मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय २४

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय २४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

धर्म ह्नणे जी गांगेया ॥ सुमनें देव अर्चिलिया ॥ धूपदीप दान केलिया ॥ काय फळ प्राप्त होय ॥१॥

तंव भीष्म ह्नणे पंडुसुता ॥ एतदर्शी प्राचीन कथा ॥ इतिहास असे तत्वतां ॥ मनुसुवर्णसंवाद ॥२॥

सुवर्ण नामें ब्राह्मण भला ॥ मेरुपाठारीं प्राप्त जाहला ॥ तंव तेथें मनु देखिला ॥ वंदिला तेणें ॥३॥

स्वर्णरचित शिळातळीं ॥ बैसोनि प्रेमकल्लोळीं ॥ पुराणशास्त्रकथा ते वेळीं ॥ मांडिली परस्परें ॥४॥

सुवर्ण मनुप्रति ह्नणत ॥ कीं सुमनीं अर्चितां दैवत ॥ काय फळ प्राप्त होत ॥ यावरी मनु बोलिला ॥५॥

ह्नणे सुवर्णा अवधारीं ॥ एक इतिहासकथा कुसरी ॥ शुक्र एके समयांतरीं ॥ घरीं आला बळीच्या ॥६॥

तयाची पूजा करोन ॥ बळी पुसे कर जोडोन ॥ कीं पुष्पधूपदीप वळिदान ॥ केलिया काय फळप्राप्ती ॥७॥

येरु ह्नणे वीरुधौषधी परियेस ॥ चंद्रकळांहीं उपजल्या देहास ॥ तरी सोमापासाव अमृत विष ॥ इयें दोनी उपजलीं ॥८॥

अमृतवल्लभ सकळिक ॥ आणि विष तें संतापक ॥ अमृत मंगळ आल्हादक ॥ तेथोनि जाहल्या औषधी ॥९॥

आणि जें सुमन ह्नणोन ॥ तें देवांसि वल्लंभ जाण ॥ सुष्टु मन तें सुमन ॥ वर्धन श्रीचें ॥१०॥

ह्नणोनि मनप्रीतिकारकें ॥ पुष्पें पवित्रें सुगंधिकें ॥ देवासि वाहिजे अनेकें ॥ तेणें पुण्यलक्ष्मी पाविजे ॥११॥

तये पुष्पांचिया जाती ॥ किती सांगों गा भूपती ॥ बहुप्रकारें भेद असती ॥ सांगतां युक्ति कुंठे ॥१२॥

आतां धूपदानफळ ॥ सुगंध निर्यास गुग्गुळ ॥ देवांसि आवडे सकळ ॥ वल्लभ परम ॥१३॥

अगरु परम सुगंध जाणा ॥ तो आवडे जगज्जीवना ॥ आणि गुग्गुळ आवडे मना ॥ यक्षराक्षसांचिये ॥१४॥

सल्लकीज धूप तत्वतां ॥ वल्लभ होत असे दैत्यां ॥ ऐसे धूपभेद सांगता ॥ बहुत असती ॥१५॥

जें फळपुष्पदान उक्त ॥ तेंचि धूपदान निभ्रांत ॥ आतां दीपदान श्रुत ॥ करवूं तुज ॥ ॥१६॥

जे देवालयी दीप लाविती ॥ ते स्वर्गगती पावती ॥ आणि सूर्यलोकीं होती ॥ प्रकाशमय ॥१७॥

जेणें देवापुढें भला ॥ दीपक असे प्रज्वळिला ॥ तेणेंचि नरक चुकविला ॥ अंधतामिस्त्र ॥१८॥

दीपदानफळ सांगतां ॥ येथेंचि विस्तार होईल ग्रंथा ॥ बळिदानाचें फळ आतां ॥ ऐकें संक्षेपें ॥१९॥

प्रत्यहीं गृहस्थाचें द्वार ॥ देवमनुष्य आणि पितर ॥ यक्षराक्षर किन्नर ॥ अन्नालागीं सेविती ॥२०॥

ह्नणोनि गृहस्थें प्रत्यहीं ॥ करावें बळिदान पाहीं ॥ तेणें आशिर्वाद सही ॥ देती देवता ॥२१॥

हें बळिदान न करितां ॥ देवता शापिती गृहस्था ॥ ऐसें बळिदान सांगतां ॥ महिमा थोर ॥२२॥

हें पुष्पादि दानमहिमान ॥ शुक्रें केलें बळीसि कथन ॥ मनु ह्नणे सुवर्णालागुन ॥ तेंचि तुज कथियेलें ॥२३॥

मग सुवर्णे नारदा कथिलें ॥ नारदें मज निरुपिलें ॥ तेंचि तुज सांगीतलें ॥ कुंतीसुता ॥२४॥

तंव धर्मे प्रार्थिला भीष्म ॥ ह्नणे कृतज्ञतेचे काय धर्म ॥ कोठें देखिले असती उत्तम ॥ ते सांगें मज ॥२५॥

भीष्म ह्नणे गा अवधारीं ॥ काशिरायाची थोर नगरी ॥ तेथोनि निघाला वनांतरीं ॥ पारधी येक ॥२६॥

बाण जोडिला धनुष्यास ॥ विंधूं पाहे मृगांस ॥ तंव वृक्ष एक विशेष ॥ विंधिला संधानें ॥२७॥

शुष्क जाहला तरुवर ॥ नाहीं पुष्प ना फळपत्र ॥ तेथ शुक एक निरंतर ॥ राहे वृक्षकोटरीं ॥२८॥

तो नसंडीचि वृक्षासी ॥ शुक अत्यंत उपवासी ॥ फळ ना पत्र भक्षावयासी ॥ परि सोडीच ना ॥२९॥

ऐसें विचित्र आचरण ॥ त्या शुकाचें ऐकोन ॥ तेणें विस्मित जाहलें मन ॥ देवेंद्राचें ॥३०॥

मग इंद्र द्विजरुपें आला ॥ शुक बहुत कृश देखिला ॥ इंद्रप्रिय बोलिला ॥ पक्षियासी ॥३१॥

अगा शुष्क जालासि कोटरीं ॥ वन तरी युक्त फळपत्रीं ॥ हा वृक्ष शुष्क भारी ॥ कां कदर्थना देखसी ॥३२॥

तुह्मां पक्षियांचें राहणें ॥ जेथ असे फळभक्षणें ॥ तोचि आश्रय तुह्मीं करणें ॥ सार्वकाळ ॥३३॥

हें ऐकोनि शुक बोले ॥ कीं तूं इंद्र हें मज कळलें ॥ निश्चित माझिये तपोबळें ॥ ऐकोनि इंद्र विस्मित ॥३४॥

ह्नणे हा पक्षिवर ॥ अतींद्रिय ज्ञानपर ॥ मग ह्नणे तूं आहार ॥ घेई अन्यफळांचा ॥३५॥

यावरी शुक ह्नणे सुरनाथा ॥ कां करविशी कृतघ्नता ॥ पाप होईल सांडितां ॥ या तरुवरासी ॥३६॥

येणें बाळपणापासोनि पाळिलें ॥ वैरियां पासोनि रक्षिलें ॥ निबिडपर्णी लपविलें ॥ कैसा आश्रय सांडावा ॥३७॥

बरवे काळीं राहिजे ॥ वोखटेकाळीं सांडिजे ॥ तो कृतघ्नधर्म बोलिजे ॥ निरयदायक ॥३८॥

ऐसा शुज्क निर्धार देखोनी ॥ प्रसन्न जाहला वज्रपाणी ॥ ह्नणे वर मागें निर्वाणीं ॥ पक्षिया तूं ॥३९॥

यावरी शुक ह्नणे देवा ॥ हा वटवृक्ष पूर्ववत करावा ॥ मग इंद्रें सिंचिला बरवा ॥ अमृत आणोनी ॥४०॥

तंव वृक्ष जाहला जीवंत ॥ पत्रफळपुष्पयुक्त ॥ शुकजाहला हर्षित ॥ तया सुरनाथ बोलिला ॥४१॥

ह्नणे शुका आयुष्यांतीं ॥ तूं पावसी अमरावती ॥ ऐसा गेला सुरपती ॥ करोनि उपकार ॥४२॥

भीष्म ह्नणे धर्मा जाण ॥ ऐसें पवित्र शुकाख्यान ॥ कृतघ्नतादोषहरण ॥ श्रवणमात्रें होताती ॥४३॥

पुढिलाचें उपकृत ॥ जो जन्मवरी आठवित ॥ तो कृतज्ञ बोलिजत ॥ शुकाचियेपरी ॥४४॥

तंव धर्म ह्नणे गंगासुता ॥ दैव आणि पुरुषार्था ॥ दोहीं मध्यें श्रेष्ठता ॥ कवणा सांगें ॥४५॥

भीष्म ह्नणे पंडुसुता ॥ एथ सांगों इतिहासकथा ॥ वसिष्ठ ब्रह्मयाची तत्वता ॥ पुरातन ॥४६॥

हाचि वसिष्ठें केला प्रश्न ॥ तंव ह्नणे चतुरानन ॥ दैवपुरुषार्थ समान ॥ जाणीं दोनी ॥४७॥

जेवीं कुणबी खेडी शेत ॥ बीज बरव्यापरी वोपित ॥ तरीच पीक होय बहुत ॥ उभययोगें ॥४८॥

जैसें बीजावेगळें शेत ॥ खेडिलें निष्फळ होत ॥ तैसे दैवेंवीण समस्त ॥ प्रयत्न निर्फळ ॥४९॥

कां बीज बरवें असे ॥ परि क्षेत्र खेडिलें नसे ॥ कोरडेपणें तेथ कैसें ॥ होईल फळ ॥५०॥

तैसें पुरुषार्थावांचोन ॥ दैव असे निष्कारण ॥ इये अर्थी दृष्टांतवचन ॥ सांगतों तुज ॥५१॥

दैव ऐसें जें नाम ॥ तेंचि शुभाशुभ कर्म ॥ परि हें नसोगा वर्म ॥ उद्योगावांचोनी ॥५२॥

जैसें बहुता गाई आंत ॥ वत्स माते पाहोनि जात ॥ तैसें कर्म गिंवसोनि सोबत ॥ दैव जाय कर्तेयासी ॥५३॥

जियें जेणें शरीरें ॥ कर्मे केलीं सानथोरें ॥ तिये अवस्थे साचोकारें ॥ प्राणी दुःख भोगितो ॥५४॥

शुभाशुभकर्माचे जाण ॥ साक्षी असती पृथ्वीभान ॥ कर्मविपाक शास्त्रप्रमाण ॥ सर्वलोक पावती ॥५५॥

ह्नणोनि पुण्य अगणित ॥ तैसेंचि तत्फळ बहुत ॥ आणि पापही तद्वत ॥ तथैव फळभोग ॥५६॥

हें न पुरवे सांगतां ॥ येणें विस्तार होईल ग्रंथा ॥ ह्नणोनि शुभाशुभाची कथा ॥ संकलिली ॥५७॥

तंव निवविलें धर्मरायें ॥ हें ब्रह्मवाक्य मानवलें पाहें ॥ आतां पूज्य आणि नमस्कार्य ॥ सांगिजे मज ॥५८॥

तुवां कोणाकारकें भलें ॥ पूर्वी पूजिलें नमस्कारिलें ॥ तंव भीष्मदेव बोलिले ॥ कीं पूजावे ब्राह्मण ॥५९॥

ब्राह्मणाचिये चरणासी ॥ जगीं दैवतपण सर्वाशीं ॥ ह्नणोनि गा परियेसीं ॥ वंदावें तेची ॥६०॥

ज्यांचे धन वेदाध्ययन ॥ ज्यांची कर्मे ब्रह्मार्पण ॥ ते न वंदावे ब्राह्मण ॥ कैसे सांगपां ॥६१॥

आणिक ऐकें वित्पत्ती ॥ जे गोब्राह्मणांप्रतिपाळिती ॥ आणि वेदमार्गी वर्तती ॥ जगीं होती ते पूज्य ॥६२॥

तूं माझा प्रीतिभाजन ॥ तूं अधीक मजहून ॥ तूं मज पूज्य द्विजजन ॥ ऐसें स्तवन करावें ॥६३॥

ब्राह्मणवचनें जें कीजे ॥ काहीं स्वल्प ऐसें दीजे ॥ तें अनंत होय जाणिजे ॥ विस्तारोनी ॥६४॥

अगा जे वेदाधिकारी भले ॥ विष्णूनें मानिले पूजिले ॥ ते न वंदावे कैसे वहिले ॥ सांग बापा ॥६५॥

ऐसें जाणोनियां बरवें ॥ रायें द्विज प्रतिपाळावे ॥ गोपाळ जेवीं सर्वभावें ॥ सदा रक्षी गाईतें ॥६६॥

ब्राह्मणवाक्य प्रतिपाळावें ॥ तया अभीष्टदान द्यावें ॥ तंव धर्म पुसे सद्भावें ॥ भीष्माप्रती ॥६७॥

कीं जे ब्राह्मणासि प्रीतीं ॥ संकल्प केलिया न देती ॥ ते काय फळ पावती ॥ मग ह्नणे भीष्म ॥६८॥

अग संकल्प केलियावरी ॥ एकी रात्री जाय जरी ॥ तरी पुण्यक्षय निर्धारीं ॥ होय साच ॥६९॥

येथ इतिहास प्रसिद्ध ॥ सृगालवानराचा संवाद ॥ तो ऐकें होवोनि सावध ॥ कुंतीसुता ॥७०॥

ते पूर्वजन्मीं दोनी ॥ मनुष्य होते जाणीं ॥ बहुधर्मी स्वस्वगुणीं ॥ सखे परम ॥७१॥

तेचि कपि सृगाल जाहले ॥ नरमांस भक्षूं लागले ॥ तंव एकदा वानरें पुसिलें ॥ सृगालासी ॥७२॥

अरे तूं कोणे पापें जालासी ॥ स्मशानीं मनुष्यमांस खासी ॥ तंव सृगाल ह्नणे तयासी ॥ जातिस्मरत्वें ॥७३॥

म्यां पूर्वजन्मीं जाण ॥ संकल्प न दिला ह्नणोन ॥ तेणें पापें ऐसा होवोन ॥ खातों मनुष्यमांस ॥७४॥

तंव येरु ह्नणे मीही ॥ अदत्तसंकल्पें वानर पाहीं ॥ हें ऐकिलें सर्वही ॥ स्मशानीं एके द्विजें ॥७५॥

तेणें द्विजें मज कथिलें ॥ तेंचि म्यां तुज सांगीतलें ॥ तरी हें तत्व विचारिलें ॥ पाहिजे शास्त्रदृष्टीं ॥७६॥

मी करोनि ब्राह्मणभक्ती ॥ मान्य जाहलों त्रिजगतीं ॥ ह्नणोनि तुह्मी समस्तीं ॥ विप्रभक्ती करावी ॥७७॥

ब्राह्मण हा वन्हिरुप ॥ भस्म करी धरिलिया कोप ॥ तंव पुसता होय धर्मभूप ॥ भीष्माप्रती ॥७८॥

ह्नणे मित्रपणें हीनास ॥ जो श्रेष्ठ करी उपदेश ॥ तेथें काय घडे दोष ॥ गंगासुता ॥७९॥

मग ह्नणे देवव्रत ॥ येथ सांगों ऋषिसिद्धांत ॥ जो हीनासि उपदेशित ॥ तो उपाध्याय हीनमती ॥८०॥

ऐकें हिमालयाचे पार्श्वी ॥ ब्रह्मश्रमीं एकी बरवी ॥ कथा वर्तली ते आघवी ॥ सांगों तुज ॥८१॥

तें ब्रह्माश्रमपद स्थान ॥ नानावृक्षलतासघन ॥ जेथ बहुतेक ब्राह्मण ॥ वेदोक्तकर्मे आचरती ॥८२॥

तापस ऋषी समग्र ॥ तंव तेथ आला एक शूद्र ॥ दयावंत विनीत फार ॥ अतिथिरुपें ॥ ॥८३॥

तो ब्राह्मणीं सन्मानिला ॥ शूद्रें ऋषिआचार देखिला ॥ संतोषोनि पुसूं लागला ॥ ब्राह्मणांसी ॥८४॥

मग तो होवोनि सद्धर्म ॥ ब्राह्मणां पुसे धर्मवर्म ॥ ते ह्नणती तूं जातिअधम ॥ काय तपस्या आचरिसी ॥८५॥

तूं करीं द्विजशुश्रूषेतें ॥ तेणें पावसी धर्मातें ॥ तें मानवलें शूद्रातें ॥ मग पर्णकुटिये राहिला ॥८६॥

राहोनियां उपवासी ॥ करी द्विजशुश्रूषणासी ॥ पूजीतसे अतिथीसी ॥ ऋषिआज्ञा पाळित ॥८७॥

तो परम विनीत जाणोनी ॥ ऋषि तदाश्रमीं येवोनी ॥ क्षेमवार्ता करोनी ॥ पावती संतोषातें ॥८८॥

त्यांतील एक ऋषि वहिला ॥ एकदा शूद्रगृहीं आला ॥ तंव शूद्र करितां देखिला ॥ पितृश्राद्ध ॥८९॥

तेथ दर्भ मांडितां चुकला ॥ ह्नणोनि ऋषि सांगता जाहला ॥ ऐसें आचार्यत्व पावला ॥ तो ब्राह्मण ॥९०॥

पुढें बहुतेकां काळां ॥ शूद्र मृत्यूतें पावला ॥ तो पुण्येकरोनि जाहला ॥ राजा मांडलिक ॥९१॥

आणि मरणांतीं तो ऋषी ॥ उपजला त्याच नगरासी ॥ उपाध्यायाचिये वंशीं ॥ राजोपाध्याय ॥९२॥

राजा असे जातिस्मर ॥ तेणें उपाध्यावरी प्रीति थोर ॥ येरु शास्त्रोक्त धर्म समग्र ॥ करी रायादेखतां ॥९३॥

राजा उपाध्यायासि देखोनी ॥ हांसे विस्मित होवोनी ॥ येरु लाजोनि ह्नणे मनीं ॥ कांपां राजा हांसतसे ॥९४॥

कोणे एके काळांतरीं ॥ रावो संतोषला त्यावरी ॥ उपाध्याय ह्नणे ते अवसरीं ॥ कांहीं असे जी मागणें ॥९५॥

राव संतुष्टपणें ह्नणे ॥ तुवां सर्वही राज्य घेणें ॥ काय ते अपेक्षा करणें ॥ आज्ञा प्रमाण मज ॥९६॥

येरु ह्नणे मी विद्यावंत ॥ शास्त्रोक्तकर्म असें करित ॥ तरी हांसण्यांचा काय हेत ॥ तें मज सांगिजे ॥९७॥

ऐकोनि राव चिंताग्रस्त ॥ ह्नणे कैसा सांगवे वृत्तांत ॥ येरु आग्रह असे करित ॥ सांभाळीं वचन ह्नणवोनी ॥९८॥

यावरी राव ह्नणे त्यासी ॥ कीं तूं पूर्वजन्मींचा ऋषी ॥ मी शूद्र करीं शुश्रूषेसी ॥ ब्रह्माश्रमपदीं ॥९९॥

तेथ तुवां प्रीति केली ॥ मज श्राद्धपद्धती दाविली ॥ तद्दोषें उत्पत्ती जाहली ॥ तुज उपाध्यायागृहीं ॥ ॥१००॥

माझें उपाध्यायत्व करिसी ॥ तेणें हांसें येतसे मजसी ॥ थोर दोषा पावलासी ॥ माझेनि तूं ॥१॥

आतां तुवां एक कीजे ॥ बहुत द्रव्य घेइजे ॥ धर्मव्रत आचरिजे ॥ होइजे पुनीत ॥२॥

ऐसा राजोपदेश ऐकोन ॥ पश्चात्तापें जाहला खिन्न ॥ मग तीर्थव्रतें करोन ॥ ब्रह्माश्रमपद पावला ॥३॥

येणेपरी तो द्विजवर ॥ मुक्त जाहला परिकर ॥ काळांतरीं गेला शीघ्र ॥ विष्णुलोकीं ॥४॥

ह्नणोनि नीचजातीचें जाण ॥ निंद्य उपाध्यायपण ॥ आणि न कीजे उपदेशवचन ॥ ह्नणोनि दूरी त्यजावा ॥५॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य त्रिवर्ण ॥ यांचें करावें आचार्यपण ॥ परंतु शूद्राकारण ॥ उपदेश न करावा ॥६॥

नीच जातीचें पुरोहितत्व ॥ करितां होइजे पतित ॥ हा उपदेश समस्त ॥ एकें धर्मराया ॥७॥

तंव धर्म ह्नणे पाहीं ॥ कवण स्त्रियेचिये ठायीं ॥ लक्ष्मी राहते तें सर्वही ॥ सांगावें मज ॥८॥

मग ह्नणे गांगेया ॥ हा भावो रुक्मिणियां ॥ लक्ष्मीप्रती पुसिला राया ॥ येरी सांगती जाहली ॥९॥

ह्नणे रुक्मिणीये परियेस ॥ त्या पुरुषाच्या ठायीं माझा वास ॥ जो कृतज्ञ शुचि विशेष ॥ क्रोधरहितपणें ॥११०॥

जितेंद्रिय सत्यवचन ॥ देव ब्राह्मणपरायण ॥ धर्मनिष्ठ सदाचरण ॥ तेथ मी राहें सर्वदा ॥११॥

आणि जो घातकी कृतघ्न ॥ अनाचारी वृथा वचन ॥ त्या पुरुषाच्या ठायीं जाण ॥ वास न करीं ॥ ॥१२॥

हें युगत्रयीं सुपरीत ॥ परि कलयुगीं विपरीत ॥ करावयालागीं पतित ॥ राहें नष्टागृहीं ॥१३॥

आतां स्त्रियेच्या ठायीं जाण ॥ जे दात देवपरायण ॥ सदाचारी पूजी ब्राह्मण ॥ तेथ माझा निवास ॥१४॥

आणि जे भ्रतारा प्रतिकूळ नारी ॥ परगृहासक्त निद्रा भारी ॥ कटुभाषिणी रुक्षा चारी ॥ तेथें वास न करीं मी ॥१५॥

आणिक वर्म सांगों सही ॥ सर्वभूषणीं मी असेंही ॥ कीं अनुकूळाच्या ठायीं ॥ तथा तपस्वियागृहीं ॥१६॥

शरदीं नक्षत्रमाळेच्या ठायीं ॥ नदी सुंदरपदार्थ गाई ॥ श्रियाआलंकृत सर्वही ॥ मीचि कीं वो ॥१७॥

जेथ देवब्राह्मणपूजन ॥ स्वाध्यायपाठ मंगलवचन ॥ तेथ माझें निवासस्थान ॥ ऐकें रुक्मिणीये ॥१८॥

तंव धर्म करी विनंती ॥ स्त्रीपुरुषांच्या संगसुरतीं ॥ कोणा अधिक सुख प्रीती ॥ पावे सांगें ॥१९॥

भीष्म ह्नणे गा भारता ॥ येथ सांगो इतिहासकथा ॥ जे भृंगाश्वा आणि सुरनाथा ॥ वर्तली पूर्वी ॥ ॥१२०॥

भृंगाश्वराजा आणि इंद्र ॥ यांसी थोर पडिलें वैर ॥ भृंगाश्व होता अपुत्र ॥ धार्मिक परम ॥२१॥

तेणें पुत्रेष्टि याग केला ॥ शतपुत्रांतें पावला ॥ इंद्र थोर खवळला ॥ रायासि घातूं पाहे ॥२२॥

मग कोणे एके दिवशीं ॥ भृंगाश्व गेला पारधीसी ॥ तंव इंद्रें मोहिलें त्यासी ॥ न देखे स्वसैन्य ॥२३॥

भुलोनि भलतीकडे गेला ॥ क्षुधातृषाक्रांत जाहला ॥ उदक पाहे तंव देखिला ॥ मावसरोवर ॥२४॥

त्याचिचे जीवनीं रिघाला ॥ स्नान करोनि बाहेर आला ॥ तंव अकस्मात जाहला ॥ स्त्रीरुप देह ॥२५॥

निज अंग अवलोकिलें ॥ तंव स्त्रीअवयव देखिले ॥ रायें अतिदुःख मानिलें ॥ कैसा जाऊं गावांत ॥२६॥

हे तंव जाहली दैवगती ॥ देखोनि स्त्रिया हांसती ॥ ऐसा चिंताग्रस्त चित्तीं ॥ होवोनि आला गावांत ॥२७॥

तंव विरुपत्व देखिलें ॥ सर्व लोक पुसते जाहले ॥ रायें त्यांप्रति ह्नणितलें ॥ कीं दैव बलवत्तर ॥२८॥

मोहें भ्रमविलें चित्तीं ॥ गेलों सरोवराप्रती ॥ स्नान करितां जाहली गती ॥ ऐसी देखा ॥२९॥

मग पुत्रां वांटोनि दीधलें राज्य ॥ ह्नणे संर्पें सदा राहिजे ॥ स्वयें वनीं गेला लज्जें ॥ जाहला तापस ॥१३०॥

त्याचे एकशत पुत्र भले ॥ संपें राज्यकरुं लागले ॥ इकडे त्यासी वनीं वरिलें ॥ एके तापसियें ॥३१॥

पुढें तये तापसिनीतें ॥ शतपुत्र जाहले निगुते ॥ मग ते पूर्वील पुत्रांतें ॥ येवोनि ह्नणे ॥३२॥

यांसी अर्धवांटा देवोनी ॥ राज्य भोगावें सर्वानीं ॥ तें मानिलें पूर्वील नंदनीं ॥ हें इंद्रें आयकिलें ॥३३॥

तंव इंद्रक्रोधें बोले ॥ ऐसें हें काय वर्तलें ॥ उफराटें पुत्र जन्मले ॥ दोनीशतें ॥३४॥

हा अपकार वृथा गेला ॥ मग इंद्र द्विजरुपें आला ॥ पूर्वपुत्रांसि बोलिला ॥ कां दवडिलें अर्धराज्य ॥३५॥

भ्रात्याभ्रात्यांचें वैर तरी ॥ प्रसिद्ध असे सर्वत्रीं ॥ हे तापसपुत्र निर्धारीं ॥ नव्हती बंधु तुमचे ॥३६॥

तें राजपुत्रां मानवलें ॥ मग युद्धकरुं लागले ॥ परस्पर क्षया मांडिलें ॥ सुरनाथाचे कर्तृत्वें ॥३७॥

तंव ते तापसिनी जावोनी ॥ सर्व सांगे पतिलागुनी ॥ तापसी रडे ऐकोनी ॥ करुणालापें ॥३८॥

ती रडतां देखोनी ॥ कृपा आली वज्रपाणी ॥ ह्नणे कवणे दुःखें कामिनी ॥ मांडिला शोक ॥३९॥

यावरी तापसिनी ह्नणत ॥ मज पूर्वी जाहले पुत्रशत ॥ पारधी खेळतां सरोवरांत ॥ रिघालों एके ॥१४०॥

स्नान करितां दैवगती ॥ मी जाहलों गा युवती ॥ मग तप करितां वनांतीं ॥ तापसपती जोडला ॥४१॥

तेथें शतपुत्र जाहले ॥ समस्तां राज्य वांटिलें ॥ परि त्यां माजी क्षय मांडलें ॥ परस्पर ॥४२॥

मज हा पुत्रशोक मना ॥ दुःसह होतसे ब्राह्मणा ॥ तंव बोले सुरराणा ॥ तियेप्रती ॥ ॥४३॥

कीं तुवां स्वबळें ॥ मज थोर दुःख दीधलें ॥ ह्नणोनि आतां म्यां दीधलें ॥ दुःख तुजलागोनी ॥४४॥

मद्विरोधें केला यज्ञ ॥ तयाचा हा फळपाक जाण ॥ तुज स्त्रीत्व पुत्रां भांडण ॥ मज इंद्रापासोनी ॥४५॥

हें ऐकोनि तापसिनी ॥ लोळणी घाली इंद्रचरणीं ॥ ह्नणे देवराया अपराधिनी ॥ मी असें सर्वोपरी ॥४६॥

कष्ट करोनियां बहुत ॥ म्यां मागीतले सुत ॥ ते तुवां राखिजे सत्य ॥ येरु प्रसन्न जाहल ॥४७॥

तियेप्रति ह्नणे कवण ॥ तुझे राखावे नंदन ॥ येरी ह्नणे वचन ॥ ऐकें देवा ॥४८॥

स्त्रीपणीं जाहले पुत्र ॥ ते राखावे समग्र ॥ तंव विस्मयें ह्नणे इंद्र ॥ कांपां वडील वंचिले ॥४९॥

येरी ह्नणे स्त्रीपणीं ॥ पुत्र जाले ते वल्लभ जाणीं ॥ इंद्र ह्नणे वो तापसिनी ॥ आणीक वर मागावा ॥१५०॥

यावरी तापसिनी ह्नणे ॥ स्त्रीत्व आवडे मजकारणें ॥ तरी तेंचि स्थिर करणें ॥ अतिसौख्यदायक ॥५१॥

इंद्र ह्नणे पुरुषत्वासी ॥ सांडोनी कां स्त्रीत्व मागसी ॥ ऐकोनि ह्नणे तापसी ॥ ऐकें देवा ॥५२॥

स्त्रीपुरुषसंबधें रमण ॥ तेथ स्त्रीसुख विशेष जाण ॥ म्यां पुरुषसंबधें पूर्ण ॥ सुख बहुत भोगिलें ॥५३॥

परंतु स्त्रीत्वेंचि सुख बरवें ॥ पुरुषसंगें सुख भोगावें ॥ मग इंद्र करोनि आघवें ॥ गेला सुरलोकीं ॥५४॥

भीष्म ह्नणे गा भूपती ॥ ह्नणोनि स्त्रियेसि अधिक प्रीती ॥ पुरुषाहोनि असे निगुती ॥ कामभोगीं ॥५५॥

ऐसें भीष्में निरुपिलें ॥ तंव धर्मे काय पुसिलें ॥ तें आइकावें वहिलें ॥ जन्मेजया ॥५६॥

हें अनुलक्षें करोनी ॥ भीष्में कथिलें धर्मालागुनी ॥ नांव ठेविलें ह्नणवोनी ॥ अनुशासिक ऐकें ॥५७॥

आतां याचिये पुढील कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ते ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्नणे कवि मधुकर ॥५८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ नानाख्यानकथनप्रकारु ॥ चतुविंशाध्यायीं कथियेला ॥१५९॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP