मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय ३०

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय ३०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

वैशंपायनासि ह्नणे भूपती ॥ सांगा अग्रकथास्थिती ॥ तंव मुनि ह्नणे प्रीतीं ॥ ऐकें राया ॥१॥

भीष्माप्रति धर्मराजें ॥ पुसिलें बरविये वोजें ॥ ह्नणे आतां आचार सांगिजे ॥ स्त्रियांचे मज ॥२॥

तंव भीष्म तिये वेळीं ॥ इतिहासकथा सांगे भली ॥ जे कैकेय्यकन्येनें पृच्छा केली ॥ शांडिल्या ऋषिपत्नीसी ॥३॥

ह्नणे तूं कोणे पुण्येंकरुनी ॥ सर्वपापांतें नाशुनी ॥ देवलोकीं विमानीं ॥ विचरतेसी ॥४॥

तुझी चंद्रासमान कांती ॥ दिव्य गंधवस्त्रें शोभती ॥ कोणेपुण्यें विमानगती ॥ जाहली तुज ॥५॥

मग शांडिल्या सांगे तत्वतां ॥ मी पाटांवादि वस्त्रें धरितां ॥ आणि सदन्नें भक्षितां ॥ नाहीं भगवीं केलीं ॥६॥

मी भ्रताराप्रती कहीं ॥ अहितें कठिन रुक्षें पाहीं ॥ वचनें बोलिलें नाहीं ॥ यावज्जन्म ॥७॥

भ्रतारसेवे कदाही ॥ असावधान जाहलें नाहीं ॥ सर्वकार्याचिये ठायीं ॥ सदा तत्पर ॥८॥

देवपितृकार्ये भारी ॥ माझा भ्रतार जींजीं करी ॥ मी त्याचे मनानुरुप बरी ॥ रहाटलियें ॥९॥

सासुसासरेयांची भली ॥ देवाऐसी पूजा केली ॥ कोणासीही कहीं कळी ॥ केलाचि नसे ॥१०॥

आणि कोणाचे घरीं कहीं ॥ आज्ञेविण गेलें नाहीं ॥ भ्रतार आलिया स्वगृहीं ॥ देखोनि संतोषें ॥११॥

तया आसनतांबूलदान ॥ करोनि नित्य रगडीं चरण ॥ विंझणें वायु घालून ॥ संतोषविला ॥१२॥

त्याचिये उच्छिष्टविण ॥ म्यां सेविलें नाहीं अन्न ॥ प्रातःकाळीं पतिहून ॥ आधींच उठें ॥१३॥

पाठीं रात्रीसि निजणें ॥ त्याचें मनोगत जाणणें ॥ जें भक्ष्यभोज्य करणें ॥ तें आज्ञानुरुप ॥१४॥

कुटुंबसेवकां अन्न देऊन ॥ उरलें भक्षीतसें जाण ॥ प्रवासीं भ्रतारा होतां गमन ॥ तैं वर्जी सर्वभोग ॥१५॥

अभ्यंग हास्य न करीं ॥ देहीं भूषणादि न धरीं ॥ पतिसमक्ष तरी ॥ ऐसी वर्त्ते ॥१६॥

काजळतैल गोरोचन स्त्रान ॥ श्रीखंड पुष्पमाळा वेणीरचन ॥ सदा ईहींकरोन ॥ पति संतोषविला ॥१७॥

गृहसामुग्री सिद्ध नाहीं ॥ ऐसें तयाप्रति कहीं ॥ कर्णकठोर वाक्यही ॥ नाहीं बोलिलें ॥१८॥

दंभ कापठ्य दुर्मन ॥ इत्यादि केलें नाहीं जाण ॥ व्यभिचारिणीचें सन्निधान ॥ नाहीं केलें ॥१९॥

ऐसा पाळितां धर्मविधी ॥ स्वर्गलोक हें विमानादी ॥ आणि पावलें सद्बुद्धी ॥ ऐकें कैकेय्यनंदिनी ॥२०॥

ऐसा पतिव्रताधर्म सांगोन ॥ शांडिल्या पावली अंतर्धान ॥ हें पढावें शांडिल्याख्यान ॥ पर्वकाळीं ॥२१॥

जो पढे तोही बरवें ॥ स्वर्गलोकीं सौख्य पावे ॥ हें निरुपिलें भीष्मदेवें ॥ युधिष्ठिरासी ॥२२॥

तंव धर्मराय प्रश्न करी ॥ कीं हा काळ संहारकारी ॥ तरी याचा महिमा निर्धारी ॥ जाणों इच्छितों ॥ ॥२३॥

मग ह्नणितलें गंगाकुमरें ॥ हें तुज सांगों इतिहासद्वारें ॥ पूर्वी प्रभाव श्रुत निर्द्धारें ॥ काळरुप विष्णूचा ॥२४॥

महादेवप्रभावही ॥ म्यां ऐकिला असे तोही ॥ एकदा द्वादशवर्षे पाहीं ॥ व्रत आचरला श्रीकृष्ण ॥२५॥

ते तपस्या पहावयासी ॥ आले नारदादिक ऋषी ॥ व्यास धौम्यादि परियेसीं ॥ कौशिकादि अनंत ॥२६॥

जैगीषदेवलादि आले ॥ कृष्णें सत्कारें पूजिले ॥ सर्वऋषी सुखें बैसले ॥ कुशासनीं ॥२७॥

मग ते परस्परें बहुत ॥ गोष्टी करिती आनंदचित्त ॥ तंव तत्समयीं अकस्मात ॥ आश्चर्य जाहलें ॥२८॥

श्रीकृष्णमुखापासोन ॥ तपाचा तेजाग्नि निघोन ॥ जाहलासे दैदीप्यमान ॥ कडकडोनी ॥२९॥

कृष्ण तप करित होता जेथ ॥ तो महाथोर पर्वत ॥ आणि तदाधारें बहुत ॥ वर्तमानें ॥३०॥

वृक्षवल्ली गुल्में पाहीं ॥ पक्षी मृग श्वापदेंही ॥ क्षणामध्यें सकळही ॥ जाहलीं भस्म ॥३१॥

हाहाःकार थोर जाहला ॥ शिखरादि जाळूनि सकळां ॥ वन्ही कृष्णचरणी लागला ॥ येऊनि शिष्यापरी ॥३२॥

ययाउपरी तो पर्वत ॥ वृक्षपशुपक्षिरहित ॥ देखोनि कृपादृष्टीं अनंत ॥ करी अवलोकन ॥३३॥

तंव मागुतेन पूर्ववत ॥ वृक्षवल्ली पक्षीसहित ॥ जाहला देखोनि मुनि समस्त ॥ आश्चर्य पावले ॥३४॥

हें जाणोनि नारायण ॥ तयांसि करीतसे प्रश्न ॥ कीं नित्यानित्य विचारज्ञ ॥ आणि निस्पृह ॥३५॥

सकळविद्यापारंगत ॥ निर्गम महानुभाव ज्ञात ॥ त्या तुह्मां विस्मय कां उपजत ॥ हा प्रकार देखोनी ॥३६॥

मुनि ह्नणती कृष्णनाथा ॥ तूंया विश्वाचा मातापिता ॥ आणि सृष्टिसंहारकर्ता ॥ तूंचि अग्निजीवन ॥३७॥

तुझी लीला पूर्वी ऐकिली ॥ तेवींच आतां हे देखिली ॥ तरी निवृत्ति पाहिजे केली ॥ संशयाची ॥३८॥

ऐसें ऐकोनि उत्तर ॥ तो मुनिजनमानसचकोरचंद्र ॥ सांगता जाहला शारंगधर ॥ तयांप्रती ॥३९॥

कीं हा माझेचि तपें करुनी ॥ माझिये देहापासोनी ॥ पुत्ररुपा ऐसा वन्ही ॥ निघाला देखा ॥४०॥

तेणें माझें वरदसामर्थ्य ॥ पहाया भस्म केला पर्वत ॥ म्यां कृपादृष्टीं यथास्थित ॥ पूर्ववत् केला स्वसामर्थ्ये ॥४१॥

तरी ऐसेनीचि विश्वासें ॥ निर्भय असा संतोषें ॥ मृगश्वापदांची विशेषें ॥ तुह्मां करुणा उपनली ॥४२॥

तें जाणोनि होता तैसा ॥ म्यां पर्वत केला ऐसा ॥ हा अर्थ असेल अनारिसा ॥ तरी पहा ज्ञानदृष्टीं ॥४३॥

आतां तुह्मी आश्चर्य देखिलें ॥ तथा जें कांहीं ऐकिकें ॥ तें सकळ सांगा वहिलें ॥ मजप्रती ॥४४॥

हें ऐकोनि साल्हाद ॥ नारायणप्रिय नारद ॥ ईश्वरपार्वतीचा संवाद ॥ सांगता जाहला ॥४५॥

ह्नणे पूर्वी हिमाचळीं ॥ तप करिता जाहला चंद्रमौळी ॥ भोंवत्या वेष्टित भूतावळी ॥ रुद्रगण ॥४६॥

सिंह व्याघ्र मृग वानर ॥ तोंडें क्रूर सौम्यदंष्ट्र ॥ कुरुप विरुप सुंदर ॥ ऐसे गण भोंवते ॥४७॥

तो ईश्वर शोभिवंत ॥ सर्पद्वय यज्ञोपवीत ॥ दिव्यगंधमाल्यें धूषित ॥ व्याघ्रचर्म उत्तरीय ॥४८॥

गजचर्म परिधान वास ॥ शतसूर्याचा प्रकाश ॥ अप्सरानृत्यें बहुवस ॥ शोभे हिमाचळ ॥४९॥

तिये सभेमध्यें शिव ॥ महापुरुष सदाशिव ॥ दिसे भीमाकार सर्व ॥ आसनस्थित ॥५०॥

तया इंद्रादिक देव ॥ नाग सिद्ध किन्नर गंधर्व ॥ चारणादि गेले सर्व ॥ नमस्कारासी ॥५१॥

सर्व ऋषीश्वरही गेले ॥ जयजयकारें गर्जिन्नले ॥ साष्टांगदंडवत केलें ॥ भूमीवरी ॥५२॥

ते महाआनंदयुक्त ॥ बैसले तये सभेआंत ॥ तंव पार्वतीही तेथ ॥ आली तत्समयीं ॥५३॥

तियें नेत्रविक्राळ देखिले ॥ तेव्हां दोहीं हस्ततळें ॥ महेशनेत्रां आच्छादिलें ॥ एकाएकीं ॥५४॥

ते आच्छादितांचि विश्व ॥ जालें अंधकारप्राय सर्व ॥ आणि स्वाहास्वधाकारभाव ॥ राहिले देखा ॥५५॥

त्या अंधकारें विश्व त्रस्त ॥ कंपायमान जाहलें समस्त ॥ तंव यानंतरें त्वरित ॥ तृतीयनेत्रींहुनि ॥५६॥

ज्वाळाजाळ प्रसरले ॥ अंधकारीं विलीन जाहले ॥ जाणों प्रळयीं तपिन्नले ॥ द्वादशार्क ॥५७॥

ऐसेप्रकारीं तो हिमाचळ ॥ वनचंपकचंदनबकुळ ॥ कदंब जंबुवादि सकळ ॥ वृक्षमात्र ॥ ॥५८॥

मालत्यादिकी वल्ली ॥ क्षणांत भस्में जाहलीं ॥ मृगसिंह व्याघ्रें जळालीं ॥ दीनें उरलीं श्वापदें ॥५९॥

त्यांची देखोनि कदर्थना ॥ पिता हिमाचळ दीनवदना ॥ तैसीच हैमवती करुणा ॥ क्रांत जाहली ॥६०॥

तें महादेवें जाणितलें ॥ पर्वता कृपादृष्टीं पाहिलें ॥ पाहतांचि अधिक जाहलें ॥ पूर्विल्याहुनी ॥६१॥

देखोनि उमा संतोषली ॥ शिवाप्रति बोलती जाहली ॥ स्वामी तिसरे नेत्रीं प्रकटली ॥ अग्निज्वाळा ॥६२॥

तरी हें प्रळयाग्निसमान ॥ उठावया काय कारण ॥ आणि हिमाचळ दहन ॥ कां पां जाहला ॥६३॥

तो जाळोनि पुनः वहिला ॥ जैसा तैसाचि कां केला ॥ तंव गिरजापति बोलिला ॥ ऐकें कारण ॥६४॥

तुवां बाळभावें वहिले ॥ माझे नेत्र आच्छादिले ॥ विश्वक्षय जेणें ज्वाळें ॥ होणार भर्वसेनी ॥६५॥

ह्नणोनियां प्राणिमात्र ॥ रक्षाया ढांकिला होता तृतीयनेत्र ॥ तो उघडिला तंव अंगार ॥ जाळीत चालिला ॥६६॥

त्याचे प्रतापे गिरि जाळिला ॥ तुज पितृदाहें खेद जाहला ॥ ह्नणोनि कृपापूरें केला ॥ यथापूर्वक ॥६७॥

हें कारण अवधारावें ॥ कीं तुज बरवें मानवावें ॥ तंव पार्वतीयां ह्नणितलें बरवें ॥ शिवाप्रती ॥६८॥

मग प्राणियाचे कृपेकरितां ॥ प्रश्न केले भूतनाथा ॥ ते ऐकें गा भारता ॥ येणें क्रमें ॥६९॥

प्रथम प्रश्न अवधारीं ॥ तुझी वदनें कोणतीं चारी ॥ त्यांत दक्षिणमुख भारी ॥ क्रूर कां पां ॥७०॥

जटा काबरिया हातीं पिनाक ॥ कंठ निळा वाहन वृष ॥ कां पां ब्रह्मचर्य सम्यक ॥ तंव शंकर बोलिला ॥७१॥

ह्नणे तिलोत्तमा नारी ॥ सुंदर अप्सरांमाझारी ॥ ब्रह्यानें केली ते नेत्रीं ॥ पहाया जाहलों चतुर्मुख ॥ ॥७२॥

उत्तरमुखें क्रीडतां तुजसी ॥ सौम्य जाहलें परियेसीं ॥ पश्चिममुखें देवऋषींसी ॥ अनुग्रह करितसे ॥७३॥

ह्नणोनि सौम्य निर्धारें ॥ तथा पूर्वमुख साचोकारें ॥ ईश्वरत्वव्यापारें ॥ जाहलें सौम्य ॥७४॥

उरलें जे दक्षिणमुख ॥ तें रौद्र घोर संहारक ॥ लोकहितार्थ जटाधारी देख ॥ तया ब्रह्मचारी मी ॥७५॥

देवरक्षणार्थ सम्यक ॥ हातीं वाहतों पिनाक ॥ कपिलोत्पति प्रस्तावीं वृष ॥ वाहन जाहलें ॥७६॥

तें गोलोककथाभूत ॥ मागांचि या पर्वाआंत ॥ कथिलें असे ह्नणोनि येथ ॥ न केला विस्तारु ॥७७॥

तंव भवानीयें तिये वेळे ॥ शिवा धर्मलक्षण पुसिलें ॥ मग त्याचें उत्तर बोलिले ॥ महादेव ॥७८॥

ह्नणे अहिंसा सत्यभाषण ॥ प्राणिमात्रीं दया शांति दान ॥ परदारविमुखता धर्मरक्षण ॥ स्वकीय जो ॥७९॥

न दीधलें तें न घेणें ॥ मद्यमांसभक्ष्य वर्जिणें ॥ इत्यादि लक्षणें त्या ह्नणणें ॥ धर्मलक्षण ॥८०॥

तथा जाणिजे वेदाध्ययन ॥ आणि शास्त्रपुराणश्रवण ॥ वेदव्रत अनुष्ठान ॥ ब्रह्मचारी धर्मी ॥८१॥

भिक्षाचर्या गुरुशुश्रूषण ॥ ययाउपरी उपकरण ॥ यथाकाळीं समावर्तन ॥ लक्षणोक्त विवाह ॥८२॥

मग तेथ पूर्वोक्त उत्तम ॥ कीजे गृहस्थाश्रम धर्म ॥ उपवासादि नियम ॥ तप ब्रह्मचर्य ॥८३॥

अग्निदेवांचें आराधन ॥ पंचमहायज्ञकरण ॥ अतिथी पूजा सेवकजन ॥ पोष्यवर्ग ॥८४॥

यांसी देवोनि शेष अन्न ॥ स्वयें करावें भोजन ॥ स्त्रीपुरुषांहीं रात्रदिन ॥ एकमतें वर्तावें ॥८५॥

हा ब्राह्मणधर्म जाण ॥ गृहस्थत्वीं प्रमाण ॥ क्षत्रियें करावें संध्यास्नान ॥ अग्निहोत्र विप्रद्वारा ॥८६॥

आणि वेदाध्ययन दान ॥ प्रजापोष्यांचें पालन ॥ यथाशास्त्रें दंडकरण ॥ राजनीतीप्रविणता ॥८७॥

यथार्थ वाणी उच्चारणें ॥ पराक्रम करणें ॥ आर्त रक्षावें धैर्ये वर्तणें ॥ करणें पंचहायज्ञ ॥८८॥

ऐसिये व्रतें निर्वाण ॥ जो युद्धीं सांडी प्राण ॥ जें अश्वमेधें होय पुण्य ॥ तें त्या रायासि होय ॥८९॥

वैश्यें पशुपालन करावें ॥ मुख्यवृत्तीनें वर्तावें ॥ सार्वकाळ सत्य बोलावें ॥ कीजे अध्ययन ॥९०॥

व्हावी इंद्रियनिग्रहता ॥ शांति वाणिज्य सौम्यता ॥ ब्राह्मणस्वागत सर्वथा ॥ कीजे दान ॥९१॥

तिळ सुगंधवस्तु रस ॥ लाक्षा आणि लवण मांस ॥ हे नविकावे विशेष ॥ कदापि वैश्यें ॥९२॥

देवगुरुपूजा करावी ॥ शूद्रें ब्राह्मणसेवा करावी ॥ सत्यवाक्यीं साक्षी असावी ॥ हे सामान्य गुण ॥९३॥

ऐसा असे वर्णाश्रम ॥ चतुर्धा प्रवृत्ति धर्म ॥ आतां निवृत्ति वानप्रस्थाश्रम ॥ आणि ऐकें परिव्राजक ॥९४॥

यांचा क्रमेंचि धर्म जाण ॥ वानप्रस्थें पवित्र वन ॥ तेथ करावें अनुष्ठान ॥ वसावें वृक्षमूळीं ॥९५॥

अग्निहोत्रादि करावीं ॥ नीवारादिकें होमावी ॥ शीतातपवृष्टी सोसावी ॥ द्वादशवरुषें ॥९६॥

देवपितर पूजावे ॥ आतिथ्य व्यर्थ होवों न द्यावें ॥ जटालोम धरावे ॥ व्हावें आत्मनिष्ठ ॥९७॥

वृक्षादिकांची स्वभावीं ॥ तैलक्रिया न करावीं ॥ उपवासें काया सुकवावी ॥ कृच्छ्रचांद्रायणीं ॥९८॥

ग्रीष्मीं मास चारी बरवे ॥ अग्निसाधन करावें ॥ दर्शपौर्णमासीं स्वभावें ॥ कीजे इष्टी ॥९९॥

ऐसिये धर्मे वानप्रस्था ॥ अंतीं ब्रह्मलोकीं संस्था ॥ आतां संन्यासाश्रम चौथा ॥ सांगतो ऐक ॥१००॥

तेथ आत्मसमारोप कीजे ॥ प्राजापत्येष्टि आचरिजे ॥ कुटीचर बहूदक होइजे ॥ हंस परमहंस ॥१॥

चहूंमाजी एकी पदवी ॥ यथावैराग्यें धरावी ॥ निर्द्वद्वें सुखदुःखें करावीं ॥ समान देखा ॥२॥

त्रिकाळ कीजे संध्यास्नान ॥ आणि करपात्रीं भोजन ॥ एकदंडी द्विदंडी जान ॥ त्रिदंडी व्हावें ॥३॥

यथा सामर्थ्यानुसारें ॥ वैराग्यें वर्तावें बरें ॥ निर्मम व्हावें आचारें ॥ अहंतावर्जित ॥४॥

यथाशास्त्रेंकरुन ॥ व्हावें अध्यात्मशास्त्रीं निपुण ॥ गीतार्थी असिजे सावधान ॥ परिव्राजकें ॥५॥

गिरिजे ऐसा हा उत्तम ॥ श्रेष्ठ वर्णाश्रम धर्म ॥ सांगीतला असे नियम ॥ संक्षेपतः ॥६॥

हीनकर्म करितां ब्राह्मण ॥ शूद्रत्व पावे निश्चयें जाण ॥ शूद्र उत्तम कर्मे करुन ॥ ब्रह्मिष्ठ होय ॥७॥

शंकर ह्नणे पार्वतीतें ॥ हे वर्णाश्रम कथिले तूतें ॥ आतां तुवां सांगावें मातें ॥ जें पुसेन तें ॥८॥

सावित्री ब्रह्मकामिनी ॥ आणि इंद्राची इंद्राणी ॥ विष्णूची सिंधुनंदिनी ॥ ऋद्धी कुबेरकांता ॥९॥

धूम्नोर्णा मार्कडेयाची ॥ स्वाहा कामिनी वन्हीची ॥ सुवर्णा सूर्याची ॥ तेचि रणा देवी ॥११०॥

गौ वरुणाची चंद्राची रोहिणी ॥ कश्यपाची अदिती कामिनी ॥ माझी कांता तूं भवानी ॥ जगप्रसिद्ध ॥११॥

इया सर्वा पतिव्रता ॥ तुवां देखिलिया आहेता ॥ तरी त्वन्मुखें पतिव्रता ॥ धर्म सांगें ॥१२॥

मग पार्वती दे उत्तर ॥ जेवीं पुरुषाचा पुरुष मित्र ॥ तेवीं स्त्रीची स्त्री निर्धार ॥ जाणिजे सखी ॥१३॥

तरी त्वत्सेवेसि अभंगा ॥ तापी रेवा शरयु गंगा ॥ सरस्वती इरावती चंद्रभागा ॥ इत्यादि नद्या असती ॥१४॥

यांसी संवादूनि भलें ॥ तुह्मालागीं सांगेन वहिलें ॥ मग पार्वतीयें पुसिलें ॥ गंगादिकांसी ॥१५॥

तैं गंगादिकी नदींसी ॥ निर्धारुनियां विशेषीं ॥ पार्वतीयें ईश्वरासी ॥ मांडिलें सांगूं ॥१६॥

ह्नणे स्वामी जें कळलें मातें ॥ तें सांगत असें तुह्मांतें ॥ पहिला धर्म स्त्रियांतें ॥ बोलिजत असे ॥१७॥

कीं पिता मातादिकांहीं ॥ कन्या वरा दीधली सही ॥ ब्राह्मण अग्नि सूर्य पाहीं ॥ साक्षी करोनी ॥१८॥

तेव्हां उपदेशिलें ब्राह्मणीं ॥ होई भ्रतारसहचारिणी ॥ ह्नणोनि तत्प्रमाण जाणीं ॥ वर्तावें कामिनीयें ॥१९॥

धरिजे बरवा स्वभाव सत्य ॥ अखंड पतीच्या ठायीं चित्त ॥ भ्रतारें खंत केली अत्यंत ॥ परि मनीं न खेदावें ॥१२०॥

न बोलावें निष्ठुरवचनें ॥ पतीसि देववत मानणें ॥ आणि शुश्रूषा करणें ॥ निरंतर ॥२१॥

सदा असावें प्रसन्नवदन ॥ काजळकुंकुम शुभ्र दशन ॥ पहावें सौम्य होऊन ॥ पतीप्रती ॥२२॥

परपुरुष विषयबुद्धीं ॥ न पहावा काळीं कधीं ॥ असतांही दरिद्रभाव विधी ॥ पति रोगिष्टा ॥२३॥

कृपणमार्ग श्रमश्रांत ॥ अकुळादि दोषयुक्त ॥ परि पतीची देववत ॥ कीजे सेवा ॥२४॥

व्रत देवपूजा यात्रा तीर्थ ॥ जियेचें भ्रतारचरणीं समस्त ॥ ऐसें मानी ते पत्नी युक्त ॥ गुणवंती पैं ॥२५॥

तेचि जाणिजे पतिव्रता ॥ विशिष्टगुणें स्वामिनाथा ॥ भीष्म ह्नणे कुंतीसुता ॥ हेंचि नारदें बोलिलें ।२६॥

आतां मूळकारण विशेषीं ॥ नारद सांगेल कृष्णासी ॥ तें ऐकावें प्रसंगेंसीं ॥ ह्नणे कवि मधुकर ॥२७॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ हरिहरपतिव्रताधर्मप्रकारु ॥ त्रिंशाध्यायीं कथियेला ॥१२८॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP