मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
गीत पंधरावे

लोकगीत - गीत पंधरावे

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


अडयाल बाई एक खडी । पडयाल बाई एक खडी ।
मधी गवळ्याची वाडी । त्या गवळ्याच्या दोघी लेकी ।
राई आणि चंद्रवळी । राई दिली कान्हा घरीं ।
चंद्रावळ दिली गवळ्याघरीं । दोघी वीं लग्रें लागलीं ।
राई गेली कान्हा घरीं । चंद्रावळ गेली गवळ्याघरीं
चंद्रावळ आणि सासू
चंद्रावळ कायच बोलली । दहीदूध साठवीलं ।
तूप लोणी साठवीलं । दुधाच्या बासरी भरल्या ।
जाईन मदुराच्या हाटी । त्याचा विकरा करीन ।
राई बहिणीला भेटीत । तवाच माघारा परतीन ।
सासू कायच बोलली ? " नको ग नको चंद्रावळी ।
मदुरेचा कान्हा आखाळी । नारी पुरुषाच्या भोगितो ।"
सासूचें न ऐकता चंद्रावळ जाते -
चंद्रावळ ऐकनाशी झाली ।  दही दूध साठवीलं ।
तूप लोणी साठवीलं । दुधाच्या बासर्‍या भरील्या ।
आणल साथीशीनदी । ओढलं रेशमी पटाड ।
घेतल्या सोनीयाच्या मेखा । घेतली रेशमांची दावी ।
तिनं लगडीजी लादिल्या । माग साथीच्या गौळणी ।
निघाली मदुराच्या हाटा । निघाली येशीच्या बाहेर ।
लागली वनाच्या मारगी । एक वन वलांडिलं ।
दोन वनं वलांडिलीं । तीन  वनं वलांडिलीं ।
चौथ्या पांचव्या वनाला । नगर दिसूं बा लागलं ।
कृष्णाच्या नगरीत -
गेली येशीच्या जवळीं । अर तूं येशीराख्या दादा ।
"आहेस कुणाई वा कोण?" "मी कान्हाचा नोकर "।
"तूं कुणाईची कोण ?" "मी गवळ्याची चंद्रावळ ।"
उघड म्हणाली येशी वी झडप । गेली मदुराच्या हाटा ।
भरल्या कवलारी पेटा । चंद्रावळ निघून चालली ।
तिनं लगडी उतरील्या  ।नंदी पागेला लाविला ।
विक्रा कराया बसली ।
इकडे वेशीराख्या कृष्णाला सांगतो -
"गवळण मोठी झाक आली ।"
कृष्ण -
"अशीलदान घेऊन याजा।"
वेशीराख्या अशीलदान मागतो न-
"अग अग तू गवळणी । अशीलदान तूं देवाचा ।"
चंद्रावळ -
"होऊं दे दह्याचा विकरा । होऊं दे लोण्याचा विकरा  ।
होऊं दे तुपाचा विकरा । उरुं दे बेरी ना बा शेरी ।
मग घालीन तुझ्या तळहातावरी ।"
गवळणींना चंद्रावळ म्हणते -
"उठा साथीच्या गवळणी । द्याग तोंडीच्या तोंडी ।
उपटा माथीयाची शेंडी । " धावल्या साथीच्या गवळणी ।
दिली तोंडीयाच्या तोंडी । उपटली माथीयाची शेंडी ।
वेशीराख्याची तक्रार -
गेला कान्हाच्या जवळीं । " आहो आहो तुम्ही कान्हा ।
नको  तुमची चाकरी । नको तुमची भाकरी ।
उठल्या साथीच्या गवळणी । दिलें तोंडीयाच्या तोंडी ।
उपटली माथीयाची शेंडी । नग तुमची चाकरी
नग तुमची नोकरी ।"
कृष्ण येऊन वेशींत बसला -
हिनं दहीदूध विकरा केला । हिनं लगडीजी लादिल्या ।
म्होर साथीच्या गवळणी । मागं साथीच्य गवळणी ।
गेली येशीच्या जवळीं ।
चंद्रावळ -
"अर तूं येशीराख्या दादा । उघडी येशीची झटप ।
तूं कुणायाचा कोण?"
कृष्ण -
"मी मथुरेचा कान्हा । अग तू ग चंद्रावळी ।
नको जाऊ तुझ्या गांवाला । जा तुझ्या बहिणीला भेटाया ।
पाणी लोणी घालील । बुती भाकरी बांधील ।
मग तुला वाट लावील ।"
चंद्रावळ निघून जाते -
चंद्रावळ ऐकेनाशी झाली । "माझा गवळी लई खट ।"
कृष्ण -
"तुझा गवळी मला ठाव । शिळ ताक खायाचा ।
म्हशीमाग जायचा ।"
चंद्रावळ ऐकनाशी झाली । निघाली येशीच्या बाहेरी ।
आली आपल्या नगरीला ।
कृष्ण राईचा वेष घालून जातो .........
कान्हा बोलतो राईला । "अग तूं गई ग अस्तुरी ।
सर्वा श्रृंगार द्यावा मला । जातो गोकुळी नाचायला ।
बांधू भूक तान्हं लाडू । बांधू बुतीची भाकरी ।"
राईचा सर्व वेष घालून आरशांत न्याहाळतो -
राईवाणी सुरत दिसूं बा लागली । निघाला येशीच्या बाहेरी ।
एक वन वलांडिलं । दोन वनं वलांडिलीं ।
तीन वनं वलांडिलीं । चौथ्या पांचव्या वनाला ।
आडवीं शेळ्यांची खिलारं ।
कृष्ण -
"अरं तूं शेळीराख्या दादा । शेळ्यांचीं खिलारं कुणाची ?"
खिलारी -
"चंद्रावळी या बाईचीं "।
कृष्ण -
"चंद्रावळीला सांगा जा । राई तुझी बहीण आली ।"
तेथून म्होरच निघाला । आडवीं उंटाचीं खिलारं ।
तेथून म्होरच निघाला । पानवठ्याला आला ।
कृष्ण -
पाणवठयाच्या बायानो । चंद्रावळीला सांगा ।
राई तुमची बहीण आली ।"
चंद्रावळीच्या घरीं -
गेला तिच्या वाड्याला । लाजून बसूं बा लागला ।
गवळी काय च बोलला । "चंद्रावळी तुझी बहीण आली ।
शेज भोज कर जाग । हितगुज बोल जाग । "सांगितलं बायकोला ।
सहा महीन्याची केली रात । भोग देऊन निघाला ।
निघाला गांवाच्या बाहेर । सार्‍या अंगावरले कपडे जाळून ।
गोसावी ग गेली होऊन । युगत लावाया चंद्रावळी ।
तिच्या कपाळीं हात बा लावला । गौळी काय बोलता झाला ।
" चंद्रवळी  तुझा नूर कां कोमलो । दारी तुळस वाळली ।
काय झालें सांग मला ।"
चंद्रावळ _
"काही नाही झालं मला । गोसाव्यानें युगत लावली ।
त्याचा हात बा लागला ।"

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP