कार्तिक माहात्म्य - अध्याय ५

कार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.

पृथु म्हणतो - हे नारदा, तूं कार्तिक व माघ या मासांच्या व्रतांचें महत्फल सांगितलेंस त्याचप्रमाणें या दोन महिन्यांचा स्नानविधि व नियम ॥१॥
आणि उद्यापनविधि हीं यथाशास्त्र कथन करा नारद म्हणतात - राजा, तूं विष्णूच्या अंशापासून झालेला आहेस ! तुला ठाऊक नाहीं असें कांहीं नाहीं ॥२॥
तथापि या व्रतांचे नियम मजपासून श्रवण कर आश्विन मासाच्या शुक्लैकादशीच्या दिवशीं ॥३॥
कार्तिकमास व्रतास आरंभ करावा आलस्य टाकून प्रहर रात्रीं निरंतर जागृत व्हावें ॥४॥
उदकानें भरलेलें पात्र घेऊन दिवसा किंवा सायंकाळींही कर्णावर यज्ञोपवीत ठेवून आग्नेयी दिशेकडे गांवाच्या बहिः प्रदेशीं गमन करावें ॥५॥
तृणांनीं भूमि आच्छादित करावी; वस्त्रानें मस्तक वेष्टन करावें व नेसावयाचें वस्त्र वर खोंचून उत्तरेकडे तोंड करुन थुंका न टाकतां ॥६॥
मूत्र व पुरीष विधि करावा हा विधि रात्रौ कर्तव्य असेल तर दक्षिणेकडे तोंड करुन करावा नंतर शिश्न धरुन उठावें व मृत्तिका आणि उदक ॥७॥
यांनीं दुर्गधीचा नाश करणारें शौच करावें मूत्रोत्सर्ग केल्यानंतर शिश्नाचें एकदां मृत्तिकेनें, डाव्या हाताचें तीनदां मृत्तिकांनीं व दोन्ही हातांचें दोनदां मृतिकांनीं शौच करावें ॥८॥
पुरीषोत्सर्ग केल्यानंतर गुदस्थानी पांच मृत्तिकांनीं, डाव्या हाताचें दहा मृत्तिकांनीं व दोन हातांचे सप्तमृत्तिकांनीं शौच करावें. हा शौचनियम गृहस्थांचा सांगितला आहे ह्याच्या दुप्पट ब्रह्मचार्‍यानें ॥९॥
व तिप्पट वानप्रस्थानें आणि चौपट संन्याशांनीं करावें जें मृत्तिका शौच दिवा करावें म्हणून सांगितलें त्याच्या निम्मे हिश्शानें रात्रीं शौच करावें ॥!०॥
रोग्यानें याच्या निमपट व मार्गस्थ असेल तर त्याच्याही निमपट करावें याप्रमाणें शौचविधि न केल्यास त्याच्या सर्व धर्मक्रिया निष्फळ होतात ॥११॥
मुखशुद्धि केल्यावांचून म्हटलेले मंत्र फलदायक होत नाहींत, म्हणून दंत व जिव्हा यांची प्रयत्नेंकरुन शुद्धि करावी ॥१२॥
हे वनस्पती ! आयुष्य, बल, यश, कांति, प्रजा, द्रव्य, ब्रह्मज्ञान, सारासार ज्ञान व धारणाशक्ति हीं आम्हांला दे ॥१३॥
हा मंत्र म्हणून गृहस्थानें बारा अंगुल प्रमाणाचें क्षीरवृक्षाचें काष्ठ घेऊन श्राद्धतिथी व उपोषण यांखेरीज अन्य दिवशीं दंतधावन करावें ॥१४॥
प्रतिपदा, अमावास्या, नवमी, षष्ठी, रविवार, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण या दिवशीं दंतधावन करुं नये ॥१५॥
कंटकीवृक्ष, कापूस, निर्गुडी, पळस, वड, एरंड व दुर्गन्धी वृक्षाच्या काष्ठांनीं दंतधावन करुं नये ॥१६॥
शौचविधि व स्नानविधि झाल्यानंतर विष्णूच्या किंवा शिवाच्या मंदिरांत जावें व गंध, पुष्प, तांबूलादिक पूजा उपचार घेऊन भक्तियुक्त होत्साता ॥१७॥
विष्णूची पाद्यादिक उपचारांनीं पूजा करुन स्तुति करावी. नमस्कार करावा व गीत वाद्यादि मंगल करावें ॥१८॥
टाळ, वेणू, मृदंग इत्यादिक वाजवून नृत्य करावें; गायकादिकांचाही गंध, पुष्प, तांबूल इत्यादिकांनीं सत्कार करावा ॥१९॥
कृतत्रेतादि युगांमध्यें तप, यज्ञ, दान हीं भगवंताला तोषदायक होतात ॥२०॥
व कलीमध्यें भक्तियुक्त गायनानें भगवान् संतुष्ट होतो म्हणून देवापुढें गायन करणारे विष्णुरुप समजून त्यांची पूजा करावी ॥२१॥ नारद म्हणतातः-- हे पृथो, तूं कोठें राहतोस असें मी भगवंताला विचारिलें असतां माझ्या भक्तीनें तुष्ट झालेले विष्णु मला म्हणाले कीं, मीं वैकुंठामध्यें तसा रहात नाहीं किंवा योग्यांच्या हदयांत वास करीन नाहीं अथवा सूर्यामध्येंही रहात नाहीं पण माझे भक्त ज्या ठिकाणीं गायन करतात तेथें मी राहतों ॥२२॥
त्यांची गंधपुष्पादिकांनीं पूजा केली असतां मला जो आनंद होतो तो माझ्या स्वतःच्या पूजनानें मला होत नाहीं ॥२३॥
माझ्या पुराण कथा व माझ्या भक्तांचे गायन श्रवण करुन जे मूर्ख निंदा करितात त्यांचा मी द्वेष करितों ॥२४॥
लक्ष्मीची इच्छा करणारांनीं शिरीष, धोत्रा, गोकर्ण, मल्लिका, शाल्मली, रुई व कणेर या पुष्पांनीं व अक्षतांनीं विष्णूची पूजा करुं नये ॥२५॥
जास्वंद, कुंद, शिरीष, जुई, मालती व केतकी हीं फुलें शंकरास वाहूं नयेत ॥२६॥
गणेशाला तुलसीपत्रें वाहूं नयेत व दुर्गेला दूर्वा वाहूं नयेत. तसेंच अगस्त्याचीं फुलें सूर्याला वाहूं नयेत ॥२७॥
याहून व्यतिरिक्त फुलें देवांना वाहण्याला पूजेमध्ये प्रशस्त आहेत. याप्रमाणें पूजाविधि करुन पुढील '' मंत्रहीनं '' या मंत्रांनीं देवाची क्षमा मागावी ॥२८॥
हे देवा, मंत्राशिवाय, क्रियेशिवाय व भक्तीखेरीज जी मीं पूजा केली ती तुझ्या कृपेनें परिपूर्ण असो ॥२९॥
अशी प्रार्थना करुन देवाला प्रदक्षिणा घालाव्या, व साष्टांग नमस्कार करुन पुन्हा देवाची क्षमा मागावी व गायनादि उपचार समाप्त करावेत ॥३०॥
याप्रमाणे कार्तिकमासीं पहांटे विष्णूचें अथवा शिवाचें पूजन जे मनुष्य उत्तम प्रकारें करितात ते निष्पाप होत्साते आपल्या पूर्वजांसहवर्तमान वैकुंठलोकाला गमन करितात ॥३१॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये कृष्णसत्यभामासंवादे कार्तिकव्रतकथनं नाम पंचमोऽध्यायः ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP