मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग ६६ ते ७०

पंचीकरण - अभंग ६६ ते ७०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥६६॥
संतसंगें मज काय प्राप्त झालें ।
सांगतों वहिलें तुजपाशीं ॥१॥
मंत्र हा तारक रामनाम एक ।
गुज हरादिक चिंतिताती ॥२॥
ज्ञानें समाधान सगुणाचें ध्यान ।
निर्गुण अभिन्न आपणचि ॥३॥
दृश्य आवाहन दृश्य विसर्जन ।
तेथें पिंडदान आढळेना ॥४॥
जपासना हरि मुद्रा अगोचरी ।
सिद्धासनावरी समाधान ॥५॥
पंचीकरणें पिंडब्रह्मांड आवरण ।
साक्ष तो आपण एकलचि ॥६॥
जीवशिवऐक्य झालें येणें रीतीं ।
प्रकृतीचे प्रांतीं द्वैत कैंचें ॥७॥
अष्ट देह स्थूळ सूक्ष्म कारण ।
चौथा महाकारण जाणिजे हा ॥८॥
विराट हिरण्य आणि अव्याकृत ।
आठवी प्रकृति मूळमाया ॥९॥
एक तत्त्व जाणे त्याचें नांव भक्ति ।
जाणावी विरक्ति संगत्याग ॥१०॥
सायुज्यता मुक्ति तेचि ते अचळ ।
साधनाचें फळ गुरुदास्य ॥११॥
गुरुदास्यें चुके संसारयातना ।
अनुभवें खुणा जाणतील ॥१२॥
अनुभवेंवीण होय सर्व शीण ।
निरसले प्रश्र दास म्हणे ॥१३॥
॥६७॥
रिसाचिये परी व्हावें एकचित्त ।
ध्यानीं भगवंत सोडूं नये ॥१॥
सोडूं नये सर्वकाळ निजव्यास ।
श्रवण अभ्यास असों द्यावा ॥२॥
असों द्यावा सदा सन्निध विवेक ।
तेणें देव एक चोजवेल ॥३॥
चोजवेल देव श्रवणें मननें ।
कुबद्धि साधनें पालटावी ॥४॥
पालटावी सर्व हे चि हे अहंता ।
शोधावी तत्त्वतां देहबुद्धि ॥५॥
देहबुद्धि सर्व ज्ञानें शोधूं जातां ।
नि:संग अनंता भेटी होय ॥६॥
भेटी होय ज्ञानें निर्गुण देवाची ।
मग नाहीं छीछी संसाराची ॥७॥
संसाराची छीछी यातना यमाची ।
चुकवील तोचि धन्य एक ॥८॥
धन्य एक जनीं तोचि तो पाहातां ।
मुक्ति सायुव्यता जया लाभे ॥९॥
जया लाभे मुक्ति सगुणाची भक्ति ।
दास म्हणे शक्ति आगळा तो ॥१०॥
॥६८॥
तुम्ही आम्ही करूं देवाचा निश्चय ।
जया नाहीं लये तोचि देव ॥१॥
देव हा अमर नित्य निरंतर ।
व्यापुनी अंतर देव आहे ॥२॥
देव आहे सदा सबाह्याभ्यंतरीं ।
जीवा क्षणभरी विसंबेना ॥३॥
विसंबेना परी जीवासी नेणवे ।
म्हणउनी धांवे नानामतीं ॥४॥
नानामतीं देव पाहतां दिसेना ।
जंव तेम वसेना ज्ञान देहीं ॥५॥
ज्ञ न देहीं वसे तया देव दिसे ।
अंतरीं प्रकाशे ज्ञानदृष्टि ॥६॥
ज्ञानदृष्टि होतां पाविजे अनंता ।
हा शब्द तत्त्वतां दास म्हणे ॥७॥
॥६९॥
ब्रह्म हें जाणावें निर्मळ निश्चळ ।
व्यापक पोकळ व्योमांकारें ॥१॥
व्योमाकार ब्रह्म बोलताती श्रुती ।
पाहों जातां मती तदाकार ॥२॥
तदाकार मती श्रवणें होईल ।
संदेह जाईल अंतरींचा ॥३॥
अंतरींचा भाव निर्मळीं लागतां ।
होईजे तत्त्वतां निर्मळची ॥४॥
निर्मळचि होणें निर्मळाचे गुणें ।
श्रवणमननें दास म्हणे ॥५॥
॥७०॥
नमोजी अनंता तूंचि माता पिता ।
तुझी सर्व सत्ता तूंचि एक ॥१॥
तूंचि एक ऐसा निश्चय मानसीं ।
झालिया मुक्तीसी काय उणें ॥२॥
काय उणें मुक्ति जया तुझी भक्ति ।
संसारीं विरक्ति सर्व काळ ॥३॥
सर्वकाळ जया श्रवणीं आवडी ।
साधका तांतडी तुझी देवा ॥४॥
तुझी देवा चाड त्यासि नाम गोड ।
पुरे सर्व कोड दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP