मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय १५

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय १५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

ऐसी ऐकोनि ज्वरकथा ॥ धर्म ह्मणे गंगासुता ॥ ब्रह्माचें अध्यात्मस्वरूप आतां ॥ सांगा मज ॥१॥

तंव भीष्म ह्मणे ॥ धर्मातें ॥ ब्रह्मीं अध्यात्मस्वरूप निरुतें ॥ तेथोनियां पंचभूतें ॥ हें पूर्वींचे सांगीतलें ॥२॥

त्यापासोनि स्थावरजंगम ॥ भूतें उपजती समविषम ॥ तेथंचि लय पावती सधर्म ॥ यथा समुद्री लहरिया ॥३॥

जेवीं कूर्म अंगें पसरी ॥ सवेंचि संकोची शरीरीं ॥ तेविं उप्तत्तिलय ईश्वरीं ॥ स्वेच्छावशे ॥४॥

आकाशापासोनी जाण ॥ अवकाश शब्दगुण ॥ रस स्नेह जिव्हा हे तीन ॥ जळगुण जळीं ॥५॥

रूप चक्षु विपाक तिन्ही ॥ हे तेजाचे गुण जाणीं ॥ गंध घ्राण शरीर मेदिनी ॥ पासाव गुणत्रय ॥६॥

प्राण चेष्टा आणि स्पर्श ॥ हे वायुगुण विशेष ॥ सत्वरजतमप्रकाश ॥ काळ कर्मबुद्धी ॥७॥

चक्षु रसना घ्राण ॥ क्षोत्र त्वचा आणि मन ॥ सातवी बुद्धी आठवा क्षेत्रज्ञ ॥ विषयीं प्रवर्त बुद्धिपासाव ॥८॥

तये बुद्धीसि प्रवर्त ॥ क्षेत्रज्ञ करीतसे सत्य ॥ सत्वरजतमभावां नित्य ॥ बुद्धीचि प्रवर्तवी ॥९॥

हर्ष प्रीति आनंद सुख ॥ शांति हे सात्विकगूण देख ॥ कदाचित होती सविशेष ॥ पुरुषाच्या ठायीं ॥१०॥

परिहास शोक संताप अक्षमा ॥ हे रजोगुण चिन्हमहिमा ॥ अविद्या रोग मोह अधर्मा ॥ मद आलस्यां प्रवर्तवी ॥११॥

भय असमृद्धि उन्माद स्वप्न ॥ प्रमाद हे तामसगुण ॥ ऐशा बुद्धीच्या गति सगुण ॥ यांचा द्रष्टा आत्मा ॥१२॥

ऐसें हें अध्यात्म जाणे ॥ तोचि बुद्धीमंत बोलणें ॥ तरी पंचभौतिक जाणणें ॥ ईश्वरेच्छा निर्मित ॥१३॥

धर्मासि ह्मणे भीष्मदेव ॥ शोकदुःखमृत्यां पासाव ॥ प्राणिया नव्हे भयभाव ॥ तो प्रकार आइकें ॥१४॥

हाचि नारदाचा प्रश्न ॥ संगमऋषीनें कथिला सगुण ॥ ह्मणे भूतभविष्यवर्तमान ॥ मी जाणें सकळांतें ॥१५॥

कर्मारंभ नाहीं करित ॥ कर्मफळेच्छा नाहीं इच्छित ॥ आणि देखें समस्त ॥ समतादृष्टीं ॥१६॥

अर्थकाम टाकोनी ॥ रागतृष्णा मोह त्यजोनी ॥ विचरतों मृत्युभय सांडोनी ॥ नाहीं धर्मलोभ प्रयोजन ॥१७॥

मी पीतामृततृप्त पाहीं ॥ ह्मणोनि शोकबाधा नाहीं ॥ ऐसें संगमें सर्वही ॥ निरूपिलें नारदा ॥१८॥

आतां शास्त्रतत्व नेणे ज्ञेय ॥ संशयात्मा अकृतव्यवसाय ॥ ऐसिया पुरुषासि श्रेय ॥ होय कोणे रीतीं ॥१९॥

हें गालवें नारदा पुसिलें ॥ मग नारदें सांगीतलें ॥ तें सांगतों ऐकें वहिलें ॥ युधिष्ठिरा गा ॥२०॥

पापकर्मापासोनि निवृत्ती ॥ सदा पुण्याचरणीं प्रीती ॥ मार्दव असे सर्वाभूतीं ॥ व्यवहारीं आर्जव ॥२१॥

अनहंकार वाणी मधुर ॥ अप्रमाद संतोष सुविचार ॥ विषय‌असेवन निर्धार ॥ वेदार्थजिज्ञासा ॥२२॥

सदैव तपाअचरण ॥ पुरुष ईहीं गुणीं करुन ॥ श्रेय पावे निर्वाण ॥ मोक्षमार्गाश्रित ॥२३॥

भीष्म ह्मणे धर्माप्रती ॥ कोणे उपायें शोक नव्हती ॥ मोक्ष पाविजे ऐसी गती ॥ हें सगरें पुसियेलें ॥२४॥

मग अरिष्टनेमी ऋषी ॥ सांगता जाहला तयासी ॥ तो संवाद परियेसी ॥ धर्मराया ॥२५॥

पुत्र पश्वादिकांच्या ठायीं ॥ संगासक्ती करी पाहीं ॥ स्नेहपाशें बद्ध तो कहीं ॥ मोक्ष नपवे ॥२६॥

पुत्रा जीवनोपायीं समर्थ जाणोनी ॥ पुत्रवती वृद्धभार्या त्यजोनी ॥ लाभालाभीं समता करोनी ॥ मोक्ष पावे ॥२७॥

बुद्धिशास्त्रेंकरोन ॥ मनुष्य असार देखोन ॥ जो वर्तें सर्व त्यजोन ॥ तोचि मुक्त ॥२८॥

ऐसें राजा सगर ऐकोनी ॥ मोक्षगुणीं युक्त होवोनी ॥ दुःखनिवृत्ती प्रजापाळणीं ॥ करिता जाहला ॥२९॥

यावरी धर्मे प्रश्न केला ॥ देवर्षि उशना शुक्रत्व पावला ॥ दैत्यासि प्रिय कां जाहला ॥ कैसा लाधला समृद्धी ॥३०॥

तंव भीष्म बोले वाणी ॥ कीं हा भृगुपुत्र मुनी ॥ पूर्वी योगबळें करोनी ॥ कुबेरा रोधिता जाहला ॥३१॥

मग त्याचें धन हरिलें ॥ कुबेरें दीनत्वें दुःख केलें ॥ महैशासी सांगीतलें ॥ उशनाचरण ॥३२॥

ह्मणे तो अलकेंत प्रवेशला ॥ माझें धन हरिता जाहला ॥ ऐकोनि शिव धाविन्नला ॥ घेवोनि त्रिशूळ ॥३३॥

उशनें आपुलें तपोबळें ॥ ईश्वरा थोर जाणितलें ॥ मग आसन घातलें ॥ शूळाग्रीं शिवाचे ॥३४॥

ह्मणोनि शिवें हस्तें करुन ॥ शूळस्थ उशना स्पर्शोन ॥ हस्तामध्यें घेवोन ॥ टाकिला उदरांत ॥३५॥

तो महेशाच्या उदरीं ॥ गेला उदकामाझारी ॥ दहासहस्त्र वर्षेवरी ॥ तप करिता जाहला ॥३६॥

तेणें तपें वृद्धी पावला ॥ उदरामाजी उद्देगला ॥ निघावया मार्ग चिंतिला ॥ स्तविन्नला शंकर ॥३७॥

मग आपुले शिश्नद्दारें ॥ वाट दीधली श्रीशंकरें ॥ उशना निघाला सत्वरें ॥ ह्मणोनि शुक्र नाम ॥३८॥

तेणें कुत्सितमार्गें जाण ॥ शुक्र निघाला ह्मणोन ॥ येत नाहीं लज्जेंकरून ॥ आकाशमध्यभागीं ॥३९॥

ज्वलत शिश्नमागीं जाण ॥ शुक्र निघाला देखोन ॥ महेश शूळेंकरोन ॥ मारूं पाहे ॥४०॥

तंव पार्वती ह्मणे शिवातें ॥ हा स्वपुत्र न मारीं यातें ॥ येरें रक्षिलें तयातें ॥ देवीवचनास्तव ॥४१॥

ऐसा तो उशना शुक्रु ॥ इष्टगती पावला थोरू ॥ मग तो जाहला दैत्यगुरू ॥ संजीवनीमंत्रास्तव ॥४२॥

हें ऐकोनि काव्योपाख्यान ॥ धर्म मागुतीं करी प्रश्न ॥ कीं इहपरलोकीं काइसेन ॥ परम श्रेय पाविजे ॥४३॥

यावरी देवव्रत बोले ॥ हेंचि जनकें पराशरा पुसिलें ॥ मग तयासि निरूपिलें ॥ मुनिप्रवरें ॥४४॥

ह्मणे राया धर्मेकरोनी ॥ पावे उभयत्र श्रेय प्राणी ॥ तंव जनकें मागुतेनी ॥ पुसोंआदरिलें ॥४५॥

ह्मणे धर्मसाधन उत्तम ॥ मज सांगा जी सवर्म ॥ यावरी निरूपिता जाहला परम ॥ पराशरू तो ॥४६॥

दम क्षमा धृति तेजा ॥ संतोष सत्यवचन लज्जा ॥ अहिंसा दक्षता सुबीजा ॥ इयें सुख करिताती ॥४७॥

हेंचि कीजे धर्मसाधन ॥ मनोरथरथीं बैसोन ॥ विषयघोडे ज्ञानरश्मींकरून ॥ आंवरी तो बुद्धिमंत ॥४८॥

पुण्यकर्में करून ॥ पाविजे तो उत्तमवर्ण ॥ उद्धृतशत्रूचें निबर्हण ॥ करावें रायें ॥४९॥

धर्मशीळ दमदयायुक्त ॥ आत्मसम भूतें देखत ॥ पूजार्ह त्यांतें पूजित ॥ तोचि पावे सुखातें ॥५०॥

पत्र मूळ फळें करुन ॥ करावें अतिथीचें पूजन ॥ मातेचें करोनि संगोपन ॥ धर्म‌अर्थ रक्षावे ॥५१॥

वेदाध्ययनेंकरून ॥ प्रथम फेडावें ऋषिऋण ॥ यज्ञें देवऋण पितृऋण ॥ श्राद्धेंकरोनी ॥५२॥

प्रजारक्षणधर्मे करोनी ॥ सुखी होतो नृपमणी ॥ ब्राह्मण होती वेदाध्ययनीं ॥ सुखीजाण ॥५३॥

वैश्य धन‌अर्जनेंकरूनी ॥ शूद्र त्रिवर्णसेवनीं ॥ सुखी होताति जाणीं ॥ स्वकर्मताप्तर्यें ॥५४॥

सुपात्री दान दीजे तें उत्तम ॥ याचिल्या दीजें तें मध्यम ॥ अपमानें अश्रद्धें तें अधम ॥ दान बोलिजे ॥५५॥

दमें विप्रा शोभा थोरी ॥ विजयें क्षत्रिया निर्धारीं ॥ धरें वैश्‍य शोभे भारी ॥ दाक्षिण्यें शूद्र ॥५६॥

हे स्वकर्मप्रशंसा जाणीं ॥ दुसरें ऐकें चित्त देवोनी ॥ पूर्वी सर्वलोक धर्मेकरोनी ॥ असते जाहले ॥५७॥

मग असुर दैत्ययोनी ॥ धर्मबुद्धीतें न साहोनी ॥ प्रजा अधर्मीं करोनी ॥ दर्प प्रवर्तविला ॥५८॥

दर्पापासाव क्रोधप्रकाश ॥ क्रोधप्रकाशें लज्जानाश ॥ मग मोहयुक्तत्वें विनाश ॥ लोकपावले ॥५९॥

देव भयभीत जाहले ॥ शंकरासी शरण गेले ॥ शिवें स्वमार्गी लोक स्थापिलें ॥ मारोनि दैत्य ॥६०॥

वेदशास्त्रें पूर्ववत ॥ प्रवर्तलीं समस्त ॥ स्थापिला राज्यीं सुरनाथ ॥ देवलोकीं ॥६१॥

तरी हिंसाकर्म टाकिल्याविण ॥ पुरुष नपावती कल्याण ॥ सर्वसिद्धी तपेंकरून ॥ पाविजे राया ॥६२॥

गृहस्थाश्रमी याप्रती ॥ सर्वही आश्रम साधती ॥ जैसा नद्या समुद्राप्रती ॥ होती प्रविष्ट ॥६३॥

तपेंकरूनियां भले ॥ पूर्वील मुनी प्रतिष्ठिले ॥ आतां वर्णधर्म वहिले ॥ ऐकें राया ॥६४॥

यजन याजन अध्ययन ॥ अध्यापन प्रतिग्रह दान ॥ हे ब्राह्मणाचे सहा जाण ॥ धर्मविशेष ॥६५॥

दान आणि यजन जाण ॥ अध्ययन विप्रसंरक्षण ॥ हे क्षत्रियाचे प्रमाण ॥ धर्मविशेष ॥६६॥

कृषि वाणिज्य पशूपाळण ॥ हे वैश्यधर्मप्रमाण ॥ विप्रादि वर्णशुश्रुषण ॥ शुद्रधर्म विशेषें ॥६७॥

अहिंसा संविभाग सत्य ॥ शम श्रद्धा कर्म आतिथ्य ॥ अक्रोध स्वस्त्रीसंतोषरत ॥ शौर्य परोत्कर्ष साहणें ॥६८॥

तितिक्षा आणि आत्मज्ञान ॥ हेसाधारण सकळां जाण ॥ सर्वनाशिवंत अज्ञानाहुन ॥ थोअ शत्रु नाहीं ॥६९॥

ह्मणोनि गा ज्ञानें पाहतां ॥ मोक्ष पाविजे तत्वतां ॥ कदलीगर्भवत सर्वथा ॥ निःसार मर्त्यलोक ॥७०॥

ज्ञानमार्ग नेणे संसारी ॥ तो भ्रमे संसारचक्रीं ॥ जेवीं अपक्कपात्र नीरीं ॥ विरोनी जाय ॥७१॥

ऐसीं जनकाप्रति गीता ॥ परशरें कथिली भारता ॥ हा ज्ञानोपदेश धरितां ॥ पावे मोक्षपद ॥७२॥

आणिक ऐकें इतिहास ॥ जेणें सर्वबंधापासोनी पुरुष ॥ सुटोनि पद पावे अविनाश ॥ तें सांगत असें ॥७३॥

साध्यें सूपर्णरूप धरोनी ॥ पुसिलें हंसाप्रति येवोनी ॥ मग हाचि प्रश्न उगवोनी ॥ सांगीतला हंसें ॥७४॥

ह्मणें चहुंवेदांचें यथार्थ ॥ उपनिषत् बोलिजे सत्य ॥ आणि सत्याचें उपनिषत ॥ दम जाणिजे ॥७५॥

तये दमाचें उपनिषत ॥ मोक्ष बोलिजे यथार्थ ॥ क्रोधादि छेदोनि समस्त ॥ परपद पाविजे ॥७६॥

जैसे मृग बळवंत ॥ वागुरां छेदोनि पळतात ॥ तेवीं लोभबंधन यथार्थ ॥ योगबळें छिदिजे ॥७७॥

सावधानज धनुर्धर ॥ लक्ष्याप्रति विंधीं शीघ्र ॥ तैस्सा निश्वळ योगीश्वर ॥ मोक्ष पावे ॥७८॥

कीं नावकारू सावधान ॥ महासमुद्र उल्लंघून ॥ नावेतें जाय घेवोन ॥ येरा बंदरासी ॥७९॥

आत्मसमाधानयोगे तैसे ॥ योगी परपदीं जावोनि बैसे ॥ हा योगाभ्यास विशेषें ॥ असे गीतोक्त भोष्मपर्वीं ॥८०॥

नाभिकंठ मस्तकीं जाण ॥ वक्षस्थळ दर्शन स्पर्शन ॥ घ्राणीं नियोजूनि मन ॥ योगी मोक्षा पावतो ॥८१॥

कणमात्र करी भक्षण ॥ घृतादि रस वर्जोन ॥ तथा आतां बळसाधन ॥ ऐकें पांडवां ॥८२॥

मास अथवा पक्ष परियंत ॥ जळपान करी दुग्धमिश्रित ॥ तो योगी पावे निभ्रांत ॥ महाबळातें ॥८३॥

जेवीं व्याघ्रादिकीं व्याप्त वन ॥ कोणीयेक पुरुष पावोन ॥ पुण्यवशें उल्लंघोन ॥ जाय बरवे स्थळीं ॥८४॥

तैसे बहुत दोष जाणीं ॥ योगी प्रवतें टाळोनी ॥ ह्मणोनि बरवें पद निर्वाणीं ॥ पाविजतो ॥८५॥

योगधारणा करितां देख ॥ चुके जन्ममरणदुःख ॥ हा योगविधी सम्यक ॥ सांगीतला संक्षेपें ॥८६॥

यावरी ह्मणे भीष्मदेव ॥ आतां सांख्ययोग अपूर्व ॥ ऐकें भ्रमादि दोष सर्व ॥ जेणें करुनि नाशती ॥८७॥

जेथ बहुप्रकार गुण ॥ पाविजती ज्ञानेकरून ॥ सकळविषयां दोषदर्शन ॥ नाशिंवंत समस्त ॥८८॥

ज्ञानविज्ञानसंपन्न ॥ होवोनि पावे मोक्ष निर्वाण ॥ काम क्रोध भय निद्रा श्वासन ॥ हे पांच गुण सर्वदेहीं ॥८९॥

यांच जयप्रकार सागेन ॥ क्रोधजय क्षमेंकरुन ॥ आणि संकल्प वर्जून ॥ कामजय कीजे ॥९०॥

सत्वाभ्यासें निद्राजय ॥ अप्रमादें जिंतीये भय ॥ लघुआहारें होय जय ॥ श्वासनाचा ॥९१॥

दुःखरूप महानीर ॥ माजी चिंतारूप र्‍हद थोर ॥ व्याधि मृत्यादि हे परिकर ॥ मगर मत्स्यादी ॥९२॥

महाभयरूप समुद्र ॥ तमोगूणरूप मीन क्षुद्र ॥ रजोरूप कच्छप थोर ॥ स्नेहकंकादी ॥९३॥

सत्यरूप महातीर्थ ॥ हें सांख्यज्ञान सत्य ॥ योगरूपनावेनें त्वरित ॥ तरोनि परपद पाविजे ॥९४॥

इतिहासीं आणि पुराणीं ॥ अर्थशास्त्री कीं प्रमाणीं ॥ जें ज्ञानी तें सर्व जाणीं ॥ सांख्यगत ॥९५॥

शमसौख्य सूक्ष्मतप जाण ॥ तें सांख्ययोगोक्त प्रमाण ॥ सर्वसांख्ययोग नारायण ॥ जाणत असे ॥९६॥

हें म्या तत्व सागीतलें ॥ ऐसें भीष्मदेवें बोलिलें ॥ तंव युधिष्ठिरें प्रश्निलें ॥ ऐकें जन्मेजया ॥९७॥

कीं जयापासोनि कहीं ॥ पुनरावृत्ती होत नाहीं ॥ तें अव्यक्त अक्षर काई ॥ तथा क्षरही सांगें ॥९८॥

मग भीष्म इतिहास बोले ॥ ह्मणे एकदा जनकें वहिलें ॥ वसिष्ठासी ऐसेंच पुसिलें ॥ कीं क्षराक्षर कोण ॥९९॥

तंव ह्मणे वसिष्ठा ब्राह्मन ॥ ब्राह्मयाचे दिवशीं जाण ॥ सांख्यशस्त्रमतें हिरण्य ॥ गर्भ बोलिजे ॥१००॥

तो विकरातें पावला ॥ अव्यक्तरूपें पहिल ॥ परिणमता जाहला ॥ तो विद्यासर्ग ॥१॥

आणि महत्त्वत्वादि सर्ग ॥ तो अदिद्यासर्ग अनेग ॥ हे दोनी सर्ग द्दिभाग ॥ पूर्वकाळीं जाहलें ॥२॥

सात्विकाहंकारापासोन ॥ पंचमहाभूतें उप्तन्न ॥ हा तृतीयसर्ग जाण ॥ वैकारिक नामें ॥३॥

वैकारिकापासाव पंचिंद्रियें ॥ विषयपंचकादि क्रमें पाहें ॥ ऐसी चोवीसतत्वात्मक आहे ॥ प्रकृती हे ॥४॥

एकद्रूप देहमात्र ॥ स्थावरजंगमादि समग्र ॥ त्या देहाचीं स्थानें त्रिप्रकार ॥ भूमि जळ आकाश ॥५॥

हें क्षररूप समस्त ॥ पंचविंशावा पुरुष सत्य ॥ चोवीसतत्व विकाररहित ॥ अमूर्त तोची ॥६॥

वर्तमान सर्वदेहांत ॥ हृदयीं प्रकाशमान स्थित ॥ पुरुष क्षरविकाररहित ॥ भ्रमे नानायोनी ॥७॥

एवं सर्वत्र अनित्य ॥ तेंचि क्षरप्रकृति निभ्रांत ॥ आणि पुरुष अक्षर नित्य ॥ बोलिजे पैं ॥८॥

तंव जनक पुसे ऋषीसी ॥ क्षरक्षरसंबंधे सृष्टी जैसी ॥ स्त्रीपुरुषसंबंधें तैसी ॥ सृष्टी असो ॥९॥

जो प्राणी होतो उप्तन्न ॥ तयाअंगीं मातेचे गुण ॥ आणि पितयाचेही प्रमाण ॥ असत आहेती ॥११०॥

मातेचे तरी मुख्य गुण ॥ त्वक मांस रक्त प्रमाण ॥ आणि अस्थि मज्जा स्नायु जाण ॥ पितयाचे पैं ॥११॥

ऐसी प्रकृतिपुरुष संबधें ॥ रचना भासते शास्त्रबोधें ॥ तंव याचें उत्तर प्रबुद्धें ॥ दीधलें वसिष्ठें ॥१२॥

ह्मणे गुणीयाच्या ठायीं ॥ गूण बोलिजताति पाहीं ॥ निर्गुणाचिये ठायीं कहीं ॥ गुण बोलेंचि नयेती ॥१३॥

चोवीसतत्वें गुणमेळावा ॥ तत्वरहित पंचविसावा ॥ याचें तत्वज्ञान पांडवा ॥ तें मोक्षसाधन ॥१४॥

आतां हा अर्थ समग्र ॥ सांगीतला नेणवे शीघ्र ॥ ह्मणोनि ऐकें सविस्तर ॥ सांख्ययोग ॥१५॥

योगांत ध्यान प्रधान ॥ तें ध्यान द्विविध जाण ॥ सगुण आणि निर्गुण ॥ प्राणायामविना नव्हे ॥१६॥

तो प्राणायाम द्दिविध ॥ त्याचे सगुण निर्गुण भेद ॥ सगुण बोलिजे वाचिक शब्द ॥ निर्गुण मानसिक ॥१७॥

तेणें प्राणायामेंकरुनि ॥ करावें नाडीचें शोधन ॥ मग आत्मनिष्ठ जाण ॥ करावें चित्त ॥१८॥

इंद्रियग्रास वश कीजे ॥ पाषाणपाय होइजे ॥ स्थाणुच्यापरी वर्तिजे ॥ कंपरहित ॥१९॥

गंभीरपणें समुद्रवत ॥ स्वल्पाहार संगरहित ॥ जावोनि निर्जनवनांत ॥ आत्मनिष्ठ होइजे ॥१२०॥

तेणें कानीं शब्द न ऐके ॥ रूप डोळां न देखे ॥ गंध न जाणे नासिके ॥ करोनि तो ॥२१॥

ऐसें लौकिक सर्वही ॥ काष्ठप्राय नेणे कहीं ॥ तेव्हां पावला जाणावा सही ॥ योगी प्रकृतीतें ॥२२॥

ऐसा कल्पना वासनारहित ॥ आत्मनिष्ठ दृढचित्त ॥ योगी जाण निभ्रांत ॥ जनकराया ॥२३॥

सांख्यज्ञान पूर्वीं उक्त ॥ प्रकृतिविक्रिय महत्तत्व ॥ सत्वरजतम अहंकार सत्य ॥ तेथोनि भूतविषय‌इंद्रियें ॥२४॥

मनेंसहित तत्वें चोवीस ॥ ईश्वर पंचविसावा जीवेश ॥ हा सांख्ययोग विशेष ॥ ज्ञानें समता पावे ॥२५॥

आतां उप्तत्ती आणि प्रळय ॥ यांतें सर्ग ह्मणिजतांये ॥ सर्गप्रळयां निर्मुक्त होय ॥ ते विद्या बोलिजे ॥२६॥

तें पंचविसावें तत्व जाण ॥ आतां सृष्टिप्रळयकारण ॥ तें अव्यक्त जाण निर्वाण ॥ पावे गुणविकारातें ॥२७॥

त्या गुणाची उप्तत्ती ॥ परस्पर विभागस्थिती ॥ ते गुण विकारसमूह मिळती ॥ तें क्षेत्र बोलिजे ॥२८॥

क्षेत्रज्ञ पंचविसावा ॥ तोचि अक्षररूप जाणावा ॥ उप्तत्ती तैसाचि जाणावा ॥ उप्तत्ती तैसाचि जाणावा ॥ प्रळयो राया ॥२९॥

गुण प्रकृतीच्या ठायीं ॥ लीन होताति सर्वही ॥ ते प्रकृती होय सही ॥ पुरुषी लीन ॥१३०॥

तेव्हांचि तो आत्मा स्वयें ॥ मी निर्गुण ऐसें जाणता होय ॥ प्रकृती ते सगुणांतें पाहें ॥ जाणत असे ॥३१॥

तेव्हा प्रकृतिज गुणजाळ ॥ निंदोनि सांडि एकवेळ ॥ आसक्त नव्हे निखळ ॥ देखे ज्ञेयतत्वातें ॥३२॥

तेव्हां पूर्वील अज्ञानदशा ॥ तेथ पश्चात्ताप करी भरंवसा ॥ ह्मणे मच्छ पडे जाळीं जैसा ॥ तैसा पडीलों होतों ॥३३॥

मी शुद्धस्वरूप निःसंग ॥ तो जाहलों अशुद्धकुसंग ॥ प्रकृतिसंग अनेग ॥ यातना जाळिया ॥३४॥

ऐसें ज्ञान होय सार ॥ हा क्षराक्षर विचार ॥ सांगीतला समग्र ॥ संकलोनी ॥३५॥

भीष्म ह्मणे धर्मरायासी ॥ हे वसिष्ठे जनकासी ॥ सांगीतलें परियेसीं ॥ मोक्षधर्मीं ॥३६॥

येणें आत्मनिष्ठा होय ॥ तो नपवें संसारनिरय ॥ हें हिरण्यगर्भऋषिरायें ॥ कथिलें वसिष्ठासी ॥३७॥

वसिष्ठें नारदा सांगीतलें ॥ नारदें मज निरूपलें ॥ जें ब्रह्मज्ञान भलें ॥ क्षराक्षरभेदें ॥३८॥

यातें पूर्णपणें जो जाणे ॥ तो मोक्ष पावे निर्माणें ॥ न जाणे तो अज्ञानपणें ॥ वर्तें संसारीं ॥३९॥

ऐसी संसारव्यवस्था अपार ॥ ह्मणोनि उपदेश ऐकावा सार ॥ पूर्वी सुमना जनककुमर ॥ गेला येकदा पारधीसी ॥१४०॥

तंव भृगुवंशीचा ऋषी ॥ येक देखिला वनवासी ॥ सुमना पुसे तयासी ॥ काय शुभाशुभ प्राणियां ॥४१॥

यावरी ऋषि ह्मणे तया ॥ जें बोखटें वाटे आपणेय ॥ जेणें पीडा होय पारकेया ॥ तें स्वयें न कीजे ॥४२॥

आणि धर्मे धर्मशास्त्रोक्त ॥ तत्प्रमाण वर्तावें सत्य ॥ स्नानसंध्या शौचादि नित्य ॥ स्वशत्क्या दान ॥४३॥

अक्रोध षट्कर्मानुष्ठान ॥ सर्वपापविनाशन ॥ शुद्धमनें वैराग्यानुसरण ॥ व्हावें आत्मनिष्ठ ॥४४॥

इये अर्थीं गा सुमना ॥ इतिहासांतर आणीं मना ॥ तें भीष्म सांगेल कुंतीनंदना ॥ ह्मणे मधुकरकवी ॥४५॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ क्षराक्षरज्ञानप्रकारू ॥ पंचदशाऽध्यायीं कथियेला ॥१४६॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ त्रयोदशस्तबक पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP