मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
अक्षरगणलक्षण

अक्षरगणलक्षण

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


अभंग.
आद्यलघू जो तो यगण म्हणावा ॥
रगण गणावा मध्यलघू ॥७॥
अंत्यलघू जो तो तगण म्हणावा ॥
नगण गणावा सर्वलघू ॥८॥
आद्यगुरु जो तो भगण म्हणावा ॥
जगण गणावा मध्यगुरु ॥९॥
अंत्यगुरु जो तो सगण म्हणावा ॥
मगण गणावा सर्वगुरु ॥१०॥
उदाहरण, श्लोक ( अनुष्टुभ्‍ )
य यमाचा न नमन । त ताराप र राधिका ॥
म मानावा स समरा । ज जनास भ भास्कर ॥११॥
या श्लोकांत छंदानुरोधानें गणांचा क्रम साधला नाहीं म्हणून खालीं क्रमानें गण लिहितों.
यमाचा, हा यगण; आद्यलघु ॥
राधिका, हा रगण; मध्यलघु ॥
ताराप, हा तगण; अंत्यलघु ॥
नमन, हा नगण; सर्वलघु ॥
भास्कर,हा भगण; आद्यगुरु ॥
जनास, हा जगण; मध्यगुरु ॥
समरा, हा सगण; अंत्यगुरु ॥
मानावा, हा मगण; सर्वगुरु ॥

लघुगुरुसंज्ञा.
श्लोक.
र्‍हस्व स्वरातें लघु बोलतवती ।
दीर्घ स्वरातें गुरु नाम देती ।
पुढें अनुस्वार विसर्ग येतो ॥
संयोग र्‍हस्वास गुरुत्व देतो ॥१२॥
हा नियम प्राय: संस्कृत शब्दांस लागू आहे. जसें - कंक, दु:ख, पर्व,पत्र इत्यादि. ह्यांतील पहिलीं र्‍हस्व अक्षरें गुरु होतात; परंतु प्राकृत शब्दांत तसें नियमानें होत नाहीं जसें - जंव, तंव, तुझ्या, तिच्या, दुसर्‍या इत्यादि. ह्यांतील मागल्या र्‍हस्वाक्षराला गुरुत्व येत नाहीं. दोन समान व्यंजनें पुढें असलीं तर मात्र मागील र्‍हस्वास नियमानें गुरुत्व येतें. जसें - कित्ता, थट्टा, गप्पा, हुद्दा इत्यादि. ह्याचें बीज असें आहे कीं, मागील र्‍हस्वाक्षरावर जेव्हां पुढील संयुक्ताक्षराच्या योगानें उचारणांत आघात येतो तेव्हां त्यास गुरुत्व येतें, एरवीं येत नाहीं. प्राकृतांत ‘तुम्ही’ ह्या शब्दाचे दोन उच्चार आहेत म्हणजे एक ‘तु’ वर आघात देऊन आहे आणि दुसरा त्याशिवाय आहे. जेव्हां आघात असतो तेव्हां ‘तु’ ह्या र्‍हस्वाक्षराला गुरुत्व येतें; आघात नसतो तेव्हां येत नाहीं. तात्पर्य कीं, संयुक्ताक्षराच्या योगानें मागील र्‍हस्वाक्षराला गुरुत्व येणें हें त्याच्या आघातावर आहे. प्राकृत शब्दांत कित्येक ठिकाणीं आघात येतो आणि कित्येक ठिकाणीं येत नाहीं, म्हणून “आघात र्‍हस्वास गुरुत्व देतो” असें म्हटलें तरी चालेल. संस्कृत शब्दांत आघात नेहमीं येतो ह्यामुळें गुरुत्व नेहमीं येतें; फारच कचित्‍ आघात येत नसेल.

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP