मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - होळी

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


शिमग्याच्या दिसी होळी रचतो शेणाची ।
पाटलाची पोळी घेईन मानाची ।
सणामंदी सण होळी बाई बाळंतिण ।
सख्यानं उभी केली ताफ्याखाली कळवातीण ।

होळीला नवस करण्याची रुढी
नवस बोलले होळीले पाच येढे ।
अंगडयाचा राया जावळाची मैना कडे ।
सणामंदी सण शिमगा गाजतो ।
सख्याच्या वाडयाले, हंडा रंगाचा शिजतो ।
सणामंदी सण, होळीबाई बाळंतीण ।

गुराखी दिवाळी गाण्याचे स्वरुप
आटंबोट बाई मोगाटं । हरण पळे तटं तटं ।
गाई म्हशीनं भरले वाडे । बळवंत राजा हो ।
दिवाळी हालते जोरानं । पदर हाले वार्‍यानं ।
काळा बैल शिंग शिंगोटी । ह्यानं काढली नागाटी ।
नांगरुन वखरुन तयार केली । त्यात पेरली पळाटी ।
पळाटी आली नखी बोटी । येचता येचता भरली वटी ।
नेऊन टाका खामगांव पेठी । खामगांव पेठची डिकमाळ उंची ।
पैसे भेटले त्याच्या आणा । दहा पाच म्हशी ।
त्याचं दुध कोन बा खाईल ।
आमच्या गावचा गुराखी खाईल बळीवंट राजा हो ऽऽऽ
दिवाळी चाले जोर्‍यानं । पदर हाले वार्‍यानं ।
आटं बोटं गाई गोमाटं । गाई म्हशीनं भरले वाडे ।
इठुन संपले आमचे गाणे । आता म्हणावे मागच्याने । बळवंत राजा हो ऽऽऽ

पहिला गट कोडी घालतो
मह्या मळयातून जायी गोपाळा । तुह्या मळयातून जायी
आरगुन जायी तिरगुन जायी बिन शेंडीचं काय ?
ते सांगून दे गोपाळा मग जाय रे ऽऽऽ

दुसर्‍या गटाचे उत्तर
आरगुन जायी तिरगुन जायी बिन शेंडीचे ।
टेकळं (जमिनीतील कंदफळ) गोपाळ सांगून दे ।
म्हणून चालले रे गोपाळा ।
मारोती बा नवरा कधी व्हाशील?
शिरी बांशिग परण्या जाशील
एवढी करणी कशासाठी । मारोतीच्या धोतरासाठी ।
मारोती बा नवरा कधी व्हशील?
शिरी बाशिंग परण्या जाशील ।
एवढी करणी कशासाठी । मारोतीच्या पटक्यासाठी ।
मारोती बा नवरा कधी व्हशील?
शिरी बाशिंग परण्या जाशील
एवढी करणी कशासाठी । मारोतीच्या बारबंदीसाठी ।
मारोती बा नवरा कधी व्हशील?
शिरी बाशिंग परण्या जाशील
आटं बोटं गाई गोमाटं । हरण पळे तटं तटं
गाई म्हशीनं भरले वाडे । दिवाळीचं तेल ना वाटे
ती कोंगडमत्ती तिच्या घरात दिवा ना बत्ती
बळीवंत राजा हो.
नवीन घरी परत नवे गाणे म्हणतात.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP