मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - अहेव मरणाची गाणी

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


पाह्यटं उठून हात जोडले सुखाले ।
आवूक मांगते जोडल्या कुंकवाले ॥
लग्नाचा जोडा देवाधर्माचे वानी । नको देवू गोरी डाव्या हाती पानी ॥

अहेव मरणाची लोकगीते
अहेव मरण पिवळं सरण । भ्रतारा आधी डाव जितला गैरीनं ॥
अहेव मरण सोमवार्‍या रातचं । पाणी कंथाच्या हातचं ॥
भ्रताराआधि मरण दे रे देवा । देर होतील खांदेकरी जावा करतील सेवा ॥

अहेव मरणाची भले वाटते मौज । पुढे चाले कंथ मागे गोताची फौज ॥
अहेव मरण कोण्या राजाच्या सईले । डोईले रुपाल कंथ हिंडतो नहीले ॥
अहेव मरण येते देवाले पुसूनं । हळदी कुंकवाच्या पुडया, जाते रथात बसून ।
स्वर्गीच्या देवा आमचा रामराम घ्यावा । भ्रतारा आधी मले स्वर्गिले नेवा ॥

अहेव मरण जसा अग्निचा लोटं । देरा भाया देखत देवा, होवू दे सरशेवट ॥

सासर-माहेर विषयक विविध रुढींचे व भावनाचे प्रगटीकरण ।
गेला माहा जिव, सरण जळे सावलीले ।
एवढया गोतामंधी दुःख झालं मावलीले ॥
गेला माहा जीव, जन म्हणे बरं झालं ।
बोलली मायबाई सोनं पुतळीचं गेलं ॥
गेला माहा जीव, देरा भायाले आनंद ।
तिळा तांदळानं वटी भरते नणंद ॥
गेला माहा जीव, देरा भायाले ईटाळ ।
पाठचा बंधू सोयरा नितळ ॥
गेला माहा जीव, जन बसल भिडून ।
चालला आत्माराज कोणी घेईना सोडून ।

गेला माहा जीव, मले भितीशी खुटवा ।
सोन्याचं पिंपळपान महया माहेरी पाठवा ॥
गेला माहा जीव, सरण जळे लाहीलाही ।
असं समजा मायबाई सैय्यापोटी आली नाही ॥
मह्या मरणाची येळ गल्लोगल्लीले बायका ।
राघोच्या परीस पोथी मैनाची ऐका ॥

जावई राजस जाऊन बसले लोकांत ।
लाडकी मैना पाणी टाकते मुखात ॥
अहेव मेली स्वर्गी सोनियाची झाली ।
भ्रताराचे मांडीवर बसायाले पोटी पुत्राच्या आली ॥
अहेव मरण सरण जळे खयवाडी ।
हाती पातळाची घडी दादा निंघले तातडी ॥
मह्या मरणाले नका करु संध्याकाळ ।
नेणंत्या राघोले थंडया पाण्याची अंघोळ ।
मह्या मरणाचा पिंड, कावळा शिवेना ।
मैनाच्या बोळवणी राघो, कबुल होईना ॥
नदीच्या कराडी, कावळयाची झुंड ।
पाठीचा राहिला उभा पोटचा पाडल पिंड ॥
नदीच्या कराडी, कावळयानं देला दगा ।
थंड पाण्यात चंद्र, केधुळचा उभा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP