मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय १८

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय १८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

वैशंपायना ह्मणे भारत ॥ ऋषे तूं सर्वज्ञ गुणवंत ॥ तरी सांगें अग्रवृत्तांत ॥ कृपा करोनी ॥१॥

मग ह्मणें वैशंपायन ॥ जें धर्मा सांगे गंगानंदन ॥ तें ऐकें चित्त देवोन ॥ संक्षेपतः ॥२॥

गांगेय ह्मणे धर्माकारणें ॥ ऐकें आतां सावधानें॥ शरणागत प्रतिपाळणें ॥ हा परमधर्म ॥३॥

पूर्वील तरी शिबिप्रमुख ॥ राजे येणेंचि धर्मे देख ॥ परमसिद्धीतें अनेक ॥ पावले देखा ॥४॥

शरणागत रक्षणार्थी ॥ पूण्यात्मे जेचि झटताती ॥ पुर्वील इतिहास इये अर्थीं ॥ सांगतों ऐक ॥५॥

कथा अखिलपापनाशिनी ॥ तुज सांगतो गा नृपमणी ॥ जे सांगितली भार्गवमुनीनीं ॥ राया मुकुंदासी ॥६॥

चरित्र परम पुण्यकारक ॥ तें मी तुज सांगतो ऐक ॥ पारधी होता कोणीयेक ॥ क्रूर पक्षीघातकी ॥७॥

कृष्णांग आणि रक्तनेत्र ॥ दीर्घजिव्हा महवक्त्र ॥ संबंधी बांधवीं शीघ्र ॥ टाकिला जो ॥८॥

जो सर्पवत परियेसी ॥ उद्देग पाववी दुसर्‍यासी ॥ तो अरण्यांत पक्षियांसी ॥ मारोनि वृत्ती चालवी ॥९॥

जाहला धर्मपराड्‌मुख ॥ तया वृत्ति न रुचे आणिक ॥ मग ह्यातारपणीं देख ॥ ऐसें वर्तलें येकदा ॥१०॥

जाणों प्रळयकाळवत ॥ महावत विजायुक्त ॥ मेघ वर्षला बहुत ॥ मही जाहली जळपूर्ण ॥११॥

पक्षिश्वापदें वनीं ॥ राहिलीं लीन होवोनी ॥ येरू क्षुघा सीतें पीडोनी ॥ राहिला वृक्षाखालीं ॥१२॥

तेथ वनदेवतां वंदोनी ॥ शिळेवरी पानें आंथरूनी ॥ क्रमूं लागलासे रजनी ॥ महाकाष्टें ॥१३॥

परि तेणें तिये दिवशीं ॥ कपोती धरोनियां पाशीं ॥ घातली होती पांजर्‍याशीं ॥ घरींज न्यावया ॥१४॥

तिचा भ्रतार तिये रात्रे ॥ त्या वृक्षाचिये शाखेवरी ॥ खोपया माजी दुःखें भारीं ॥ पावला संताप ॥१५॥

ह्मणे कीं माझी युवंती ॥ पतिव्रताशीळ कपोनी ॥ तें मागील निरूपणा ॥ येथ जाणावें संपूर्ण ॥ त्यातील कुळागम प्रधान ॥ ऐकें विशेष ॥१६॥

ह्मणे आगम पुसतां कुळांचा ॥ वेचू तुजसहित देवाचा ॥ तेथें पाड काय इतरांचा ॥ सांगों समर्थ ॥१७॥

पाहतां मोक्षधर्मसिद्धांतीं ॥ कैचें स्वपरकुळ ज्ञाती ॥ हे रचना संसारभ्रांती ॥ ते न फिटे कदा ॥१८॥

कुळज्ञातिविशेषीं ॥ आणि वर्णसंकर बोलिलासी ॥ तरी हें खडाया परियेसीं ॥ कथा येकी सांगतें ॥१९॥

पद्मपुराणीं विशेषीं ॥ व्यासें कथिलें गणेशासी ॥ होती पद्मपुरनगरीसी ॥ एकी वेश्या सुंदरा ॥२०॥

ते षोडशवर्षी मनोहर ॥ तारुण्यें जिंकिला पंचशर ॥ तिये जाहलीं कन्याकुमर ॥ जावळीं समयांतरीं ॥२१॥

परि तीं अपत्यें देखोनी ॥ मनीं विचारी कामिनी ॥ ह्मणे होईल तारुण्यहानी ॥ यांसी वाढवितां ॥२२॥

मग त्यां नेवोनि घराबाहेरी ॥ सांडिलीं उकरडेयावरी ॥ तंव कोणी धनवंत वेव्हारी ॥ आला तिये मांर्गें ॥२३॥

तो निपुत्रिक ह्मणोनि ॥ गेला पुत्रासि घेवोनी ॥ हर्षे सांगें स्त्रियेलागुनी ॥ पुत्र देवें दीधला ॥२४॥

पुढें तो तिहीं वाढविला ॥ तंव तैसाचि वाणिया भला ॥ वेव्हारीक फिरत आला ॥ तियेचि वाटे ॥२५॥

तयाप्रति नव्हती कुमरी ॥ ह्मणोनि अखंड चिंता करी ॥ तेणें हे देखिली नेत्रीं ॥ उकिरडां बाळेकी ॥२६॥

परमोल्हासें उचलिली ॥ नेवोनि स्त्रियेसि दीधली ॥ महाउत्साहें वाढविली ॥ ऐसी दोघें उपवरें ॥२७॥

त्या दोघांचियाही माता ॥ मोहजाळें अति व्याप्ता ॥ तारूण्य देखोनि चिंता ॥ करिती वर्‍हाडाची ॥२८॥

परि पुत्र पोसणा ह्मणोनी ॥ कोणी न देती नंदिनी ॥ तैसेंचि तिये कन्येलागुनी ॥ न वरी कोणीच ॥२९॥

ऐसीं सोळावर्षे परियंत ॥ दोघें उपवर जाहलीं बहुत ॥ तंव कैसें फळलें अद्भुत पूर्वकर्म ॥३०॥

कवणे एके समयांतरीं ॥ ते त्या पुत्रासि मेळविली नोवरी ॥ वर्‍हाड जाहलें ॥ तुरंगगजरीं ॥ महोत्साहें ॥३१॥

तयां सुखसंभोग भोगितां ॥ दिवस क्रमले असती बहुता ॥ तंव पुत्रांची मातापिता ॥ मृत्युगंतें पावलीं ॥३२॥

मग दोघें करिती व्यवहार ॥ अत्यंत सुखशयनींभर ॥ तंव जाहला चमत्कार ॥ ऐकें जनका ॥३३॥

पति पहूडला सुखशयनीं ॥ चरण संवाहितसे कामिनी ॥ तंव आली येकी योगिनी ॥ द्दारीं तयांचे ॥३४॥

भिक्षा शब्दासि उच्चारिलें ॥ तयांकडे अवलोकिलें ॥ पूर्वकर्म जाणितलें ॥ मग हांसिन्नली ॥३५॥

तें हास्य देखोनि सुंदरीं ॥ थोर शंकली जिव्हारीं ॥ ह्मणोनि पुसावया द्वारीं ॥ आलीं भिक्ष घेउनी ॥३६॥

ह्मणे हास्य काइसें सांग सत्य ॥ मग भिक्षा घेई ह्मणोनि विनवित ॥ तंव योगिनी ह्मणे यथार्थ ॥ हें मज त्वां न पुसावें ॥३७॥

तुं आग्रहें पुससी मातें ॥ तरी सांगतां पडसी चिंते ॥ येरी अधिकचि पुसे आर्तें ॥ मग योगिनी बोलिली ॥३८॥

ह्मणे माझें वाक्य मनीं धरिसी ॥ तरी धंदात्याग आचरिसी ॥ ह्मणोनियां मद्दाक्यासी ॥ निर्धार व्हावा ॥३९॥

येरी ह्मणे अहो माते ॥ तूं गुरूचि भेटलिस मातें ॥ मग योगिनी ह्मणे हा बंधु तूतें ॥ पूर्वील होय ॥४०॥

तुमची वेश्या एकी जननी ॥ इत्यादि कथिलें मांडोनी ॥ ह्मणे वणिक्‌द्दारें कामिनी ॥ जाहलीस बंधूची ॥४१॥

आतां वाटेल तें करीं ॥ भिक्षा घालीं गे झडकरीं ॥ येरी ह्मणे धीर धरीं ॥ क्षणयेक माते ॥४२॥

जंव मी करीं संदेहनिवृत्ती ॥ ह्मणोनि गेली भ्रताराप्रती ॥ योगिनीप्रोक्त सर्व स्थिती ॥ सांगीतली तयातें ॥४३॥

ह्मणे मी आतां योगपथें जाईन ॥ पापाप्रायश्चित्त करीन ॥ मग निघाली तेथून ॥ योगिनीसंगें ॥४४॥

आंगीं अष्टांगयोग बाणला ॥ ज्ञानें पापक्षय जाहला ॥ निवर्तली कितियेक काळां ॥ गुरुयोगिनी ते ॥४५॥

येरीकडे तो वणिक्‌पुत्र ॥ जाहला स्त्रीविण कामातुर ॥ तेणें पापकर्म अनाचार ॥ कैसा आचरला ॥४६॥

उद्ममाचे मिषें निघाला ॥ पद्मपुरनगरीं गेला ॥ तंव रामाहाट देखिला ॥ नगराबाहेरी ॥४७॥

तेथ तयाची पुर्वमाता ॥ वेश्या तारूण्यरूपता ॥ तियेसि अनओळखीरमता ॥ जाहला तो ॥४८॥

प्रीति वाढली परस्परीं ॥ पांच वरुषें भोगिली सुंदरीं ॥ मग जाणोनि गरोदरी ॥ गेला उद्ममासि तो ॥४९॥

असो गणिकेसि जाहला पुत्र ॥ आनंद रामाहाटीं थोर ॥ ऐसा चौंमासांचा कुमर ॥ जाहला देखा ॥५०॥

इतक्यांत तिये वेश्येची नंदिनी ॥ जे जाहली होती योगिनी ॥ ते फिरत आली भुवनीं ॥ मातेचिये ॥५१॥

ह्मणे भिक्षा दे गे जननीये ॥ येरीनें आसनें बैसविलें तिये ॥ बाळक होता कडिये ॥ तो ठेवोनि गेला घरांत ॥५२॥

भिक्षा आणावयालागीं ॥ योगीनी बाल देखे दैवभागी ॥ योगबळें ओळखिला वेगीं ॥ ह्मणे आरुता ये बापा ॥५३॥

अगा तुं आमुचा सोयरा ॥ आठां प्रकारीं रे कुमरा ॥ मग नातेसंबंधोच्चारा ॥ करिती जाहली ॥५४॥

पहिलें नातें सहोदर ॥ दुसरें कुमर तिसरें देवर ॥ चौथें नातें भ्रतार ॥ हौसी आह्मां ॥५५॥

पांचवें भाचा षष्ठ चुलता ॥ सातवें तरी मामा निरुता ॥ आठवें नातु सर्वथा ॥ ऐशा सोयरिका आठ ॥५६॥

बालकासी चुंबन देवोनी ॥ पृथक उच्चारी नातेनी ॥ हें गणिका आयकोनी ॥ शीघ्र बाहेरी पातली ॥५७॥

ह्मणे माते सांग यथार्थ ॥ काय बोलिलीस गुप्तार्थ ॥ येरी ह्मणे ऐकें समस्त ॥ दत्तचित्तें ॥५८॥

जरी असत्य बोलेन वचन ॥ तरी मज गुरूची आण ॥ तूं माझी माता उप्तन्न ॥ जहलों दोघें तवोदरीं ॥५९॥

ह्मणोनि माझा हा सहोदर ॥ दुसरें माझिये पतीचा कुमर ॥ तुझ्याठायीं उपजला निर्धार ॥ तेणें मज पुत्रची ॥६०॥

ममपतीचा धाकुटा बंधु ॥ ह्मणोनि देवर प्रसिद्ध ॥ चौथिया नात्या विविधु ॥ शास्त्रदृष्टी विचार ॥६१॥

पति तैसा दीर चिंती ॥ कां जे देवराज्च सुतोप्तत्ती ॥ करावीचि कुळयुवतीं ॥ कामीं विषयाभावो ॥६२॥

दुजें सासु होवोनि देखे पुत्रवदन ॥ प्रतक्ष कोणा ऐसें साधन ॥ बहुतकाळ वर्तमान ॥ होवोनि गेले ॥६३॥

तुझिये रक्तधातुपासोन ॥ माझें देह जाहलें उत्पन्न ॥ ह्माणोनि एकचि अंग जाण ॥ तुझें माझें ॥६४॥

तरी तुझेनि अंगें मातें ॥ हा भ्रतार होय माते ॥ पुत्रो वै पितृनामासि येथें ॥ ऐसी वेदश्रुती ॥६५॥

तरी कन्या वै मातृनामा ॥ ऐसी व्याख्यानाची महिमा ॥ ह्मणोनि पति होय आह्मां ॥ विचारदृष्टीं ॥६६॥

पांचवें नातें ऐक विचार ॥ माझिये बंधूचा हा कुमर ॥ ह्मणोनि भाचा निर्धार ॥ होय माझा ॥६७॥

याचा पिता तो तुझा भ्रतार ॥ हा धाकुटा त्याचा सहोदर ॥ मी त्याची कन्या हा चुलता निर्धार ॥ सहावें नातें ॥६८॥

सातवें मामा ऐसियापरीं ॥ मी तूं दोघी एकाच्या नारी ॥ आणि मी तंव याची सहोदरी ॥ तैसीच तूंही होसी ॥६९॥

ह्मणोनि हा तुज बंधू माये ॥ आणी मी तुझी कुमरी पाहें ॥ यास्तव हा मामा होय ॥ मजलागोनी ॥७०॥

आतां तुं सवती आह्मांसी ॥ तुझा पती तो पुत्र उभयांसी ॥ तो पतीचि परि विशेषीं ॥ होय पुत्र मज ॥७१॥

त्या पुत्राचा हा सुतु ॥ ह्मणोनि मज होय नातु ॥ तैसा तुजही होय नातु ॥ पुत्रात्मज ह्मणोनी ॥७२॥

दुसरें जाहला तुझिये कुशी ॥ हें आठवें नातें परियेसीं ॥ तरी या समस्त पापासी ॥ कारण तुंचि माते ॥७३॥

ऐकोनि लाजली जिव्हारीं ॥ बाळ घेवोनि गेली भीतरीं ॥ भिक्षा न घेतां गेली झडकरी ॥ योगिनी ते ॥७४॥

ऐसी संसाराची व्यवस्था ॥ न दिसे कुळधर्म पाहतां ॥ ह्मणोनि वर्णसंकर बहुतां ॥ परींचा असे ॥७५॥

सुलभा ह्मणे राया जनका ॥ पुसतां न पुरवे देखा ॥ कष्टी होइजे बहुतेका ॥ एके द्दिजाचिये परी ॥७६॥

ऐकें कोणी येक ब्राह्मण ॥ गुरुसि करी बहुत प्रश्न ॥ गुरु ह्मणे हा सांडीं अवगुण ॥ पुसापुसीचा ॥७७॥

पुसतां बहुत कष्टी होसी ॥ परि तो न मानी गुरुवाक्यासी ॥ ऐसें असतां एके दिवशीं ॥ तेणें तुरी भक्षिल्या ॥७८॥

तये तुरींचे टरफलें ॥ एक दांतीं होतें गुंतलें ॥ तें नखें करोनि फेडिलें ॥ पाहें तंव उच्छिष्ट् ॥७९॥

थोर विकल्पे कंटाळला ॥ ह्मणे भ्रष्टस्पर्श जाहला ॥ मग नदीतीरीं गेला ॥ स्नान करायासी ॥८०॥

आपोशन करितां शेखीं ॥ चूळाचिये सरिसें मुखीं ॥ शीत गेलें अवचितें देखीं ॥ तयाचिये ॥८१॥

जंव थूंकोनि पाहिलें ॥ तंव तें शीत दृष्टीं देखिलें ॥ अंतःकरण कंटाळलें ॥ ह्मणे शीत कोणाचें ॥८२॥

ह्मणोनि तें जाणावयासी ॥ शोधीत जाय नदीतीरासी ॥ तंव रजकी येकी वस्त्रांसी ॥ खळी देतां देखिली ॥८३॥

येरू तिये ह्मणे तुं कवणी ॥ ते ह्मणे मी परटिणी ॥ मग चालिला कंटाळोनी ॥ त्राहींत्राहीं ह्मणत पैं ॥८४॥

ऐसा थोर भागला शिणला ॥ एकें ग्रामांत प्रवेशला ॥ क्षुधेनें थोर पीडला ॥ प्रवेशला येक घरीं ॥८५॥

तंव घरींचा ब्राह्मण परियेसीं ॥ गेलासे कारटे भक्षावयासी ॥ ब्राह्मणी असे गृहासी ॥ महादुर्बळ ॥८६॥

तियें तो ब्राह्मण देखिला ॥ आदरमानें बैसविला ॥ आतिथ्य उपचार मांडिला ॥ दीधलें भोजन ॥८७॥

मग मुखशुद्धी करावया ॥ सुपारी एक दिधली तया ॥ येरू दांतें जाय फोडाया ॥ परि न फुटेची ॥८८॥

ह्मणोनि ह्मणे ब्राह्मण ॥ कैसी हे सुपारी कठिण ॥ तंव बोलिली आपण ॥ ब्राह्मणी तया ॥८९॥

बापा आह्मी ब्राह्मणें दुबळीं ॥ सात बाळें मज जाहली ॥ तैं हे सुपारी चघळिली ॥ मुखीं धरोनी ॥९०॥

पतिपुत्रेंसिं भोजनोत्तरीं ॥ आह्मीं चघळू हे सुपारी ॥ ऐसी बहुत दिवसवरी ॥ घरीं आमुचें ही असे ॥९१॥

आजि थोर भाग्य आमुचें ॥ कीं आतिथ्य घडलें तुमचें ॥ परि हें ऐकूनि ब्राह्मणाचें ॥ कंटाळलें मन ॥९२॥

ब्राह्मणी ह्मणे ब्राह्मणा ॥ दुबळेपण नसावे कवणा ॥ तुज रोटी वाढिली भोजना ॥ ते दैवें मिळाली आजी ॥९३॥

नेणिजे कवणाचा कणिकगोळा ॥ श्वान एक घेवोनि आला ॥ तो म्यां मुखींचा सांडविला ॥ त्याची भाजिली भाकर ॥९४॥

घरीं भाजन काहीं नाहीं ॥ फुटकी काठवटी असे पाहीं ॥ तिये बंद दीधलें ठायी ठायीं ॥ चर्मकांकराचे ॥९५॥

माजी मर्दिली हे कणिक ॥ तुज भोजन दीधलें देख ॥ जन्मामध्यें हेंचि एक ॥ घडलें पूण्य ॥९६॥

स्मशानींचीं इंधेनें ॥ आणोनि कष्टप्रयत्‍नें ॥ रंधन केलेंसे जाणणें ॥ ऐसीं हातभाग्यें आह्मीं ॥९७॥

हें सांगतसे ब्राह्मणी ॥ तंव ब्राह्मन आला तेक्षणीं ॥ आणिलें कारटें खाउनी ॥ उरलें अन्न ॥९८॥

तंव्फ़ लेंकूरें आलीं खेळोनी ॥ तें भोजन केलें मिळोनी ॥ येरें हें चरित्र पाहोनी ॥ दुःखें विव्हळ जाहला ॥९९॥

ह्मणे जळो माझा संसार ॥ अवघा दुःखरूप आचार ॥ मज गुरुनें वर्जिलें निर्धार ॥ परि मूढत्वें नायकिलें ॥१००॥

मग तेथोनि मुरडला ॥ येवोनि गुरूसि सांगता जाहला ॥ तंव गूरू ह्मणे गा भला ॥ फिटला संदेह ॥१॥

आतां यापुढें तरी काहीं ॥ तुवां भ्रांतपणें न पुसावें पाहीं ॥ मग तो त्यजोनि सर्वही ॥ जाहला योगीश्वर ॥२॥

सुलभा ह्मणे जनका पाहें ॥ तरी पुसतां ऐसें होय ॥ मज नवल वाटताहे ॥ तुझिये विदेहपणाचें ॥३॥

स्थूळदेहाचे निरसनें ॥ होय शमदमां मरणें ॥ परि लिंगदेह कवणें ॥ उपायें फिटे ॥४॥

कारण आणि महाकारण ॥ यांचें कैसें होय निरसन ॥ ह्मणोनि वाटे अप्रमाण ॥ तुझें विदेहत्व ॥५॥

अगा चहुं देहांचा नाश ॥ कराया समर्थ परेश ॥ तो विदेही जगन्निवास ॥ हा श्रीकृष्णची ॥६॥

याचीं लीलालाघव चरित्रें ॥ नेणतीं ऋषी वेदशास्त्रें ॥ पृच्छा करितां अपारें ॥ व्यसनें पावसील ॥७॥

ऐसें योगिनीनें निरूपिलें ॥ जनकें तटस्थ आयकिलें ॥ न बोलेचि मौन साधिलें ॥ अवघे तूष्णींभूत ॥८॥

तंव योगिनी उपमली ॥ गगनामार्गें चालिली ॥ यानंतरें अदृश्य जाहली ॥ ज्योती मिळाली कृष्णांत ॥९॥

तेणें जनक प्रबोधला ॥ आपुला अभिमान त्यागिला ॥ मग चरणीं लागला ॥ श्रीकृष्णाचे ॥११०॥

ह्मणे नकळे तुझी थोर ॥ तूंचि तारक श्रीहरी ॥ मग देवें ब्रह्मज्ञान श्रोत्रीं ॥ उपदेशिलें ॥११॥

तेणें संदेह निवर्तला ॥ परमात्मभाव उमटला ॥ आत्मानात्मविवेक भासला ॥ स्तविला गोविंद ॥१२॥

ते स्तुति वाखाणितां ॥ येथेंचि विस्तार ॥ होईल ग्रंथा ॥ असो मग कृष्णा गेला त्वरितां ॥ द्दारावतीये ॥१३॥

वैशंपायन ह्मणे भारता ॥ हे पद्मपुराणींची कथा ॥ सांगीतली संक्षेपता ॥ प्रसंगानुसार ॥१४॥

कार्यकारण सार घ्यावें ॥ येरे फळकट सांडावें ॥ जैसें नवनीत काढावें ॥ दधिमध्यगत ॥१५॥

शांतिपर्वीं मोक्षधर्म ॥ धर्मरायासि सांगें भीष्म ॥ तेथ हा कथासंबंध उत्तम ॥ पुराणांतरींचा ॥१६॥

सुलभाजनकसंवाद ॥ ऐकोनि धर्म सानंद ॥ मग प्रश्न करील प्रबुद्ध ॥ पुढिले प्रसंगीं ॥१७॥

ते शुकोप्तत्तिकथा ॥ पुढें ऐकावी भारता ॥ श्रोतयां जाहाल विनविता ॥ मधुकरकवी ॥१८॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ योगिनीपुराणांतरकथाप्रकारू ॥ अष्टादशाध्यायीं कथियेला ॥११९॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौत्रयोदशस्तबकः अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP