मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - कौटुंबिक जीवन

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


जन गेला जतरी, काय जनानं पाहिले ।
माय बाप घरी. टूली काय देवाईनं घडलं ॥
हातात तागडं वाणी हिंडतो कवाचा ।
बाप या बैयाचा सौदा मिळेना दोहीचा ।
अंगाच्या कातडयाच्या शिवते वाह्यना ।
काशी मपल्या बयाचा उपकार फिटल्या जाईना ॥
नको करु पूता मायेची धूळमाती ।
तुपल्या जन्मायेळं आस्तुरी कुठं व्हती? ॥

माहेर :
लेकी तुही जात खायची जायची ।
लेकानं केली बोली कायड काशीले न्यायाची ॥
बोलले बापाजी लेकी सासुरवास कसा ?
चरकात उस घातला जसा ॥
बोलले बापाजी लेकी नांदून करावं नावं ।
भोवताली सोयर्‍याचे गाव तिथं निघल तुमचं नाव ॥
यावर मुलगी आपल्या सासुरवासाविषयी म्हणते.
सासुचा सासुरवास भोगते जिवावर ।
तुमच्या नावासाठी निजते शेवावर ॥
काम करु करु मले मरुन जायाचं ।
बाप या बैयाचं नाव कैलास न्यायचं ।
लेक करता लेक साखरंचं पोतं ।
तुपल्या संसाराचा जामीन नाही होत ॥

स्त्रियांच्या सासुरवासाची सामाजिक प्रथा १.
बापानं देल्या लेकी नाही पाह्मली सोय ।
कसाबाच्या घरी जशी उभी केली गाय ॥
पापं झालं, लय दुनिया बुडाली पापानं ।
शिंगीच्या मोलानं, लेक इकली बापानं ॥
बोलले बापाजी, लेकी लय झाल्या ।
बोलती काशीबैया चिमण्या उडू उडू गेल्या ॥

भाऊ-बहिण : आई-बापाइतकेच किंबहुना त्याहून थोडे जास्तच प्रेम त्यांना भावाविषयी वाटत असते. म्हणूनच त्या म्हणतात.
मोत्या पवळयाचा पाऊस कुठें पडतो, कुठं नाही ।
एवढया दुनियेमेधी, भाऊ-बहिणीले मोठा अप्रूप बाई ॥
बहिण-भावंडाची, माया अंतरकाळजाची ।
पिकलं सिताफळ, याले गोदी साखरची ॥
बहिणीले भाऊ, एक तरी असावा ।
चोळी-बांगळी, एका रातीचा इसावा ।
बहिणीचा सासुरवास, भाऊ ऐकतो दुरुन ।
जाय बहिण मरुन ।
ल्योक हा आपला लेक मयना काहून थोडी ॥
अशी जन्मली एका कुशीतून जोडी ॥
नको घेऊ चोळी बांगडी । नको येवू नियाले
सुखी राहाय दादा मले भारज (आधार) घेयाले ॥
नको म्हणू दादा नासल घुसल ।
ज्याले नाही बहीण त्याचं कितीक साचल?
ज्याले नाही बहीण त्याचा खर्च वाचला ।
चाटयाच्या पालात दुचित बसला ॥
चाडयावर मुठ ठुतो बहिणीच्या नावानं ।
बंधुच्या शेताले पिक आलं दुनिन (दुप्पट)
दिवाळी दसरा मह्या जिवाले आसरा ।
माय गिरजानं मूळ घाडलं उशिरा ।
सीता भावजाई, भरली वटी पड पाया ।
वरसाकाठी येरझारं, संबाळ मपले बापबया ॥
काय सांगु बाई, मह्या माहेराच्या रीती ।
तांब्याच्या परातीत, भावजया पाय धुती ॥
भाऊ घेतो चोळी, भावजय राग राग ।
चोळीची काय गोडी, जोडयानं नांदा दोघं ॥
भावापरता भावजय रतन ।
सोन्याच्या कारण चिंधी करावी जतन ॥
भावापरता भावजय सीता ।
शेल्याचा पदर येवू देईना रीता ।
दिवाळीची बोळवण काठापदरा रेशीम ।
पाठच्या बंधुनं आवघं धुंडलं वाशिम ।
साडीची बोळवण, लाडीच्या येईना मना ।
लाडक्या लेकीले देऊळगावची मिरानी आणा ॥
आताच्या समयाने भाऊ नाही बहीणीचा ।
खिशात चोळी वाडा पुसे मेव्हणीचा ॥
वळवाचा पाऊस पडून वसरला ।
दादाले झाल्या लेकी आम्ही बहिणी इसरला ॥
चांदणीनं चाँद शिकवला परोपरी ।
नाही जाऊ देला बाई भाऊ बहिणीचे घरी ॥
याउलट बहिणही कधी भावाविरुद्ध वागतानाचा अनुभव आहे.
समयाकारण बहिणीच्या घरी भाऊ राहला सालानं ।
पाणी भरतो घागरीनं ।
वसरीचा खांब किडयानं कोरला ।
संपत्तीसाठी भाऊ बहिणीनं मारला ।
भावाची संपत्ती बहिणीचं झालं मन ।
केले इखाचे लाडू, बंधु टाकला मारुनं ।

सासर :
पतिविषयक निष्ठा व प्रेम
पाह्मटं उठूनी हात जोडते सुखाले ।
अहेव मांगते जोडव्या कुंकवाले ।
हेंगडा पांगळा नारी लगनाचा जोडा ॥
याची कनगळी धरुन घालली अग्नीचा येढा ।
काय करती गौरी देरा भायाची पालखी ॥
नार भ्रतारावाचून हालकी ॥
जन्म देला बाई माय-बापानं ।
शेवट केला बाई परनारीच्या पुतानं ॥
भ्रतार नाही बाई आहे पूर्वीचा गोतं ।
नाही आठवू देली मावली परमुलखातं ॥
कोण्यागावी गेला बाई माह्या जिवाचा मव्हन ।
याच्या बिगर गोड लागेना जेवण ॥
नको म्हणू गौरी भ्रतार भोळा ।
केसानं कापल गळा याले नाही कनवळा ॥
नको म्हणून गौरी भ्रतार आला हाती ।
विंचवाच्या वेदना व्हतील किती ॥
नको म्हणून गौरी भ्रतार आपला ।
नाग पेटारी तपला ॥
येरंड तोडूनी घातला गराडा ।
पुरुष नाही धडा नितं नारीचा पवाडा ॥
आस्तुरी जन्म देव घालून चुकला ।
पराचा घरी बैल भाडयानं जुपला ॥
सासु-सासर्‍याचा आशीर्वाद घे गं सुनं ।
मांडीवर तान्हं दौलतीले काय उणं ॥
सासु-सासरे मह्या माडीचे कळस ।
नणंद पाहूणी शोभे अंगणी तुळस ॥
सूनेले सासुरवास करु मी कशासाठी ।
मळयात मेथी टाकली नफ्यासाठी ॥
लेकाले म्हणते दादा, सुनेले म्हणते बाई ।
आपुल्या वाडयात विठ्ठल-रुखुमाई ॥
सुनेले सासुरवास नको करु मायबाई ।
आपला व्हता चाफा आली परायाची जाई ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP