कार्तिक माहात्म्य - अध्याय २२

कार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.

नारद म्हणतात - राजा ! एकदां विष्णुदास नित्यस्नानसंध्याविधि आटोपून त्यानें स्वयंपाक केला, इतक्यांत तो पाक गुप्तपणानें कोणीं हरण केला ॥१॥
तो स्वयंपाक नाहींसा झाला असें पाहूनही सायंकाळची पूजा वगैरे व्रताचा भंग होईल म्हणून पुन्हा त्यानें पाक केला नाहीं ॥२॥ दुसरे दिवशीं स्वयंपाक करुन श्रीहरीला नैवेद्य अर्पण करण्यास डोळे मिटले तों इतक्यांत पाक पुन्हा कोणी नेला ॥३॥
याप्रमाणें सात दिवस त्याचा पाक कोणी हरण करीत होतें, तेव्हां त्याला चमत्कार वाटून तो विचार करुं लागला ॥४॥
अहो ! रोज येथें येऊन माझा पाक कोण नेतो ? हें क्षेत्र संन्याशास राहाण्यास योग्य आहे म्हणून मला ही जागा सोडणें बरें नाहीं ॥५॥
जर मी पुन्हा पाक करुन जेवावें तर संध्याकाळचे पूजानियमाचा भंग होईल तो कसा करावा ॥६॥
पाक करुन तत्काल भोजन करावें तर हरीला अर्पण केल्याशिवाय वैष्णवांनीं भोजन करुं नये ॥७॥
आज सात दिवस मी उपोषण करुन व्रतस्थ येथें राहिलों. आतां मात्र आज पाक करुन त्याचें चांगलें रक्षण करितों ॥८॥
असें चिंतन करुन त्यानें पाक केला व आपण दडून बसला; इतक्यांत एक चांडाल पाक चोरुन नेण्यास टपून बसलेला पाहिला ॥९॥ तो अतिशय क्षुधेंनें व्याकुळ, दीनवदन, हाडें व कातडें उरलें आहे इतका कृश असा पाहतांच त्या ब्राह्मणाला त्याची दया आली ॥१०॥ तो अन्न घेऊन जाऊं लागला तेव्हां ब्राह्मण त्याला म्हणाला, अरे ! थांब उभा रहा; असें हें कोरडे रुक्ष अन्न कसें खाशील ? हें तूप घे ॥११॥
याप्रमाणें भाषण करीत तो ब्राह्मण आपल्याजवळ आला असें पाहून तो चांडाळ भिऊन वेगानें पळत असतां पडला व मूर्च्छित झाला ॥१२॥
तो चांडाळ भीतीनें मूर्च्छित पडला आहे असें पाहून तो ब्राह्मण श्रेष्ठ विष्णुदास त्वरेनें त्याजवळ जाऊन दयेनें त्यावर आपल्या धोत्राचे पदरानें वारा घालूं लागला ॥१३॥
नंतर तो उठल्यावर त्याकडे विष्णुदासानें पाहिलें, तों शंख, चक्र, गदा धारण करणारे साक्षात् नारायण त्याला दिसले ॥१४॥ पीतांबरधारी, चतुर्भुज, श्रीवत्सांकित, किरीट, कुंडलें, कौस्तुभमणि धारण करणारे, जवसाचे फुलाप्रमाणें श्यामवर्ण, हदयावर कौस्तुभ झळकत आहे असे प्रभु त्यानें पाहिले ॥१५॥
विष्णुदर्शन झाल्याबरोबर अंगावर रोमांच, आनंदाश्रु इत्यादि सात्विक भावामुळें त्या ब्राह्मणाला स्तुति व नमस्कार करण्याचें सुचेना ॥१६॥
नंतर इंद्रादिक देव तेथें आले. गंधर्व अप्सरा नाचूं व गाऊं लागल्या ॥१७॥ शेंकडो विमानांनीं, देव, ऋषि यांच्या समुदायांनीं व गीत, वाद्यें यांच्या घोषांनीं तें स्थान व्यापून गेलें ॥१८॥
तेव्हां विष्णूंनी आपल्या सात्विक व्रती भक्ताला आलिंगन देऊन आपलेप्रमाणें त्याला रुप दिलें व विमानांत बसवून वैकुंठाला नेलें ॥१९॥
विष्णुदास विमानांत बसून विष्णुलोकास जाऊं लागला; तेव्हां दीक्षित चोलराजानें त्याला पाहिलें ॥२०॥
राजा वैकुंठास जाणार्‍या विष्णुदासाला पाहून मुद्गलास मोठ्यानें हांक मारुन म्हणाला ॥२१॥
चोल म्हणाला - ज्याच्याशीं स्पर्धा करुन मी यज्ञ दानादिक केलें तो विष्णुदास, विष्णुरुप धारण करुन वैकुंठास चालला ॥२२॥
मी यज्ञकर्ता होऊन या विष्णुक्षेत्रांत तुजकडून अग्नींत हवन केलें व उत्तम दानें देऊन ब्राह्मण संतुष्ट केले ॥२३॥
तथापि अजूनही मला हरि प्रसन्न होत नाहींत विष्णुदासाच्या भक्तीला हरींनीं साक्षात्कार दिला ॥२४॥
याकरितां, दानांनीं व यज्ञांनीं विष्णु प्रसन्न होत नाहीं तर त्याचें दर्शन होण्याला भक्ति हेंच मुख्य कारण आहे ॥२५॥
गण म्हणतातः-- राजा याप्रमाणें बोलून, लहानपणापासून दीक्षित असल्यामुळें त्याला पुत्र झाला नाहीं, म्हणून त्यानें बहिणीच्या मुलाला राज्यावर बसविलें ॥२६॥
अद्यापि त्या देशांत चोल राजानें नियम केल्याप्रमाणे तेव्हांपासून राजाच्या बहिणीच्या मुलालाच राज्य मिळतें ॥२७॥
नंतर राजा यज्ञमंडपांत येऊन यज्ञकुंडापुढें उभा राहिला व विष्णूला बोलावून तीन वेळ मोठ्यानें म्हणाला कीं ॥२८॥
हे विष्णो ! मला काया वाचा मनें करुन तुझी स्थिर भक्ति दे. याप्रमाणें बोलून सर्व लोक पाहात असतां त्यांच्या समक्ष त्यानें अग्निकुंडांत उडी टाकिली ॥२९॥
तेव्हां मुद्गलाला राग आला व रागाचे भरांत त्यानें आपली शेंडी उपटली. म्हणून अद्यापि त्याचे गोत्रज मुंजींत शेंडी काढितात ॥३०॥ चोल राजा कुंडांत उडी टाकीत आहे इतक्यांत विष्णु कुंडांत प्रगट झाले व त्यांनी राजाला आलिंगन देऊन विमानांत बसविलें ॥३१॥
त्याला आलिंगन देऊन व सारुप्य देऊन त्याला विमानांत घेऊन इंद्रादिकदेवांसह विष्णु वैकुंठास गेले ॥३२॥
नारद म्हणालेः-- जो विष्णुदास तो पुण्यशील नांवाचा व जो चोलराजा तो सुशील नांवाचा असे हे दोघे विष्णूसारखें रुप धारण करणारे असे झाले. त्यांना रमापति विष्णूंनी आपले द्वारीं राहणारे द्वारपालगण केलें ॥३३॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये द्वाविशोऽध्यायः ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP