पंचक - ध्यानपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
व्यान लागलें रामाचें ।
दु:ख हरले जन्माचें ॥१॥
रामपदांबुजावरी ।
वृत्ति गुंतली मधुकरी ॥२॥
तनु मेघश्याममेळें ।
चित्त चातक निवालें ॥३॥
रामचंद्र नाम एकीं ।
चक्षू चकोर जहाले सुखी ॥४॥
कीर्ति सुगंध तरुवरी ।
कुजे कोकिळ वैखरी ॥५॥
रामीं रामदास स्वामी ।
प्रगटले अंतर्यामीं ॥६॥
॥२॥
मुगुटकिरीट कुंडले ।
तेज रत्नांचें फांकलें ॥१॥
ऐसा राम माझे मनीं ।
सदा आठवे चिंतनीं ॥२॥
कीर्तिमुखें बाहुवटें ।
दंडीं शोभती गोमटे ॥३॥
जडित रत्नांचीं भूषणें ।
दशांगुलीं वीरकुंकणें ॥४॥
कांसे शोभे सोनसळा ।
कटीं सुवर्णमेखला ॥५॥
चरणीं नेपुरांचें मेळे ।
वांकी गर्जती खळाळें ॥६॥
राम सर्वांगीं सुंदर ।
चरणीं ब्रीदाचा तोडर ॥७॥
सुगंधपरिमळ दुसरे ।
झेंपावती मधुकरें ॥८॥
गळां पुष्पांचीया माळा ।
वामें शोभे भूमिबाळा ॥९॥
स्वयंभ सुवर्णाची कास ।
पुढें उभा रामदास ॥१०॥
॥३॥
धनुष्य बाण काय केलें ।
कां कर कटावरि ठेविले ॥१॥
हा कां धरिला अबोला ।
दिसे वेष पालटिला ॥२॥
किलकिलाट वानरांचे ।
थवे दिसतना तयांचे ॥३॥
पंढरीसी जहालें येणें ।
एक्या हनुमंताकारणे ॥४॥
दिसे हनुमंत एकला ।
सैन्यामधुनी फुटला ॥५॥
रामीं रामदास भाव ।
तैसा होय पंढरीराव ॥६॥
॥४॥
जहाले अजन्माचे पोटीं ।
मिथ्या म्हणतां फोडी घांटी ॥१॥
नवल नवल सावज ।
काय सांगों मी हें चोजें ॥२॥
तयासि मारूं जातां पाहे ।
जीवा हानि होत आहे ॥३॥
रामीं रामदासवर्म ।
काळेना तयाचें हो कर्म ॥४॥
॥५॥
आत्मारामाविण रितें ।
स्थान नाहीं अनुसरतें ॥१॥
पहातां मन बुद्धि लोचन ।
रामेंविण न दिसे आन ॥२॥
सवडी नाहीं तीर्थगमना ।
रामें रोधिलें त्रिभुवना ॥३॥
रामदासीं तीर्थ भेटी ।
तीर्थ रामेहूनि उठी ॥४॥
॥६॥
रूप रामाचें पाहतां ।
मग कैंची रे भिन्नता ॥१॥
दृश्यअदृश्यावेगळा ।
राम जीवींचा जिव्हाळा ॥२॥
वेगळीक पहातां कांहीं ।
हें तों मुळींच रे नाहीं ॥३॥
रामदासीं राम होणें ।
तेथें कैंचें रे देखणें ॥४॥
॥७॥
वेळे पाऊस पडेना ।
नासकवणी उघडेना ॥१॥
ऐसें कुळवाडीयांचें भंड ।
दु:ख जहालें उदंड ॥२॥
बहूपरी आलें शेत ।
रेडयापाडयाचें आऊत ॥३॥
कांहीं केल्यानें पिकेना ।
धान्य वेळेसी विकेना ॥४॥
फाळा लविला उदंड ।
अवघे जाहलें थोतांड ॥५॥
वारीम रोगांचीं वाजती ।
नाना आभाळें फिरती ॥६॥
टोळ पक्षी मूषकादिक ।
खाती श्वापदें आणिक ॥७॥
दावेदारांची यातना ।
चोरराचोरा राहवेना ॥८॥
नित्य पोटाचे मजूर ।
वेठिखालीं निघे उर ॥९॥
घर खोपट मोडकें ।
एक पटकूर फाटकें ॥१०॥
बहू रोगें गुरे गेलीं ।
धारणीनें मुलें मेलीं ॥११॥
सर्व संसार बुडाला ।
दास म्हणे जोगी झाला ॥१२॥
॥८॥
वड पिंपळ वाढले ।
बहूसाल विस्तारले ॥१॥
तरी ते जाणावे निष्फळ ।
त्यांचें खातां नये फळ ॥२॥
नाना वृक्ष फळेंविण ।
परि ते जाणा नि:कारण ॥३॥
रामदास म्हणे विचार ।
नसतां तसे होती नर ॥४॥
॥९॥
चित्त देउनि ऐकारे ।
पोहणार पडिला धारे ॥१॥
मन मुळ्याच्या शेवटें ।
वाहे जीवन उफराटें ॥२॥
उगमासी संगम झाला ।
रामदासीं शब्द निघाला ॥३॥
॥१०॥
बरें चांगलें आणि गोड ।
ऐकतांचि पुरे कोड ॥१॥
अभिमानापैलीकडे ।
मन बुद्धीसी नातुडे ॥२॥
रामदास म्हणे साचें ॥
मूळस्थान या जन्माचें ॥३॥

॥ अभंगसंख्या ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP