पंचक - व्यर्थपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
आतां सांभाळा आपुला ।
पाहूं जातां काळ गेला ॥१॥
आतां हित कोण वेळे ।
पुढें होणार नकळे ॥२॥
देहालागीं नानापरी ।
कष्ट केले जन्मवरी ॥३॥
केले देहाचें भजन ।
परी देह झाला क्षीण ॥४॥
देहालागीं जीवेंभावें ।
वय वेंचलें आवघें ॥५॥
म्हणे रामीं रामदास ।
केला आयुष्याचा नाश ॥६॥
॥२॥
वय झालें वाताहात ।
अविचारें केला घात ॥१॥
देव नाहीं ओळखिला ।
पुढें विषय देखिला ॥२॥
बाळपण मूर्खपण ।
कांहीं नेणे हो आपण ॥३॥
होता तारुण्याचा भार ।
पुढें झाला कामातुर ॥४॥
वृद्धपणीं संकोचित ।
देह जहाला गलित ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
जन्म गेले मूर्खपणें ॥६॥
॥३॥
देहालागीं कष्ट केले ।
परि ते अवघे व्यर्थ गेले ॥१॥
देह देवाचे कारणीं ।
होतां देव होय ऋणी ॥२॥
प्राणी लोभें गुंडाळला ।
पुढें अंतकाळ आला ॥३॥
जे जे कांहीं कष्ट केले ।
ते ते अवघे व्यर्थ गेले ॥४॥
नानापरी सांभाळिली ।
पुढें काया हे जाळिली ॥५॥
दास म्हणे मूर्खपण ।
पुढें जन्मासी कारण ॥६॥
॥४॥
शत वर्षांची मर्यादा ।
तितुका व्यर्थ गेला धंदा ॥१॥
देह संसारीं गोविला ।
नाहीं देव आठविला ॥२॥
काया वाचा मनोभावें ।
अवघें प्रपंचीं लावावें ॥३॥
नीच सेवकाचे परी ।
सेवा केली जन्मवरी ॥४॥
दास म्हणे विषयबेडी ।
अंतकाळीं कोण सोडी ॥५॥
॥५॥
देव संसारीं घालितो ।
अंतकाळीं सोडवितो ॥१॥
तया देवासी चुकले ।
प्राणी लोभें भांबावले ॥२॥
केलें जेणें चराचर  ।
देव विश्वासी आधार ॥३॥
देव जीवाचें जीवन ।
देव बंधविमोचन ॥४॥
देव सर्वांचे अंतरीं ।
सांभाळितो निरंतरी ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
जयाचेनी धन होणें ॥६॥

॥ अभंगसंख्या ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP