मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय २६

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय २६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

रायासि ह्नणे वैशंपायन ॥ मागां सत्पात्रता ऐकोन ॥ धर्म पुसे भीष्मालागुन ॥ कीं सत्पात्रता कैसी ॥१॥

मग बोले गंगाकुमर ॥ जो तपस्वी सदाचार ॥ तोचि जाणावा सत्पात्र ॥ त्यासी दान देइजे ॥२॥

त्याचें अनंतफळ जाणीं ॥ परि दान देइजे श्रद्धेंकरुनी ॥ माझेनि मतें तरी जाणीं ॥ न कीजे विप्रपरीक्षा ॥३॥

पापियासि न देइजे ॥ पापियाचें न घेइजे ॥ आपण दूरी राहिजे ॥ पापापासोनी ॥४॥

आतां श्राद्धकाळ सांगों मांडोनी ॥ देवकर्म तें पूर्वाण्हीं ॥ पैतृककर्म अपराण्हीं ॥ माध्यान्हीं मनुष्यकर्म ॥५॥

हा काळनियम असे पाहें ॥ लोप जालिया व्यर्थ जाय ॥ राक्षस नेती कृतक्रिये ॥ हरोनियां ॥६॥

श्राद्ध केलिया पावे स्वर्ग ॥ न केलिया नरकभोग ॥ हेंचि सांगतां वाढेल अनेग ॥ कथाकल्पतरु ॥७॥

असो धर्म ह्नणे भीष्मालागुन ॥ ब्राह्मण मारिलिया वांचोन ॥ ब्रह्महत्या घडे कवण ॥ प्रकारांहीं ॥८॥

तंव ह्नणे गंगानंदन ॥ ब्राह्मणासि आमंत्रून ॥ मग न दे उचित दान ॥ ते ब्रह्महत्या होय ॥९॥

आणि जो करी वृत्तिहरण ॥ संतापवी गौब्राह्मण ॥ तो ब्रह्मघ्न इत्यादि गौण ॥ ब्रह्महत्या जाणिजे ॥१०॥

मग सकळऋषी देखतां ॥ धर्म ह्नणे गंगासुता ॥ कोण देश आश्रम पर्वतां ॥ पुण्य प्रकृष्ट ॥११॥

तंव ह्नणे गंगाकुमर ॥ इयेअर्थी परिकर ॥ शिलोंछसिद्धांत प्रश्नोत्तर ॥ ऐकें धर्मा ॥१२॥

कोणे एके समयांतरीं ॥ सिद्ध फिरत देशांतरीं ॥ तंव शीलवृत्ती देखोनि नेत्रीं ॥ गेला घरीं तयाचे ॥१३॥

गृहस्थें अतीता पूजिलें ॥ भोजनोत्तर बैसले ॥ संतोषें करुं लागले ॥ सुखवार्त ॥१४॥

तंव पुसे शीलवृत्तीं ॥ कोण आश्रम गिरि फिरलेती ॥ तें पुण्य प्रकृष्ट प्रीती ॥ सांगा मज ॥१५॥

मग सिद्ध सांगे समग्र ॥ नैमिष हिमाचळ पुष्कर ॥ गंगा यमुना कुरुक्षेत्र ॥ शरयू चंद्रभागादी ॥१६॥

आणि काश्मीरमंडळा अंतीं ॥ जितुक्या समुद्रगामिनी असती ॥ तितुक्या पवित्रा बहुतीं ॥ श्रेष्ठ जाण ॥१७॥

कलिंगदेशीं आणिक ॥ गंगाद्वार कुशावर्त बिल्वक ॥ नीलपर्वत कनखले देख ॥ धूतपापा दक्षिणे ॥१८॥

वाराणसी विश्वेश्वर ॥ द्वारका आणि पंढरपुर ॥ ऐसीं पुण्यस्थळें अपार ॥ प्रभासादी ॥१९॥

गंधमादन पर्वतोत्तम ॥ कोणाचें सांगो माहात्म्य ॥ तंव शीलवृत्ती गंगामाहात्म्य ॥ पुसता जाहला ॥२०॥

ऐकोनि सिद्ध ह्नणे आपण ॥ जेथ गंगा तो देश धन्य ॥ पर्वत आश्रम स्पर्शिले जाण ॥ तेही धन्यची ॥२१॥

जे गंगेसि जाती ॥ स्नानदान तर्पण करिती ॥ दहा पिढ्या उद्धरती ॥ त्या नरांच्या ॥२२॥

गंगा देखिलिया स्पर्शिलिया ॥ स्नानवंदन केलिया ॥ बहुतां जन्मीं अर्जिलिया ॥ पापां क्षय होय ॥२३॥

मग सिद्धवाक्यें विश्वासला ॥ शीलवृत्ती गंगेसि गेला ॥ स्नानपानें पवित्र जाहला ॥ ऐसें पुण्य प्रकृष्ट ॥२४॥

तंव धर्म ह्नणे सद्भावें ॥ रायानें काय करावें ॥ इहपरलोक साधावे ॥ उपायें कवणे ॥२५॥

मग ह्नणितलें गंगानंदनें ॥ ब्राह्मणाचेनि आशीर्वचनें ॥ राज्य पाविजे रायानें ॥ आणि स्थिर होय ॥२६॥

मेलियावरी स्वर्ग पावे ॥ ह्नणोनि ब्राह्मण पूजावे ॥ नमस्कारावे दान द्यावें ॥ सुखी कीजे ॥२७॥

हे राजधर्म विशेष ॥ एतदर्थी प्राचीन इतिहास ॥ पृथ्वी सांगे परियेस ॥ वासुदेवासी ॥२८॥

कीं ब्राह्मणापासोनी श्रीपती ॥ सद्बुद्धी आणि कीर्ती ॥ सकळही सुखें पावलेती ॥ ब्राह्मणप्रसादें ॥२९॥

ब्राह्मणें जयां देवपण दिलें ॥ ते प्रत्यक्ष देव जाहले ॥ ज्यांसी शापिलें ते च्यवले ॥ स्थानापासोनी ॥३०॥

ब्राह्मणें सिंधु खारट केला ॥ इंद्र सहस्त्रभाग जाहला ॥ तोचि सहस्त्रनेत्रत्व पावला ॥ तत्प्रसादें ॥३१॥

किती सांगों पुरुषोत्तमा ॥ या ब्राह्मणांचा महिमा ॥ ह्नणोनि ब्राह्मण श्रेष्ठ धर्मा ॥ जगत्रयीं ॥३२॥

हें निरुपण ऐकोनी ॥ धर्म पुसे भीष्मालागुनी ॥ कीं स्त्रीचा स्वभाव मजलागुनी ॥ सांगिजे साकल्यें ॥३३॥

तंव भीष्म ह्नणे कुंतीसुता ॥ आतां ऐकें इतिहासकथा ॥ पंचचूळा विधिसुता ॥ जाहला संवाद ॥३४॥

पंचचूळा अप्सरेसी ॥ हेंचि नारदें पुसिलें विशेषीं ॥ मग येरी ह्नणे तयासी ॥ ऐकें नारदा ॥३५॥

स्त्रियांसि अपवाद अत्यंत ॥ कामस्वभावा संतत ॥ त्या पुरुषाव्यतिरिक्त ॥ बरवें देखती ना ॥३६॥

अग्नीसि काष्ठें न पुरती ॥ उदकें सिंधूसि अतृप्ती ॥ तैसे पुरुष स्त्रियांप्रती ॥ न पुरती देखा ॥३७॥

स्त्रिया स्वभावें चंचळ अती ॥ पुरुषासी न राखवती ॥ कथा एकी एतदर्थी ॥ सांगो अपूर्व ॥३८॥

कोणी देवशर्मा नामें ऋषी ॥ रुची नावें भार्या तयाची ॥ परमसुंदरी लावण्याची ॥ राशी जेवीं ॥३९॥

परपुरुषा पासाव जाण ॥ तिसी देवशर्मा करी रक्षण ॥ तंव समयांतरीं तो ब्राह्मण ॥ चालिला ऋषियज्ञीं ॥४०॥

तो जातेवेळीं ऋषी ॥ बोलिला वपुला शिष्यासी ॥ कीं राखावें इये स्त्रीसी ॥ बरव्या प्रकारें ॥४१॥

परम कामिक सुरेश ॥ करी परस्त्रीचा अभिलाष ॥ रुपें पालटी बहुवस ॥ नाडावया ॥४२॥

सर्वासि भ्रांती घालोनी ॥ कांता भोगी प्रवेशोनी ॥ ऐसें शिष्या शिकवोनी ॥ यज्ञकरणीं चालिला ॥४३॥

मग वपुल शिष्य संतत ॥ तिये इंद्रापासाव रक्षित ॥ परम कपटी सुरनाथ ॥ ह्नणोनियां ॥४४॥

तेणें विचारिलें चित्तीं ॥ इंद्रासि नानारुपें असती ॥ तरी कवणिये युक्तीं ॥ राखावें इये ॥४५॥

तो वायुरुप धरोन ॥ जाईल इसी स्पर्शोन ॥ ह्नणोनि योगबळें करुन ॥ तिचिये देहीं प्रवेशला ॥४६॥

इंद्र सुंदररुपें आला ॥ तो स्त्रियेचे मनीं भावला ॥ मग सुरनाथ बोलिला ॥ कीं हा समय अपूर्व ॥४७॥

आतां सर्वथा चुकों नये ॥ येरी शिष्याचेनि भयें ॥ काहींच न बोले समयीं तिये ॥ तंव इंद्र नेटला ॥४८॥

ह्नणे निर्जनप्रदेश परियेसीं ॥ तरी कां पां न बोलसी ॥ येरी ह्नणे कां न देखसी ॥ वपुला माझे देहीं ॥४९॥

इंद्र काम मोहित जाहला ॥ परि वपुला देखोनि पळाला ॥ जंव देवशर्मा गृहीं आला ॥ तंव वपुलें कथिला वृत्तांत ॥५०॥

तेणें ऋषी संतोषला ॥ शिष्यासि वर देता जाहला ॥ वपुल सुखें फिरुं निघाला ॥ पृथ्वीमंडळ ॥५१॥

तंव सुरांगना स्वर्गी जात होती ॥ तिये मस्तकींची पुष्पें जाती ॥ पडलीं देवश्रमआश्रमाप्रती ॥ अम्लानें सुपरिमळें ॥५२॥

तीं रुचीनें देखिलीं ॥ घेवोनि मस्तकीं घातलीं ॥ मग बहिणीच्या घरीं गेली ॥ प्रभावतीचे ॥५३॥

तैं प्रभावतीयें देखिलें ॥ ह्नने कैंची फुलें परिमळें ॥ हीं मज द्यावीं ऐसें बोले ॥ रुचीप्रती ॥५४॥

येरी येवोनी गृहासी ॥ सांगे देवशर्मंयासी ॥ जी मागत असे फुलांसी ॥ बहिणी माझी ॥५५॥

तैंचि वपुल आला भेटीसी ॥ देवशर्मा ह्नणे तयासी ॥ कीं त्वां आणावें पुष्पांसी ॥ जावोनि स्वर्गी ॥५६॥

येरु चालिला तिये स्थळीं ॥ जेथें देवांगनेनें वेणी सोडिली ॥ आणि फुलें होतीं पडलीं ॥ तेथें गेला ॥५७॥

मग ती फुलें घेतलीं ॥ येत असे गगनपोकळीं ॥ तंव विचित्रें देखिलीं ॥ दोनीं स्त्रीपुरुषें ॥५८॥

तीं चक्रभ्रमी खेळत होतीं ॥ येरु ख्याल पाहे अती ॥ तंव सहाजण देखिले पुढतीं ॥ फांसे खेळतां ॥५९॥

ते ह्नणती येकमेकांत ॥ कोणी साक्षी नसे येथें ॥ जो खोटें खेळेल त्याचे माथें ॥ पाप वपुलमुनीचें ॥६०॥

हें वपुलें आयकोन ॥ अंतरीं थोर जाहला खिन्न ॥ लाजोनि ह्नणे आपण ॥ असों तपस्वी सत्याचार ॥६१॥

कैसें पाप केलें आपण ॥ ह्नणोनि आला संतापोन ॥ आश्रमीं फुलें पुढां ठेवोन ॥ नमिला श्रीगुरु ॥६२॥

यावरी ह्नणे गुरुमुनी ॥ तुवां काय देखिलें वनीं ॥ वपुल चिंतावोनि मनीं ॥ सर्व सांगता जाहला ॥६३॥

तंव सर्वज्ञत्वें ऋषि बोले ॥ त्वां गुरुपत्नीसि योगबळें ॥ एकाकार करोनि वहिलें ॥ राहिलासि येकांतीं ॥६४॥

तरी परस्त्रीजवळी पाहें ॥ जो पुरुष एकांतीं राहे ॥ तो परम पातकी होय ॥ जाण शिष्या ॥६५॥

जरी ह्नणसील आपुले मनीं ॥ कीं एकांतीं नसे कोणी ॥ एकी होती गुरुपत्नी ॥ मग कैसें ठाउकें ॥६६॥

तरी चक्रभ्रमी खेळती दोनी ॥ जियें तुज भेटलीं वनीं ॥ ती दिवस आणि रजनीं ॥ सत्य जाण ॥६७॥

साहीजण फांसे खेळती ॥ ते साहीऋतु देखिजती ॥ पापपुण्याचे साक्षी होती ॥ प्राणिमात्रां ॥६८॥

त्वां न सांगीतलें मजसी ॥ आणि माझिये स्त्रियेसी ॥ योगें एकांतीं राहिलासी ॥ हें पाप केलें ॥६९॥

तेणें तुज नरक होती ॥ परि इंद्रापासाव राखिली युवती ॥ तेणें पुण्यें स्वर्गगती ॥ होईल तुज ॥७०॥

ऐसी स्थिती जाणिजे ॥ तरी गुप्तही पाप न कीजे ॥ करितां अहोरात्र जाणिजे ॥ ऋतु साही जाणती ॥७१॥

ह्नणोनि ऐकें ऋषिवर्या ॥ कितीयेक पापी स्त्रिया ॥ परमपवित्रा भलिय ॥ कितीयेक ॥७२॥

एकी तारिती एकी बुडविती ॥ भलिया दुर्लभा सर्वार्थी ॥ विशेष संख्या असताती ॥ वोखटीयांच्या ॥७३॥

तंव भीष्मासि ह्नणे धर्म ॥ स्त्रीपरिग्रहें होय धर्म ॥ आणि अपरिग्रहें अधर्म ॥ तरी ते विवाह किती ॥७४॥

मग ह्नणे पितामह ॥ पंचप्रकारींचे विवाह ॥ ते ऐकें निसंदेह ॥ क्रमेंचि राया ॥७५॥

कुळशीळ संपन्न आचार ॥ गुणवंत देखिजे वर ॥ तय कन्या दीजे सादर ॥ तो ब्राह्मविवाह ॥७६॥

कन्या वर्‍हांडा योग्य देखोनी ॥ परस्परें सुखें करोनी ॥ देइजे महोत्साहें नंदिनी ॥ तो क्षात्रविवाह ॥७७॥

कन्या वराचे मनीं येवोन ॥ जो विवाह तो गांधर्व जाण ॥ द्रव्य देवोन भय दावोन ॥ जो विवाह तो आसुर ॥७८॥

कन्येसि हटाग्रहें बांधोनी ॥ मातापिता रडतीं टाकुनी ॥ बलात्कारें नेइजे हरोनी ॥ तो पैशाच्य विवाह ॥७९॥

ऐसें पंचविवाहकर्म ॥ तयामाजी तिन्ही उत्तम ॥ दोनी बोलिजे अधम ॥ क्रमेंचि पाहें ॥८०॥

ब्राह्मणें तीनी वराविया ॥ क्षत्रियें दोनी कराविया ॥ वैश्यें स्वजाती जाण राया ॥ शूद्रा वर्जिजे त्रिवर्णी ॥८१॥

शूद्रीच्या ठायीं अपत्य ॥ तें निषिद्ध असे सत्य ॥ ह्नणोनि स्त्री नकीजे निभ्रांत ॥ शूद्रजातीची ॥८२॥

तेथ अपत्यें होती अनुलोंमें ॥ शूद्रादिजाती प्रतिलोमें ॥ जीं बाळें जाहलीं अधर्मे ॥ तीं वर्णसंकरें ॥८३॥

त्या वर्णसंकरांच्या जाती ॥ सप्तमस्तबकीं बोलिल्या असती ॥ ह्नणोनि संकलिलें युक्तीं ॥ भारता गा ॥८४॥

आतां धर्म पृच्छा करील ॥ गंगानंदन निरुपिल ॥ तेंचि सकळ कथिजेल ॥ पुढिले प्रसंगीं ॥८५॥

तेथ होवोनि सावधान ॥ श्रोत्रीं कीजे कथा श्रवण ॥ विनवी श्रोतयां लागुन ॥ कवि मधुकर ॥८६॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ स्त्रीधर्माख्यानप्रकारु ॥ षडिंशाध्यायीं कथियेला ॥८७॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP