मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय २०

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय २०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ कैसा जन्मला शुकदेवो ॥ तो सांगें कथान्वयो ॥ पुराणांतरींचा ॥१॥

मग ह्मणे मुनीश्वर ॥ राया तूं चातुर्यसागर ॥ तरी प्रश्नाचें उत्तर ॥ ऐक आतां ॥२॥

याग सरलिया नंतरीं ॥ तोचि दिन अवघारीं ॥ गर्भ संभवला उदरीं ॥ व्यासपत्‍नीचे ॥३॥

तिये सुलजा नाम ह्मणती ॥ लोकवार्ता जगीं बोलती ॥ परि ऋषिकन्या सत्यवती ॥ अपर नाम ॥४॥

असो नवमास जालियावरी ॥ प्रसूति नव्हे ते नारी ॥ चिंता करी तिये अवसरीं ॥ व्यासदेव ॥५॥

बारासोळा मासांचा अवसरू ॥ वाट पाहे ऋषीश्वरू ॥ चोवीसतिसां जाहला भरू ॥ परि प्रसुति नव्हेची ॥६॥

एकदा पर्जन्य सप्तरात्रीं ॥ संतत पडिला असे भारी ॥ तेणें व्यासाचिये शरीरीं ॥ थोर कष्ट जाहले ॥७॥

तंव देखिलें शिवलिंग ॥ भावें पूजा केली चांग ॥ तेणे तोषला उमारंग ॥ व्यासाप्रती ॥८॥

ह्मणे कोणे केलें पुजन ॥ तरी तो भक्त निर्वाण ॥ मग होवोनि प्रसन्न ॥ ह्मणे वरब्रूहीं ॥९॥

कोणे एके पुराणीं ॥ वर्तत असे ऋषिवाणी ॥ कीं व्यासासि चक्रपाणी ॥ प्रसन्न जाहला ॥१०॥

मग श्रीकृष्ण ह्मणे शुकदेवा ॥ कां उदरीं करिशी मावा ॥ आह्मी काय संसाराभवा ॥ भीत असों ॥११॥

सोळासहस्त्र अंतःपुरें ॥ साठलक्ष कन्याकुमरें ॥ रथ अश्व नरकुंजरें ॥ द्रव्या मिती नाहीं ॥१२॥

येरू ह्मणे हो श्रीहरी ॥ मज जाणें निजमंदिरीं ॥ ह्मणोनि न निघें बाहेरी ॥ तवदर्शन हेंचि पुरे ॥१३॥

यावरी ह्मणे कैवल्यनाथ ॥ शुका ऐकें येक अर्थ ॥ जेणें पाविजे सिद्धपंथ ॥ ब्रह्मप्राप्तीचा ॥१४॥

पंच‌इंद्रियांपासून ॥ आशा मोह सांडून ॥ कामक्रोध आपणाधीन ॥ करावे तुवां ॥१५॥

दंभ प्रपंच अहंकार ॥ यांचा करावा संहार ॥ तेणें करूनि कैवल्यद्दार ॥ पावसी तूं ॥१६॥

ऐसा शुकदेव उपदेशिला ॥ तेणें तो ब्रह्मयोगी जाहला ॥ मग कृष्णनाथ बोलिला ॥ नीघ बाहेरी ॥१७॥

तंव शुकदेवें विनाविलें ॥ देवें मज उपदेशिलें ॥ परि येक सांकडें पडीलें ॥ कृपाळुवा ॥१८॥

बारावर्षे जाहलीं जन्मासी ॥ नग्न कैसा निघों हृषीकेशी ॥ स्वयंभ कांसोटा जरी देशी ॥ तरी निघणें घडेल ॥१९॥

ऐसें शुकदेव बोलिला ॥ देवें स्वयंभ कौपीन रचिला ॥ मग बाळक जन्मला ॥ जोडोनि हस्त ॥२०॥

तो मागें परतोनि न पाहे ॥ थोर निघाला लवलाहें ॥ ऐसा वैराग्यशीळ न होय ॥ भूतभविष्यीं ॥२१॥

तंव व्यासें पाठोवाटी ॥ धांव घेतली सुरसुटी ॥ ह्मणे पुत्रा पाहें दृष्टीं ॥ परतोनि येकदां ॥२२॥

अरे बाळा तुज कारणें ॥ काय शिकविलें नारायणें ॥ नको जाऊं निष्ठुरमनें ॥ सांगतं ऐक ॥२३॥

मातापितरां दुखविजे ॥ आणि वनांतरा जाइजे ॥ हे श्रेष्ठपण केविं मिरविजे ॥ जगामाजी ॥२४॥

तुं सुपुत्र ह्मणविसी ॥ पूर्वज्ञानें बोधलासी ॥ ह्मणोनि आज्ञा न मानिसी ॥ परि हें युक्त नव्हे ॥२५॥

येणेंपरी व्यास ह्मणे ॥ परि तें शुकदेव न माने ॥ मग सिद्धसरोवर तेणें ॥ आटोपिलें ॥२६॥

तये सरोवरीं देखा ॥ समाधि लागली त्या बाळका ॥ परि जगचावट बोलती लोका ॥ कीं केलें तप ॥२७॥

ब्रह्मकमंडलूच्या तीरीं ॥ स्वयंभ गुफे माझारी ॥ चातक मयुरें शेजारीं ॥ तेथें आसन घातलें ॥२८॥

मग विभूति आणिली ॥ ते सर्वांगी चर्चिली ॥ ज्ञानमुद्रा समाधि भली ॥ लाविली शुकें ॥२९॥

स्थाना करुनि प्रदक्षिणा ॥ नमन केलें सहस्त्रकिरणा ॥ प्रणम्य करूनि आसना ॥ वंदिनी भूमी ॥३०॥

उत्तरमुखें आसनावरी ॥ वामचरण करोनि उपरी ॥ आणि उजवा चरण धरी ॥ भूमिकेसी ॥३१॥

भारता ऐसा तो शुकदेवो ॥ तेणें घेतला समाधिठावो ॥ ह्मणोनि संसाराचा भावो ॥ फिटला त्याचा ॥३२॥

ऐसें देखोनि व्यासमुनी ॥ निघाला सत्यलो कभुवनीं ॥ विचारित अंतःकरणीं ॥ कीं हें विरिचीसि सांगावें ॥३३॥

लवलाहीं ब्रह्मा सेविला ॥ सावित्रीसह नमस्कारिला ॥ मग बोलों लागला ॥ ग्लनिवचनें ॥३४॥

जयजयाजी विरिंचिनाथा ॥ तूं अनाथांचा त्राचा ॥ तरी शुका माझिये सुता ॥ टाळावें तपेंसी ॥३५॥

मग ब्रह्मा क्षीरसागरा ॥ जावोनि विनवी शारंगधरा ॥ तेथोनि आले गौरीहरा ॥ जवळी सर्व ॥३६॥

तिन्ही देव विचार करिती ॥ कैसी कीजे बुद्धीमती ॥ मग बाहोनि शंचीपती ॥ ह्मणती रंभा पाठविजे ॥३७॥

ऐसी आज्ञा जाहली ॥ देवसभा विसर्जिली ॥ इंद्रे रंभा बोलविली ॥ रूपलावण्य ॥३८॥

देवेंद्र ह्मणे रंभेतें ॥ त्वां जावोनि भूमंडळातें ॥ तपीं ढाळोनि व्याससुतातें ॥ आणावें येथ ॥३९॥

ऐकोनि निघाली नायका ॥ श्रृंगार करुनियां देखां ॥ शोभा वर्णिता मुखशंशाका ॥ न्युन चंद्रमंडल ॥४०॥

आलाप करी तारूण्यभरें ॥ चाले हंसगती पायीं नेपुरें ॥ दर्पण पाहे क्षणांतरें ॥ परमशोभें ॥४१॥

आतां आणीन शुकदेवा ॥ ह्मणोनि केला निघावा ॥ विश्वास आला सर्वदेवां ॥ कार्य करील हे ह्मणोनी ॥४२॥

इंद्रे विमान दीधलें ॥ बैस रंभे ह्मणितलें ॥ तंव विमान चालिलें ॥ सिद्धाश्रमासी ॥४३॥

विमानाचें दिव्यतेज ॥ वरी रंभा अतिविराज ॥ गगनीं येतां वाटलें चोज ॥ तापसांसी ॥४४॥

सहस्त्रवरूषांची समाधी ॥ लावोनि बैसली तापसमादी ॥ परि तेही ढळली आधीं ॥ देखोनी रंभेंतें ॥४५॥

जेवीं अवचिता तडकु पडे ॥ कां धनिकांवरी घाला पडे ॥ तेवीं तापसीं केलें वेडें ॥ आगमनें तिचिया ॥४६॥

येक तपातें सांडोनी ॥ आडवे राहती येवोनी ॥ ह्मणती जरी हे जोडे कामिनी ॥ तरीच धन्य संसारीं ॥४७॥

परि ध्यानस्थ शुकदेवो ॥ बणलासे सोहंभाव ॥ ऐसा रंभेनें स्वयंभुव ॥ देखिला शुकमुनी ॥४८॥

मन लाविलें चिंतनी ॥ प्रेतरूप कुंडी ठेवोनी ॥ सुखसामाधी हारपोनी ॥ राहिलासे निश्वळ ॥४९॥

रंभा देखे तंव अचेतन ॥ ह्मणे कुडींसि काय कारण ॥ याचा जरी परतेल प्राण ॥ तरीच उपाय चालेल ॥५०॥

जंव रंभा सन्मुख ठेली ॥ विमानाखालीं उतरली ॥ तंव नानापुष्पवल्ली ॥ लवल्या भारें ॥५१॥

केळीं रातांजन नारिकेळें ॥ निंबोणी केतकी सदाफळें ॥ फणस गंभारी रातोप्तलें ॥ भ्रमर रुंजी घालिती ॥५२॥

दावणा मोगरा तुशिंबिरी ॥ मोगरा शेवंती वाटोगरी ॥ उतोतिया नारंगी बोरी ॥ द्राक्षीमंडप ॥५३॥

ऐसी रम्य वनस्थळी ॥ रंभा दृष्टीने न्याहाळी ॥ उभी असे शुका जवळी ॥ कटाक्षबाणें ॥५४॥

मग जोडोनियां पाणी ॥ बोले वैराटिकाक वचनीं ॥ तानकर्माचिये मिळणीं ॥ मंजूळ गीत गातसे ॥५५॥

शुकालागीं होती समाधी ॥ तंव चैतन्य जाहली बुद्धी ॥ ह्मणे वो माये काय बुद्धी ॥ असे तुझिये मानसे ॥५६॥

रंभा ह्मणें गा डोळसा ॥ तुझें रूप देखोनि राजसा ॥ तेणें माझिये मानसा ॥ उठिला काम ॥५७॥

मज येतअसे करुणा ॥ मी स्वर्गीची देवांगना ॥ सहजें आलें या वना ॥ तंव तुझे कष्ट देखिले ॥५८॥

चाल जाऊं माझिये घरीं ॥ मजसारिख्या तेथें नारी ॥ नानासुखें संसारीं ॥ भोगूं तेथें आपण ॥५९॥

बरवीं वस्त्रें पांघुरवीन ॥ चांपेलतेलें चचींन ॥ कस्तुरीमळिवट रेखीन ॥ तुझीये भाळीं ॥६०॥

विंजुणा वारीन स्वकरीं ॥ ऐशी मज सारिखी नारी ॥ सुख भोगवीन परोपरी ॥ संसारामाजी ॥६१॥

वायां नको करूं श्रम ॥ सांडी तपश्वर्येंचा भ्रम ॥ सुख्यशयनीं घराश्रम ॥ स्वीकारावा ॥६२॥

तेव्हां शुकदेवो ह्मणे ॥ काय ह्मणावें तुजकारणें ॥ तूं आलीस भावें जेणें ॥ तो घडणें नाहीं ॥६३॥

स्त्रीपुरुषांचा वानिसी भोग ॥ तरी तो जन्मातरीं भोगिला चांग ॥ आतां करूनियां त्याग ॥ बैसला येथें ॥६४॥

बरवीं वस्त्रें नेसवीन ह्मणसी ॥ तरी स्वयंभ कौपीन मजसी ॥ नेसोनि राहिलों अहर्निशीं ॥ नारायणनामें ॥६५॥

सत्रावीचिये सुखसेजे ॥ सदा संतोष भोगाविजे ॥ अनुभव जालिया पाविजे ॥ मोक्षपद ॥६६॥

तें मुक्तिपद भोगणें ॥ सुखामाजी राहणें ॥ संसारदुःख सांडवणें ॥ येणेंपरी ॥६७॥

ऐसें ऐकोनि रंभा ह्मणे ॥ तप करोनि राज्य भोगणें ॥ तें आतांचि जरी प्राप्त होणें ॥ तरीं वोखटें काय ॥६८॥

ययाउपरी शुक ह्मणे ॥ जरी होय राज्य करणें ॥ तरी सुकृतार्थ आचरणें ॥ दानधर्म ॥६९॥

पाहें पां राजा भर्तृहरी ॥ जन्मोनि राज्यकुळामाझारी ॥ तो काय स्थिरावला सुंदरी ॥ राज्यामाजी ॥७०॥

पितापुत्रांचे भांडण ॥ हें द्रव्याचि होय कारण ॥ अथवा भासे मेळवण ॥ दुःखालागीं ॥७१॥

हें मिथ्या मायाजाळ ॥ लटिकेंचि असे पाल्हाळ ॥ वाढवितां लागे काळ ॥ मोक्षपदासी ॥७२॥

जरीं तुं ह्मणसी घराश्रम ॥ तरी स्त्रीपुरुषांचा नाहीं नेम ॥ मग वायां जातो धर्म ॥ मृत्युस्तव ॥७३॥

पाहें पां नारदमुनी ॥ तेणें मन्मथ सांडोनी ॥ वंद्य जाहला त्रिभुवनीं ॥ योगिता तो ॥७४॥

मदनाचेनि महाभेंणें ॥ षडाननें केलें पळणें ॥ मग स्त्रीरूप देखणें ॥ वर्जिलें देखा ॥७५॥

तुवां इतुकें जाणितलें ॥ विषयसुखातें वानिलें ॥ परि रंभे हें वृथा गेलें ॥ चुकला मोक्ष ॥७६॥

तंव रंभा ह्मणे हो मुनी ॥ ऐसें न जाणा अंतःकरणीं ॥ ऋषि योगी महामुनी ॥ काय स्त्रीविण राहिले ॥७७॥

पहा घराश्रमीं अनूसरया ॥ देव उदरा आले तिया ॥ आणि श्रियाळ चांगुणेयां ॥ प्रत्यक्ष भेटला शूळपाणी ॥७८॥

ऐसा घराश्रमींचा भावो ॥ तेणें भेटतो गोविंद ॥ मग चुके येवोजावो ॥ संसारींचा ॥७९॥

ऐकोनि ह्मणे शुकमुनी ॥ सहस्त्रार्जुन गेला मरणीं ॥ वाळीं मेला रामबाणीं ॥ स्त्रियेचेनि योगें ॥८०॥

भस्मासुर गेला प्राणों ॥ कींचक मारिला भीमसेनें ॥ ऐसें स्त्रियांचे करणें ॥ अवो रंभे ॥८१॥

ययाउपरीं रंभा ह्मणे ॥ कां स्त्रियांसी निंदणें ॥ पति निमाल्या त्याकारणें ॥ करिती अग्निप्रवेश ॥८२॥

रावणस्नुषा सुलोचना ॥ जालंधरपत्‍नी वृंदा जाणा ॥ तैसीच सुधन्व्याची अंगना ॥ गेली पतिसांगातीं ॥८३॥

पाहें पां माझें लावण्य ॥ त्रिभुवनासी पडे मोहन ॥ तूं तरी शहाणपण ॥ मिरवितोसी ॥८४॥

धनगरासि रत्‍न दाविजे ॥ तेणें तें केवीं वोळखिजे ॥ जरी पारखी पाविजे ॥ तरीच ज्ञान ॥८५॥

चंदन रानीं सांपडे भिकारी ॥ तरी अज्ञानत्वें बांधी भारां ॥ मग आणोनि बाजारा ॥ विकी मृत्तिक्तामोलें ॥८६॥

नातरीं बुद्धीहीनें वणिजें ॥ सैंधवभावें हिरा विकिजे ॥ तेथें पारखीविण दुजें ॥ कोण जाणें ॥८७॥

तैसी मी स्वर्गींची अप्सरा ॥ तुज जोडलें योगेश्वरा ॥ तप केलेंसि अपारा ॥ ह्मणोनि प्राप्त जाहलें ॥८८॥

तपश्वर्येचें फळ जाहलें ॥ तुज स्त्रीरत्‍न जोडलें ॥ पुढें धन्यत्व पावलें ॥ संसारामाजी ॥८९॥

तंव ह्मणे शुकमुनी ॥ रंभे तुं तंव शहाणी ॥ मनभेदालागीं अजूनी ॥ स्थिरावलींस ॥९०॥

परि ऐकें वो सुंदरी ॥ नवद्दारीं दुर्गंधीं शरीरीं ॥ वस्त्रें सुवर्ण अलंकारीं ॥ बरवें दिसे ॥९१॥

अस्थिमांसाचा गोळा ॥ मळमूत्रांचा गुंडाळा ॥ दुर्गंधीं करूनिं कंटाळा ॥ कैसा नये तुज ॥९२॥

तुं वानिसी जेणें मुखें ॥ तें लाळपित्तें भरलें विशेषें ॥ विचारीं मनीं सारिखें ॥ तुझें तुंची ॥९३॥

ऐसें ऐकोनियां वचन ॥ निवांत राहिली खोंचोन ॥ पैज आली होती घेवोन ॥ ते वृथा जाहली ॥९४॥

ह्मणे आता यें उणेपणें ॥ जगीं कंठणें लाजिरवाणें ॥ मिरवूं कैसें अपमानें ॥ हें शरीर ॥९५॥

ह्मणोनि देह विदारी ॥ नखाग्र घालूनि भीतरीं ॥ तंव कर्पुर कस्तुरी ॥ जवादीपरिमळ ॥९६॥

जैसें कर्दळीकलेवर ॥ मध्यें कर्पूराचें बिढार ॥ तैसें निर्मळ दिसे उदर ॥ तये रंभेचें ॥९७॥

शुकह्मणे हो सुंदरी ॥ बारावर्षें राहिलों उदरीं ॥ मळमूत्रांचियें भीतरीं ॥ कष्टलों फार ॥९८॥

ऐसा पवित्र ठावो असता ॥ तरी येथचि राहतो संतता ॥ तुजसारिखी उदरमाता ॥ केविं पाविजे ॥९९॥

तुज ऐसी जननी ॥ प्राप्त केवीं आह्मालागुनी ॥ हे चुकी केली चक्रपाणी ॥ येथें ठाव कां न दिला ॥१००॥

ऐसा शब्द परिसोनी ॥ रंभा विचारी अंतःकरणीं ॥ कीं आग्रह करितां यालागुनी ॥ झणी मजवरी कोपेल हा ॥१॥

येवढी जयाची थोरी ॥ तो केविं ये आपुलें घरीं ॥ सर्प खेळवितां व्यापारी ॥ पाविजे मरणा ॥२॥

जरी जाणोनि विष घेइजे ॥ तरी आयुष्य पुरल्याविण जाइजे ॥ ऐसें वर्तमान ओळखिजे ॥ कोणेकाळीं ॥३॥

मी तरी याचें निःकारण ॥ करित असें कीं छळण ॥ नेणों देईल शापवचन ॥ मजलागोनी ॥४॥

कैची तो व्यासमुनी ॥ देवी राहतील आपुले स्थानीं ॥ मी येथें शापालागुनी ॥ होईन पात्र ॥५॥

मग उठिली झडकरी ॥ शुकदेवातें नमस्करी ॥ आरुढोनि विमानावरी ॥ गेली स्वर्गलोंकी ॥६॥

घनवटली देवसभा ॥ तेथें प्राप्त जाहली रंभा ॥ ह्मणे जाहल्यें कर्पूरगाभा ॥ परि तो योगी उठेना ॥७॥

ऐकोनि आश्चर्य जाहलें देवां ॥ पुष्पें वाहिलीं शुकदेवा ॥ वज्रघर सत्वभावा ॥ वानीतसे ॥८॥

ऐसा शुक तपिन्नला ॥ मदन पायांतळीं घातला ॥ थोर कीर्तिघोष जाहला ॥ जगामाजी ॥९॥

हे भविष्योत्तरींची कथा ॥ तुज कथिली गा भारता ॥ आतां येकनयनाची कथा ॥ सांगो तुज ॥११०॥

बळीनें दान दीधलें वामना ॥ तैं दर्भशिखा खोंचली नयना ॥ झारींच्या मुर्खीं होता जाणा ॥ शुक्राचार्या ॥११॥

हे ब्रह्मपुराणींची कथा ॥ परि दुजी असे अपूर्वता ॥ ते सांगतों जगवार्ता ॥ साकल्यपणें ॥१२॥

तरी ऐकें चित्त देवोन ॥ कोणैककाळीं चतुरानन ॥ सावित्रीसवें ॥ कामातुर होवोन ॥ सुरतसुखें रमत होता ॥१३॥

तेचि समयीं शुक्रमुनी ॥ आला दर्शना लागोनी ॥ तंव देखिलीं तीं दोन्हीं ॥ येकांतांत ॥१४॥

काम न होतां संपूर्ण ॥ तेणें कोपलीं सावित्री आपण ॥ ह्मणे जावोत याचे नयन ॥ आणि हा बधिर होवो कीं ॥१५॥

ऐसा शाप पावला ॥ शुक्र अंधबधिर जाहला ॥ मग तेणें विष्णु प्रार्थिला ॥ आर्तवचनीं ॥१६॥

जयजयाजी हृषीकेशी ॥ तूं जरी कृपा करिशी ॥ तरी संकटीं तारिशी ॥ दीनपतितां ॥१७॥

तूंचि हरी तुंचि हर ॥ तूंचि ब्रह्मा तूंचि दातार ॥ तुंचि त्रैलोक्यीं वज्रधर ॥ स्थापिला देवा ॥१८॥

ऐसा नानाकरूणावचनीं ॥ धांवा तयाचा ऐकोनी ॥ तत्काळ पातला शारंगपाणी ॥ तयाजवळी ॥१९॥

भक्तांचा कैवारी मुरारी ॥ वेगें आला जेथें त्रिपुरारीं ॥ तंव ह्मणे पंचवक्त्री ॥ तें अपुर्व परिसिजे ॥१२०॥

असतां ब्रह्मयाचें वचन ॥ तें आपणा होतें भंजन ॥ परि हें सावित्रीचें वचन ॥ दुर्घट दिसे ॥२१॥

मग ते ब्रह्मलोकीं येवोनी ॥ करिते जाहले विनवणी ॥ कीं सावित्री माते शुक्रमुनी ॥ करीं शापमुक्त ॥२२॥

देवी ह्मणे माझी वाणीं ॥ अन्यथा नव्हे परि एकनयनी ॥ हा होईल त्रिभुवनीं ॥ आणी एक श्रोत्र ॥२३॥

असो शुक्रें उघडिले लोचन ॥ तंव जाहला एकनयन ॥ आणि नष्ट जाहला कर्ण ॥ एक तयाचा ॥२४॥

मुनि ह्मणे राया भारता ॥ ह्मणोनि एकनयन बोलिजे सर्वथा॥ हे ब्रह्मपुराणींची कथा ॥ कथिली तुज ॥२५॥

आतां याचिये पुढील कथा ॥ धर्म पुसेल गंगासुता ॥ ती ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्मणे कवि मधुकर ॥२६॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ रंभाशुकचरित्रप्रकारू ॥ विंशाध्यायीं कथियेला ॥१२७॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौत्रयोदशस्तबक विंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP