मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय २५

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय २५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

वैशंपायन ह्नणती राया ॥ धर्मे पुसिलें गंगातनया ॥ कीं शिवमहिमा सांगें स्वामिया ॥ आणि सहस्त्र नामें ॥१॥

तंव ह्नणे गंगानंदन ॥ शिवाचा महिमा असे गहन ॥ नकळे ब्रह्मादिकांलागुन ॥ शिवापासोनि विश्व हें ॥२॥

शंभु स्वामी जगत्राचा ॥ भोळा ईश सर्वाचा ॥ वर्णितां कुंठित होय वाचा ॥ शेषादिकांची ॥३॥

तेथ माझा पाड कवण ॥ परि हें शिवचरित्र जाण ॥ साक्षात जाणे श्रीकृष्ण ॥ येर पारा नपवती ॥४॥

जो पुत्रकामस्वार्था ॥ बद्रिकाश्रमीं गेला होता ॥ ह्नणोनि त्यासी हे कथा ॥ पुसावी तुवां ॥५॥

मग उठिला युधिष्ठिर ॥ करी कृष्णासि नमस्कार ॥ पुसे शिवमहिमा विचार ॥ आणि सहस्त्रनामें ॥६॥

श्रीकृष्ण ह्नणे कुंतीसुता ॥ शिवाचा महिमा सांगतां ॥ वर्षे लागतील बहुता ॥ गहन ह्नणवोनी ॥७॥

परि तूं श्रोता सम्यक ॥ आणि हे ब्राह्मण आर्तिंक ॥ यास्तव सांगतों आइक ॥ संक्षेपोनी ॥८॥

मग देवें करुनि आचमन ॥ शुचिष्मंत होवोन ॥ ह्नणे धर्मा सावधान ॥ ऐकें ऋषींसहित ॥९॥

कवणी एके दिनीं ॥ रुक्मिणीचे पुत्र देखोनी ॥ पुत्रनिमित्त मजलागोनी ॥ प्रार्थी जांबुवंती ॥१०॥

ह्नणे स्वामी प्राणनाथा ॥ तूं त्रिलोकींचिये नाथा ॥ तुजलागीं काय करितां ॥ अशक्य असे ॥११॥

तरी आपुले समान ॥ मज द्यावा जी नंदन ॥ तप वारावरुषें दारुण ॥ केलें भीमकीसाठीं ॥१२॥

आणि पुत्र मागीतले बरवे ॥ तरी मजही तैसेचि द्यावे ॥ तें जांबुवंतीवाक्य भावें ॥ मानिलें आह्मीं ॥१३॥

आज्ञा गुरुकुळाची घेतली ॥ त्यांहीं आशीर्वचनें दिलीं ॥ गरुडारुढ मी तत्काळीं ॥ गेलों पुत्रप्रयत्ना ॥१४॥

शीघ्र पावलों कैलासासी ॥ देखोनी संतोष वाटला मानसीं ॥ तंव आश्रम देखिला दृष्टीसी ॥ उपमन्यूचा ॥१५॥

तेथें पढती द्विजवर ॥ तें वर्णितां होईल विस्तार ॥ जंव मी गेलों समोर ॥ तंव मुनिराज देखिला ॥ ॥१६॥

जटावल्कल शोभिवंत ॥ परम तापसी तेजद्भुत ॥ भोंवते शिष्य पढत ॥ मध्यें विराजमान ॥१७॥

नूतन वय देखिलें ॥ तंव येरें ह्नणितलें ॥ देवा बरवें बिजे केलें ॥ थोर भाग्य आमुचें ॥१८॥

तप सफळ जाहलें आमुचें ॥ चरण देखिले तूमचे ॥ मनोरथ पुत्रप्राप्तीचे ॥ होतील सफळ ॥१९॥

येथ राहिजे श्रीपती ॥ नांदती प्रत्यक्ष शंभुपार्वती ॥ तपस्वी मुनी बहुतांरीतीं ॥ पावले सिद्धीतें ॥२०॥

आणि ह्नणे गा सर्वेश्वरा ॥ आतां ऐकें ममचरित्रा ॥ प्रसन्न करोनि घेतलें शंकर ॥ तें सांगेन तुज ॥२१॥

पूर्वी कृतयुगीं परियेसीं ॥ व्याघ्रपाद नामें ऋषी ॥ त्याचा मी पुत्र मजसी ॥ धौम्यबंधु दुसरा ॥२२॥

नित्य आमुची माता देख ॥ दुग्धाभावी पिष्टोदक ॥ पाजी तें आह्मीं जाणो सम्यक ॥ कीं दुग्ध तें हेंची ॥ ॥२३॥

तंव कोणे एके दिवशीं ॥ आह्मां सहित पितयासी ॥ नेलें यज्ञमंडपासी ॥ रायें मूळ करोनी ॥२४॥

तेथें बहु दुग्ध होतें ॥ तें वाढिलें आह्मातें ॥ अमृतप्राय निरुतें ॥ लागलें स्वादकर ॥२५॥

यावरी गांवासि आलिया ॥ पिष्टोदक पाजी माया ॥ तें निस्वाद मग मियां ॥ ह्नणितलेंसे ॥२६॥

हें तंव दुग्ध नव्हे माते ॥ कां फसवितेसि आमुतें ॥ ऐसें ऐकोनि तियेतें ॥ जाहलें दुःख ॥२७॥

ह्नणे बापा ऐकें वचन ॥ निःकांचन वनचरें आपण ॥ दरिद्रियां मिळे गोधन ॥ कैसें सांग ॥२८॥

जन्मांतरीं पूजिजे अनंत ॥ तैं समृद्धि पावे बहुत ॥ कां शंभुप्रसादें प्राप्त ॥ भाग्य होय ॥२९॥

म्यां पुसिलें मातेसी ॥ कोण तो शंभु पूजा कैशी ॥ कोठें वास प्राप्ति कैसी ॥ कैं प्रसन्न होइजे ॥३०॥

तंव माता करी अश्रुपात ॥ प्रेमें मस्तकीं फिरवी हात ॥ चुंबन देवोनि स्फुंदत ॥ ह्नणती जाहली ॥३१॥

अरे तो शंकर बाळका ॥ दुराराध्य असे सकळिकां ॥ अनंतरुपें ब्रह्मादिकां ॥ नाकळे जो ॥३२॥

तया देवाची करितां भक्ती ॥ सर्व मनोरथ पूर्ण होती ॥ त्यादिवसापासोनि श्रीपती ॥ म्यां तपातें मांडिलें ॥३३॥

दिव्यसहस्त्रवरुषें सत्य ॥ अंगुष्ठाग्रीं एकशत ॥ पर्णाशनीं निभ्रांत ॥ शतें दोनी ॥ ॥३४॥

सातशतें वायुभक्षण ॥ ऐसीं सहस्त्रवरुषें जाण ॥ तंव इंद्ररुपें प्रसन्न ॥ जाहला श्रीशंकर ॥३५॥

ह्नणे माग बाळा वरदान ॥ तंव म्यां ह्नणितलें वचन ॥ कीं मज नाहीं इंद्रप्रयोजन ॥ पाहिजे देव शंकर ॥३६॥

जें शंकर देईल वरदान ॥ तेंचि मी घेईन जाण ॥ एक शिवभक्तीवांचोन ॥ वृथा वाटे स्वर्गसुख ॥३७॥

ऐकोनि ह्नणे मावइंद्र ॥ कोण तुझा आहे शंकर ॥ ज्यासी ध्यातोसी निरंतर ॥ अवगणोनि आह्मांसी ॥३८॥

म्यां ह्नणितलें तयासी ॥ कीं जो कर्ता सकळांसी ॥ तुमचा स्वामी तुह्मासी ॥ नकळे केवीं ॥३९॥

ब्रह्मयासी ब्रह्मपद ॥ तुज दीधलें इंद्रपद ॥ जो सर्वव्यापक प्रसिद्ध ॥ तिहींलोकीं ॥४०॥

सर्वव्यापक ईशान ॥ तयाजवळी वर मागेन ॥ तो देईल तेंचि घेईन ॥ हें माझें व्रतअसे ॥४१॥

इंद्रा तुवां स्वस्थानीं जाणें ॥ मी नमागें तुजकारणें ॥ ऐसा निर्भर्त्सितां वचनें ॥ अंतरीं संतोष पावला ॥४२॥

मग रुप पालटोनि इंद्र ॥ जाहला वृषभारुढ शंकर ॥ त्रिनेत्र दशभुज पंचवक्त्र ॥ रुद्रगणेंसीं ॥४३॥

सहस्त्रार्क उदेली कांती ॥ गणगंधर्व पुढां गाती ॥ सुरांगना नृत्य करिती ॥ स्तविती ब्रह्मादिक ॥४४॥

ऐसा शंकर प्रकटला ॥ गगनीं पुष्पवर्षाव जाहला ॥ प्रेमें देखोनि म्यां स्तविला ॥ स्तोत्रसहस्त्रीं ॥४५॥

श्रीकृष्ण ह्नणे युधिष्ठिरा ॥ उपमन्यें स्तविलें शंकरा ॥ तें सांगतां कल्पतरुवरा ॥ होईल पसर ॥४६॥

असो तें ऐकोनि स्तवन ॥ सुखी जाहले देवगण ॥ सुरदुंदुभी वाजवून ॥ केली पुष्पवृष्टी ॥४७॥

पार्वतीसहित कैलासपती ॥ तेव्हां बोलिले मजप्रीतीं ॥ उपमन्या तुझी दृढभक्ती ॥ कळली मज ॥४८॥

आतां मागें वरदान ॥ मग मी बोलिलों स्तवून ॥ धन्य माझें तपाचरण ॥ देव प्रत्यक्ष देखिला ॥४९॥

तरी दे तुझी दृढभक्ती ॥ आणि त्रिकाळज्ञान उमापती ॥ तेवींचि निवास कीजे प्रीतीं ॥ आश्रमीं माझिये ॥५०॥

तंव जें जिये समई इच्छिसी ॥ तें सकळही पावसी ॥ ऐसें बोलोन कैलासवासी ॥ जाहला अदृश्य ॥५१॥

जो श्रीकृष्णा मजलागुन ॥ शंभु जाहला प्रसन्न ॥ तो इये आश्रमीं जाण ॥ असे निरंतर ॥५२॥

आतां हें सिद्धपीठ वरवें ॥ तुवां येथें तप करावें ॥ आठां मासीं स्वभावें ॥ पावशील वर ॥५३॥

ऐसें उपमन्यें सांगतां ॥ मी जाहलों तप करिता ॥ आठां दिनीं दीक्षा देता ॥ जाहला उपमन्य ॥५४॥

मग म्यां केलें जटाचीवर ॥ पहिले मासीं फळाहार ॥ दुजे मासीं दुग्धाहार ॥ पुढें जळाहार केला म्यां ॥५५॥

यावरी वायुभक्षण करीं ॥ तपश्चर्या मांडिली थोरी ॥ मग राहिलों अंगुष्ठाग्रीं ॥ दृष्टीं सूर्यी लावोनी ॥ ॥५६॥

तंव देखिला शक्तिसहित ॥ कर्पूरगौर उमाकांत ॥ सकळगणसंयुक्त ॥ वाद्यगजरेंसीं ॥५७॥

मज बोले उमाकांत ॥ कीं तूं माझा परमभक्त ॥ तपें कष्टलासि बहुत ॥ आतां घेई वरदान ॥५८॥

तूं सर्वपुरुषीं श्रेष्ठ होसी ॥ युद्धीं जयातें पावशी ॥ मत्सन्निकर्षा अहर्निशी ॥ असशील तूं ॥५९॥

तुज पुत्रकन्या बहुता ॥ म्यां दीधल्या गा अनंता ॥ ऐसे उत्तम वर देता ॥ जाहला शंभु ॥६०॥

तैसीच माता पार्वती ॥ अनेक वर जाहली देती ॥ कीं सोळासहस्त्र स्त्रिया होती ॥ परमस्त्रिग्धा ॥६१॥

होती कन्या आणि कुमर ॥ सर्व जय प्रियत्ववर ॥ ऐसें बोलोनि गौरीहर ॥ अदृश्य जाहलीं ॥६२॥

म्यां हें अपूर्व वरदान ॥ केलें उपमन्यूसि कथन ॥ तंव बोलिला उपमन्य ॥ हें काइसें नवल ॥६३॥

याहूनि एक अपूर्व ॥ तुज सांगेन नवलाव ॥ नाहीं शंभूहूनि देव ॥ भुवनत्रयीं ॥६४॥

पूर्वी कृतयुगीं थोर ॥ तंडी नावें द्विजवर ॥ तेणें आराधिला शंकर ॥ दशशतवरुषें ॥६५॥

मग ईश्वरापासोन ॥ महोत्कर्ष पावला ब्राह्मण ॥ ह्नणोनि तेणें केलें स्तवन ॥ ते ऐकें शंभुस्तुती ॥६६॥

नामें असंख्य परिकर ॥ त्यांत जपता जाहला सहस्त्र ॥ तींही सांगतां विस्तार ॥ होईल कल्पतरुसी ॥६७॥

शिव शंभु शंकर ॥ पार्वतीश त्रिनेत्र ॥ विश्वेश्वर स्थाणु रुद्र ॥ जटी त्रिशूली ॥६८॥

महेश गंगाधर भूतनाथ ॥ पिनाकी ईशान विश्वनाथ ॥ लिंगमूर्ती हर विख्यात ॥ इत्यादि सहस्त्र नामें ॥६९॥

हें शिवसहस्त्रनाम ॥ संस्कृतग्रंथीं उत्तम ॥ पहावें श्रवणार्थ सवर्म ॥ अनुशासिकीं ॥७०॥

प्रसन्न होवोनि कैलासराणा ॥ ह्नणे माग तंडीब्राह्मणा ॥ तुज अक्षय्य लोक नाना ॥ होती दुःखविवर्जित ॥७१॥

आणि यशस्वी परमज्ञानी ॥ होसील ऐसा वर देवोनी ॥ अदृश्य जाहला शूलपाणी ॥ ऐकें देवा ॥७२॥

आतां पवित्र हें स्तोत्र गहन ॥ ब्रह्मलोकींहूनि जाण ॥ पावला तंडी ब्राह्मण ॥ तो क्रम ऐकें ॥७३॥

ब्रह्में कथिलें इंद्रातें ॥ इंद्रें निरुपिलें यमातें ॥ यमें कथिलें रुद्रगणांतें ॥ रुद्रगणीं तंडीप्रती ॥७४॥

हा स्तोत्रपाठ जिये ठायीं ॥ तेथ प्रेतपिशाचभय नाहीं ॥ श्रीकृष्ण ह्नणे धर्मा पाहीं ॥ ऐकें इतिहास स्तोत्राचा ॥७५॥

परशुरामें तप माडिलें ॥ येणें स्तोत्रें शिवा स्तविलें ॥ प्रसन्नपणें शिवें दीधलें ॥ परशुप्रती ॥७६॥

मातृवधीं पाप नाहीं ॥ आणि जय सर्वाठायीं ॥ तैसेंचि ऐकें आणीकही ॥ गार्ग्युपाख्यान ॥७७॥

गार्ग्यऋषी तपिन्नला ॥ स्तवें महेश प्रसन्न केला ॥ त्रिकाळज्ञान पावला ॥ तथा सहस्त्रपुत्र ॥७८॥

आणीक ऐकें भारता ॥ मांडव्य शूळीं दीधला होता ॥ तेणें शिवाप्रति स्तवितां ॥ जाहला प्रसन्न ॥७९॥

ह्नणे गा मांडाव्या पाहें ॥ तुज शूळव्यथा न होय ॥ मुक्ति पावसी आमय ॥ बाधिती ना ॥८०॥

आणिक ऐकें प्रमाण ॥ गालवऋषी तपोधन ॥ बाळपणीं अध्ययन करुन ॥ आला स्वगृहीं ॥८१॥

तंव न देखे पितयासी ॥ ह्नणोनि पुसे मातेसी ॥ माता रडे आवेशीं ॥ येरु दुःखी जाहला ॥८२॥

मग गेला शिवाप्रती ॥ येणें स्तोत्रें केली स्तुती ॥ तंव वरद उमापती ॥ ह्नणे ऐकें गालवा ॥८३॥

तूं मातापितयांसीं ॥ सकुटुंब सुख पावसी ॥ मग आला जंव गृहासी ॥ तंव पिता देखिला ॥८४॥

ऐसा महेशस्तोत्रमहिमा ॥ ऐकें जन्मेजया उत्तमा ॥ देवें सांगीतला धर्मा ॥ अनुशासिकीं ॥८५॥

वैशंपायन ह्नणे अवधारीं ॥ ऐसें ऐकिलियावरी ॥ भीष्मासन्मुख होवोनि करी ॥ धर्म प्रश्नातें ॥८६॥

कीं कामजयाचें फळ कवण ॥ प्राप्त होय पुरुषालागुन ॥ आणि स्त्रियांचें आचरण ॥ केवीं जाणिजे ॥८७॥

सांगें ऐसिया अर्थगव्हरा ॥ तंव भीष्म ह्नणे युधिष्ठिरा ॥ ऐकें इतिहासपरंपरा ॥ इये अर्थी ॥८८॥

अष्टावक्र आणि दिशेचा ॥ संवाद असे पूर्वीचा ॥ वदान्यमुनीची कन्या साचा ॥ सुप्रभानामें ॥८९॥

ते सुंदरे देखिली ॥ अष्टावक्रें मागीतली ॥ वदान्यमुनीजवळी ते काळीं ॥ ऐकोनि येरु बोलिला ॥९०॥

कीं तूं उत्तरदिशा पाहोनि येई ॥ मग हे कन्या देईन सई ॥ अष्टावक्र ह्नणे काई ॥ पहावें तेथ ॥९१॥

मग ह्नणे वदान्य ॥ कीं कुबेरलोक टाकोन ॥ हिमाचळपर्वतावरोन ॥ जाई शिवस्थळी ॥९२॥

तेथ गणगंधर्वासहित ॥ नांदतसे पार्वतीकांत ॥ त्यापुढें जावोनि त्वरित ॥ पहावें श्यामवन ॥९३॥

तेथ वृद्धा नारी देखसी ॥ तुवां पूजावें तियेसी ॥ मग आलिया आह्मांपाशीं ॥ देईन कन्यादान ॥९४॥

ऐकोनि येरु चालिला ॥ उत्तरदिशे प्रवेशला ॥ देश नगरें टाकीत गेला ॥ कैलासाममीप ॥९५॥

तेथें धनदाचें हेमंधर ॥ राखणाईत असती किंकर ॥ त्यांही कुबेरा समाचार ॥ जाणविला ।९६॥

तंव धनदें बिजें केलें ॥ पूजा करोनि गृहीं नेलें ॥ बहुमानें राहविलें ॥ कांहीं दिवस ॥९७॥

कुबेर अष्टावक्र बैसले ॥ तेथ धनदें बोलिलें ॥ मुने आजी कौतुकख्यालें ॥ नाचवूं सुरांगना ॥९८॥

येरु तथास्तु बोलिला ॥ मग नृत्यारंभ जाहला ॥ ऐशा आनंदें एक गेला ॥ दिव्यसंवत्सर ॥ ॥९९॥

नृत्यांनी कुबेर ह्नणे ॥ आतां आपुलें कार्य करणें ॥ येरु उत्तरे शीघ्रपणें ॥ चालिला देखा ॥१००॥

पुढें कैलासीं वेंधला ॥ रचना देखोन्मि संतोषला ॥ आठही दिशा फिरिन्नला ॥ तंव देखिलें हेमगृह ॥१॥

परि त्याचें न देखे द्वर ॥ ह्नणोनि हाका मारी विप्र ॥ कीं मी अतिथी आलों बाहेर ॥ न्यारे भीतरीं मातें ॥२॥

तंव कन्या बाहेर आल्या ॥ गृहीं गुप्त नेलें तया ॥ माजी वृद्धा स्त्री डोल्हारियां ॥ बैसलीसे ॥३॥

ते सालंकृत देखोनी ॥ विप्रें आशीर्वाद देवोनी ॥ मग स्वस्थानीं बैसोनी ॥ बोलता जाहला ॥४॥

येकीनें रहावें इये ठायीं ॥ येरीं जावें आपुले गृहीं ॥ तंव गेलिया समस्ताही ॥ वृद्धा येकी राहिली ॥५॥

तियेनें सेवा आरंभिली ॥ रात्रीं एकत्र निद्रा केली ॥ कामचेष्टा मांडिली ॥ परि तो निष्काम देखिला ॥६॥

मग ते होवोनि दुःखित ॥ ह्नणे काम मज पीडित ॥ तरी पुरुषत्व असोनि प्राप्त ॥ कां मजसी न रमसी ॥७॥

येथें आनंद संतोष ॥ उत्फुल्लित सकळ वृक्ष ॥ आणि मी सकाम विशेष ॥ कां उचिता चुकतोसी ॥८॥

हा वृथा असे संसार ॥ भोगभोग करीं साचार ॥ तंव ह्नणे अष्टावक्र ॥ ऐकें कामिनी ॥९॥

परदारागमन अवधारीं ॥ निषिद्ध बोलिलें धर्मशास्त्रीं ॥ तरी धर्म न टाकावा चतुरीं ॥ टाकितां निंद्य होय ॥११०॥

हें ऐकोनि वृद्धा ह्नणत ॥ आह्मां काम वल्लभ अत्यंत ॥ पुरुषावेगळें समस्त ॥ वृथा वाटे ॥११॥

या कामसंचारें अती ॥ पिता बंधु नोळखिजेती ॥ ऐसें ऐकोनियां चित्तीं ॥ चिंतावला विप्र ॥१२॥

यावरी सुगंधतैल आणोनी ॥ तया मर्दितसे कामिनी ॥ मग जेवविला न्हावोनी ॥ शय्येवरी निजविला ॥१३॥

स्पर्शती जाहली कामस्थानीं ॥ येरु ह्नणे वो कामिनी ॥ तूं परदारा कैसेनी ॥ घडे संग ॥१४॥

उपरी ह्नणे सुंदरी ॥ मी स्वतंत्र अवधारीं ॥ नव्हे परपुरुषाची नारी ॥ तंव ह्नणे ब्राह्मण ॥१५॥

स्त्रियांलागीं स्वातंत्र्य पण ॥ कदापि नव्हेचि जाण ॥ तरी तुज स्वातंत्र्य काइसेन ॥ हें नवल वाटे ॥१६॥

वृद्धा ह्नणे विशेषें ॥ मी तंव कुमारिका असें ॥ कोणेही पुरुषें भुक्त नसें ॥ ह्नणोनि स्वतंत्र ॥१७॥

येरु आश्चर्ये ह्नणत ॥ कीं तूं वस्त्रालकारभूषित ॥ परम वृद्धा किंनिमित्त ॥ नकळे बोलणें ॥१८॥

यावरी येरी ह्नणे तयासी ॥ अगा सांगतें परियेसीं ॥ मी उत्तरदिशा सर्वाशीं ॥ वृद्धारुपें ॥१९॥

स्त्रियांसि कामज्वर बहुत ॥ हें तुज प्रकट केलें गुप्त ॥ तुझें पहाया मनोगत ॥ कौतुकपणें ॥१२०॥

तूं सत्यसंकल्प जाण ॥ येथ आलासि ब्राह्मण ॥ आतां वरुनि कन्यारत्न ॥ जाई स्वाश्रमासी ॥२१॥

तूं पावसी कन्याकुमर ॥ मग आज्ञा मागोनि द्विजवर ॥ वदान्याजवळी शीघ्र ॥ आला देखा ॥२२॥

सर्व समाचार कथिला ॥ तेणें वदान्य संतोषला ॥ सुपात्रीं समर्पिली बाळा ॥ सुप्रभानामें ॥२३॥

ऐसें त्याचें ब्रह्मचर्य ॥ आणि सदाचार सुप्रभे तिये ॥ जंव तो फिरोनि ये ॥ तंव मार्ग पाहिला ॥२४॥

तरी ऐसिया दुर्लभा स्त्रिया ॥ येरी पापरुपा असत्या ॥ सत्य बोले तेचि भार्या ॥ धन्य त्रिजगीं ॥२५॥

आतां असो हें बोलणें ॥ भीष्में कथिलें सुवचनें ॥ दिशाऋषोचे संभाषणें ॥ सत्पात्रता श्रेष्ठत्व ॥२६॥

हे ऐकूनियां प्रश्न ॥ भीष्मासि पुसेल कुंतीनंदन ॥ तें ऐकावें चित्त देवोन ॥ ह्नणे मधुकरकवी ॥२७॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ दिशाऋषिसंवादप्रकारु ॥ पंचविंशाध्यायीं कथियेला ॥१२८॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP