पंचक - विवेकपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
एक देव आहे खरा ।
माया नाथिला पसारा ॥१॥
हेंचि विचारें बाणावें ।
ज्ञान तयासी म्हणावें ॥२॥
साच म्हणों तरि हें नासे ।
मिथ्या म्हणों तरि हें दिसे ॥३॥
पाहों जातां आकारलें ।
मुळीं कांहीं नाहीं झालें ॥४॥
कैसा देही देहातीत ।
कैसे अनंत अनंत ॥५॥
रामदासाचें बोलणे ।
स्वप्नामाजीं जाईजणें ॥६॥
॥२॥
पूर्वी पहातां मी कोण ।
धुंडूं आपणा आपण ॥१॥
स्वयें आपुला उगव ।
जाणे तोचि महानुभाव ॥२॥
कोण कर्म आचरला ।
कैसा संसारासी आला ॥३॥
आले वाटें जो मुरडे ।
देव तयासि सांपडे ॥४॥
आली वाट ती कवण ।
मायेचें जें अधिष्ठान ॥५॥
रामदासाची उपमा ।
ग्राम नाहीं कैंची सीमा ॥६॥
॥३॥
पांचा लक्षणीं पूरता ।
धन्य धन्य तोचि ज्ञाता ॥१॥
विवेंक वैराग्य सोडीना ।
कर्म मर्यादा सांडीना ॥२॥
बाह्म बोले शब्दज्ञान ।
अंतर्यामीं समाधान ॥३॥
रामीं रामदास कवि ।
न्याय नीतीनें शिकवी ॥४॥
॥४॥
अंतर्यामीं समाधान ।
बाह्य सगुण भजन ॥१॥
धन्य धन्य तेंचि ज्ञान ।
अंतर्यामीं समाधान ॥२॥
निरूपणें अंतरत्याग ।
बाह्य संपादी वैराग्य ॥३॥
रामीं रामदास म्हणें ।
ज्ञान स्वधर्मलक्षणें ॥४॥
॥५॥
कौल झाला रघुनाथाचा ।
मेळा मिळाला भक्तांचा ॥१॥
अहंभाव वरचेवरी ।
बळेंचि घातला बाहेरीम ॥२॥
क्षेत्रीं विवेक जहाला ।
क्तोध देशोघडी केला ॥३॥
काम देहींचा कोंडिला ।
मद मत्सर पाडिला ॥४॥
लोभ दंभ नागविला ।
अहंकार बुडविला ॥५॥
कुत्रें मीपण पळालें ।
उगेंच अज्ञान गळालें ॥६॥
फित्वखोर होतां द्वंद ।
त्याचा केला शिरच्छेद ॥७॥
तिरस्कार दावेदार ।
त्यास बोधें केला मार ॥८॥
मन चोरटें धरिलें ।
नित्यनेमें जर्जर केलें ॥९॥
आळस साक्षेपें घेतलें ।
पायीं धरूनि आप्टिलें ॥१०॥
दुश्चितपण अकस्मात ।
निरूपणीं केला घात ॥११॥
कपट मैंद सांपडलें ।
उभें सर्वांगीं तोडिलें ॥१२॥
बंड पाखांड तुटिलें ।
बळेंचि धरूनि कुटिलें ॥१३॥
शब्द बांधोनी पाडिला ।
नि:शब्द तेथें प्रतिष्ठिला ॥१४॥
गर्वताठा विटंबिला ।
वाद विवेकें झाडिला ॥१५॥
जेणें भावार्थ उडविला ।
धरूनि विकल्प बुडविला ॥१६॥
करूनि अभावाचा नाश ।
राहे रामीं रामदास ॥१७॥

॥ अभंगसंख्या ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP