मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
रुखवत

रुखवत

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.



रुखवत आलं रुखवत आलं रुखवतांत केळीची फणी ।
उघडुन पहाती रायरुक्मिणी ॥

रुखवत आलं रुखवत आलं त्यांत होता जाम ।
रुखवत उघडायला आला फलटणीचा राम ॥

रुखवत आलं रुखवत आलं त्यांत होतं रताळ ।
उघडुन बघतात त्यांत पंढरीचा येताळ ।

आलं आलं रुखवत रुखवतावर डबा ।
उघडुन पाहती तो राम लक्ष्मण उभा ।

आलं आलं रुखवत रुखवतावर झुबा ।
उघडुन पाहती तो पांची पांडवाची सभा ।

आलं आलं रुखवत रुखवतावर जाई ।
उघडून पाहती तो जानकी सीतामाई ।

आलं आलं रुखवत अर्जुन गर्जुन ।
उघडुन पाहती तो भीमार्जुन ।

आलं आलं रुखवत मांडवाच्या दारीं उभा ।
उघडुन पाहती तो भरली इंद्रसभा ।

आलां आलां रुखवत रुखवताचें भ्यव ।
उघडुन पाहते तो गोकुळचें कृष्णदेव ॥
१०
आलं आलं रुखवत रुखवतावर सहाण ।
उघडुन पाहते अंजनीचे हनुमान ॥
११
आलं आलं रुखवत दणाणलं हेळ ।
उघडुन पाहतें राम लक्ष्मणाचा खेळ ॥
१२
आलं आलं रुखवत दणाणलं पुणं ।
उघडुन बघतें सुपभर सोनं ॥
१३
आलं आलं रुखवत दणाणली बारामती ।
उघडुन बघतें सुपभर मोती ॥
१४
आलं आलं रुखवत दणाणलं मंमई ।
उघडुन बघतें सोन्याची समई ॥
१५
आलं आलं रुखवत दणाणलं जोतं ।
उघडुन बघतें साखरेचं पोतं ॥
१६
आलं आलं रुखवत आंत होता आंबा ।
रुखवत उघडते कुणाची रंभा ॥
१७
सुकून वड घाली गंगा । भागीरथीशीं जाऊन सांगा ॥
यमुनासी परत मागा । तिंबायाशी ॥
काशी घेउनी घागर । शिंपर शिंपीती नागर ॥
नका जाऊं वनारशीं । दिवा ठेवायाशीं ।
यश्वदीनं  धरली वाट । गुजाई भाजी लाही पीठ ।
कासई म्हणती आणा सुठ । पाही वाट ॥
यश्वदीनं केली करंजी । भिमानें केली पातळ सोजी ।
नखुल वळीत बसली राधी । दरवाजाशीं ॥
बायजा पापड लाटिती । चिमा वळणावं घालिती ॥
आणि अणारस तळी । रखमाई ॥
कुठं दिली माझी सई । मला अजून ठावं नाहीं ॥
सखु बहिणी करावं काय ? सांगा आम्हांसी ॥
झुरळ्या पाडी वर सगुणा । रुसून बसली ग चांगुणा ॥
समजाविती ग मैना । तळतळ गे बाई ॥
तुळजा आलीया धावून । हातीं लाटण घेऊन ॥
रंगी बोल धमकाउनि । बुंदी बांध ग बाई ॥
गुळाचा पाक करी राधा । निराई म्हणती गोळी बांधा ।
जाळ घालुन सुंदर सौदा । झारा फिरवुनि ॥
खिसका दळी सतीभामा । ठिवला भरुनि ॥
कांडीत होती नार साळो । तिकडनं आली बया बाळो ॥
गंगी म्हणती भिस्की दळो । कितीक माणसें ॥
लाडू मोडित बसली आका । तिकडनं आला मामा सखा ।
कांग लाडू झाला फिका । पाही उचलोनी ॥
साती दुरड्या रुखवत । ओल्या वरातीला जात ।
गलोगली मिरवत । जिमनी नेल्या मांडवांत ॥
रुखपताच्या सात दुरडया -
पहिली दुरडी रुखवत । जिमनी नेल्या मांडवांत ॥
विहिणी उघडुन पहात । पानसुपारी ॥
दुसरी दुरडी रुखवत । जिमनी नेल्या मांडवांत ।
काठो सपेटाची । विहीण झाली विठ्ठलाची ॥
तिसरी दुरडी रुखवत ।जिमनी नेल्या मांडवांत ॥
काठोकाठ गुलालाची । विहीण झाली दलालाची ॥
चौथी दुरडी रुखवत । जिमनी नेल्या मांडवांत ॥
काठोकाठ अबीराची । विहीण झाली कबीराची ॥
पांचवी दुरडी रुखवत । जिमनी नेल्या मांडवांत ॥
नाहीं झाली माझी नेहरी । नवर्‍या देवाला गोत भारी ॥
सहावी दुरडी रुखवत । जिमनी नेल्य मांडवांत ॥
तुपाची म्यां केळी दिली । नणंदही विहीण केली ॥
सातवी दुरडी रुखवत । जिमनी नेल्या मांडवांत ॥
खालीं सोजाची काकर । विहीण झाली एका मातेची लेंकरं ॥

१८
रुखवत आलं रुखवत आलं दणाणली आळी ।
उघडुन पहाती दीडच पोळी ॥
१९
मांडवाच्या दारीं । रुखवत आलं भारी । आंत काय काय परी ॥
शेवया साजुक । तेलच्या नाजूक । हळदीच्या वाट्या।
कुंकवाचं कुडं । उडदान वड । शेंदी सकट पांच नारळ ।
देठासकट जायफळ । असं नाव घ्या खडाखडी ।
वर ठेवा पातळाची घडी ॥

२०
आलं आलं रुसवत । त्यांत होतं बक्षी गहू ।
नवर्‍याच भाऊ तिरशिंगराव । त्याला समजावितो सारा गांव
समजून घॆईना घरीं  । वरमायची आली नेहरी ।
घालतो सोन्याची सरी । समजून घेतो घरीं ॥

२१
ईवाई करिती चांदी चुंदीचा । आखुड बांध्याचा । टिकल्या लेइना गंधाच्या ।
अंग भरलं ठायींठायीं । दारी बसलं  दादाभाई ।
नवरा आला थोराचा । कमरीं करगोटा मोराचा ।
दिठ झाली लालाला । काळँ लावा गालाला ।
दिठ झाली नागणीला । मिरच्या टाका आगणीला ॥

२२
आलं आलं रुखवत रुखवतांत पोव्हा ।
विहीण म्हणते मला चोळी नको लुगडें नको अन टकुचं पोलकं शिवा ॥
आलं आलं रुखवत मांडवाच्या दारीं पडली पांचाची नोट ।
विहीण म्हणते मला साडी नको चोळी नको मला विजार अन्‍ कोट ।
आलं आलं रुखवत आंत होती चंची ।
भाडयाच्या दागिन्याची नवर्‍याची वरमाई कोणची ?
आलं आलं रुखवत रुखवतांत नथीचा आकडा ।
इवायदांदा मेला फाकडा इवाय म्हणतो बाई तुमचा एक दांत कांहो वाकडा ?॥

२३
आलं आलं रुखवत रुखवतांत जाई ।
विहीणीच्या वात्यावर उभं राहून पाही पंढरपूर पाही  ॥

२४
 मांडवाच्या दारीं पडलं बेल ।
देव कारव्याला बकरं आणलेलं वाटेनच मेलं ।
बसाया पटकरा आणलेलं पुण्याला गेलं ।
इवाय करुन केला दलाल ।
नाहीं भांगांत मिळाला दमडीचा गुलाल ॥
खाल्या आळीला वरल्या आळीला ।
कशाचा गलबला बाई जावईबा जलमला ।
बारा हो गावचा खालता होता एक मळा ।
नांगारुन डोंगरुन केला काला । त्यांत पेरलं जोंधळ ।
त्याच्या झाल्या पिशा पिशा ॥
जावईबोवाच्या भरल्या गोणी मिशा ॥

२५
विहीणबाई विहीणबाई हांका मारतो बाळ्या ।
तुमच्या कां हीं मोठाल्या वळ्या?॥

२६
मांडवाच्या दारीं पडलं टिपरं । विहीणीला पोर झालं झिपरं ।
ईवाय म्हणतो पोर कां हो झिपरं ?
असूं द्या दादा रात्रीं निजाया गेली होती तेव्हां नवर्‍या आलं फेंफर
तेव्हां पोर झालं झिपरं ॥

२७
आडभितीला पडभीत पडभितीला कमान ।
आंत सर्त्र्या रंगाची विहीण मिळाली ढोंगाची । चटी पटी भांगाची ।
भांगभर मोती । इवायानं विहीण नेली पलंगावर रातीं ।
आम्हांला तरी काय माहिती ? पण सभेची लोक बोलत होती ॥

२८
व्याह्यानं विहीण होकारली कशासाठीं?
व्याह्यानं विहीण होकारली गोठासाठी ।
हिचे गोठ दिले हातीं हिला खोलींत नेली राती ।
न्हाई म्हणाल ग बायांनो खरं सांगा रे पोरांनो ।
खोली खोल ग मैना रात्रीं केवढा धिंगाणा ।
व्याह्यानं विहीण होकारली कशासाठी ?
व्याह्यानं विहीण होकारली पुतळ्यासाठी ।

२९
नथ ल्या वैनी नथ ल्या ।
तुमच्या नथीवरनं उडतीं पाखरं । उडती पांखरं मान देशीचीं ।
मानदेशीचा हरी सोनार । हरी सोनार खरीद करणार ।
खरीद करणार बैल भरणार ।
बैल भरणार खोलीत जाणारणी । खोलींत जाणारणी दणकं देणारणी ।
खोली खोल ग मैना रात्रीं केवढा धिंगाणा ।
बोली बोल मैना तुझी कानडी येईना?
येळा ल्या वैनी येळा ल्या .....

३०
मांडवाच्या दारीं विहीण बसली मैना ।
अंगावर नऊशे रुपयांवा गहेना । लेई म्हणतो लेईना
उंबर म्हणती डेर दिलं । चाल म्हणतो चालना ।
पांचीं पक्वान्न केलं । जेव म्हणतो जेवना ।
बाई बाई करतो भोसडी वर पाहीना ।
बरं पटतं कां देऊं  बटाट?

३१
पांच रुपयांचा घेतलाय कोंबडा । पांच रुपयांचा घेतलाय कोंबडा ।
हळुंच शिगवरी येंग र तूं । भल्या माझ्या कोंबड्या कुकु च कू । पांच ......
हळूंच दादर येंगव तूं । भल्या माझ्या कोंबड्या कुकु च कू । पांच .......
हळूंच पलंग येंग र तूं । भल्या माझ्या कोंबडया कुकु च कू। पांच ......
हळूंच मिर्‍या वार र तूं । भल्या माझ्या कोबडया कुकु च कू । पांच.....
हळूंच टोच मार र तू । भल्या माझ्या कोंबड्या कुकु च कू । पांच .......
हळूंच दाणा येच र तू । भल्या माझ्या कोंबडया कुकु च कू ।

३२
तूं हळुं हळुं ये ग माझी सौदागरणी । तूं कशी कशी ये ग माझी सौदागरणी ।
तुझ्या पायांत मोडला कांटा माझी सौदागरणी । ते कांटा कोण काढील माझी सौदागरणी?
इवायदादा काढील माझी सौदागरणी । तो कसा कसा काढील माझी सौदागरणी ?
तो शोधून शोधून काढील माझी सौदागरणी ।
एक ना मोडी दोन नाय मोडी । तिसर्‍यानं लवंगा खोडी ।

३३
अर दुरडीच्या दुरडया । आणल्या ग तेलच्या । व्याही म्हणे कालच्या विहीणीला ।
विहिणीचं लफडं । पोटाची धाय । सखे ग बाय । खोलीची सुध यांनी केलीच नाय ।
परातीच्या पराती । आणल्या पोळ्या । व्याही घेती चोळ्या विहिणीला ।
विहिणीचं लफडं । पोटाची घाय । सखे ग बाय ।खोलीची सुध यांनी केलीच नाय ।
परातीच्यापराती । आणल्या ग शेवया । व्याही देतो जेवाया विहिणीला ।
विहिणीचं लफडं । पोटांची धाय । सखेग बाय । खोलीची सुध यांनीं केलीच नाय ।
तबकंच्या तबकं । आणलीं पानं । व्याही धरी थानं । विहिणीचीं ।
विहिणीचं लफडं । पोटाची धाय । सखे ग बाय । खोलीची सुध यांनी केलीच नाय ।
तबकंच्या तबकं । आणल्या सुपार्‍या । व्याही म्हणे दुपार्‍यान्‍ । विहिणीला ।
विहिणीचं लफडं । पोटाची धाय । सखे ग बाय । खोलीची सुध यांनी केलीच नाय ।
तबकंच्या तबकं । आणला चुना । व्याही म्हणं पुन्हां । विहिणीला ।
विहिणीचं लफडं । पोटाची धाय । सखे ग बाय । खोलीची सुध यांनी केलीच नाय ।

३४
रुखवत आलं रुखवतांत होतीं मक्याचीं कणस ।
इचकट आणा घालूं नका आम्ही मरजीची माणसं ॥

३५
रुखवत आलं रुखवत रुखवतावर लव्हाळा ।
विचकट आणा नका घालूं आपण चहुकून जिव्हाळा ॥

३६
आलं आलं  रुखवत रुख्वतावर मोर ।
विचकट आणा घालूं नका तुमच्या झिपरीला दोर ॥

३७
विहीण बसली न्हायाला । पाणी आणा गंगाचं । मखर बांधा भिंगाचं ।
फुल जडा हारोहार । दूध प्यायला दोन म्हशी । दोन म्हशीला दोन टोणगे ।
दोन टोणग्यावर बारा मण गहूं  । बारा मण गव्हांत चार मण हुलगे ।
इहीण म्हणती दादा इतकं कशाला ?
बाई तुझ्या लेकीला अन्‍ माझ्या लेकाला ।
बाबा एवढं बसून खाऊं । झालझेंडा घ्यायला मांडवांत जाऊं ॥

३८
उभी होते मेण्यांत । काचोळी अंगांत । गुलाल भांगांत ।
जायफळ ओटींत । लवंगा मुठींत । सोड ग सोड ढवळा पितांबर ।
कचेरीला उभे । सोन्याची किल्ली । हातीं दिली । उघडली
खोली । खोलींत होती चुला । चुलीवर होती परात । परातींत
होता भात । भातावर होतं तूप । तुपासारखं रुप । रुपासारखा
जोडा  । चंद्र्भागेला पडला वेढा । रंगीत दुरडी । रंगीत सुपली ।
आडभीत पडभीत । पडभितीला होते गहूं । जलमले पांचजण
भाऊ । एक जलमला तिरशिंगराव । एक म्हणतो बांधा भाकरा
जाऊं नगराला । गाडी घेतली तासाची । बैल घेतले अणजापूर ।
अनजापूरवा लेहेंजा । (कामाची झाली लेंडी । गार दौंडेंत
घेतली बंडी ।) करमळ्यांत घेतला जोडा । अशी माय वरी तर
भाकर लागली बरी । पाडाचा अंबा महादेवाला वाहिला ।
व्याह्यासाठीं विहीणीसाठीं खानदेश पाहिला ।

३९
ऐका आणा सांगती । लेक शिंद्याची । भाची दिवटयाची ।
मेहुणी सावळ्याची । खाल्लं  पेडगांव । वरलं पेडगांव । मधीं
चाललं भीमाचं नावं । पागाचं पारगावं । शिंदेकरांच आडळगांव ।
दाभाड्याचं तळेगाव । चिंचपूर माझं माहेर । नाना सखा महादु
माझं भाव । विडसांगीं माझं गांव । जिजाबाई माझं नाव । जिल
आणा येईना तिनं टाळी ठोकून दाव । बर पटतं कां देऊं बटाट?

४०
झालुबाई झालु । झालुंत होती जाई । नको रडूं नवरीच्या
आई । ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।
झालूबाई झालू झालूंत होता चाफा । नको रडूं नवरीच्या बापा ।
ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।
झालूबाई झालू झालूंत होती येणी । नको रडूं नवरीच्या बहिणी ।
ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।
झालूबाई झालू झालूंत होता ओवा । नको रडूं नवरीच्या भावा ।
ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।
झालूबाई झालू झालूंत होती बोरं । मायबाप झाली चोर ।
ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।
परसदारीं होती बोरं । तिजवर बसला जावई चोर ।
ज्याची होती त्यानं नेली । आपली माया व्यर्थ गेली ।

४१
सोन्याचा वस्तरा । न्हावीदादा तूं चतुरा । हळुंच चुचकारा ।
लक्ष्मीआई धरी घडी । तेलणीची विडी ।
सोन्याचा वस्तरा । न्हावीदादा तूं चतुरा । हळूंच चुचकारा ।
खंडोबा धरी घडी । तेलणीची विडी ।

४२
सोन्याचा नांगुर । रुप्याचा फाळा । नंदीजी जुपिला ।
सरीजी सोडिली । वाखुरी सोडिली ।
रुप्या़चा जी नाडा । सोन्याच्या जी मोटा । नंदीजी जुपिला ।
मोटाजी हाणील्या । हळदाई लावील्या ।
हळदाईच्या उगविली । हळदाई आली एक पान । मग आलीं दोन पानं ।
मग आलीं तीन  पानं ।
चौथ्या पांचव्या पानाला । हळदाई मोडिली । हळदाई वेचिली ।
सोन्याची चुलवण । रुप्याच्या काहिली । हळदाई शिजविली । हळदाई वाळविली ।
सोन्याचा वरवंटा । रुप्याचा पाऽटा । हळदाई वाढली ।
लाविली आधीं । पंढरीच्या देवा ।
आधीं मान कोणायाचा । नवर्‍यानवरीचा ।
दुसरा मान कोणाचा । वरमाईबाईचा ।
तिसरा मान कोणाचा । कुरवल्याबाईचा ।
चौथा मान  कोणाचा । वर्‍हाड्या बायांचा ।
पांचवा मान कोणाचा । परटिणीबाईचा ।

४३
नवर्‍या पेहराव कशायाचा ? नवर्‍या पेहराव कडयायाचा
करंड सोलीला कुसरीचा ।
नवर्‍या पेहराव कशायाचा ? नवर्‍या पेहराव तोड्यायाचा ।
करंड खोलीला कुसरीचा ।

४४
ताग ताग तागून ये । बारीक सूत पाजून ये ।
कांकणाचा दोर आवळ करावा ।

४५
नवर्‍या नवरीचं कौतिक पहाता । दावी घेत्याती एकमेकां

४६
नवर्‍या नवरी कशी नेशील ?
नवर्‍या बाप । नवर्‍याचा बाप । गेला फलटण शहरांत ।
गेला फलटण शहरांत ।
केली मेण्याची किंमत । नवरी बसविली मेण्यांत ।
आणली नवर्‍याच्या शिवेवर । शिव धरली शिवार्‍यानं ।
नवरीकडील माणसें म्हणतात : -
"नवर्‍या, नवरी कशी नेशील? "
नवरा: - चोळी पातळ देईन । नवरी जितून नेईन ।
तिथनं नवरा निघाला । आला येशीच्या जवळीं ।
येस धरली येसकरांनी ।
" नवर्‍या नवरी कशी नेशील?"
"पांच पानं विडा मी देईन । नवरी जितून नेईन ।"
तिथनं नवरा निघाला । आला मांडवाजवळीं ।
मांडव धरला वर्‍हाड्यांनी ।
"नवर्‍या नवरी कशी नेशील?"
"वर्‍हाड जेवण मी घालीन । नवरी जितून नेईन ।"
तिथनं नवरा निघाला । आला बोहल्याजवळीं ।
बाहेलं धरलं मेहुण्यांनी ।
"नवर्‍या, नवरी कशी नेशील ?"
"तुमचा कान मी धरीन । तुम्हांला पटका मी देईन । नवरी जितून नेईन ।"
तिथनं नवरा निघाला । गेला बोहला चढूनी ।
बसला नवरीच्या बाजूला । नवरीची बाजू धरली बहिणींनीं
"नवर्‍या , नवरी कशी नेशील?"
"तुम्हाला चोळी मी देईन ।नवरी जितुनी नेईन ।"
तिथनं नवरा निघाला । गेला उंबर्‍याजवळीं ।
उंबरा धरला वरमाईनं ।
"नवर्‍या, नवरी कशी नेशील?"
"वरमाय साडी मी देईन । नवरी जितुनी नेईन ।"
तिथनं नवरा निघाला । गेला देव्हार्‍याजवळीं ।
देव्हारा धरला देवानं ।
"नवर्‍या , नवरी कशी नेशील?"
"देवा गोंधळ घालीन । तुझा गजर करीन । नवरी जितुनी नेईन ।"

४७
नवरी जितुनी नेईन
भाऊ:- "गहूं पेरला गव्हाळींत ।
गव्हासारखी तिची लोंबी । दार धरुन कां ग उभी? "
बहीण : - " दादा ,लेकी मागण आलें ।"
भाऊ : - " तुझ्या लेकीचं लेणं काय ?"
बहीण: - "घालीन साखळ्याचा जोड । नवरी जितुनी नेईन ।"

४८
नवरी जितुनी नेईन
भाऊ :- "सोन्याचा करदोडा । लवत खवत । कोण पाव्हणी येतीया ।"
बहीण :- "दादा , नव्ह मी पाहुणी । दादा , तुमची बहिणाई ।"
भाऊ :- "कां हो अक्का ,येणं केलं ?"
बहीण :- "दादा, लेकी मागण आलें ।"
भाऊ :- "आक्का दुरुलाग पला । लेकी पायच दुखत्याल ।"
बहीण :- " मी मेणाच करीन । नवरी जितुनी नेईन"॥
भाऊ: - "सोन्याचा करदोडा । लवत खवत । कोण पाव्हाणी येतीया ?"
बहीण:- "दादा, नव्ह मी पाहुणी । दादा, तुमची बहिणाई ।"
भाऊ: - "कां हो आका  , येणं केलं ?"
बहीण:- "सडक झाडं मी लावीन । नवरी जितुनी नेईन ।"
भाऊ:- " सोन्याचा करदोडा लवत खवत । कोण पाव्हणी येतीया?"
बहीण:- "दादा नव्ह मी पाहुणी । दादा, तुमची बहिणाई ।"
भाऊ :- "कां हो आका, येणं केलं ?"
बहीण :- "दादा , लेकी मागण आलें ।"
भाऊ:- " आका , दुरुलाग पला । लेकी तहान्च लागल ।"
बहीण: - "आडवी बारव खंदीन । नवरी जितुनी नेईन ।"

४९
आका लेक मागते
बहीण: -
दारीं होती जाई । तिला बांधली गाई । दादा लेक देतो तिला हातच नाहीं ।
दारीं होती जाई तिला बांधली गाई । दादा लेक देतो तिला पायच नाहीं ।
भाऊ : -
"आका लेक मागते । कसं करावं ग? ।"
बायको : -
" होईन सातोदरी । मग देईन होंजीच्या घरीं ।"

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP