पंचक - उन्मत्तपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
रामीं विसरला प्राणी ।
कामलोभें केली हानी ॥१॥
कामधेनु मोकलिली ।
घरीं गाढवी बांधिली ॥२॥
उपटुनी कल्पतरू ।
केला शेराचा आदरू ॥३॥
सांडूनियां चिंतामणि ।
वेंची दहिंवराचें पाणी ॥४॥
गेलें हातींचें निधान ।
केलें कवडीचें साधन ॥५॥
परिस रागें हुंडारिला ।
हाती पाषाण घेतला ॥६॥
सार अमृत सांडिले ।
दैन्यवाणें कांजी प्याले ॥७॥
सोनें सांडुनी आदरें ।
वेचूं लागला खापरें ॥८॥
रत्न सांडूनियां खडे ।
गेले म्हणून दु:खें रडे ॥९॥
केली साखर परती ।
सुखें तोंडीं घाली माती ॥१०॥
म्हणे रामीं रामदास ।
तोडीं संसाराची आस ॥११॥
॥२॥
शांति माता मारिली ।
भ्रांति तेथें प्रतिष्ठिली ॥१॥
ऐसे लोक कलियुगीचे ।
भय न धरिती पापाचें ॥२॥
विवेकगुरु तो मारिला ।
तेथें क्रोध प्रतिष्ठिला ॥३॥
नीतिअमृत सांडिलें ।
असत्यमद्यपान केलें ॥४॥
दया बहिण संहारिली ।
निंदाभातंगी पाळिली ॥५॥
पुत्रविचार दवडिला ।
दासीपुत्र प्रतिष्ठिला ॥६॥
सत्य ब्राह्मण मारिला ।
दोषी धीवर पाळिला ॥७॥
ज्ञान पक्कान्न सांडिलें ।
माष अज्ञान सेविलें ॥८॥
भक्ति लक्ष्मी त्यागिली ।
अभक्ति अवदसा घेतली ॥९॥
मित्र विश्वास सोडिला ।
शत्रु विकल्प जोडिला ॥१०॥
भेदचोरटे पाळिले ।
अभेदराजे दुराविले ॥११॥
रामी रामदास म्हणे ।
जळो अभक्तांचें जिणें ॥१२॥
॥३॥
जेणें संसारीं घातिलें ।
पापी त्यासी विसरले ॥१॥
श्रीसी सांडोनियां दारा ।
भजे दासीच्या डिगरा ॥२॥
मायबापें दुरावलीं ।
चोरें आपुली मानिलीं ॥३॥
फोडोनियां शालिग्राम ।
वेश्या सेवितां अधम ॥४॥
रामीं रामदास म्हणे ।
जळी अभक्तांचें जिणें ॥५॥
॥४॥
ज्याच्या उदरासी आला ।
त्यासी फिरोनि पडला ॥१॥
तोचि जाणावा चांडाळा ।
देवब्राह्मणाचा काळ ॥२॥
झाला स्रियेसी लंपटु ।
मायबापांसी उद्धटु ॥३॥
भय पापाचें न धरी ।
सज्जनाची निंदा करी ॥४॥
नेणे माय कीं मावशी ।
कोणें सांगावें तयासी ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
यम केला त्याकारणें ॥६॥
॥५॥
प्राणी संसारासी आला ।
परि तो देवासी चूकला ॥१॥
तगे तोचि तो अज्ञान ।
नेणे भगवंताचें ज्ञान ॥२॥
देह आपुला मानिला ।
देखी सांडोनियां गेला ॥३॥
जें जें कांहीं अशाश्वत ।
तें तें मानिलें शाश्वत ॥४॥
देवीं ब्राह्मणीं अभाव ।
तेथें वर्णांगाचा भाव ॥५॥
रामदासाचें स्वहित ।
जेणें मानिलें अनहित ॥६॥

॥ अभंगसंख्या ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP