कार्तिक माहात्म्य - अध्याय ८

कार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.

नारद म्हणाले -- हे राजा, मीं आतां कार्तिकव्रताचा उद्यापनविधी सविधान संक्षेपानें सांगतों तो श्रवण कर ॥१॥
व्रत करणारानें कार्तिकशुद्धचतुर्दशीला व्रताची संपूर्णता होण्याकरितां व विष्णूच्या प्रीतीकरितां उद्यापन करावें ॥२॥
तुलसी वृंदानवनावर मंडप घालावा; त्याला चार द्वारें ठेवावीं व तो तोरणें, फुलें चवर्‍या यांनीं सुशोभित करावा ॥३॥
चार द्वारांत मातीचे द्वारपाळ पुण्यशील, सुशील, जय व विजय असे करावे व त्यांची पूजा करावी ॥४॥
तुळसीच्या खालीं चार रंगांनीं सुशोभित असें सर्वतोभद्र काढावें ॥५॥
त्यावर पंचरत्नांनीं युक्त व नारळासहित असा शुभ कलश ठेवावा ॥६॥
त्यावर शंख, चक्र, गदा व पद्म यांतें धारण करणारा पीतांवरधारी विष्णु याची लक्ष्मीसह पूजा करावी ॥७॥
व्रत करणारानें इंद्रादिक लोकपालांची त्या मंडलावर पूजा करावी भगवान् द्वादशीला जागे झाले, त्रयोदशीचे दिवशीं सर्व देवांनीं भगवंताचें दर्शन घेतलें व चतुर्दशीचे दिवशी पूजन केलें ॥८॥
म्हणून या कार्तिक शुद्ध चतुर्दशीचे दिवशीं उपोषण करुन शांत व एकाग्र अंतः करणानें राधादामोदराचें पूजन करावें ॥९॥
सोन्याची विष्णुप्रतिमा करुन गुरुच्या आज्ञेनें व नाना प्रकारच्या भक्ष्यादि पदार्थानी युक्त षोडशोपचारांनीं पूजा करावी ॥१०॥
रात्रीं गायन करुन व वाद्यें वाजवून जागरण करावें व सकाळीं उठून नित्यकर्मे करावी ॥११॥
नंतर होम करुन ब्राह्मणभोजन घालावें व त्यांना यथाशक्ति दक्षिणा द्यावी, कृपणपणा करुं नये ॥१२॥
याप्रमाणें वैकुंठचतुर्दशी करणाराला व या दिवशीं नुसतें उपोषण करणारालाही वैकुंठ प्राप्त होतें ॥१३॥
या वैकुंठचतुर्दशीपर्वणीचें माहात्म्य देव व शेष शंभर वर्षे देखील वर्णन करुं शकणार नाहींत ॥१४॥
वैकुंठचतुर्दशीला हरिजागरामध्यें जे भक्तीनें गायन करितात ते मागील शंभर जन्मांचे पातकापासून मुक्त होतात ॥१५॥
विष्णुजागरामध्यें जे गातात, नाचतात त्यांचें पुण्य हजार गाई दान करणारांचे पुण्यासारखें सांगितलें आहे ॥१६॥
जो वासुदेवापुढें गाऊन नाचून मौज दाखवील व असें रात्रीं जागरण करील ॥१७॥
व विष्णूच्या कथा सांगून विष्णुभक्तांचें मनरंजन करील त्याला त्याचें पुण्यफळ विष्णु आपले लोकास नेऊन सालोक्यताही देईल ॥१८॥
इतर भाषणें सोडून तोंडानें वाद्य वाजवितो, याप्रमाणें नित्य जो हरिजागर करील त्याला दररोज कोटितीर्थांचें पुण्य मिळे ल ॥१९॥
पौर्णिमेला  तीस दंपत्यें अगर शक्तीप्रमाणें निदान एका तरी सपत्नीक ब्राह्मणास भोजन घालावें ॥२०॥
या दिवशीं विष्णूंनीं मत्स्यरुप धरुन वर दिले म्हणून या दिवशीं जप, होम, दान इत्यादि केलेलें कर्म अक्षय्य फल देणारें होतें ॥२१॥
म्हणून ब्राह्मणाला खीर आदि अन्न घालून भोजन द्यावें व ' अतोदेवा ' या मंत्रानें तीळ व क्षीर यांचा होम करावा ॥२२॥
विष्णूच्या प्रीतीकरितां व इतर देवांप्रीत्यर्थ ब्राह्मणांना यथाशक्ति दक्षिणा द्यावी व नमस्कार करावा ॥२३॥
पुन्हां विष्णूची, देवांची व तुळशीची पूजा करुन कपिला गाईची यथाविधि पूजा करावी ॥२४॥
व्रताचा उपदेश करणार्‍या गुरुची त्याचे पत्नीसह वस्त्रालंकारांनीं पूजा करावी व त्या सर्व ब्राह्मणांची प्रार्थना करावी ॥२५॥
प्रार्थना मंत्र - हे द्विजहो, आपल्या कृपेनें विष्णु मला सदा प्रसन्न असोत व या व्रतापासून माझ्या सात जन्मांचें पाप नाहींसें व्हावें व माझी संतती स्थिर व्हावी व माझे मनोरथ सफळ व्हावे व देहाचा अंत झाल्यावर दुर्लभ जें विष्णूचें स्थान तें प्राप्त व्हावें ॥२६॥२७॥२८॥
याप्रमाणें गुरुची व ब्राह्मणांची प्रार्थना करुन त्यांना संतुष्ट करुन पाठवावे. ती पूजा व गोप्रदान गुरुला द्यावें ॥२९॥
नंतर आपले मित्रांसह भोजन करावें. कार्तिक व माघ यांच्या व्रताचा व उद्यापनाचा असाच विधि आहे ॥३०॥
याप्रमाणें जो कार्तिकव्रत करील त्याची सर्व पापें जाऊन मनोरथ पूर्ण होऊन तो विष्णूच्या सन्निध जाईल ॥३१॥
सर्व व्रतें, सर्व दानें व सर्व तीर्थे यांचें जें फल आहे त्याचे कोटिपट फल या कार्तिकव्रतानें मिळतें ॥३२॥
जे विष्णूचे भक्तींत निमग्न होऊन कार्तिकव्रत करितात ते धन्य, ते पूज्य व त्यांचेंच जन्म सफळ झालें ॥३३॥
जो कार्तिकव्रत करण्याचा संकल्प करितो त्याचीं देहांतील सर्व पातकें भीतीनें कांपूं लागतात; यानें कार्तिकव्रत केलें तर आम्ही कोठें जावें असें त्यांना भय होतें ॥३४॥
याप्रमाणे हे कार्तिकव्रताचे नियम जो ऐकतो व विष्णु भक्तांपुढें भक्तीनें सांगतो त्या दोघांना सर्व पापांचा नाश करणारे व्रत नियम केल्याचें फळ मिळतें ॥३५॥
इति श्रीपद्मपु० कार्तिकमा० अष्टमोऽध्यायः ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP