उपमालंकार - लक्षण ३६

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां सादृश्य व समान धर्म ह्या दोहोंमध्यें अभेदसंबंध असतो, ह्या मताप्रमाणें होणारा शाब्दबोध असा:-
‘ अरविंदसुंदरं वदनम्‍ ’ ह्या वाक्यांत, वरील मताप्रमाणें, अरविंद शब्दाचा, लक्षणेनें, ‘ अरविंदावर राहणारा समान धर्म, ’ असा अर्थ प्रतीत होत. व नंतर त्या समान धर्माचा, पुढें असलेल्या सुंदर ह्या पदार्थाच एक अंश जो सुंदरत्व त्याच्याशीं, अभेदानें अन्वय होतो. आतां, ‘ अरविंदमिव सुंदरम्‍ ’ ह्याचा शाब्दबोध करतांना, अरविंद हा पदार्थ आधाराधेयसंबंधानें इव ह्या पदार्थाशीं अन्वित होतो ( म्ह० अरविंद हा आधार, व इवार्थ समानधर्म हा आधेय या संबंधानें ). आणि इव हा पदार्थ, समान धर्मच अस-ल्यानें, शेवटीं अरविंद ह्या पदार्थाचा, सुंदर या पदार्थाच्या एकदेश जें सौंदर्य, तद्रूप समान धर्माशीं, आधाराधेयभाव ह्या संबंधानें अन्वय होतो. बाकीचा शाब्दबोध पूर्वीप्रमाणेंच. ( ह्या ठिकाणांही एदकदेशान्वय करणें भाग पडलें आहे, तरी त्यांत दोष नाहीं ) ह्यानंतर, ‘ सौंदर्येण, अरविंदेन, समम्‍ ’ ह्या वाक्यांत, सौंदर्य शब्दाच्या पुढें असलेल्या तृतीयेचा, ‘ धान्येन धनी ’ ह्या बाक्यांतील तृतीयेच्या अभेद या अर्थाप्रमाणें, अभेद हाच अर्थ घ्यावा; व दुसर्‍या म्ह० अरविंद ह्या पदाच्यापुढें असलेल्या तृतीयेचा अर्थ निरूपितत्व असा करावा; आणि मग सौंदर्याशीं अभिन्न, आणि अरविंदानें निरूपित जें सादृश्य, तद्‍युक्त असलेल्या पदार्थाशीं हें मुख अभिन्न, आहे असा वरील वाक्याचा शाब्दबोध करावा.
आतां, ‘ अरविन्दायते मुखम्‍ । ’ इत्यादि वाक्यांतील क्यड्‍ ह्या प्रत्ययाचा अर्थ आचार हा मात्र एक सामान्य धर्म आहे. त्या आचाराचें, उपमानपदाच्या लक्षणेनें उपस्थित केलेल्या उपमाननिरूपित सादृश्य (ह्या लक्ष्यार्थांतील सादृश्य ) हें विशेषण होतें. ह्या सादृश्यरूप विशेषणाचा व त्या आचाररूप धर्माच्या दोन प्रकारांनीं अन्वय होऊं शकतो-( एका मताप्रमाणें, ) प्रयोजकतासंबंधानें व ( दुसर्‍या मताप्रमाणें ) अभेंदसंबंधानें. ह्या सादृश्यरूप विशेषणाचें विशेष्य, सादृश्याचा आश्रय असलेला ( मुखादि ) पदार्थ व, तेंच विशेष्य येथील उपमेय. ‘ चंद्रीयति मुखम्‍ ’ या वाक्यांतील क्यच्‍ प्रत्ययाच्या आचार ह्या अर्थाचा, वरीलप्रमाणेंच प्रथम उपमान-निरूपित सादृश्य ह्या विशेषणाशीं अन्वय करावा, ( प्रयोजकतासंबंधानें अथवा अभेदसंबंधानें ); आणि नंतर सादृश्यरूपी विशेषणाशीं अभिन्न जो आचाररूप धर्म त्याचा, तिडन्तार्थाशीं अन्वय करून आचारा-नुकूलकृतिमत्‍ मुखम्‍ असा शाब्दबोध करावा. ( सादृश्य व समान धर्म ह्यांचा, दोन मतांप्रमाणें, होणारा अन्वय ध्यानांत घेऊन त्याप्रमाणें होणारा हा शाब्दबोध थोडक्यांत आतांपर्यंत सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP