कार्तिक माहात्म्य - अध्याय ९

कार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.

पृथु म्हणतात - हे नारदा, आपण कार्तिकाचें व्रत विस्तारानें सांगितलें. त्यांत श्रीविष्णूची पूजा तुळशीचे खालीं करावी म्हणून सांगितलें ॥१॥
याकरितां तुलसीचें माहात्म्य इतकें काय व ती देवांचा देव जो विष्णू त्याला इतकी अति प्रिय कशी झाली हें आपण मला सांगा ॥२॥
हे नारदा, तुळशी कशी उत्पन्न झाली व कोठें झाली तेंही सांगा. ॥३॥
नारद म्हणाले - राजा, सावधान चित्तानें ऐक. तुलशीचें माहात्म्य व त्यासंबंधाची पूर्वीची हकीकत तुला सर्व सांगतो ऐक ॥४॥
पूर्वी एकदां इंद्र देव व अप्सरा यांसहवर्तमान शंकराच्या दर्शनाकरितां कैलासास गेला ॥५॥
जों शंकराच्या घराजवळ जातो तों तेथें ज्याचें तोंड भयंकर व दाढा अक्राळविक्राळ असा एक महापराक्रमी पुरुष त्यानें पाहिला ॥६॥
इंद्रानें त्याला विचारिलें कीं, अहो आपण कोण ? शंकर कोठें गेले ? याप्रमाणें पुनः पुनः विचारिलें तरी तो कांहीं बोलला नाहीं ॥७॥
तेव्हां इंद्र रागावून त्याची निर्भर्त्सना करुन म्हणाला, अरे मूर्खा, मी किती विचारतों तरी तूं उत्तर देत नाहींस ॥८॥
तर मी तुला वज्रानें मारितों. तुझा त्राता कोण आहे पाहूं ! असें म्हणून इंद्रानें त्याला वज्र मारिले ॥९॥
तेणेंकरुन त्याचा कठ निळा झाला व वज्राचें भस्म झालें. नंतर शंकर आपल्या तेजानें सर्वास जाळतात कीं काय असे लाल झाले ॥१०॥
तें पाहून बृहस्पति हात जोडून त्वरेनें पुढें आला व इंद्रालाही साष्टांग नमस्कार करण्यास लाविलें व स्तवन करुं लागला ॥११॥
बृहस्पति म्हणतात - हे शंकरा, तूं देवाधिदेव, त्र्यंबक, कपर्दी, त्रिपुरासुराला मारणारा, शर्व, अंधकाला मारणारा, विरुप, सुरुप, बहुरुप, शंभु दक्षयज्ञाचा नाश करणारा, सर्व यज्ञाचें फल देणारा, कालांचा नाश करणारा, कालरुप, सर्प धारण करणारा, ब्रह्मदेवाचें शिर हरण करणारा, ब्राह्मणाचा दयाळू असा आहे; अशा तुला नमस्कार असो ॥१२॥१३॥१४॥
नारद म्हणतात - याप्रमाणें बृहस्पतीनें स्तवन केलेले शंकर त्रैलोक्याला जाळणारी नेत्रांतील अग्निज्वाळा आवरुन म्हणाले ॥१५॥
हे गुरो, तुझ्या स्तुतीनें मी प्रसन्न झालों, वर माग. तूं इंद्राला जीवदान दिलेंस म्हणून तूं जीव या नांवानें प्रसिद्ध हो ॥१६॥
गुरु म्हणाले - देवा, आपण प्रसन्न असाल तर इंद्र शरण आला आहे याचें रक्षण करा व तुमचे तृतीय डोळ्यांतील अग्नि शांत होवो ॥१७॥
शंकर म्हणाले - हा अग्नि पुन्हा कपाळावरील डोळ्यांत कसा शिरेल ? आतां इंद्राला पीडा होऊं नये म्हणून याला मी दूर टाकितों ॥१८॥
नारद म्हणाले - राजा, शंकरांनीं याप्रमाणें बोलून तो अग्नि हातीं घेऊन समुद्रांत टाकला, तो गंगा व समुद्र यांचा संगस आहे तेथें पडला ॥१९॥
इतक्यांत त्याला बाळरुप प्राप्त होऊन तो रडूं लागला. तेव्हां त्या रडण्याच्या शब्दानें पृथ्वी थरथर कांपूं लागली ॥२०॥
त्या रुदनाच्या शब्दानें स्वर्गादिक सत्यलोकांपर्यंत सर्व लोक बहिरे झाले. तें रुदन ऐकून ब्रह्मदेव तेथें आला व हें काय आहे म्हणून आश्चर्य पावला ॥२१॥
इतक्यांत समुद्राच्या मांडीवर तें मूल पाहून ब्रह्मदेव समुद्रास म्हणाला - हें अद्भुत बाळक कोणाचें ? ॥२२॥
ब्रह्मदेवाचें भाषण ऐकून समुद्रानें ब्रह्मदेव आलेला पाहून हात जोडले ॥२३॥
तें मूल ब्रह्मदेवाच्या मांडीवर ठेवून नमस्कार करुन म्हणाला - हे ब्रह्मदेवा, हा सिंधुगंगेच्या संगमांत झालेला माझा मुलगा आहे ॥२४॥
तर हे जगद्गुरो याचे जन्मसंस्कार तूं कर. नारद म्हणाले - याप्रमाणें समुद्र बोलत आहे ॥२५॥
इतक्यांत त्या बालकानें ब्रह्मदेवाची मिशी धरुन ओढली. ब्रह्मदेव हिसके मारुन मिशी सोडवूं लागला. तेव्हां ब्रह्मदेवाच्या दोन्ही नेत्रांतून पाणी आलें ॥२६॥
कष्टानें मिशी सोडविल्यावर ब्रह्मदेव समुद्रास म्हणाले - यानें माझ्या नेत्राचें पाणी धारण केलें ॥२७॥
म्हणून हा जलंधर या नावानें प्रसिद्ध होईल व या योगानें तरुण होऊन सर्व शास्त्रपारंगत होईल ॥२८॥
शंकरावांचून याचा कोणाचेही हातून वध होणार नाहीं. जेथून हा उत्पन्न झाला तेथूनच त्याचा नाश होईल ॥२९॥
नारद म्हणाले - याप्रमाणें ब्रह्मदेवांनीं बोलून शुक्राला बोलावून आणलें व जलंधरास राज्यावर बसविलें व समुद्राचा निरोप घेऊन ब्रह्मदेव अंतर्धान पावले ॥३०॥
ब्रह्मदेवाच्या दर्शनानें समुद्रास आनंद झाला व त्यानें कालनेमीची मुलगी वृंदा जलंधरास नवरी करण्यास मागितली ॥३१॥
कालनेमी आदिकरुन दैत्यांनीं मोठ्या आनंदानें ती मुलगी जलंधरास दिली; ती उत्तम वश्य स्त्री मिळाल्यावर व उत्तम आप्त मिळाल्यावर शुक्राच्या सहाय्यानें तो बलवान् होऊन राज्य करुं लागला ॥३२॥
इति पद्म० का० मा० जलन्धरवर्णनंनाम नवमोऽध्यायः ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP