कथाकल्पतरू - स्तबक ७ - अध्याय ११

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

रायासि ह्मणे मुनीश्वर ॥ भारता तूं बहुत चतुर ॥ ज्ञानमताचा सागर ॥ तुझिये ठाई ॥१॥

आतां ध्रुव निघाल्यावरी ॥ गेला कवण्या देशाभीतरीं ॥ ते सागों सकळ परी ॥ छपन्नकोटींची ॥२॥

तेतीसकोटी सूर्यव्यापारू ॥ तो क्रमोनि गेला धुरु ॥ आणि नवकोटी अंधकारु ॥ क्रमोनि गेला ॥३॥

तये अंधकारामाजी सिद्व ॥ असती अकरा रुद्र प्रसिद्ध ॥ हें ऋषिवाक्य पुराणसिद्ध ॥ असे राया ॥४॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ येक असे जी संदेहो ॥ तरी अकरारूद्रांचा नामोद्बवो ॥ सांगिजे मुने ॥५॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया ऐकें चित्त देऊन ॥ अभेदरूद्र प्रथम जाण ॥ दुसरा अमरू ॥६॥

अभेदरुद्र तो पूर्वदिशे ॥ अमरू आग्नेयकोणीं वसे ॥ दक्षिणे अंतरोद्भव सौरसें ॥ असे राया ॥७॥

नैऋत्यकोणीं आकळू पाहें ॥ अविकार रुद्र पश्चिमे राहे ॥ तप्तरुद्र वायव्येसि आहे ॥ रोघोनियां ॥८॥

सिद्धरुद्र उत्तरभागीं ॥ महादेव ईशान्य‍अंगीं ॥ तीन राहती मध्यभागीं ॥ अंतरकोणी ॥९॥

तयांची नावें भारता ॥ द्वैपायनु होय मज सांगता ॥ आद्यपुरु आणि सप्तश्रु तत्वतां ॥ तिसरा तो हनुमंत ॥१०॥

असो ययांते नमस्करुनी ॥ ध्रुव निघाला तेथुनी ॥ पुढें पावला तो भुवनीं ॥ अष्टसिद्धिचिये ॥११॥

तये अष्टसिद्धिंसि करूनि नमन ॥ सप्तसमुद्रीं केलें स्नान ॥ ज्यांचें पृथ्वीसि असे कंकण ॥ पुढतपुढती ॥१२॥

दोनकोटी क्षारसमुद्र ॥ तेवढाचि इक्षुरससमुद्र ॥ कोटियोजनें घृत समुद्र ॥ सुरोद तेवढाची ॥१३॥

येककोटी दधिसमुद्र ॥ तेवढाचि दुग्धसमुद्र ॥ येककोटी शुद्धोदसमुद्र ॥ समीप जाहले ॥१४॥

ऐशीं स्नानें सप्तसमुद्रां ॥ नवकोटी वसुंधरा ॥ रोधिली असे अवधारा ॥ समुद्रोदकें ॥१५॥

इतुका मार्ग क्रमिलियावरी ॥ मग आला देशाभीतरीं ॥ शाण्णवकोटी अवधारीं ॥ क्रमिला देश ॥१६॥

शाण्णवकोटी वाळुकादेश ॥ अठराकोटी खुरासन पैस ॥ ऐसे क्रमीतसे राजस ॥ योगी ध्रुव तो ॥१७॥

मगधदेश दोन कोटी ॥ धर्माकार सालक्ष पृष्ठी ॥ पंचगौड येकैककोटी ॥ बत्तीससहस्त्र कनोज ॥१८॥

तीनसहस्त्र जालंधरदेश ॥ नवलक्ष असे जळपैस ॥ तेथें चाले योगिराजस ॥ आयोध्या त्यजूनी ॥१९॥

उज्जयिनी येकलक्ष अवधारीं ॥ तीनलक्ष कन्याकुमारी ॥ बहात्तरलक्ष वसुंधरीं ॥ जोटदेश ॥२०॥

चौदालक्ष कोंकण ॥ अठ्याण्णवलक्ष माळवा जाण ॥ कर्नाटक लक्ष तीन ॥ सातलक्ष सोरट ॥२१॥

चवेचाळीससहस्त्र वत्सहर ॥ आरुष सहस्त्रस्थळ परिकर ॥ दहासहस्त्र तीनशें गिरिवर ॥ मालसेंडा कोटि येक ॥२२॥

येकसहस्त्र विराध सत्य ॥ तेरासहस्त्र गुजराथ ॥ नवसहस्त्र ते सुरत ॥ ध्रुव चाले क्रमोनियां ॥२३॥

नवसहस्त्र ब्राह्मणमर्‍हाड ॥ पंचेचाळीस सहस्त्र भाट ॥ पंधरासहस्त्र कर्नाट ॥ असे राया ॥२४॥

येकलक्ष कलंबर ॥ अठरासहस्त्र बेटर ॥ दहासहस्त्र दुष्टमुख सूकर ॥ मुखाचे देखा ॥२५॥

बारालक्ष काशी कांती ॥ येकलक्ष कोनब्रह्म ह्मणती ॥ हे वाराहपुरणींची मती ॥ असे राया ॥२६॥

चौसष्टसहस्त्र जालंधर ॥ चारीलक्ष वडनगर ॥ पारिजातक सतरासहस्त्र ॥ माळवा तो ॥२७॥

मागधदेश येकतीस सहस्त्र ॥ वायो लक्ष नवसहस्त्र ॥ महादेशाचा पैस चार ॥ असे राया ॥२८॥

पंधरासहस्त्र जयंती ॥ जेथें देवा लाधली वैजयंती ॥ ते उद्धरिली महासती ॥ करकमळस्पर्शें ॥२९॥

मग चौदासहस्त्र क्रमिले ॥ तेहतीस सहस्त्र चढिले ॥ पुढें तेथोनियां निघाले ॥ योगपंथें ॥३०॥

दहासहस्त्र लंकाभुवन ॥ हुरमुज अकरासहस्र जाण ॥ बारालक्ष येकपाद गहन ॥ पाहिला देश ॥३१॥

पंधरालक्ष वेषरमुख ॥ अकरालक्ष श्वानमुख ॥ चौदालक्ष गजमुख ॥ क्रमिला ध्रुवें ॥३२॥

ऐशीलक्ष नेपाळभुवन ॥ पांचलक्ष काउर जाण ॥ चौसष्टी लक्ष गाजिण ॥ क्रमिलें ध्रुवें ॥३३॥

सिंहल नवलक्ष पैलकडां ॥ योगी जातसे झडझडां ॥ तंव कनकमेरूचा हुडा पुढां ॥ आला तयातें ॥३४॥

तेथें असती चारी अरण्यें ॥ तंव तीं कवण राजा ह्मणे ॥ मग जंबुद्दीपींचें सांगणें ॥ पडिलें वैशंपायना ॥३५॥

दंडकारण्य चंपकारण्य ॥ नैमिषारण्य धर्मारण्य ॥ असती जंबूद्दीपीं जाण ॥ भारता राया ॥३६॥

पुढें महान चारी पीठीं ॥ क्रमीत असे धूर्जटी ॥ वोढिया नाग ज्वाळाधरपूटीं ॥ पूर्णगिरी चतुर्थ ॥३७॥

त्याचियें पूर्वे चारी क्षेत्रें ॥ देखिलीं महाविचित्रें ॥ तेथें स्नानें घडलीं पवित्रें ॥ ध्रुवदेवासी ॥३८॥

मागुती चारी तीर्थं देखिली ॥ तेथें धुवासि स्नानें घडलीं ॥ तंव ह्मणे तीं सांगा वहिलीं ॥ जन्मेजयो ॥३९॥

मग वैशंपायन दे उत्तर ॥ कीं अग्नि आणिक संचार ॥ चक्रवती आणि सागर ॥ ऐसीं तीर्थे चारी ॥४०॥

तंव पुढें तीन्ही नदी ॥ देखिल्या जंबुद्दीपामधीं ॥ तेथें जाहला स्नानविधी ॥ ध्रुवदेवासी ॥४१॥

जे विष्णूचे उद्भवले चरणीं ॥ भागीरथीचे वोघ तीन्ही ॥ ते वाहती वेगें करोनी ॥ मेरुकडां परावे ॥४२॥

येकवोघ पश्चिमदिशे ॥ तेथे ध्रुव स्नान करितसे ॥ उत्तरवोघ प्रकाशे ॥ विष्णुलोकीं ॥४३॥

तेथें ध्रुवे स्नान सारिलें ॥ मग विष्णुचरणांते स्मरिलें ॥ तंव तेणें समीप देखिलें ॥ मुक्तिजळ ॥४४॥

तिसरा वोघ पूर्वदिशे ॥ तो दिव्यरूपें प्रकाशे ॥ तेथें स्नान केलें राजसें ॥ उत्तानपादकुळदीपें ।४५॥

ऐसा जंबुद्दीपांमधीं ॥ क्रमितसे पदोपदीं ॥ तंव पाहतसे शुद्धी ॥ प्लक्षद्दीपींची ॥४६॥

जंबुद्दीपीं मनुष्याचें वसणें ॥ प्लक्षद्दीप उद्दस जाण ॥ तें सांडूनि शाल्मलीं राहणें ॥ केलें योगि ऋषभें ॥४७॥

कुशद्दीपीं राक्षस वसती ॥ क्रौंचद्दिपीं माधव असती ॥ आणि शाकद्दीपीं राहती ॥ नंदीवृषभ ॥४८॥

तेथोनि घ्रुवा जाणें घडलें ॥ गोमे दद्दीपीं येणें केलें ॥ तंव अप्सरांचें भुवन पडिलें ॥ ध्रुवावरी ॥४९॥

सप्त अप्सरा विनविती ॥ ध्रुवासि गृहीं नेऊंपाहती ॥ परि तो मोहीं न पडे निश्चिती ॥ कंदर्पाचें न चाले ॥५०॥

मेनिका रंभा घृताची ॥ तिलोत्तमा आणि उर्वशी ॥ मंउघोषा सातवी सुकेशी ॥ ऐशा देवता अप्सरा ॥५१॥

असो ध्रुव देव त्यां सांडूनी ॥ मदनपेटीका जिंकूनी ॥ तेथें कैसी चाले करणी ॥ पंचशराची ॥५२॥

आतां कोटी येक जंबुद्दीप उरलें ॥ तें नवांठायीं विभागिलें ॥ तंव आणिक पुसों आदरिलें ॥ जन्मेजयरायें ॥५३॥

ह्मणे तीं नवखंडें व्यासदेवें ॥ कथिलीं असती स्वभावें ॥ तरी तें कथन आघवें ॥ सांगिजे मज ॥५४॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ तुज सांगों गा निवडून ॥ सप्तद्दीपांचाही प्रश्न ॥ ऐक आतां ॥५५॥

जंबुद्दीप प्लक्षद्दीप ॥ शाल्मलीद्दीप कुशद्दीप ॥ क्रौचद्दीप शाकद्दीप ॥ पुष्करद्दीप सातवें ॥५६॥

आतां हरिवर्ष इलावर्तखंड ॥ रमणक हिरण्य कुरुखंड ॥ किंपुरुखंड भरतखंड ॥ सातवें राया ॥५७॥

भद्राश्व आणि केतुमालखंड ॥ ऐसी भुमी नवखंड ॥ परि दाहवें ह्मणती पांखांड ॥ काशिखंड पैं ॥५८॥

तंव ह्मणे भारतभूपती ॥ कीं चौदा भुवनें ह्मणती क्षिती ॥ तरी तीं सांगा जी वेदमूर्तीं ॥ वैशंपायना ॥५९॥

तरी वायुभुवन मेघभुवन ॥ सूर्यभुवन चंद्रभुवन ॥ ताराभुवन गगनभुवन ॥ इंद्रभुवन सातवें ॥६०॥

ब्रह्मभुवन विष्णुभुवन ॥ शिवभुवन शुन्यभुवन ॥ काळभुवन पक्षिभुवन ॥ निरंजनभुवन चौदावें ॥६१॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ कवणे पर्वतीं खंडठावो ॥ आणि तो जातसे ध्रुवदेवो ॥ कैशियापरी ॥६२॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं धन्य सुजाणा ॥ तरि पुसिले पुशीचा प्रश्न ॥ ऐक आतां ॥६३॥

नवनवसहस्त्र योजनें ॥ नवहीखंडें असती गहनें ॥ तयां क्रमित घडे जाणे ॥ ध्रुवदेवासी ॥६४॥

जया रक्तकृष्ण बहु रेखा । चंद्रसूर्य भोंवती परिखा ॥ तो मेरुपर्वत असे देखा ॥ इलावर्तखंडीं ॥६५॥

इलावर्ताहूनि परता ॥ नीलपर्वताचिये आरुता ॥ ध्रुव जात असे भारता ॥ आकाशपथें ॥६६॥

मग तयाचे पलिकडे ॥ रमणक आणि हिरण्यखंडें ॥ पर्वत असे तयांपुढें ॥ श्रूंगवान नामें ॥६७॥

तो श्रृंगवान गिरि प्रचंड ॥ तयाचे उत्तरेसो कुरुखंड ॥ आतां दक्षिणे असती उदंड ॥ पर्वत तीन ॥६८॥

इलावर्ताचे दक्षिणदिशे ॥ निषध नामें पर्वत असे ॥ पुढें हरिवर्षखंडतां वसे ॥ तया परतें ॥६९॥

हरिवर्षाचा शेवट ॥ तोचि पर्वत हेमकुट ॥ पुढे किंपुरुषखंडाचा पुट ॥ वसे तयामध्यें ॥७०॥

किंपुरुषदक्षिणे हिमाचळ ॥ पर्वत असे महा विशाळ ॥ त्याचे दक्षिणभागीं स्थळ ॥ भरतखंडाचें ॥७१॥

आतां इलावर्तापश्चिमे पर्वत ॥ त्याचें नांव माल्यवंत ॥ तेथें केतुमालखंड निश्वित ॥ पश्चिमभागीं ॥७२॥

इलावर्ताचे पूर्वेसि जाण ॥ पर्वत असे गंधमादन ॥ पुढें भद्राश्वखंड सांडून ॥ जातसे योगी ॥७३॥

देखिला सोळासहस्त्र मेरु ॥ तळवटीं असे वर्तुळकारु ॥ तयाचा उपरी चौफेरु ॥ बत्तीससहस्त्र ॥७४॥

सोळासह्स्त्र भूंमिगत ॥ ऐसी मेरूची असे मात ॥ हें वैशंपायन सांगत ॥ जन्मेजयसी ॥७५॥

तंव ह्मणे स्वामी अवधारा ॥ तेथिच्या द्रुमां आणि डोंगरां ॥ नावें असती मुनीश्वरा ॥ तीं सांगिजे जी ॥७६॥

मुनि ह्मणे पूर्वेसि गिरी मंदर ॥ त्याचेवरी आम्रतरुवर ॥ अकराशत योजनें विस्तार ॥ तया झाडाचा ॥७७॥

येकशत योजनें छाया ॥ तेथें जातसे ध्रुव राया ॥ तळीं दुग्धाचें कुंड तया ॥ भरलें असें ॥७८॥

अविकोनि फळा तळीं पडे ॥ गिरिशिखराऐसें आदळे ॥ झरे वाहती येकपाडें ॥ त्याचिये रसाचे ॥७९॥

भारता त्या रसाची सदा ॥ नदी वाहे प्रकटमदा ॥ तियेचें नांव असे अरुणोदा ॥ विस्तारली पुढें ॥८०॥

मंदरगिरीवरूनी ॥ धारा पडती भरूनी ॥ ते इलावर्तखंडासि धरोनी ॥ चालिली पूर्वे ॥८१॥

तेथें भवा नीचिया भारता ॥ सेवकी राहती योषिता ॥ यक्षकिन्नरी असती अमिता ॥ आज्ञाधारका ॥८२॥

त्यातें स्पर्शोनि चाले अनिळ ॥ त्याचा शतयोजनें सुटे परिमळ ॥ तेणें होतसे सुकाळ ॥ सर्वजीवां ॥८३॥

मेरूचिये उत्तरे प्रसिद्ध ॥ पर्वत असे नामें कुमुद ॥ सहस्त्रयोजनें सानंद ॥ वरी वटवृक्ष असे ॥८४॥

येकशत योजनें ॥ छाया विस्तारली तेणें ॥ तळीं उदक अति गोडपणें ॥ भरलें कुंड ॥८५॥

ध्रुव देखे शतगांवें ॥ कुंड विस्तीर्ण असे बरवें ॥ ह्मणे येथें स्नान करावें ॥ योगीजनीं ॥८६॥

तया वडाचा बडिवार ॥ जेंजें कल्पी आश्रितनर ॥ तेंतें पाववी साचार ॥ कल्पवृक्ष तो ॥८७॥

आतां पश्चिमे अवधारीं ॥ असे सुपार्श्व नामें गिरी ॥ आणि त्याचिये मस्तकावरी ॥ कदंबवृक्ष विरुढला ॥८८॥

दहासहस्त्र योजनें वाड ॥ तें उंच कदंबाचें झाड ॥ तेथें ध्रुव पदपावड ॥ देखे योगी ॥८९॥

कदंबातळी इक्षुरसु ॥ कुंड शतयोजनें अवकाशु ॥ तेथें ध्रुव योगिराजसु ॥ विश्रामला ॥९०॥

त्या कंदबापासोनि विस्तरा ॥ पांचां प्रचंड डोंगरां ॥ प्रवाहो चालिले मधुधारा ॥ सुढाळ पांचाठायीं ॥९१॥

पांचपांच क्रोश अद्धुता ॥ ऐशा विस्तारल्या सरिता ॥ सुपार्श्वावरूनि इलावर्ता ॥ चालिल्या पश्चिमे ॥९२॥

आतां दक्षिणदिशे डोंगर ॥ तयाचें नाम मेरूमंदर ॥ त्याचे मस्तकीं असे तरुवर ॥ जांभळीच्या ॥९३॥

तो सहस्त्र योजनें उत्तुंग ॥ शतयोजनें छायालाग ॥ ऐसा विस्तार असे चांग ॥ तया वृक्षाचा ॥९४॥

तें मधुकुंड उचबंळत ॥ अतिरसाळ दीप्तिवंत ॥ भोंवतें वन चैत्ररथ ॥ देखिलें ध्रुवें ॥९५॥

तये जंबवृक्षाचीं फळे ॥ गजायेवढीं ढिसाळें ॥ भूमीसि पडतां आदळें ॥ होती शतखंड ॥९६॥

तें जंबुनदी नाम जाहलें ॥ फळ रसातें वाहिलें ॥ तेणें तटाकीं मृत्तिकेसि बोलिलें ॥ जांबूनद सूवर्ण ॥९७॥

आतां पूर्वदिशे मेरु शिखरीं ॥ ब्रह्मयाची असे नगरीं ॥ धुर्वदेव तये भीतरीं ॥ प्रवेशला राया ॥९८॥

अनुपम्य असे ते नगरी ॥ तये मंदरगिरिवरी ॥ चतुरानन राज्य करी ॥ सत्यलोकीं ॥९९॥

तैं हात जोडोनि परिकर ॥ ध्रुवे ब्रह्मया केला नमस्कार ॥ विधोनेंही करोनि नमस्कार ॥ वोळखिला तो ॥१००॥

ह्मणे केउता आलासी ॥ कवणें कारणीं भुललासी ॥ येरु ह्मणे हूषीकेशीसी ॥ भेटावया ॥१॥

तुझें दर्शन जाहलें ॥ तेणें अंतरीं सुख वाटलें ॥ आतां मन माझें निवालें ॥ कॄपावचनें ॥२॥

जयजयाजी विधाता ॥ भेटी कीजे आतां अनंता ॥ शूळपाणी सहिता ॥ मजलागोनी ॥३॥

मग ध्रुव आणि चतुरानन ॥ दोघे निघाले मेरूवरून ॥ गेले दक्षिणदिशेसि गहन ॥ कैलासपुरी ॥४॥

तेथे भेटले शूळपाणी ॥ मग तिघे निघाले तेथूनी ॥ ऐसे गेले वैकुंठभुवनीं ॥ विष्णुलोका ॥५॥

तो पर्वत नामें कुमुद ॥ उत्तरेसि परम प्रसिद्ध ॥ त्यावरी असे महा आनंद ॥ विष्णुलोकींचा ॥६॥

तेथोनि पश्चिमे पाहती ॥ पर्वत उद्यानें देखती ॥ माजी वरुणाची असे स्थिती ॥ कंदर्पासहित ॥७॥

तेथे तेहतीस कोडी ॥ देवांची वसे परवडी ॥ कामधेनु पारिजातक झाडीं ॥ विराजती वनें ॥८॥

तयांमाजी अनुपम्य कुसरी ॥ अमरावती इंद्रपुरी ॥ देखती ब्रह्मा ध्रुव त्रिपुरारी ॥ सानंदपणें ॥९॥

तयाचिये पुढें वैकुठंलोकी ॥ तिघे चालिले विशेंषीं ॥ तंव तेथे वैकुंठनायकीं ॥ केलें शयन ॥११०॥

मग विनवी विधांता ॥ जयजयाजी विश्वभरिता ॥ जयजयाजी श्रीअनंता ॥ मुक्ति देणें ध्रुवासी ॥११॥

ध्रुव आला असे जवळां ॥ ऐसें विधाता विनवी गोपाळा ॥ तो ध्वनी पडतां श्रवणकमळा ॥ जागिन्नले हरी ॥१२॥

नमूनि ध्रुव ह्मणे कृपानिधी ॥ आह्मी आलों तुझिये शुद्धी ॥ त्रिपुररीसहित विधी ॥ आलों येथें ॥१३॥

भारत मग ते शारंगपाणी ॥ बोलता जाहला कृपावाणी ॥ कीं अढळपद ययालागुनी ॥ देणें लागे ॥१४॥

भक्तांमाजी परम श्रेष्ठ ॥ अढळपदीं स्थापिजे वरिष्ठ ॥ विधि हरि आणि नीलकंठ ॥ ह्मणती ऐसें ॥१५॥

ध्रुवा अढळपदी स्थापुनी ॥ तेथोनि गेले देव तीन्ही ॥ तंव आला सूयवंश ह्मणवोनी ॥ गर्भस्तिदेवो ॥१६॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ कितीयोजनें आला सूर्यदेवो ॥ हा फेडा जी संदेहो ॥ वैशंपायना ॥१७॥

कितीयोजनें अढळपद धुरु ॥ किती योजनें निशांकरु ॥ कितीयोजनें असे पारु ॥ नवग्रहांचा ॥१८॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ प्रदक्षिणे आला सहस्त्रकिरण ॥ कीं स्ववंश केला येणें धन्य ॥ ह्मणवोनियां ॥१९॥

सूर्यवंश जाहला उजेड ॥ ह्मणोनि स्तवी मार्तंड ॥ साष्टांग घातलें दृढ ॥ दंडवत तया ॥१२०॥

आतां असो हे गणना ॥ पुसिले पुशीचिया कारणा ॥ मार्ग येकलक्ष योजना ॥ येकलक्ष बिंब ॥२१॥

तो ध्रुवा लक्षोनि चालिला ॥ दोनीलक्ष मार्ग क्रमिला ॥ तैसाचि ध्रुव नमस्कारिला ॥ दोनीलक्ष सहित चंद्रें ॥२२॥

मग वसुंधरेचा सुत तत्वतां ॥ मंगळ नामें गा भारता ॥ तो नवलक्षयोजनें पंथा ॥ क्रमीत आला ॥२३॥

अठरालक्ष बिंबासहित ॥ तो ध्रुवासि प्रदक्षिणीत ॥ तंव आलासे धांवत ॥ चंद्रसुत बुध ॥२४॥

पांचलक्ष योजनें ॥ मार्ग क्रमिला असे तेणें ॥ तेम चंद्रसुताचेम बिंब जाणणें ॥ योजनें सोळालक्ष ॥२५॥

मग देवगुरु बृहस्पती ॥ अकरालक्ष चालिले पंथीं ॥ फेरीं ध्रुवाजवळी येती ॥ लक्षबिंबें ॥२६॥

दैत्यगुरुसि ठाव जाहला ॥ सातलक्ष मार्ग क्रमिला ॥ बेचाळीस लक्ष मिरवला ॥ शुक्र बिंबें ॥२७॥

तेणें जोडोनियां पाणी ॥ ध्रुवदेव विनविला वचनीं ॥ ह्मणे आह्मी तुह्मालागोनी ॥ प्रदक्षिणा करूं आलों ॥२८॥

आतां सूर्याचा जो कुमर ॥ नामें बोलिजे शनैश्वर ॥ तयाचा असे बिंबाकार ॥ पंचेचाळीसलक्ष ॥२९॥

तेणें ऐकोनियां श्रवणें ॥ ह्मणे ध्रुव कैसा पाहों नयनीं ॥ मग आला मागिले चरणीं ॥ तेरालक्ष मार्ग ॥१३०॥

तो मागिले चरणी आला ॥ ह्मणोनि ध्रुव कोपिन्नला ॥ ह्मणे ऐसा कैसा केला ॥ नमस्कार येणें ॥३१॥

तंव सांगे दिनमणी ॥ कीं याची ऐसीच असे करणी ॥ हा सन्मुखपणें नयनीं ॥ पाहूं नये ॥३२॥

तीनीलक्ष नक्षत्रें असती ॥ तीं ध्रुवासि प्रदक्षिणा करिती ॥ तेथोनि सप्तऋषींची वस्ती ॥ चौदालक्ष उंच ॥३३॥

आतां असो ध्रुव राहविला ॥ तीनीयोजनें स्थापिला ॥ अढळपदीं बैसविला ॥ कॄष्णदेवें ॥३४॥

पंधराकोटी ध्रुवमंडळ ॥ देवें पद दीधलें अढळ ॥ त्रैलोक्यामाजो निर्मळ ॥ उंच मेरूहुनी ॥३५॥

तंव ह्मणे पारिक्षिती ॥ कैसी नवग्रहांची आकृती ॥ मग ह्मणे वेदमूर्तीं ॥ ऐकें राया ॥३६॥

मंगळ असे भुमिकुमर ॥ तयाचा त्रिकोण आकार ॥ आणि बाराकोणी दिनकर ॥ द्वादशदृष्टी ॥३७॥

चोवीसकोणी आकृती ॥ रूप जाणावें निशापती ॥ आणि बुधाची आकृती ॥ बाणाकार ॥३८॥

गुरु स्फटिकवर्ण निर्धार ॥ तयाचा षट्‍कोण आकार ॥ ऐसा असे हा विचार ॥ ऐक राया ॥३९॥

आतां शुक्राची जे मूर्ती ॥ ते पंचकोण गा भूपती ॥ हें वेदवाक्य सांगती ॥ ब्रह्मपुराणी ॥१४०॥

पुढें आइकें शनिरुप ॥ त्याचें धनुष्याकार स्वरूप ॥ आणि ध्वजाकार दीप ॥ बोलिजे केतु ॥४१॥

आतां राहूची आकृती ॥ सूर्याकार गा भूपती ॥ पुढें आइकें दिशास्थिती ॥ सकलग्रहांची ॥४२॥

दशदिशां मध्यवासी ॥ राहणें असे दिनकरासी ॥ तयाचिये समीप शशी ॥ वर्ते भारता ॥४३॥

आतां मंगळाचें घर ॥ दक्षिणदिशा साचार ॥ आणि बुधांचें उत्तरे घर ॥ मेरुशिखरीं ॥४४॥

गुरुचें जाणिजे राहणें ॥ पश्चिमेसी बैसणें ॥ वस्ती असे नैऋत्यकोणे ॥ शुक्रदेवाची ॥४५॥

तया महाग्रहा शनी ॥ रहिवास असे आग्नेयकोणीं ॥ आणि ईशान्यदिशा धरूनी ॥ वसे राहू ॥४६॥

तैसाचि मग वायव्यदिशे ॥ महाग्रह के तु वसे ॥ आणि सर्वजनां आकाश दिसे ॥ मेरुशिखर तें ॥४७॥

हे कथा श्रीभागवती ॥ ऐशीच रघुवंशींची मती ॥ ते ऐकें गा भूपती ॥ भुगोलाची ॥४८॥

ऐसें ध्रुवचरित्र जाहलें ॥ तंव जन्मेजयें आणिक प्रश्निलें ॥ कीं शनैश्र्वरा सन्मुख वहिलें ॥ कां पाहूं नये ॥४९॥

तो विमुख कां राहिला ॥ कवणें तया शाप दीधला ॥ उत्तर दीजे जी या बोला ॥ वैशंपायना ॥१५०॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ पूर्वीं कोणैककाळीं जाण ॥ दक्षें मांडिला असे यज्ञ ॥ पुत्रजन नार्थ ॥५१॥

ब्रह्मया देवोनि आचर्यपद ॥ दक्षें स्थापिला वेदविद ॥ परि शनी मागे तें पद ॥ ब्रह्मयाजवळी ॥५२॥

तंव तो वारिला चतुराननें ॥ ह्मणे ब्रह्मासन केविं देणें ॥ कीं मर्यादा सोडिली येणें ॥ महंतांची ॥५३॥

ऐसें ह्मणोनि उठिला ॥ शनीसि विध्वंसूं निघाला ॥ तंव अतिकोपें तापला ॥ शनैश्वर तो ॥५४॥

तामसी करोनियां दृष्टी ॥ पाहिली ब्रह्मयाची मुखटीं ॥ तंव ब्रह्मा मूर्छित सृष्टीं ॥ पडिला देखा ॥५५॥

ब्रह्मयासी मूर्च्छा आली ॥ ह्मणोनि दक्षें धांव घेतली ॥ ह्मणे पुण्यचिये वेळीं ॥ उद्भवलें पाप ॥५६॥

असो पल्लवें नेत्र पुशी ॥ ब्रह्मा सावध झाला मानसीं ॥ मग शाप बोले तामसी ॥ विश्ववदनें ॥५७॥

तंव शनीचें शिसाळ तुटलें ॥ तें यज्ञकुंडामाजी पडलें ॥ मग तें द्क्षें काढिलें ॥ जळों नये ह्मणवोनी ॥५८॥

आतां ब्रह्मवध घडेल ॥ अवधा यज्ञ विध्वंसेल ॥ तेणें मग कार्य राहील ॥ यज्ञकरणाचें ॥५९॥

दक्ष ह्मणे हो चतुरानना ॥चतुर्मुखा कॄपाजना ॥ कीजे जी यज्ञकारणा ॥ ब्रह्मदेवा ॥१६०॥

येथें ब्रह्मघात घडला ॥ हा अपराध थोर जाहला ॥ सकळयज्ञ विध्वंसला ॥ निष्कारण ॥६१॥

ताता तुवां जेथें असिजे ॥ तेथें यज्ञकार्य विध्वंसिजे ॥ हें तुह्मांसि न साजे ॥ ब्रह्मदेवा ॥६२॥

मग ब्रह्मा बोले वचनीं ॥ ह्मणें तुजकारणें उठवूं शनी ॥ आणि तरी ब्रह्महत्येंचें झणीं ॥ दुःख मातें ॥६३॥

जये यज्ञीं म्यां असावें ॥ तेथें ऐसें न व्हावें ॥ ऐसें ह्मणोनि विधीनें स्वभावें ॥ उठविला शनी ॥६४॥

मग तये दक्षें यजमानें ॥ शिरकमळ उचलिलें तेणें ॥ लाविलें शनिधडाकारणें ॥ विपरीत देखा ॥६५॥

परि ब्रह्मा शाप बोलिला ॥ ह्मणोनि शनी विमुख राहिला ॥ मग ब्रह्मासनीं बैसविला ॥ आपुलेनि हातें ॥६६॥

मग दक्षें यज्ञकंकण ॥ आपुलें करीं बांधिलें जाण ॥ आणि आरंभिला यज्ञ ॥ पुत्रकामेष्टी ॥६७॥

यज्ञपूर्णाहूती जाहली ॥ ऋत्विजांची वाचा वळली ॥ परि कन्या होवोत ऐशी बोली ॥ बोलला शनी ॥६८॥

दक्षा जाहला राज्यभिषेक ॥ ऋषि आशिर्वाद कन्याविशेष ॥ ऐसें ऐकोनियां नावेक ॥ दक्ष विस्मित जाहला ॥६९॥

ब्रह्मयाचे शापबोलीं ॥ शनी चालिला विपरितचलीं ॥ हे अववी असे बोली ॥ भविष्योत्तरपुराणीं ॥१७०॥

शिर विपरीत फिरे केवीं ॥ चरण विपरीत न चालवी ॥ ऐसी ब्रह्मयाची गोवी ॥ न कळे कवणा ॥७१॥

ह्मणोनि राया भारता ॥ सन्मुख पाहवेना भानुसुता ॥ ऐसी हे असे अनंतकथा ॥ प्रसंगवशें ॥७२॥

हा कथानामें कल्पतरू ॥ अठरापुरांणींचा अर्थहारू ॥ कंठीं घालिजे अरुवारू ॥ श्रोतेजनीं ॥७३॥

नानाकथारत्‍नवाणी ॥ कल्पतरूची मांडणी ॥ श्रोतयां जोडलीसे खाणी ॥ पवित्र राया ॥७४॥

आतां असो हे सादरता ॥ वैशंपायन सांगे भारत ॥ तैं ऐकावें सकळश्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥७५॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ सप्तमस्तबकमनोहरू ॥ ध्रुवचरित्रभूगोलप्रकारु ॥ येकादशाऽध्यायीं कथियेला ॥१७६॥

॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP