां यमलोक पाहिला ॥ संयमिनीनगरीये॥१५॥

यमराजें मज देखिलें ॥ अर्घ्यपाद्यें पूजिलें ॥ मग संतोषें तुह्मां पुसिलें ॥ ह्मणे केउती कृपा केली ॥ १६॥

म्यां मग सांगीतलें जरी ॥ देवा आलों तुझिये नगरीं ॥ जें कांहीं असेल अंतरीं ॥ तें करावें ॥१७॥

परी यम ह्मणे सर्वथा ॥ स्वामी असत्य कां बोलतां ॥ पितयानें ह्मणितलें सुता ॥ कीं जा यमासि पाहें॥१८॥

मग ह्मणे अत: पर पाहें ॥ तुमचें दर्शन जाहलें लाहें ॥ पिता शोक करीत आहे ॥ तरी शीघ्र जाइंजे ॥१९॥

आतां अतिथी आहेसी ॥ ह्मणोनि मागें वरदानासी ॥ तंव म्यां ह्मणितलें तयासी ॥ दावीं पुण्यभूमिका ॥२०॥

मग विमानीं बैसविलें ॥ धार्मीकलोक दाखविले ॥ जे सुवर्णमय रचिले ॥ रत्नखचित प्रासाद ॥२१॥

गृहें वनें सरोवरें देख ॥ कल्पवृक्षादि तरु अनेक ॥ दुग्धजला नद्या सम्यक ॥ आणि घृतप्रवाहा ॥२२॥

म्यां विचरिलें यमासी ॥ कीं या भोग्य कवणासी ॥ तंव धर्म ह्मणे परियेसीं ॥ सावधानें ॥२३॥

जे दुग्धदि गोरस निरतंर ॥ सुपात्र ब्राह्मणां देणार ॥ आणि देती विधियुक्तप्रकार ॥ तयां या नदी भोग्या पैं ॥२४॥

ग्रहणादिकाळीं पुण्यदेशीं ॥ धेनु देती ब्राह्मणासी ॥ सत्पात्र तरी परियेसीं ॥ वेदाध्यायी ब्राह्मण ॥२५॥

अग्निहोत्री सुशीळ जाण ॥ कुटुंबी स्वधर्मपरयण ॥ आतां गोस्वरुप प्रमाण ॥ ऐकें ऋषिबाळका ॥२६॥

गाई पोसण घेतलिया ॥ कीं संग्रमीं जिंकिलिया ॥ अथवा घरीं वाढलिया ॥ त्या मुरव्य जाण ॥२७॥

मग देहशुध्दयर्थ उपवास ॥ दात्यानें करुनि तीनी दिवस ॥ सालंकृत ब्राह्मणास ॥ ते गाई समर्पिजे ॥२८॥

सहवत्सा कांस्यदोहना ॥ ताम्रपृष्ठी युक्तलक्षणा ॥ ऐसी दीजे सदक्षिणा ॥ ब्राह्मणासी ॥२९॥

तियेचीं रोमकूपें जितुकीं ॥ वरुषें सहस्त्रसंरव्या तितुकीं ॥ दाता वसे स्वर्गलोकीं ॥ इत्यादि पुण्यकर्ते ॥३०॥

ते इये पुण्यभूमीं वसती ॥ ऐसें यमोक्त ऐकोनि प्रीतीं ॥ मागुतेनि तयाप्रती ॥ पुसिलें मियां ॥३१॥

देवा जयासि नाहीं गाय ॥ तो केविं पावे लोकीं इये ॥ तवं यम ह्मणे उपाय ॥ ऐकें बालका ॥३२॥

गाई नाहीं तेणें बरवी ॥ घृताची धेनुका द्यावी ॥ तिळधेनुक तद्भावीं ॥ तद्भावीं जळधेनुका ॥३३॥

ऐसिया जे धेनु देती ॥ ते इयेलोकीं पावती ॥ हें ऐकोनि म्यां नमस्तुती ॥ केली यमाची ॥३४॥

यावरी आज्ञा घेवोनी ॥ निकट आलों तुमचे चरणीं ॥ गोदानमाहात्म्य ऐकोनी ॥ आणि पाहोनि धर्मातें ॥३५॥

मागुतें बोलिलें गंगासुतें ॥ ऐसेंचि माहात्म्य ब्रह्मयातें ॥ इंद्रे पुसिलें तंव तेथें ॥ हेचि थोरी उपदेशिली ॥३६॥

हेंचि मांधातें स्वभावीं ॥ पुसिलें बृहस्पतीसि पूर्वी ॥ येरें विधा कथिली बरवी ॥ ते ऐकें दत्तचित्तें ॥३७॥

ह्मणे सुंदरा बहुदुग्धवंता ॥ नवीना सवत्सा आणि शांता ॥ रोहिणी बहुळादि तथा ॥ नामें धरुनी ॥३८॥

पूर्वोक्त दानपात्रें आणोन ॥ षोडशोपचारें पूजोन ॥ उपवासत्रय करुन ॥ विधिपुर :सर ॥३९॥

देशीं काळीं देउनी । गोव्रती व्हावें दिवस तीनी ॥ एकी रात्री त्यांसवें जाणीं ॥ वसावें तेथ ॥४०॥

कीजे गोरसभक्षण ॥ कामाष्टमी आरंभून ॥ पत्नीसहित राहून ॥ वर्तावें ऐसे ॥४१॥

यथोक्त व्रत कीजे परिकर ॥ मंत्रादि विधानपुर : सर ॥ याचि गोदानें पूर्वील नृपवर ॥ महासिध्दितें पावले ॥४२॥

नृग यौवनाश्व भगीरथ ॥ मांधाता मुचुकुंद भरत ॥ नैषध सोमदत्त दशरथ ॥ दिलीपादि राजे ॥४३॥

स्वर्गी निशळ जाहले जाणीं ॥ हें गोदानफळ ऐकोनी ॥ युधिष्ठिरें कपिलादानीं ॥ तोषविलें ब्राह्मणां ॥४४॥

भीष्म ह्मणे कुंतीसुता ॥ वार्ताप्रसंगीं आनवार्ता ॥ पूर्वी वडीलकथित श्रुता ॥ जाहली मज ॥४५॥

एकदा प्रजापतीनें ऐसी ॥ आज्ञा केली दक्षपुत्रासी ॥ कीं प्रजासृष्टी विशेषीं ॥ करावी तुवां ॥४६॥

याउपरी नानाप्रकार ॥ सृष्टि करितां चराचर ॥ स्थावराहूनियां थोर ॥ जंगम रचिलें ॥४७॥

जंगम श्वापदादि प्राणी सत्य ॥ मनुष्य श्रेष्ठ तयाआंत ॥ मनुष्यांत ब्राह्मण त्यातं ॥ श्रेष्ठ यज्ञ ॥४८॥

तये यज्ञेंकरुन ॥ सोमपानादि संपूर्ण ॥ इत्यादि सृष्टिसि जाण ॥ वृत्ति केल्या ॥४९॥

अमृत जीवन देवांसी ॥ तैसेंचि स्त्रजिलें प्राणियांसी ॥ तंव जीवनचिते ब्रह्मयासी ॥ प्रार्थिलें ऋषीश्वरीं ॥५०॥

तेणें करुनि अमृतपान ॥ ढेंकर दीधला तृप्त होवोन ॥ तो सुगंधढेंकर तेणेकरुन ॥ जाहली मुखापासोनि सुरभी ॥५१॥

ते सुरभी ब्रह्मसुता ॥ असे वैष्णवी लोकमाता ॥ मग तियें स्त्रजिल्या अनंता ॥ स्वर्णकपिला ॥५२॥

त्या अमृत स्त्रवती अपूर्व ॥ एकदा वत्समुखापासाव ॥ फेन पडला तो अर्थभाव ॥ ऐकें आतां ॥५३॥

अधोभागीं होता त्रिपुरारी ॥ फेन पडिला तयावरी ॥ तेणें कोपें तृतीयनेत्रीं ॥ निघाली वन्हिज्वाळा ॥५४॥

तेणें गाई काळ्यानिळ्या ॥ काबरिया ऐशा जाहल्या ॥ परि ज्या सोमाश्रयें राहिल्या ॥ त्या उरल्या कापिल ॥५५॥

असो कोपलें देखोनि रुद्रासी ॥ ब्रह्मा ह्मणे तयासी ॥ कीं अमृतें शिंपिलासी ॥ गोउच्छिष्ट पवित्र हें ॥५६॥

चंद्रापासाव अमृत ॥ जेवीं स्त्रवतें निभ्रांत ॥ तैसे स्त्रवतें अमृत ॥ गाईपासोनी ॥५७॥

मग त्या गाईत सर्वथा ॥ एक बळीवर्द होता ॥ तया समवेत उमाकांता ॥ त्या दीधल्या ब्रहयानें ॥५८॥

मग तो वृषभ उमापती ॥ ठेविला ध्वजस्तंभीं प्रीतीं ॥ ह्मणोनि वृषांक हे रव्याती ॥ पावला शिव ॥५९॥

गाईचा पती ह्मणवोन ॥ पशुपती हें अभिधान ॥ तोचि नंदिकेश्वर जाण ॥ भारतमतें ॥६०॥

पूर्वी सोम सांगीतला ॥ तदाधारें गाई कपिला ॥ तद्दानें अनंतफळाला ॥ गणना नाहीं ॥६१॥

भीष्म ह्मणे धर्मा परियेसीं ॥ सौदासराजा सूर्यवंशीं ॥ तो एकदा वसिष्ठासी ॥ पुसता जाहला ॥ ६२॥

जी त्रैलोक्यामाजी काय ॥ सर्वात पवित्र तें आहे ॥ तंव वसिष्ठें सर्वोपायें ॥ गाई प्रतिष्ठिली ॥६३॥

ह्मणे गाईहूनि कांहीं ॥ सर्वत्रपणें पवित्र नाहीं ॥ स्वाहास्वधाकार गाई ॥ वेगळा न चले ॥६४॥

लक्ष्मी केवळ गोधन ॥ तेचिं यज्ञादिकांचें संधान ॥ तियेचें केलिया दान ॥ उभयलोकीं सुख पावे ॥६५॥

जया सहस्त्रगाई असती ॥ तेणें शतगाई दीजेती ॥ आणि शतगाई असती ॥ तेणें दहा द्याविया ॥६६॥

जया दहा असतील ॥ तो एकचि देईल ॥ परि या समस्तांचें फळ ॥ समतुल्यची ॥६७॥

जो करी शतगोदान ॥ तेणें एक वृषभ नूतन ॥ त्या गाईसहित सद्भुण ॥ द्यावा जाणीं ॥६८॥

गोमतीविद्या जपे भावें ॥ तोही महापुण्य पावे ॥ हेंचि कथिलें भीष्मदेवें ॥ युधिष्ठिरासी ॥६९॥

पूर्वी ज्या गाई स्त्रजिलिया ॥ त्याहीं ब्राह्मा तपेंकरुनियां ॥ संतोषित करुनि तया ॥ मागीतला वर ॥७०॥

कीं सर्वापेक्षां उत्कृष्टा ॥ आह्मी असावें जी श्रेष्ठा ॥ न लिंपूं न होऊं नष्टा ॥ कोणेही पापें ॥७१॥

आमुचें सर्व मळमूत्र ॥ आदिकरुनि व्हावें पवित्र ॥ याहीउपरी विचित्र ॥ एक व्हावें ॥७२॥

आमुचें दानकर्ते सद्भावें ॥ स्वर्गी गोलोकीं वसावे ॥ आह्मां अपमानिती त्यां व्हावे ॥ सर्वदोष ॥७३॥

तंव वर दे सावित्रीनाहो ॥ हें सर्व अधिकाधिक होवो ॥ यास्तव गाई श्रेष्ठ पहाहो ॥ भुवनत्रयीं ॥७४॥

लोणी दुग्ध फेन जळ ॥ जिये स्थळीं दहीं शेवाळ ॥ ऐसीया नदी वाहती पुष्कळ ॥ तेथ गोदानकर्ते पावती ॥७५॥

तंव युधिष्ठिर पुसता होय ॥ कीं सर्वात पवित्र काय ॥ हें ऐकोनि गांगेय ॥ बोलता जाहला ॥७६॥

ह्मणे पूर्वी व्यासासि भला ॥ शुकें ऐसाचि प्रश्न केला ॥ कीं सर्व यज्ञांत कोण जाहला ॥ यज्ञ थोर ॥७७॥

काय करुनि महानुभावयती ॥ स्वर्गगतीतें पावती ॥ देव काइसेनि संतोषती ॥ कोठें राहती अध्वर ॥७८॥

दानामाजी निर्धार ॥ कोण दान असे थोर ॥ आणि पवित्रांत पवित्र ॥ काय सांगा ॥७९॥

हें ऐकोनि पुत्रासी ॥ सर्व सांगे व्यासऋषी ॥ ह्मणे यज्ञाहूनि विशेषीं ॥ गोदान थोर ॥८०॥

जें केलिया स्वर्ग पावती ॥ गाईचिये विषयीं प्रीती ॥ यज्ञकर्मे राहाटतीं ॥ घृतादिकारणत्वें ॥८१॥

घृतहोमें देवादिकही ॥ संतुष्ट होताति पाहीं ॥ पवित्राहूनि पवित्र गाई ॥ त्याहूनि कांहीं नाहीं श्रेष्ठ ॥८२॥

गाईसि शिंगे नव्हतीं पाहिलीं ॥ पाठी इहीं तपश्वर्या केली ॥ ब्रह्मयापासोनि लाधलीं ॥ श्रृंगें देखा ॥८३॥

ऐशा गाई पूजीजती ॥ तरी पुत्रपौत्रीं होय स्वर्गती ॥ हें शुकें ऐकोनि प्रीतीं ॥ पूजिल्या गाई ॥८४॥

तैशा तूंही पूजीं धर्मराया ॥ तंव येरु ह्मणे गागेया ॥ गाईचे मूत्रा आणि गोमया ॥ लक्ष्मीयुक्त ऐकितों ॥८५॥

हा संदेह टाळिजे ॥ तंव बोलिलें गंगात्मजें ॥ इये अर्थी अवधारिजे ॥ प्राचीनकथा ॥८६॥

पूर्वी कोणेएके समयीं ॥ दैत्यांसि टाकोनियां पाहीं ॥ गाई होत्या तिये ठायीं ॥ लक्ष्मी प्राप्त जाहली ॥८७॥

तंव गाईनीं पुसिलें तिये ॥ संदुरे त्रैलोक्यरमणीये ॥ तूं देवता कोण काय ॥ ऐकोनि लक्ष्मी बोलिली ॥८८॥

मी वल्लभ सर्वा स्वयमेव ॥ लक्ष्मी असे माझें नांव ॥ म्यां दैत्य टाकिले अपाव ॥ जाहला तयां ॥८९॥

मग देव अधिष्ठिले ॥ ते परमसुखी जाहले ॥ आतां वसावया आल्यें ॥ तुह्मांमध्यें ॥९०॥

येरी ह्मणती तूं चंचळ पाहीं ॥ तुज वसणें सर्वाठायीं ॥ बरवा वोखटा विचार नाहीं ॥ आह्मांत राहण्या योग्य नव्हसी॥९१॥

तंव लक्ष्मी बोलिली भयें ॥ मी तुह्मांत आलियें ॥ तरी अंगिकार न करा हें ॥ उचित नव्हे ॥९२॥

याउपरी ह्मणती गाई ॥ तुझी अपमानता कांहीं ॥ आह्मी करिजेत नाहीं ॥ तूं चंचळ ह्मणोनि वर्जितों ॥९३॥

तंव श्री ह्मणे परियेसा ॥ करुनि अनेक तपस्या ॥ माझी कृपाकटाक्षइच्छा ॥ ब्रह्मादि करिताती ॥९४॥

त्या मज तुह्मी केवळ ॥ अपमानिली हे रव्याती होईल ॥ तरी तुमचा कुत्सित असेल ॥ देहभाग जो ॥९५॥

तेथ मी वसेन सही ॥ तंव ह्मणती सकळ गाई ॥ अवो आह्मांमध्यें कांहीं ॥ नाहीं कुत्सित ॥९६॥

मग सर्वगाईनीं विचरोनी ॥ गोमय गोमूत्राचिये स्थानीं ॥ पद्मालयेचें वास्तव्य जाणीं ॥ कल्पिलें देखा ॥९७॥

ऐसा करितांचि संकेत ॥ लक्ष्मी रीघाली गोमूत्रशेणांत ॥ ह्मणोनि हा प्रभाव यथार्थ ॥ सांगीतला ॥९८॥

तंव धर्म प्रश्न करी ॥ गोलोक सर्वलोकांउपरी ॥ हें सांगिजे उत्तरीं ॥ मग भीष्म बोलिला ॥९९॥

ऐकें इंद्रब्रह्याचा इतिहास ॥ पूर्वी इंद्रें मारिलें दैत्यांस ॥ तेणें पावले संतोष ॥ समस्त देवऋषी ॥१००॥

मग ब्रह्मयाजवळी गेले ॥ आनंदे सेवा करिते जाहले ॥ तेथें इंद्रें ब्रह्मया पुसिलें ॥ कीं गोलोक उच्च कां पां ॥१॥

यावरी ब्रह्मा ह्मणे कांहीं ॥ गाईचा महिमा जाणवत नाहीं ॥ गाईवांचोनि कांहीं ॥ यज्ञसिध्दि नपवती ॥२॥

वृषभ तरी गाईचे सुत ॥ तयांपासाव कृषि होत ॥ धान्यें निपजत आहेत ॥ व्रीह्यादिकें॥३॥

आणि गाईपासोनि घृतोत्पत्ती ॥ ऐसी उभयपदार्थी ॥ होय यज्ञाची निष्पत्ती ॥ ह्मणोनि गाई उत्तमा ॥४॥

आतां लोकीं उच्चताकारण ॥ तेंही ऐकें सावधान ॥ पूर्वी देवयुगीं जाण ॥ अदिती कश्यपकांता ॥५॥

तियें तप केलें पुत्रार्था ॥ तें देखोनि दक्षसुता ॥ सुरभी ही गौमाता ॥ तपश्वर्या करित ॥६॥

दिव्यवर्षसहस्त्र अमूप ॥ धर्मार्थ करीतसे तप ॥ तें देखोनियां समीप ॥ मी संतोषें पावलों ॥७॥

म्यां ह्मणितलें सुरभीसी ॥ वर मागें वो मजपाशीं ॥ येरी ह्मणे मजसी ॥ नाहीं मागणें ॥८॥

ऐकोनि ऐसिया बोला ॥ मज थोर आनंद जाहला ॥ मग ह्मणें तुझा लोक भला ॥ होईल सकळांवरी ॥९॥

भूलोकीं तुझिया संतती ॥ त्या सर्वा पूज्य होती ॥ जरामरणाची भीती ॥ नाहीं लोकीं तुझिये ॥११०॥

नाहीं अमंगळ कांहीं ॥ हें विधीनें सांगतां पाहीं ॥ इंद्रें असाधारण गाई ॥ मनिल्या देखा ॥११॥

धर्मरायासि ह्मणे भीष्म ॥ हें गोमाहात्म्य उत्तम ॥ तुज कथिलें संकलोन ॥ प्रसंगानुसार ॥१२॥

तंव धर्म ह्मणे गंगानंदना ॥ गाई भूमी स्वर्ण जाणा ॥ हीं महादानें दक्षिणेविना ॥ निर्फळ होती ॥१३॥

ते दक्षिणा आणि स्वर्ण एक ॥ त्याची उत्पत्ति किमात्मक ॥ हें सांगावें इत्यादिक ॥ मग ह्मणे भीष्म ॥१४॥

पूर्वी ऐकें कुंतीसुता ॥ नाशला शंतनु माझा पिता ॥ मग मी श्राध्द कराया तत्वतां ॥ गेलों गंगाद्वारीं ॥१५॥

तेव्हां जान्हवी माउली ॥ तेही मज साह्य जाहली ॥ मग दर्भ घातले भूमंडळीं ॥ वेदाज्ञाप्रमाण ॥१६॥

पिंड देऊं मांडिला त्यांवरी ॥ तों दर्भ भेढूनि ते अवसरीं ॥ शंतनूचा हात बाहेरी ॥ निघाला प्रत्यक्ष ॥१७॥

तो चिन्हांनीं ओळखिला ॥ मनीं विस्मय वाटला ॥ कीं साक्षात् पिता आला आपुला ॥ पिंड घ्यावयासी ॥१८॥

विचार उपजला याउपरी ॥ जे वेदाज्ञा पिंड द्यावा दर्भावरी ॥ तरी प्रत्यक्ष पिंड घेवोनि करीं ॥ काय पितें करिजतें ॥१९॥

ऐसें मनीं निर्धारोन ॥ केलें शास्त्रोक्त पिंडदान ॥ तेव्हां हस्त अंतर्धान ॥ पावला तोची ॥१२०॥

याउपरी रात्रौ स्वप्नीं ॥ सर्वपितर संतोषोनी ॥ बोलिले मजप्रती येवोनी ॥ धन्य सुता सर्वज्ञा ॥२१॥

कां जे शास्त्रप्रमाण कव्हणी ॥ राहटेचिना तुजवांचोनी ॥ हे परीक्षा पाहण्यालागोनी ॥ निघाला हस्त ॥ २२॥

आह्मी संतोषलों समग्र ॥ परि पूर्वज देव ऋषीश्वर ॥ आदिकरुनि प्राणिमात्र ॥ तरीच संतोषतील ॥२३॥

जरी जितुके दानयज्ञ ॥ तेथ दक्षिणा देशील सुवर्ण ॥ तेणें सांग धर्म सगुण ॥ होईल अधिक ॥२४॥

हें ऐकोनि जागिन्नलों ॥ थोर विस्मया पावलों ॥ सुवर्णदान करिता जाहलों ॥ तया उपरी ॥२५॥

आतां येक कथा अवधारीं ॥ परशुरामें मारुनि क्षेत्री ॥ केला अश्वमेध भारी ॥ शोधनार्थ ॥२६॥

तरी कृतपुण्यविशेषीं ॥ ऐसें वाटेचिना त्यासी ॥ तेव्हां सर्व ऋषीश्वरांसी ॥ पुसता जाहला ॥२७॥

कीं सर्वामध्ये उत्तम काय ॥ जेणें पुरुष कृतकृत्य होय ॥ तंव वसिष्ठादि उपाय ॥ सांगते जाहले ॥२८॥

अगा सर्वाहूनि जाण ॥ श्रेष्ठ असे सुवर्णदान ॥ अतएव महिमा गहन ॥ प्रत्यक्ष असे ॥२९॥

महाराजे सुरवर ॥ करिती मुकुटादि अलंकार ॥ मस्तकीं वाहती निरंतर ॥ ह्मणोनि थोर महिमा ॥१३०॥

ऐकें पूर्वी हिमाचळीं ॥ तप करितां चंद्रमौळी ॥ पर्णिता जाहला शैलबाळी ॥ तेणें जाहला तपक्षयो ॥३१॥

तो समागम देखोनी ॥ देव सभय होवोनी ॥ शंकरासी विनवणी ॥ करिते जाहले ॥३२॥

जी तूं अमोघवीर्य पशुपती ॥ आणि तैसीच हे पार्वती ॥ तरी तुमचेनि संयोगें उत्पत्ती ॥ होईल जे ॥३३॥

ते दाह करील सर्वासी ॥ ह्मणोनियां कामदेवासी ॥ कृपा करोनि सर्वासी ॥ द्यावा वर ॥३४॥

कीं अपत्याचि निमित्त ॥ योग न व्हावा स्त्रीपुरुषीं संतत ॥ सुखसमागमें सुरत ॥ व्हावें सर्वदा ॥३५॥

मग महेश प्रसन्न जाहला ॥ ऐसाचि वर दीधला ॥ पाठीं ऊर्ध्वरेता जाहला ॥ श्रीशंकर ॥३६॥

तंव देवां कोपली भवानी ॥ ह्मणे तुमचे पुत्रभयेंकरुनी ॥ काम सांडिला उच्छेदोनी ॥ माझिये प्रजेचा ॥३७॥

तरी तुह्मी देव समस्त ॥ होवाल कीं अपत्यरहित ॥ ऐसा शाप जाला तंव तेथ ॥ नव्हता वन्ही ॥३८॥

तो होता भूमिभागाखालीं ॥ आतां एकदा चंद्रमौळी ॥ वीर्य आंवरी परि भूतळीं ॥ कांहीं पडिलें ॥३९॥

तें वन्हिमाजी पडिलें ॥ तेथेचि वाढतें जाहलें ॥ पुढें तारकासुरें पीडिलें ॥ त्रैलोक्यासी ॥१४०॥

मग देव ब्रह्मया शरण गेले ॥ तया तारकोपद्रवा कथिलें ॥ ह्मणती हव्यकव्य राहिले ॥ वेदमार्ग ॥४१॥

ऐकोनि सत्यनाथ बोले ॥ जेणें वेदमार्ग उच्छेदिले ॥ तयालागीं वधा वहिले ॥ सुरवरांनो ॥४२॥

देव ह्मणती आमुचेन तया ॥ केवीं मरण होईल स्वामिया ॥ शापिलें असे पार्वतीयां ॥ कीं अनपत्यत्व पावाल ॥४३॥

येरु ह्मणे सर्वथा ॥ परि तेथें अग्नि नव्हता ॥ आणि शिवाचें वीर्य आतां ॥ असे उदरीं तयाचे ॥४४॥

तो बाळ मारील दानवा ॥ ह्मणोनि अग्नि ठायीं पाडावा ॥ तो पार्वतीभयें आघवा ॥ लपोनि रहिलासे ॥४५॥

ऐसी आज्ञा पावले ॥ देव वन्हीसि गिंवसिते जाहले ॥ तंव रसातळीं तापले ॥ मंडूकादी ॥४६॥

त्यांतील एक मंडूक आला ॥ तो देवां सांगता जाहला ॥ कीं अग्नि रसातळीं लपाला ॥ तेणें आह्मां तापविलें ॥४७॥

तापें जळ ऊष्ण जाहलें ॥ तें आह्मां नवचे साहिलें ॥ हें ऐसें सांगीतलें ॥ तें कळलें वन्हीसी ॥४८॥

तेणें शापिलें मंडुकांसी ॥ कीं रसना नव्हे तुह्मांसी ॥ ऐसें शापोनि तयांसी ॥ आपण गेला अन्यस्थळीं ॥४९॥

ते मंडूक शापिले जाणोनी ॥ कृपा केली सुरगणी ॥ कीं तुह्मां जिव्हा नसोनी ॥ नानाशब्द कराल ॥१५०॥

बिळांत वसतां केवळ ॥ निराहार क्षुधें मराल ॥ तैं पृथ्वी तुह्मां रक्षील ॥ जीवाल मागुते मृगोदकें ॥५१॥

तंव अग्नीसि पाहोनी ॥ हस्ती सांगे देवांलागुनी ॥ तें जाणोनियां वन्ही ॥ शापिता जाहला हस्तीतें ॥५२॥

कीं तुमची ज्ञाती आघवी ॥ त्यांची उफराटी जिव्हा व्हावी ॥ हें बोलोनि स्वभावीं ॥ शमीगर्गी लपाला॥५३॥

तो हस्तीचा शाप जाणोनी ॥ तया ह्मणितलें सुरगणीं ॥ कीं उफराटी जिव्हा निदानीं ॥ होईल मात्र ॥५४॥

परि तिये जिव्हें केवळ ॥ तुह्मी सर्व रस जाणाल ॥ आणि वाणीही उच्चाराल ॥ उच्चस्वरें ॥५५॥

असो शमीगर्भी अग्नि गेला ॥ तो पोपटें देखिला ॥ मग देवां सांगता जाहला ॥ ह्मणोनि तेथें देव गेले॥५६॥

तंव हें वन्हीसि कळलें ॥ मग शुकातें शापिलें ॥ कीं तुझी जिव्हा वहिलें ॥ वळो विपरीत ॥५७॥

तें जाणोनि देवीं समस्तीं ॥ ह्मणितलें तये शुकाप्रती ॥ जरी र्‍हस्व जिव्हा निरुती ॥ होईल व्यंकटा ॥५८॥

तरी तुझी वाणी शुका ॥ मनोहर होईल सकळिकां ॥ जैसें बोलणें बाळका ॥ तैसें बोलसील ॥५९॥

असो मग शमीच्या ठायीं ॥ अग्नि देखिला देवांहीं ॥ ह्मणोनि शमी समस्तांहीं ॥ मानिला श्रेष्ठ ॥१६०॥

मग अग्नि ह्मणे देवगना ॥ सांगा काय असे आज्ञा ॥ येरु ह्मणती गा कृ्शाना ॥ तारकासुरें पीडिलें ॥६१॥

आह्मां पार्वतीयें शापिलें ॥ समस्तां अनपत्य असे केलें ॥ तंव अग्नीनें सांगीतलें ॥ देवांप्रती ॥६२॥

मी वर्तेन आज्ञेप्रमाणें ॥ तुह्मीं स्वस्थळीं आतां जाणें ॥ मग बिजे केलें वन्हीनें ॥ गंगेजवळी ॥६३॥

तिये अंतरीं प्रवेशला ॥ सकळ वृत्तांत सांगीतला ॥ मग वीर्यगोळ ठेविला ॥ तियेमाजी ॥६४॥

तेथें तो गर्भ वाढतां ॥ धरुं न शके गंगामाता ॥ तंव एक दैत्य अवचिता ॥ गेला गंगेप्रती ॥६५॥

तो जळांत प्रवेशला ॥ क्रूरशब्द करिता जाहला ॥ तेणें गंगा जाहली व्याकुळा ॥ गतप्राण क्षणएक ॥६६॥

यावरी ते गर्भधारणीं ॥ अधिकचि असमर्थ होउनी ॥ अग्नीसि ह्मणे माझेनी ॥ गर्भ नाहीं धरवत ॥६७॥

तरी पीडेकरितां पाहीं ॥ गर्भ टाकितें सहसाही ॥ पूर्णसुखासुखी नाहीं ॥ जाणावें तुवां ॥६८॥

अग्नि ह्मणे तुज पाहीं ॥ सामर्थ्य असे धराया मही ॥ तरी गर्भधारणीं कां नाहीं ॥ नको टाकूं सर्वथा ॥६९॥

ऐसें वारितांही पण ॥ मेरुमस्तकीं जावोन ॥ गंगेने टाकिलें जाण ॥ तया गर्भासी ॥१७०॥

मग गंगादेवी येवोनी ॥ सर्व सांगीतलें वन्ही ॥ येरु पुसे तिये लागुनी ॥ कीं कैसा असे ॥७१॥

गंगा ह्मणे स्वामिनाथा ॥ तो असेचि ना वाढता ॥ तुजसमान स्वरुपता ॥ होवोनि असे ॥७२॥

मेरु जाहला दीप्तिमंत ॥ पद्में उत्पलें ईहीं मिश्रित ॥ नंदनवनापरी अत्यंत ॥ शीतळ तो ॥७३॥

कदंबापरी परिमळवंत ॥ तेजें सूर्यकिरणवत ॥ तेणें गर्भरसें सत्य ॥ स्पर्शिली मृत्तिका ॥७४॥

तेंचि सुवर्ण जाहलें ॥ तेज पर्वतीं उसळलें ॥ कांहीं गंडकीमाजी राहिलें ॥ ऐसा तुझा नंदन ॥७५॥

हा वृत्तांत सांगीतला ॥ तेणें अग्नी संतोषला ॥ इकडे तो गर्भगोळ पोशिला ॥ कृत्तिकांहीं ॥७६॥

ह्मणोनि कार्तिकेय नाम जालें ॥ तेज गुंफेच्याठायीं राहिले ॥ ह्मणोनि गुह नाम ठेविलें ॥ त्या बालकासी ॥७७॥

हे कार्तिकाची उत्पत्ती ॥ असे द्वितीयस्तबकीं आनमती ॥ येथें कथिली पुनरुक्ती ॥ कथाविशेषें ॥७८॥

तेणें तारकासुर वहिला ॥ स्वशक्तीनें मारिला ॥ असो जो तेजोभाग उरला ॥ तेंचि सुवर्ण ॥७९॥

ऐसी सुवर्णाची उत्पत्ती ॥ सांगीतली इये मतीं ॥ परि प्रकारांतरें वित्पत्ती ॥ असे आन ॥१८०॥

ईश्वरें वरुणरुप धरोनी ॥ याग करितां स्वनयनीं ॥ देखोनि स्वायंभुवनंदिनी ॥ स्त्रवला वीर्य ॥८१॥

तें पूषादेवें वहिलें ॥ भूमीवरी सरकटिलें ॥ अग्निमाजी टाकिलें ॥ तंव जाहले आश्वर्य ॥८२॥

ज्वाळेपासोनि भृगुविप्र ॥ अंगारापासोनि अंगिर ॥ आणि भस्मांतूनि शुत्र्क ॥ ऐसे उपजले ॥८३॥

अत्रि जाहला अश्रुपासोन ॥ रक्तापासाव कांचन ॥ ऐसा तो ब्रह्माग्नि जाण ॥ सर्वदेवमय ॥८४॥

त्याचें सारभूत सुवर्ण ॥ हे कथा वसिष्ठें आपण ॥ परशुरामाप्रति कथन ॥ केली पूर्वी ॥८५॥

मग तें तद्वाक्य ऐकोन ॥ रामें केलें सुवर्णदान ॥ पावता जाहला संतोष गहन ॥ तये वेळीं ॥८६॥

ऐसा इतिहास धर्मे ऐकिला ॥ ययाउपरी भीष्म प्रार्थिला ॥ ह्मणे जी श्राध्दविधी वहिला ॥ सांगा मज ॥८७॥

तंव भीष्म ह्मणे प्रत्यक्ष ॥ तेथ काळ कृष्णपक्ष ॥ बाराही मासांचें लक्ष्य ॥ तयामाजी ॥८८॥

प्रतिपददिकीं अनेक ॥ फळें पाविजती देख ॥ तैसींच नक्षत्रीं बहुतेक ॥ कामनाश्राध्दें ॥८९॥

द्रव्यें तिळ यवादि प्रसिध्द ॥ शाली सुगंधा उडिद ॥ मृगादिकांचीं मांसें विविध ॥ बोलिलीं असती ॥१९०॥

गोघृत गोदुग्धसार ॥ गुड शर्करा पवित्र ॥ श्वेतजिरें उपस्कर ॥ इत्यादिकें ॥९१॥

अपराण्हादि काळ जाण ॥ पात्रें कांस्य रौप्य सुवर्ण ॥ आतां वर्जित ब्राह्मण ॥ सांगत असें ॥९२॥

असत्यवादी रोगग्रस्त ॥ पशुस्वामी वेदरहित ॥ वाढ घेणार व्याजगृहीत ॥ गायक कपटी ॥९३॥

पितयाचें वाक्य न करी ॥ परगामिनी ज्याची नारी ॥ सर्व वित्र्कयी अनाचारी ॥ गृहदाहक ॥९४॥

विषादादि सामुद्रिकलक्षणज्ञ ॥ राजयाचा सेवकजन ॥ तेलकरी गंधवादी जाण ॥ जया आळ आला असे ॥९५॥

सुतारकाम करणार ॥ मित्रद्रोही आणि चोर ॥ श्वानसर्पे खादला पामर ॥ इत्यादिक वर्जावे ॥९६॥

आतां कुळशीलसंपन्न शांत ॥ जितेंद्रिय मातृपितृभक्त ॥ आणि तयांच्या वचनांत ॥ राहे सदा ॥९७॥

नूतन जाहला अग्निहोत्री ॥ वेदपाठक सदाचारी ॥ आणि ऋतुकाळीं करी ॥ स्वस्त्रीगमन ॥९८॥

ऐसियांचे ठायीं अवधारीं ॥ श्रेध्देंकरुनि श्राध्द करी ॥ अत्र्कोध नम्र ब्रह्मचारी ॥ पूर्वदिनीं असावें ॥९९॥

तैसेचिं श्राध्ददिवशीं ॥ राहिजे ऐसिये नियमेंसी ॥ हें करी तो उत्तमलोकाशी ॥ पावे जाण ॥२००॥

तंव युधिष्ठिरें पुसिलें ॥ हें श्राध्द कोठोनि वर्तलें ॥ यावरी भीष्मदेव बोले ॥ कीं ऐकें धर्मा ॥१॥

पूर्वी स्वायंभुवमन्वंतरीं ॥ त्याचेचि वंशीं अवधारीं ॥ दत्तात्रेय नामें धरत्रीं ॥ राजा जाहला ॥२॥

त्याचा तिमिराज नृपवर ॥ त्याचा श्रीकांत नामें पुत्र ॥ तो तप करुनि वर्षसहस्त्र ॥ पावला मरण ॥३॥

त्याचा पुत्र शोक करितां ॥ अंतरीं विव्हळ होत्साता ॥ कल्पनें जाहला संपादिता ॥ श्राध्दा योग्य पदार्थ ॥४॥

प्रात:काळीं अंवसेसी ॥ आमंत्रिलें ब्राह्मणांसी ॥ मग पित्याचे उद्देशीं ॥ केलें श्राध्द ॥५॥

श्राध्दयज्ञ पूर्ण करोनी ॥ विचारिता जाहला मनीं ॥ हें म्यां काय केलें झणी ॥ ऋषिपितर क्षोभतील ॥६॥

हें स्वेच्छें सर्व केलें ॥ तेणें भय थोर उपजलें ॥ मग दत्तात्रेया स्मरिलें ॥ तंव तो पावला ॥७॥

तो तयासि बोलिला ॥ पूर्वी हा पितृयज्ञ मनें कल्पिला ॥ तो तुवां सर्वथा केला ॥ तरी भय न धरावें ॥८॥

हा केवळ धर्म परियेसीं ॥ दृष्ट असे ब्रह्मयासी ॥ तुजवांचोनि आणिकासी ॥ स्फुरण नोहे ॥९॥

पाठीं दत्तात्रेयें कांहीं ॥ अग्नौकरणादिक पाहीं ॥ धर्म उरला होता तोही ॥ उपदेशिला ॥२१०॥

ऐसिया उपरी सत्य ॥ परंपरा श्राध्दकृत्य ॥ भूमंडळीं यथार्थ ॥ प्रचरलें हें ॥११॥

आतां छत्रउपानहदानकथा ॥ इतिहास ऐकें कुंतीसुता ॥ पूर्वी जमदग्नी त्र्कीडतां ॥ बाण टाकी लक्षावरी ॥१२॥

आणि रेणुकेसि ह्मणे ॥ तुंवा बाण आणोनि देणें ॥ येरी जाय पतिवचनें ॥ आणोनि वोपी ॥१३॥

ऐसी दोघीं त्र्कीडा मांडिली ॥ तंव माध्यान्हवेळा जाहली ॥ मस्तकीं उष्णें पीडली ॥ रेणुकामाता ॥१४॥

मग द्राक्षीछाया देखिली ॥ तेथें घडियेक विश्रामली ॥ पाठीं जमदग्नी जवळी आली ॥ कोपोनि येरु बोलिला ॥१५॥

कां पां विलंब लाविला ॥ सतीसि चळकंप सूटला ॥ ह्मणे पाई पोळ जाहला ॥ पीडलें शरीर ॥१६॥

ह्मणोनि द्राक्षीतळीं भलें ॥ स्वामिया विश्रामलियें ॥ कोप न करावा येरु हें ॥ ऐकोनि बोलिला ॥१७॥

जेणें सूर्यें ऐसे पीडिलें ॥ तोचि विधनि पाडूं खालें ॥ हें ऐकोनि द्विजरुप धारिलें ॥ भास्करें देखा ॥१८॥

नमन करुनि जमदग्नीस ॥ ह्मणे स्वामिया आठमास ॥ सूर्ये शोषूनि घ्यावे रस ॥ किरणें करुनी ॥१९॥

आणि चातुर्मास्यीं बरवें ॥ समयीं नीर वर्षावें ॥ तेणें अन्न होय आघवें ॥ सर्वप्राण मूळ ॥२२०॥

तेणें अन्नें होती यज्ञ ॥ अन्नछत्रादि धर्म जाण ॥ चालताती तरी कवण ॥ अपराध सूर्याचा ॥२१॥

तंव ऋषि ह्मणे केवळ ॥ उष्ण नलगे वाटे शीतळ ॥ ऐसा उपाय कीं सकळ ॥ विचारावा तेणें ॥२२॥

सवेंचि जमदग्नी ह्मणे ॥ म्यां तुज सूर्य जाणिलें ज्ञानें ॥ तरी शरणागता मारणें ॥ उचित नव्हे ॥२३॥

मग सूर्ये छत्रपादुका ॥ दीधल्या ऋषीप्रति देखा ॥ तैहूनि प्रचार जाहला ऐका ॥ छत्रपादुकांचा ॥२४॥

तरी छत्रउपानह देती ॥ ते इहपरलोकीं सुखी होती ॥ तथा देवतांसि मालती ॥ चंपकपद्मादिकें ॥२५॥

पुष्पें आणि सुगंध धूप ॥ गोघृताचे लाविती दीप ॥ तेणें सौभाग्यस्वरुप ॥ युक्त होती ॥२६॥

उत्तमलोक पावे अंतीं ॥ तळीं विहिरी कूप बांधिती ॥ हीं जळदाने बोलिजती ॥ धर्मशास्त्रीं ॥२७॥

तथा आंबावडपिंपळ ॥ इत्यादि वृक्षसुशीतळ ॥ रोपण केलिया अनंतफळ ॥ तेणें पूर्वज उध्दरती ॥२७॥

स्वर्गलोक अक्षय होय ॥ दु:खदरिद्र दूर जाय ॥ हे दानधर्म पाहें ॥ धर्मशास्त्रीं ॥२९॥

तेवींच बळिदानें भारता ॥ गार्हस्थ्यधर्म रक्षितां ॥ उभयकाळीं बळिहरण करितां ॥ पावे उत्तमलोक ॥२३०॥

कनिष्ठ मध्यम उत्तम ॥ अनुत्र्कमें करितां धर्म ॥ विद्याधर गंधर्वलोक नाम ॥ स्वर्गलोक त्र्कमेंची ॥३१॥

गोलोक ब्रह्मलोकदिक ॥ पुण्यानुसार प्राप्त देख ॥ ऐसे पुण्यात्मे नानालोक ॥ पावताती त्र्कमेंची ॥३२॥

महापुण्यप्रभावें देख ॥ भगीरथादि राजे अनेक ॥ पावले देखोनि सम्यक ॥ ब्रह्में तयां विचारिलें ॥३३॥

कीं तुह्मी इये लोकीं आघवे ॥ आलेति कोणे दानप्रभावें ॥ तंव ते ह्मणती ऐकावें ॥ स्वामिनाथा ॥३४॥

भागीरथीतीर्थसेवनें ॥ नानासुवर्ण कोटिदानें ॥ केलीं वांच्छारहितमनें ॥ तथोपवासादी ॥३५॥

हीं केलीं तेणें तपोबळें ॥ तुमचें दर्शन येथ जाहलें ॥ तरी उपवासादि सकळें ॥ तपें जाणिजे ॥३६॥

दरिद्रें एकांतर उपोषण ॥ दूसरे दिवशीं कीजे भोजन ॥ कीं तिसरे दिवशीं भोजन ॥ त्र्कमें येणेंची ॥३७॥

मासोपवासांत उपोषण ॥ करी त्याचें उद्यापन ॥ शत्त्क्यनुसार ब्राह्मणभोजन ॥ करी जो कोणी ॥३८॥

तो सुकृततारतम्यें जाण ॥ पावे उत्तमोत्तमस्थान ॥ लोकप्राप्ती होय जाण ॥ त्र्कमेंचि राया ॥३९॥

हें अनुशासिकीं भलें ॥ भीष्में सविस्तर सांगीतलें ॥ तेंचि संक्षेपें निरुपिलें ॥ श्रोतयांसी ॥२४०॥

आतां याचिये पुढील कथा ॥ भीष्म सांगेल पंडुसुता ॥ तेचि वैशंपायन वक्ता ॥ बोलेल भारतेंसीं ॥४१॥

तेंचि संकलोनि सर्व ॥ सांगों विस्तारभयास्तव ॥ हे दानधर्म अपूर्व ॥ ह्मणे मधुकरकवी ॥४२॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ दानधर्मकथनप्रकारु ॥ अष्टाविंशतितमाध्यायीं कथियेला ॥२४३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP