मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - फुगडीचे गाणे

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


खडकावर झाड जाई जूईचं जाई-जुईचं
करणफुल मह्या भावजईचं भावजजीचं
भावजयी पडली लोकांची लोकांची
बशी फुटली काचाची काचाची
फुटली व फुठली दादानं बायकोला कुटली कुटली फु बाई फूऽऽऽ

किंवा
एरंडाचे पानावर झगमग दिवा ।
सवतीची बोळवन आली रे देवा ।
आली तशी पळून गेली ।
पळता वळता मोडला काटा ॥
शंभर रुपये आला तोटा । फु बाई फूऽऽऽ

किंवा
आठक्या घरात पडक्या घरात चिकन माती ।
सोबतीणीचा पाय घसरला जसा हाल्या पसरला फु बाई फूऽऽऽ

किंवा
माळयाची लेक चाळयाची । कांदा खाते पातीचा पातीचा
नवरा करते जातीचा फु बाई फूऽऽऽ
असा मेल्यानं नवस केला । फकिरा बुडयाला कोंबडं देला ।
महागावच्या पोरीनं जयहिंद केला फु बाई फूऽऽऽ

किंवा
नदीच्या काठी राळा पेरलाबाई, राळा पेरला ।
एके दिवशी काऊ आला बाई, काऊ आला ।
एकच कणीस तोडून नेलं बाई, तोडून नेलं ।
सईच्या अंगणात टाकून देलं बाई, टाकून देलं ।
सईनी उचलून घरात नेलं, कांडून राळा केला ।
राळा घेऊन बजारात गेली, बाजारात ईकून ।
तीन पैशाच्या घागर आणली, घागर घेऊन पाण्याले गेली ।
मधल्या बोटाले विंचू चावला बाई, विंचू चावला ।
रडत पडत घरी आली बाई. घरी आली ।
देश्या मंतर खोटा, विंचू उतरेना बाई उतरेचा ।
नवर्‍याचा मंतर खरा, विंचू उतरे भरा भरा ।

किंवा
दोन बायकाची हौस मोठी गडयाले ।
दिवाळी सणाले आंघोळ करतो वढयाले ॥
दोन बायकाचा पुरुष बसे चुलीपशी ।
जळली दाढी-मिशी याचा न्याव गेला येशीपाशी ॥
कोण्या गावी गेला बाई फेंगडया पायाचा ।
नाही भरवसा याचा घरी येण्याचा ॥
काय झाकशिल गोरी मिशाच्या आकडयाले ।
चटणी नाही तुकडयाले काय राखती झोपडयाले ॥
आळशा नारीनं घेतलं निजून ।
भोळा भ्रतार देतो खारका भाजून ॥
वाटंच्या वाटसरा काय पाह्यतं खेडयाले ।
सोन्याचं कुलूप मह्या बंधुच्या वाडयाले ॥

मुलगी.
लाडक्या लेकीच्या किती घालू येनी गुढ ।
माणिक चौकात मोत्याचा झाला सडा ॥
साखर सोजीची सर्व लावली आजीनं ।
लाडक्या लेकीचं तोंड जळतं भाजीनं ॥

किंवा
पराचा परदेशी मैना मही सासुरवासी ।
जाऊन पाह्य बाळा तोंडावरची निळी कशी?

किंवा
सासुरवासनी येनं मह्या वसरीले ।
तुपल्यासारखी मैना मही सासराले ॥

आईबाप.
माय करता माय. माय मव्हळाचा मध ।
आंतरी केला शोध ताकाचं होईना दूध ।
मपल्या संसाराची चिंता कोणाले आसलं ।
झोप बैयाच्या नेतरी नसलं ॥

जिव्हाळा.
नगरच्या वाटं घोडं कोणाचं एकलं ।
नाही धाडलं बाईले तोंड बंधूचं सुकलं ॥
दिवस मावळला झाडाझुडावरही बोले रावा ।
बैया तुहं बाळ बहिणीसाठी घेते धावा ॥
वाटवर वडं गटुळया पानाचा ।
बोळवतो बहिणी बंधू कवळया मनाचा ॥

किंवा
बहिणीच्या घरी भाऊ गेला लय दिसा ।
गोफाचा करदुडा उकलती फासा ॥
भावाले पाहूणचार शेवग्याच्या शेंगा ।
सांगतो मोठेपण तोंडी लावल्या लवंगा ॥
भाऊ घेतो चोळी भावजय राग राग ।
चोळीची काय गोडी जोडयानं नांदा दोघं ।
बोबडे तुहे बोल लागतील गोड । पपया फिरुन पुन्हा बोल ॥
लाडली मैना खेलायाले गेली राती ।
पैजणाची माती मामा काढे दिव्या-जोती ॥
लाडका लेक खिजला आर्ध्याराती । खेळयाले चंद्र मागे हाती ॥
राघो मैनाचा पिंजरा जाईच्या शेंडयाले ।
राघो तोडतो कळया मैना गुफते येनीले ॥
मनाची हाऊस सांगीन शेजच्या भ्रताराले ।
कुलूपाचे तोडे सांग सोनाराले ॥
भ्रताराचं सुख सांगते मी माहोरी ।
काचेचा पलंग याले मोत्याच्या झालरी ॥
पिकल्या पानाचे ईडे केले परातीत ।
दोहीचं एकचित्त काय करल तिर्‍याईत ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP