मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १११ ते ११५

पंचीकरण - अभंग १११ ते ११५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१११॥
अनंताचा अंत पहावया गेलों ।
तेणें विसरलों आपणासी ॥१॥
आपणा आपण पहातां दिसेना ।
रूप गवसेना दोहींकडे ॥२॥
दोहींकडे देव आपणचि आहे ।
संग हा न साहे माझा मज ॥३॥
माझा मज भार जाहला बहुत ।
देखत देखत कळों आला ॥४॥
कळों आला भार पाहिला विचार ।
पुढें सारासारविचारणा ॥५॥
विचारणा झाली रामीं रामदासीं ।
सर्वहि संगासी मुक्त केली ॥६॥
मुक्त केली मोक्षा मुक्तीची उपेक्षा ।
तुटली अपेक्षा कोणी एक ॥७॥
॥११२॥
पहिलें प्रथम मूळीं परब्रह्म ।
व्यापक सूक्ष्म जेथें तेथें ॥१॥
जेथें तेथें वस्तु आहे निरकार ।
शुद्ध व्योमाकार प्रगटित ॥२॥
प्रगटित असे दिसेना ना भासे ।
विचार विलसें ज्ञानियासी ॥३॥
ज्ञानियासी ज्ञान कळे निरंजन ।
आणि जन वन सारिखेंचि ॥४॥
सारिखेचि आहे देव ओळखतां ।
जेथें तेथें जातां देव भासे ॥५॥
देव भासे मनीं नित्य निरंतर ।
बाह्म अभ्यंतर व्यापुनियां ॥६॥
व्यापुनियां आहे सर्वांचे अंतरीम ।
अनुभवें हरी ओळखावा ॥७॥
ओळखावा परी ओळखतां नये ।
म्हणोनि उपाये साधुसंग ॥८॥
साधुसंग धरी श्रवण विवरी ।
सारासार करी विचारणा ॥९॥
विचारणा करी देवा निर्गुणाची ।
आणि सगुणाची उपासना ॥१०॥
उपासना कर्म हो आधीं पाळावें ।
मग सांभाळावें ब्रह्म-ज्ञान ॥११॥
ब्रह्मज्ञान नसे ते जन आंधळे ।
सन्मानीं पांगुळे क्रियाभ्रष्ट ॥१२॥
क्रियाभ्रष्ट कर्मउपासनेविण ।
नेणतां निर्गुण सर्व मिथ्या ॥१३॥
सर्व मिथ्या जंव ब्रह्मज्ञान नाहीं ।
क्रियाकर्म कांहीं सोडविना ॥१४॥
सोडविना कर्म या कर्मापासांनी ।
भगवंतावांत्तोनी तारांबळी ॥१५॥
तारांबळी झाली देवास नेणतां ।
कमी गुंडाळितां देव कैंचा ॥१६॥
देव कैंचा भेटे कर्म उरे पुढें ।
संशयचि वाढे सर्वकाळ ॥१७॥
सर्वकाळ गेला संदेहीं पडतां ।
नित्य चोखाळितां कळिवर ॥१८॥
कळिवर काय नित्य धूत गेला ।
लवितो कोणाला उप- ॥१९॥
उपकार कैंचा सेवक देहाचा ।
आणि कुटुंबाचा भारदाही ॥२०॥
भारवाही ला देवासी चुकला ।
लैकिकचि केला जन्मवरी ॥२१॥
जन्मवरी केलें अंतीं व्यर्थ गेलें ।
कासाविस झालें वायाविण ॥२२॥
वायाविण काळ गेला कीं निर्फळ ।
कर्म हें सबळ सुटेना कीं ॥२३॥
सुटेना कीं कर्म कोण सोडविता ।
सोडूनि अनंता कमै केलीं ॥२४॥
कमे केलीं देह चालतां निर्भळ ।
खंगतां ओंगळ देह झाला ॥२५॥
देह झाला क्षीण सदा हगवण ।
मृत्तिकेचा शीण कोण करी ॥२६॥
कोण करी तेव्हां कर्माचें पाळण ।
झाली भण-भण शरीराची ॥२७॥
शरीराची जेव्हां झाली भणभण ।
तेव्हां नारायण भजों पाहे ॥२८॥
भजो पाहे तेव्हां नारायण कैचा ।
गेला अभाग्याचा व्यर्थ काळ ॥२९॥
व्यर्थ काळ गेला देवा न भजतां ।
देह चोखाळितां चोखाळेना ॥३०॥
चोखाळिला देहो वाढला संदेहो ।
अंतकाळीं पाहो दैन्यवाणा ॥३१॥
दैन्यवाणा पाहे देवा न भजतां ।
पाहा तुला आतां कोण सोडी ॥३२॥
कोण सोडी देव धुंडिल्या वांचुनी ।
म्हणोनि भजनीं सावधान ॥३३॥
साव-धानपणें देवासि शोधावें ।
तेणेंचि साधावे परलोक ॥३४॥
परलोक साधे संतांचे संगतीं ।
चुके अधोगति गर्भवास ॥३५॥
गर्भवास चुके ज्ञान अभ्यासितां ।
वस्तूसि पाहतां वस्तुरूप ॥३६॥
वस्तुरूप होणें विवेकाच्या गुणें ।
नित्य निरूपणें सारासार ॥३७॥
सारासारें घडे असाराचा त्याग ।
योगिया नि:संग सहजचि ॥३८॥
सहजचि कर्मापासूनि सुटला ।
बोधें विनटला परब्रह्मीं ॥३९॥
परब्रह्मीं हेतु लागतां अहेतु ।
देहे देहातीतु रामदास ॥४०॥
॥११३॥
कर्मै चित्तशुद्धि होऊ नियां गेली ।
मग उपासली उपासना ॥१॥
उपासना-मिसें देव ठांई पडे ।
संदेहचि उडे एकसरा ॥२॥
एकसरा पंथें सांपडे सुगम ।
जैसे विहंगम फळावरी ॥३॥
फळावरी झड जातां अनायासीं ।
निर्फळ असोनी वायावीण ॥४॥
वाया-वीण शीण कासया करावा ।
निर्फळ जाणावा संसार हा ॥५॥
संसाराचा सोस कर्मीं निज-ध्यास ।
तेणें जगदीश अंतरला ॥६॥
अंतरला देव अंतरीं न द्यावा ।
विवेक पाहावा सज्जनांचा ॥७॥
सज्जनाचा योग सर्वांचा वियोग ।
आणि त्याचा त्याग चमत्कारें ॥८॥
चमत्कारें त्याग तत्त्वविवरणें ।
शीघ्रचि पावणें मोक्षपदीं ॥९॥

मोक्षपदीं ज्ञान रामदासीं झालें ।
बंधन तुटलें संशयाचें ॥१०॥

॥११४॥
संशयाचें कर्म संशयीं पडिलें ।
तें कोणें सोडिलें ज्ञानेंविण ॥१॥
ज्ञानेंविण देव कैंचा ठायीं पडे ।
अज्ञानें बापुडें गुंडाळलें ॥२॥
गुंडाळलें सर्व लैकिकाकरितां ।
लैकिक पाहतां उद्धरेना ॥३॥
उद्धरेना लोक हे कोणी कोणासी ।
व्यर्थचि देवासी अंतरावें ॥४॥
अंतरावें व्हावें बहुत आधींन ।
बहुतांचें मन राखवेना ॥५॥
राखवेना मन बहुतां जनांचें ।
आणि सज्जनांचें वर्म चुके ॥६॥
वर्म चुके कर्म आडवेंचि आलें ।
नाहीं ओळखिलें आत्म-यासी ॥७॥
आत्मयासी जाणे तोचि एक भला ।
संसारीं सुटला विवेकानें ॥८॥
विवेकानें लाभ पावावा आपुला ।
लैकिकें देवाला सोडूं नये ॥९॥
सोडूं नये ज्ञान सगुणीं भजणें ।
भक्ति निवेदनें ओळखावी ॥१०॥
ओळखावी भक्ति सायुज्यता मुक्ति ।
येणें होय गति दास म्हणे ॥११॥
॥११५॥
अस्थीचा विटाळ होतां स्नान केलें ।
चुडे दांतवलें कासयासी ॥१॥
आच मन करावें शूद्राच्या विटाळे ।
हाटाचे चौढाळे कोण जाणे ॥२॥
नदीचे प्रवाहीं आंत पाहों नये ।
स्नान संध्या होये अग्रोदकीं ॥३॥
ओले चर्मीं सिद्ध होत आहे हिंग ।
स्वयंपाकी सांग सेविताती ॥४॥
रामदास म्हणे हें कोणी न पाहे ।
देह मूळीं आहे विटाळाचा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP