मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १५१ ते १५५

पंचीकरण - अभंग १५१ ते १५५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१५१॥
समाधान व्हावें विवेकें पाहावें ।
वायूच्या स्वभावें सर्व कांहीं ॥१॥
सर्व कांहीं घडे वायुचिकरितां ।
वायु पाहों जातां आढळेना ॥२॥
आढळेना वायु आकाशीं विराला ।
कर्ता काय झाला अंतरींचा ॥३॥
अंतरींचा सर्व विवेकें पाहतां ।
ब्रह्मरूप आतां सहजचि ॥४॥
सहजचि झालें विचारानें केलें ।
माणूस पाहिले शोधूनियां ॥५॥
शोधूनियां नीत माणूस पाहावें ।
वर्म पडे ठावें दास म्हणे ॥६॥
॥१५२॥
शरीराचीं तत्त्वें तत्त्वांचें शरीर ।
पहावा विस्तार विस्तारूनि ॥१॥
विस्तारूनि गुणीं तत्त्वांची मांडणी ।
सिद्धांतें जावोनी आरंभावी ॥२॥
आरंभावी तंत्त्वें तत्त्वें वेगळालीं ।
मीपणा गळालीं विवेकानें ॥३॥
विवेकें पाहतां कोणीचा नाढळे ।
समजतां कळे सर्व कांहीं ॥४॥
सर्व कांहीं लाभ होतो निरूपणें ।
श्रवणमननें दास म्हणे ॥५॥
॥१५३॥
माणुसाचें ब्रह्म शोधितां होईल ।
प्रचीत येईल रोकडीच ॥१॥
रोकडी प्रचीति होती गुरुमुखं ।
फुका सर्व सुखें हाता येती ॥२॥
हाता येती बीजें सज्जनाच्या गूजें ।
प्रचीतीच्या भोजें आनंदला ॥३॥
आनंदला प्राणी सद्रुरु सेवितां ।
क्षुधार्थी जेवितां जेवीं तृप्त ॥४॥
तृप्त झाली बुद्धि निर्गुणाची शुद्धि ।
लागली समाधि रामदासीं ॥५॥
॥१५४॥
आतां कांहीं बोलों धालों ।
तृप्त झालों विवेकें राहिलों परब्रह्मीं ॥१॥
परब्रह्मीं जातां ब्रह्मचि तत्त्वता ।
विचारें पाहतां आपणचि ॥२॥
आपणचि असे कोणीहि न दिसे ।
संसाराचें पिसें वाव झालें ॥३॥
वाव झाल भय सर्व संसारींचें ।
लाधलें हरीचें निजधाम ॥४॥
निजधाम बोधें विवेकें पाहावें ।
दास जीवें भावें सांगतसे ॥५॥
॥१५५॥
आकाराचें सुख निराकारा नये ।
निराकारीं काये पाहशील ॥१॥
पाहशील सुख सुखामागें दु:ख ।
शोक आवश्यक अंगीं वाजे ॥२॥
अंगीं वाजे शोक एखादिये वेळीं ।
सुख सर्वकाळीं सगुणाचें ॥३॥
सगुणाचें सुख नासोनि जाईल ।
सगुण होईल नाहीं ऐसें ॥४॥
नाहीं ऐसें एक निर्गुण दिसतें ।
रोकडेंचि तेथें कांहीं नाहीं ॥५॥
कांहीं नाहीं कैसें आहे घनदाट ।
सर्वांचें शेवट परब्रह्म ॥६॥
परब्रह्म परी पाहतां दिसेना ।
नये अनुमाना कांहीं केल्या ॥७॥
कांहीं केल्या नोहे पाषाणाचें सोनें ।
तैसें हें अज्ञानें जाणिजेना ॥८॥
जाणिजेचि जनीं निज परब्रह्म ।
तंत्र कैंचा श्रम जाउं पाहे ॥९॥
जाऊं पाहे मन ब्रह्मासी पहाया ।
तंव तेथें माया दिसताहे ॥१०॥
दिसताहे माया तंव निरूपासी ।
येरवीं मायेसी ठाव कैंचा ॥११॥
कैंचा ठाव तया मायाज्ञानियासी ।
रामीं रामदासीं संतसंग ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP