मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
प्रकृतीचा निरोगीपणा

प्रकृतीचा निरोगीपणा

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


वधू आणि वर यांचे वय, रूप, शरीराची उंची, इत्यादी बाबतींत ज्याप्रमाणे काही एक प्रकारचा मेळ असला पाहिजे म्हणून वरील कलमात सांगितले, तशाच प्रकारचा मेळ उभयतांच्या प्रकृतीचे परिणाम एकमेकांवर झाल्याशिवाय राहणार नाहीत. स्त्रीच्या अंगी जोम असून पुरुष अशक्त असला, तर ज्याप्रमाणे ‘ वरणभाताची ’ ची स्थिती होऊन पुरुष मोडावतो, व तो अकाल मृत्यूला बळी पडण्याचीही भीती असते, त्याचप्रमाणे उलटपक्षी पुरुष दांडगा असला, व स्त्रीस त्याची शक्ती सहन न झाली, तर स्त्रीची अंतरिन्द्रिये बिघडतात, व त्यांचा परिणाम भावी संततीचा क्षीणपणा, किंवा मुळीच संतती न होणे, अगर गर्भमोचनाच्या संधीत अकाली मरण, इत्यादी आपत्ती प्राप्त होण्याचा संभव असतो. यासाठी अशा प्रसंगी वैद्यकशास्त्र जणण्यार्‍या व अनुभवी अशा वैद्याची सल्ला घ्यावी हे प्रशस्त होय. एखादे वेळी मनुष्य बाह्यत: चांगला निरोगी दिसतो, परंतु त्यास काळजाचा अशक्तपणा इत्यादी प्रकारचे रोग असल्यामुळे ते रोग केव्हा प्रकट होतील व उचल खातील याचा सामान्य प्रतीच्या व्यवहारी मनुष्यास सहसा बोध होण्याजोगा नसतो, व त्या योगाने काळीज वगैरेंची कार्ये एकदम बंद पडून भलताच परिणाम होतो. असा परिणाम होण्याची भीती नसावी, व कुष्ठ, अपस्मार इत्यादी स्पर्शसंचारी व असाध्य रोगांची बीजे वराच्या अंगी असल्यास त्यांचेही अगोदर ज्ञान झालेले असावे, हे व्यवहारदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यायोगे इतर रीतींनी इष्ट वाटत असलेला विवाहसंबंध वेळीच निषिद्ध करिता येतो.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP