मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - नैतिक शिक्षणाची लोकधारणा

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


हासु नको गौरी, तुला हासनं भवलं ।
धुतल्या साडीला, कोणी वंगण लावलं ॥
जाईन सभेतून । सभेची मी लेकबाळ ।
खाली पाह्म पाप्या । मीरी मही पाय-घोळ ।
जाईन उभ्या गल्ली । उभारीचा मव्हा रंग ।
खाली पाह्य पाप्या । धरणी होईल दुभंग ।
शिकवलं ग्यानं । माय माह्या गिरजेनं ।
उभं नाही राहु बाई । परपुरुषाच्या सावलीनं ।
आपला पुरुष । पांघरावी शालजोडी ।
परपुरुषाशी बोलायची काय गोडी ।
कुळाच्या नारीनं । कुळाचा केला नास ।
धन्याची कोथमिरं । मळयाबाहेर गेला वास ॥
घराची आस्तुरी जसं तुळशीचं रोपं ।
परनारीसाठी घेतो गल्लीनं झोपं ॥
मव्हन्या नारीनं मव्हनं घातली दह्यातं
लोकाचा भ्रतार हिनं घेतला कह्यातं ॥
अंधार्‍या रातचे कोण वाळवते राळे ।
अस्तुरीचे चाळे पुरुषा तुले काय कळे ।


दोन बायका करण्याची समाजरुढी
दोन बायकांची चाल लावली देवानं ।
पारबतीवर गंगा सवत आणली देवानं ॥
दोन बायकांची हौस मोठी गडयाले ।
दिवाळी सणाले आंघोळ करतो वढयाले ॥
दोन बायकांचा दादला करे गावाचा निवाडा ।
याच्या घरी नित सवती सवतीचा झगडा ।

विधवा विवाह, परजातीत लग्न करणे याचा समाजनिषेध
पाटाच्या नारीचा सहा महिने गजर ।
असा उतरला हिच्या साडीचा पदर ।
रांडपण घालती रांडपणाचा कळस ।
धाकली बहिण दारी वाळते तुळस ।
नारीनं केला संग, नाही पाहिला जातीचा ।
कुंभाराच्या दारी दिवा जळतो मातीचा ।

अन्य काही सामाजिक रुढींचे प्रगटीकरण.
जवाई, जवाई नको म्हणू येडे बाई ।
जिनं देला जन्म तिचा तिले झाला नाही ॥
ताडक्या लेकीचं नांव, सीता नाही ठेवू ।
सीताच्या कर्माचा पवाडा झाला बहु ॥
संबरत सोयरा कणीं नाही याच्यापाशी ।
काय करायाचे याचे, बारा बैल बारा म्हशी ॥
नांदाया चालली देशमुख पाटलाची कन्या ।
हिच्या बुदीले चांदण्या संग महार राखण्या ।
गावचे पाटील, चिखलीले गेले ।
राघो तुमच्या मामीयाचे शिरी मंदील झळकले ॥
मेहेकार तालुक्याले कोन बोलतं पाखरू ।
बैयाचं बाळराज, जमिनदाराचं लेकरु ॥
नांदाया घालली मैना लाडं कोडं ।
मामा धरे धोड चुलते चालती पुढं ।
मामाच्या वाडयाले, मामा भाचीच्या पाया पडे ।
घरच्या घरी काशीचं तीर्थ घडे ॥
शकून-अपशकून, दृष्ट लागणे ह्या प्रथाही समाजात दिसतात.
शेजीचा मुराळी मह्या दारावरुन गेला ।
त्याचा पायगुण झाला । बंधु राती न्यायाले आला ।
माय-बापाले एकला याले घोकू नये बाई ।
निंघते धनुराज, याले हटकू नाही बाई ।
अशी झाली दिट, मह्या नवतीच्या लालाले ।
तिन्ही वाटंची माती, जाते निंबाच्या पाल्याले
विविध जाती धर्माचे स्नेहपूर्ण समाजजीवन
गुरु-भाऊ केला जातीचा मुसलमान ।
याच्या बिब्या मले करती सलाम ।
गुरु-बंधू केला जातीचा माळी ।
त्याच्या बागेत केळी, नित धाडतो नव्हाळी ।
सळु बहीण केली, म्यातं लभान्याची लेकं ।
भेटीची आगद. गाडी हाणं तांडयालोकं ।
माह्या सोबदनी वाण्या बामनाच्या पोरी ।
तांब्याच्या धागरी, भेटी व्हतील गंगेवरी ।
सखू बहिण केली, चंभाराची भागु ।
बंधुच्या मह्या कोटावर काढे राघू ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP