कथाकल्पतरू - स्तबक ७ - अध्याय ७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

रायासि ह्मणे वैशंपायन ॥ दैत्य वाढले ब्रह्मयापासून ॥ त्यामाजी हिरण्याक्षाचें कथन ॥ द्वितीयस्तबकीं कथिलेंसे ॥१॥

आतां तयाचा बंधु पुढार ॥ हिरण्यकश्यप नामें असुर ॥ तयासि जाहला हरिभक्त कुमर ॥ प्रल्हाद नामें ॥२॥

त्यासी पढविता होय पिता ॥ हे द्वितीयस्तबकींची वार्ता ॥ परि नृसिंहविदारणकथा ॥ सांगतों ऐक ॥३॥

असो प्रल्हादासि पढवी जैसें ॥ परि तो न उच्चारी तैसें ॥ लागलें हरिनामाचें पिसें ॥ तया बाळकासी ॥४॥

ह्मणोनि तयासि पुसे पिता ॥ कीं हें कैशियासि ह्मणसी सुता ॥ तंव येरू ह्मणे सांग ताता ॥ त्याविण आणिक कोण असे ॥५॥

त्रिभुवनामाजी हरि समर्थ ॥ चहूंयुगीं त्याचा पुरुषार्थ ॥ ज्याचेनि जोडे परमार्थ ॥ वैकुंठप्राप्ती ॥६॥

ऐसें पितयानें ऐकोनी ॥ साट आणवोनि तत्क्षणीं ॥ ह्मणे हा छंद सांडीं झणी ॥ नातरी पावसी दुःखातें ॥७॥

येरु आनंदें निर्भय मनीं ॥ हरिनाम गातसे वदनीं ॥ राव ह्मणे भिवव मनीं ॥ या बाळकसी ॥८॥

पांचावरूषांच्या लेंकुरा ॥ साटीं भिववितां अवधारा ॥ तंव आपण क्षीरसागर ॥ गजबजिले हरी ॥९॥

देव धांवला वेगें करोनी ॥ साटां जाणवलें अद्भुतचिन्हीं ॥ भये थरारिली मेदिनी ॥ पडिलें ठेक ॥१०॥

साट उठती आटोआटी ॥ न्याहों उठिला भुवनसंपुटीं ॥ धैर्य नहोई घालाया दृष्टी ॥ गबाक्षद्वारेंही ॥११॥

परि येरूचे मनीं काहीं ॥ हरिवांचोनि दिजें नाहीं ॥ अंतर्बाह्य प्रकटला देहीं ॥ नारायण ॥१२॥

दैत्य ह्मणे रे गजापुढें ॥ घालाबें हें पिसे वेडें ॥ ऐसें तयाचें आचरण कुडें ॥ तेथें कायसे पापदर ॥१३॥

पोटीं येईना कळबळा ॥ मग नेत्रीं सांडील कां जळा ॥ मारवितां आपुलिया बाळा ॥ शंका केउती ॥१४॥

साटां आणि महांतांतें ॥ उभें केलें तयाभोंवतें ॥ फुटती कुंभस्थळें परि ते ॥ गज न येती पुढारा ॥१५॥

करिती दुरोनियां नमन ॥ मग केउते जाती पळोन ॥ मदोन्मत्ती केलें नमन ॥ त्या बाळकासी ॥१६॥

तेथें नृसिंहचि अवधारा ॥ सिंह भासे तया कुंजरां ॥ मग पाहतां सुटला भेदरां ॥ नघरवे धीर ॥१७॥

हिरण्यकश्यप ह्मणे शस्त्रें ॥ मारोनि करा वेगळीं गात्रें ॥ लाजविलें या अपवित्रें ॥ दैत्यवंशीं ॥१८॥

मग शस्त्रांचिया कोडी ॥ धायें हाणिती परवडी ॥ परि येरू उच्चारी नाम तोंडीं ॥ वज्रासमान ॥१९॥

मग डोहीं महाविशाळीं ॥ बाळ लोटिलासे जळीं ॥ परि धरिला वरूण आवलीं ॥ विष्णुचेनि धाकें ॥२०॥

मग थडिये काढुनी ॥ महावन्हींत दीधला टाकुनी ॥ ज्वाळा लागलिया गगनीं ॥ नसमाय तेज ॥२१॥

जैसें मुसेंत आटिजे सोनें ॥ तेवीं दिव्यकांती जाहली तेणें ॥ उपमे दिसे परि हीनें ॥ नपवे सरी ॥२२॥

काहीं नचले आगिचें केलें ॥ ह्मणोनि भुजंग आणविले ॥ त्यांहीं गरुडासहित देखिलें ॥ विष्णुरूप ॥२३॥

पंचरत्वां राहिलें चळण ॥ प्रल्हादाचें देखोनि छळण ॥ मग तयासि मेरूवरून ॥ लोटिती बळें ॥२४॥

मल्ल घातले बाळावरी ॥ हाणिती कुशीसी कोंपरी ॥ परि पराभोवना चत्वरीं ॥ बाळ तयांतें ॥२५॥

ऐसे मल्ल जाहले हिंपुटी ॥ श्वासोश्वास नमाय पोटीं ॥ येरु नामवज्रें फांसोटीं ॥ लागू नेदी ॥२६॥

मशक केवीं हालवी कुंजरा ॥ क्षुद्रप्राणी काय गिरिवरा ॥ नातरी मुंगी महासागरा ॥ तरोशके केवीं ॥२७॥

तैसें जयाचे नेहटें श्रीहरी ॥ तयासि विघ्न काय करी ॥ वाउगी जाहली व्यर्थ परी ॥ सायास केले ॥२८॥

मग बाळासि राजा ह्मणे ॥ इतुका वेळ रक्षिलासि जेणें ॥ तो दाखवीं मजकारणें ॥ तुझा देव ॥२९॥

येरु ह्मणे बाह्मभ्यंतरीं ॥ असे माझा श्रीहरी ॥ जळीं स्थळां काष्ठाभीतरीं ॥ पाषाणीं असे ॥३०॥

हिरण्यकश्यप ह्मणे रे सुता ॥ अंतीं कां मरण पावसी आतां ॥ तुं न सांडिसी अनंता ॥ येवढिये जाचणीं ॥३१॥

तया पाहसी रात्रंदिवस ॥ आह्मां न सांपडे ह्रुषीकेश ॥ आणि तूं ह्मणसी त्याचा विश्वास ॥ असे निर्वाणी ॥३२॥

तरी पाषाणीं पाहतां ॥ हा मर्गजस्तंभ हाणितां ॥ प्रकट होईल येथ आतां ॥ तुझा हरी तो ॥३३॥

ऐसें ह्मणोनि अंगत्राणें ॥ स्तंभ हाणितला दैत्यें तेणें ॥ तंव तडाडिलीं अखिल भुवनें ॥ ब्रह्मंडींचीं ॥३४॥

तें महाविशाळ लोहित रूप ॥ जाणों देखोनि विरिजे आप ॥ मग दैत्यावरी घालोनि झेंप ॥ मोडिल खड्गा ॥३५॥

मल्ल‍युद्ध दोघांसि जाहलें ॥ दैत्यासि मोक्षपद दीधलें ॥ परि जानूवरी धरोनि वहिलें ॥ भेदिलें वक्षस्थळ ॥३६॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ येक असे जी संदेहो ॥ त्यासी प्रसन्न महादेवो ॥ तरी मरण कैसें ॥३७॥
कवण वेळ कवण जागा ॥ भूमंडळ कीं कैलास स्वर्गा ॥ प्रसन्नता कीं मनुष्यवर्गा ॥ नाहीं मरण ॥३८॥

तरी कैसा वधिला जी मुनी ॥ हें सांगावे निवडुनी ॥ ऐकतां संतोषला मुनी ॥ ऋषिराव तो ॥३९॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं श्रोता विचक्षण ॥ तरी पुसिले पुसीचा प्रश्न ॥ ऐक आतां ॥४०॥

तो सांजवेळीं जानुवरी ॥ ना बाहेर ना गृहाभीतरीं ॥ नाहीं दिवस नाहीं रात्रीं ॥ धरणीवरी आथीच ना ॥४१॥

ह्मणोनि उद्नम सांजवेळ ॥ नृसिंहरूप जाहला गोपाळ ॥ गृहमध्यभागीं अंतराळ ॥ गवाक्षद्वारीं ॥४२॥

ह्मणोनि नृसिंहें नखें तिखें॥ रोंविली वृक्षस्थळीं रोखें ॥ मरण दीधलें निर्जीव नखें ॥ शिववाक्यास्तव ॥४३॥

ऐसें भक्ताचिये कारणी ॥ देवें विकट रूप धरोनी ॥ दैत्यासि जानूवरी चिरोनी ॥ दीधली मुक्ती ॥४४॥

अंत्रमाळा नखीं गुंडवी ॥ आंसुडोनी सुरवरां दावी ॥ परि ते कथा असे नवी ॥ जन्मेजया गा ॥४५॥

समस्त झांकोनियां विधी ॥ सनत्कुमारां कथिली आधी ॥ त्यांहीं निवेदिली सिद्धी ॥ व्यासदेवासी ॥४६॥

व्यासांची कृपा आह्मांवरी ॥ जे तरी दर्लभ चराचरी ॥ ते कथिलीसे उत्तरीं ॥ अनुपम्य कथा ॥४७॥

ऐसें हे नृसिंहविदारण ॥ मजसी कथिलें विस्तारून ॥ तें ऐकें चित्त देऊन ॥ भारता तूं ॥४८॥

आतां ऐक जाहलें जैसें ॥ सांगिजेल सर्वहि तैसें ॥ मग नृसिंहतेज कैसें ॥ जाहलें राया ॥४९॥

दिसती तेजपुंज गवाक्षद्वारीं ॥ सूर्य लक्षणीं अवधारीं ॥ शस्त्रे घालितां त्यावरी ॥ न पुरें हांवं ॥५०॥

कमलतंतु तोडितां वदनीं ॥ हांव न पुरे हस्तीलागुनी ॥ तैसी न पुरोचि ते क्षणीं ॥ हांव नृसिंहाची ॥५१॥

वारितां न सरे तेजकोडें ॥ समस्तां मांडलें सांकडें ॥ ऐसें भय आलें रोकडें ॥ तिहींलोकं ॥५२॥

त्याचिये तेजें आकाशीं ॥ पोळले देखा रविशशी ॥ अवघिया सकळ लोकांसी ॥ जाहले दुःख ॥५३॥

तेणें तेजें तापली धरा ॥ कूर्माचें कंवटें अवधारा ॥ बराहाचिया दंतधारा ॥ जाहल्या तप्त ॥५४॥

खळबळिला शेषफणी ॥ जळों पाहे शिरींचा मणी ॥ कीं आंग काढों पाहे झणी ॥ टाकील कीं पृथ्वीसी ॥५५॥

देवां प्रळयो जाहला गाढा ॥ पडों पाहे मेरूचा कडा ॥ ब्रह्मांड जळे धडधडां ॥ वर्तला आकांत ॥५६॥

ब्रह्मा संवत्सर लेखूनि पाहे ॥ ह्मणे लेखा चुकलों काय ॥ मनीं थोर म्याला पाहें ॥ तये वेळीं ॥५७॥

कदा मृत्युलोकाचिया सुखा ॥ आतां अनुभव नव्हेचि देखा ॥ कोठें गुंतलासि त्र्यंबकां ॥ प्रळयकरणा ॥५८॥

ध्यानीं पाहे कमळध्वज ॥ निश्वळमनें पंकजाअत्मजज ॥ तंव नृसिंहरूप गरुडध्वज ॥ अक्तरलासे ॥५९॥

शेषमंचक मोडों पाहे ॥ ऐसा सागरीं वळसां होये ॥ मग शिवस्तुतीसि लवलाहें ॥ करिता जाहला ॥६०॥

ह्मणे दुःखसागरीं त्वां निजरूपा ॥ घेवोनि टाकीं आपुलें कोपा ॥ आह्मी आचरलों अनंत पापां ॥ मृडानीपते ॥६१॥

धांवधांव गा अवधारा ॥ शिवा शंकरा त्रिशूळधरा ॥ समस्तांचिया दुःखहरा ॥ धगधगीता ॥६२॥

येकवटोनि सुरगण ॥ सकळ पावले कैलासभुवन ॥ महादेवाचे प्रीतिस्थान ॥ जें कां भारता ॥६३॥

तंव पार्वतीसहित महादेवो ॥ क्रीडावनीं आनंदभावो ॥ गंधर्व कीन्नर साध्य सर्व ॥ जाणविती सेवा ॥६४॥

अष्टवसु अकरा रुद्र ॥ चौदा मनु चौदा इंद्र ॥ किंपुरुष आणि वरूण चंद्र ॥ बाराआदित्यांसह ॥६५॥

असो येवोनि तेथें सुरवरीं ॥ नमस्कार घातला ते अवसरीं ॥ जेवीं दंड पडे पृथ्वीवरी ॥ तेवीं विधाता लोटला ॥६६॥

ह्मणे हो शिवा विष्णुनिवारणा ॥ सर्वदुःख परिहारणा ॥ दुस्तर दुरितसिंधु तारणा ॥ नीलकंठा तूं ॥६७॥

नमो नमो जी काळकाळा ॥ महारुद्रा जाश्वनीळा ॥ मृडानीवरा अतुर्बळा ॥ चंद्रमौळी ॥६८॥

कालकूटोद्भवीं रक्षिलें जना ॥ हे पवाडें प्रसिद्ध पुराणा ॥ तरी आतांचिया विघ्ना ॥ निवारीं देवा ॥६९॥

विबुधां भय वोडवलें देवा ॥ तें तूं निवारीं सदाशिवा ॥ कर्ता हर्ता सर्वजीवां ॥ तूंचि येक ॥७०॥

तुझें उघडे नेत्रपातें ॥ तैं होती कल्पकल्पातें ॥ आतों तुजविणें कोणी रक्षितें ॥ सृष्टिसि नसे ॥७१॥

आह्मे अवघेचिं तांतलों ॥ ह्मणोनि लोटांगणीं पातलों ॥ मग देवो लागला बोलों ॥ विरिंचीसी ॥७२॥

ऐसें ऐकोनि कृपावंत ॥ पुसों लागला दुर्गाकांत ॥ जे सांगतां सावित्रीकांत ॥ नृसिंहव्यथा ॥७३॥

ह्मणे तुमचा वरदपुत्र ॥ हिरण्यकश्यप जो कां असुर ॥ त्याचा नृसिंहरूपें संहार ॥ केला हरीनें ॥७४॥

परि आतां त्या नृसिंहतेजें ॥ आहाळलीं सर्वबीजें ॥ ऐसें ऐकतां वृषभध्वजें ॥ कोपीं मन आथिलें ॥७५॥

ह्मणे तो पुत्र माझा वरद ॥ त्याचा कोणीं केला वध ॥ तरी तयाचा मूळकंद ॥ छेदीन भक्ताकारणें ॥७६॥

शिव विचारी निजमनी ॥ कीं कोणाचें तेज सिंहाहोनी ॥ मग त्यासी लोपवाया लागुनी ॥ धरिलें शरभरूप ॥७७॥

करीं डौराचा दमदमाट ॥ असंख्या घंटांचा घणघणाट ॥ वीरकंकणांचा झणझणाट ॥ गर्जें गगन ॥७८॥

करीं चाळवी त्रिशूळ ॥ नेणों कवळील गगनमंडळ ॥ असंभाव्य जाहला तेजगोळ ॥ महारुद्र ॥७९॥

मग जावोनि नॄसिंहाजवळी ॥ त्यातें प्रबोधी तये वेळीं ॥ मधुरवाचा मुखकमळीं ॥ जैसा पिता पुत्रातें ॥८०॥

परि तें न मानीच हरी ॥ ह्मणोनि विमुखला त्रिपुरारी ॥ तंव शंमु अंतरीं स्मरण करी ॥ वीरभद्राचें ॥८१॥

जाणोनि स्मरण शंकरा ॥ धांव घेतली वीरभद्रा ॥ ह्मणे कासयी जी कर्पूरगौरा ॥ स्मीरलें मज ॥८२॥

हर ह्मणे जावें हरीजवळी ॥ त्यासी नमावें शिरकमळीं ॥ जैसा भाव दावील वनमाळी ॥ तैसें पुढें आचरिजे ॥८३॥

जरी भयानक देखसी ॥ तरी घे माझ्या शरभरूपासी ॥ तेणें वधिलें वरदपुत्रासी ॥ हिरण्यकश्यपातें ॥८४॥

हे आज्ञा होतां वीरभद्रा ॥ मग तो आला अवधारा ॥ आणि नृसिंहासि करूणोत्तरा ॥ विनवीतसे ॥८५॥

वीरभद्र ह्मणे आदिपुरुषा ॥ अवतरलासि तूं विश्वसुखा ॥ तुझेनि अवतारें देखा ॥ उपकार जगासी ॥८६॥

सकल सृष्टी पाळावयासी ॥ युगायुगीं तूं अवतार घेसी ॥ सुखदायक अससी देवांसी ॥ तुंचि देवा ॥८७॥

तुवाम प्रथम घेतली धांव ॥ पुच्छीं बांधोनियां नाव ॥ तैं मत्स्यरूपें सकळ जीव ॥ रक्षिले तुवां ॥८८॥

कूर्मरूपें रक्षिलें तैसेंही ॥ उद्दस होतां दिशा दाही ॥ आणि दाढेसि धरिली मही ॥ वराहरूपें ॥८९॥

बहुत वेळे नृसिंहरूपें ॥ हिरण्यकश्यप वधिला कोपें ॥ तेंचि तुवां धरिलें सांपें ॥ भयानक रूप ॥९०॥

वामनरूपें बांधिला बळीं ॥ तीन पदें केली ब्रह्मांडतळी ॥ ही तुझी ब्रीदावळी ॥ ऐकों आह्मी ॥९१॥

तुवां ब्राह्मणा दीधली भूमी ॥ तूं जीवात्मा विश्वस्वामी ॥ ऐसे पंवाडे तुझे आह्मी ॥ ऐकिले देवा ॥९२॥

आतां तुझे तेज अपार ॥ तेणें विश्व तापलें समग्र ॥ जनासि होईल संहार ॥ तुझेनि तेजें ॥९३॥

तरी हें उग्रतेज आंवरीं ॥ आतां माझें शिकविलें करीं ॥ तूं स्वामी नरकेसरी ॥ पाळिता आह्मां ॥९४॥

हरि ह्मणे अलासि जैसा ॥ परतोनियां तू जाई तैसा ॥ नातरी मी कोपतां कैलासा ॥ जाणें घडेल शंकरा ॥९५॥

आतां जाळीन चराचर ॥ त्रिभुवनीं असें मीचि थोर ॥ कर्ता हर्ताही सर्वत्र ॥ मीचि येक ॥९६॥

मीच विस्तारीं संहारीं ॥ लोपवीं लोकाभीतरीं ॥ माझी पावेना कोणी सरी ॥ विश्वामाजी ॥९७॥

माझेचि मर्यादें केवळ ॥ हें विश्वही वर्तें सकळ ॥ प्रवृत्ति निवृत्ति माझाचि खेळ ॥ विश्वामाजी ॥९८॥

पंचभूतीं तेज माझें ॥ मजहूनि कवण असे दुजें ॥ मज वाराया बळ तुझें ॥ कवण कार्य ॥९९॥

देवता आदिकरोनि थोर ॥ सकळां माझाचि आधार ॥ ब्रह्मा विष्णु आणि शंकर ॥ सकळ मीची ॥१००॥

माझिये नाभीं चतुरानन ॥ त्याचें ललाटीं त्रिलोचन ॥ माझेचि बळें सहस्त्रवदन ॥ घरी महितें ॥१॥

समस्तासी तारावया ॥ कीं समस्तां संहारावया ॥ अथवा सकळां रक्षावया ॥ मीचि येक ॥२॥

संर्ग स्थिति आणि संहारीं ॥ त्रिभुवनीं मीचि येक हरी ॥ ऐसिया माझें तूं कुसरीं ॥ इच्छिसी निवारण ॥३॥

आतां मज दंडवत करूनी ॥ तुवां जावें येथुनी ॥ राहिलासि मजपुढें अजूनी ॥ कैसा तूंरे ॥४॥

लोक नासाया काळ जाण ॥ मीच मरणाचें असें मरण ॥ दैत्य आणि सुरगण ॥ मजप्रसादेंची ॥५॥

तंव जन्मेजयो ह्मणे स्वामी ॥ कांहीं येक पुसेन मी ॥ तरी वीरभद्रासि केली समी ॥ काय कारण ॥६॥

जयाचे त्रैलोक्य उदरीं ॥ तया शिकविजे काय वीरभद्रीं ॥ जो वारितांही त्रिपुरारीं ॥ नव्हें शांत ॥७॥

जो स्वयें देव त्रिपुरारी ॥ तयाचें नायके दैत्यारी ॥ तो वीरभद्रें शिकविल्यावरी ॥ निवेल कैसा ॥८॥

निंदक निंदा मिथ्या करी ॥ परि ते जडे त्याचेचि शरीरीं ॥ तैसी वीरभद्रें जाहली परी ॥ तये वेळीं ॥९॥

मग बोले रायासि मुनी ॥ कीं जेवीं कैलासी शूळपाणी ॥ त्याचीच वीरभद्रें वाणी ॥ कथिली नृसिंहा ॥११०॥

जैसा हेर जावोनि अन्यठायीं ॥ उपदेशिला निरोप देयी ॥ परि सांगणें पडे अन्य काहीं ॥ स्वबुद्धीचें ॥११॥

आतां असो हे दृष्टांत कुसरी ॥ अहंभावें कोंदला हरी ॥ तंव वेगेंकरोनि त्रिपुरारी ॥ ठाकोनि आला ॥१२॥

अहंभाव केला देवें ॥ ह्मणोनि ईश्वर ह्मणे जावें ॥ असो शरभरूप घेवोनि शिवें ॥ धावणें केलें ॥१३॥

जेवीं हयग्रीवावतारीं ॥ अहंभाव घरी श्रीहरी ॥ मग मौर्वीचपेटें अंबरीं ॥ गेलें शिर ॥१४॥

तेव्हां हयाचें शिर लाविलें ॥ ह्मणोनि हयग्रीव नाम जाहलें ॥ असो ऋषींहीं जीवाविलें ॥ तये वेळीं ॥१५॥

यास्तव अहंभावो न कीजे ॥ स्वये नाहीं न ह्मणावें दुजें ॥ विघ्न असे सहज सहजें ॥ अहंकारिय ॥१६॥

तरी असो हा अपवाद ॥ दैत्यासि मारी गोविंद ॥ आतां सांगो पुढील भेद ॥ यये कथेचा ॥१७॥

देवाचा देखोनि अहंकार ॥ मग बोलिला वीरभद्र ॥ ह्मणे विसरला शारंगधर ॥ महेशासि कैसा ॥१८॥

हे अपवादक हरनिंदा ॥ शिव कोपतां ऐक गोविंदा ॥ मग पावसी मुकुंदा ॥ निश्वयें नाश ॥१९॥

जैसी करितां तपसाधना ॥ अवचित पावे स्वर्गांगना ॥ मग ते करी महाविघ्ना ॥ तपसिद्धीचे ॥१२०॥

ऐकिले नानाअवतारीं ॥ पंवाडे तुझे श्रीहरी ॥ आणि हे कथा अवधारीं ॥ कालची देखा ॥२१॥

दक्षयज्ञाचिये अवसरीं ॥ जेवीं वर्तले गा मुरारी ॥ तैं बळ तुझें परोपरी ॥ दवडिलें आह्मी ॥२२॥

जीं पंचमहाभूतें सुरेखें ॥ हींच शंभूचीं पंचमुखें ॥ ऐसीं वचनें महा तेखें ॥ बोलता जाहला वीरभद्र ॥२३॥

ऐकें प्रथमभूत जें मही ॥ तें सद्योजात मुख पाहीं ॥ दुजें आप तें मुख पाहीं ॥ वामदेव ॥२४॥

आतां अघोर मुख तेज ॥ वायु तत्त्वपुरबीज ॥ ईशान मुख तें जाण सहज ॥ आकाश पैं ॥२५॥

वीरभक्र ह्मणे हो हरी ॥ येकवीस स्वर्गीवरी ॥ तिहीं देवांचिये उपरी ॥ तेज शिवाचें ॥२६॥

तयाचे चरणपंकजीं देव ॥ तिन्ही जन्मले सावयव ॥ ऐसें आपुलें असोनि वैभव ॥ नाठविशी तूं ॥२७॥

मी महेशाचा अवतार ॥ जटेपासूनि उद्नार ॥ उप्तत्ती आणि संहार ॥ मज मीचि असें ॥२८॥

अहो सृष्टी रचावयासि हरें ॥ सुनीळ लोहित शंकरें ॥ ललाटीं रचिला आदरें ॥ तो हा चतुरानन ॥२९॥

ह्मणोनि विधिरूपें करोनी ॥ ब्रह्मांड निर्मिता शूळपाणी ॥ तो येथें पातला ये क्षणीं ॥ सृष्टिकार्यार्थ ॥१३०॥

ह्मणोनि आपण अशेष ॥ महादेवा मानावें विशेष ॥ वराह कूर्म आणि शेष ॥ वंदिती जया ॥३१॥

तुझें इतुकेंचि थोरपण ॥ लेंकुरा काय जाणपण ॥ अहंकार स्फुरे जाण ॥ तुझा ठायीं ॥३२॥

भक्त रक्षिला हा महा उपकार ॥ परि जगासि जाहला अपकार ॥ वायां विण अनुपकार ॥ अवतरलासी ॥३३॥

आतां महादेवाकारणें ॥ तूं निंदितोसि कवण्या गुणें ॥ नाहीं करणें ना संहारणं ॥ तुझ्या ठायीं ॥३४॥

युगायुगीं तूं अवतार घेसी ॥ परि ईश्वरासी शक्ति मागसी ॥ तेणें मग तूं जिंकसी ॥ प्रबळ दैत्यां ॥३५॥

कुलांलचक्राचिये परि ॥ हरें भवंडिलासि मुरारी ॥ हें तुझें कर्म अवधारीं ॥ शिवाजवळी ॥३६॥

शिवें आपुले मुंडमाळे ॥ तुझें शिर वोंविलें स्वलीळे ॥ तें तूं विसरलासि ये वेळे ॥ कर्तुत्व शिवाचें ॥३७॥

तुझिये वराहरूपाच्या दाढा ॥ शिवे मोडिल्या कडकडा ॥ तो कडाडीचा पंवाडा ॥ विसरलासि कीं ॥३८॥

जननीयेनें उपकार केले ॥ ते बाळक कैसें विसरलें ॥ शूळाचिये अणीसि रक्षिलें ॥ तें विसरलासी ॥३९॥

दक्षयज्ञीं दक्षाचें शिर ॥ छेदिलें म्या मह थोर ॥ कीं तुझिया पुत्राचें पांचवें शिर ॥ म्यां छेदिलें देखा ॥१४०॥

त्या दिवसापासोनि चारी मुखें ॥ ब्रह्मयासि मी देखें ॥ तो चतुरानन येणें विशेषें ॥ जाहला देखा ॥४१॥

ब्रह्मयाचें खंडिलें शिसाळ ॥ तैंचि देखिलें तुझें बळ ॥ तूं लाजसी ना विवेकशीळ ॥ बोलतां वाणी ॥४२॥

शिवें उघडोनि तृतीय नयन ॥ क्षणें जाळिला तवपुत्र मदन ॥ आणि त्रिपुरकदंव वधोन ॥ त्रिपुरारी नाम पावला ॥४३॥

मरुध्वजाचिये युद्धीं ॥ हरी हारविलें तुज आधीं ॥ दधीचियें जिंतिलसि तघीं ॥ तें नाठविशी तूं ॥४४॥

वेदपुराणवाचा परियेसा ॥ जेणें पावविल्या आकाशा ॥ ऐसिया शिवा महेशा ॥ विसरलासि कैसा ॥४५॥

विषविद्यें जाळिलासी ॥ सर्वांगी अवघा पोळलासी ॥ प्रळयकाळीं जोजावलासी ॥ तें विसरलासि कां ॥४६॥

शिवें तुजकारणें चक्र निर्मिलें ॥ ह्मणोनि चक्रपाणी नांव पावलें ॥ तयासि तुवां निंदिलें ॥ तरी जय कैसा ॥४७॥

त्याची तुजवरी प्रीती आथी ॥ तरी अप्रीति कां धरिसी श्रीपती ॥ आतां सांग रे कवणें प्राप्ती ॥ धरिलीस चाड ॥४८॥

तूं याचक द्वारीं ॥ पत्‍नी वसे दुजियाचे मंदिरीं ॥ येकाचा चरण उरावरी ॥ अद्यापि असे ॥४९॥

क्षीरसागरीं शैषशयन ॥ शंभुचें फेडावया ऋण ॥ आता मिरवितोसि संत्राण ॥ नृसिंहरूपें ॥१५०॥

शास्त्रें आंगम निर्गम ॥ स्थावर आणि जंगम ॥ असुरसुरादि कर्माकर्म ॥ शिवाधिष्ठित ॥५१॥
असो हे कथा स्कंदपुराणी ॥ कथिली असे विस्तारूनी ॥ कीं वीरभद्र बोलिला वाणी ॥ नृसिंहाजवळी ॥५२॥

परि अग्निपुराणींची मात ॥ कीं शरभरूपें उमाकांत ॥ आला नृसिंहविदारणार्थ ॥ तिये वेळीं ॥५३॥

आतां असो हें शरभरूप ॥ वीरभद्रासि आल कोप ॥ विष्णूसि तेणें हाणोनि थाप ॥ शक्तिहीन पैं केला ॥५४॥

ऐसीं कथा पुण्यपावन ॥ दोष हराया कारण ॥ ब्रह्महत्येचें नासे दूषण ॥ श्रवण केलिया ॥५५॥

ऋषिमताविण बोलणें ॥ तें विघवेचें जणूं श्रृंगारणें ॥ तैसें ग्रंथीं पडे उणें ॥ नसतां साक्ष ॥५६॥

हरिवंशीं आणि भागवतीं ॥ व्यासें कथिलीसे भारती ॥ परि हे भिन्न ग्रं थमती ॥ असे राया ॥५७॥

भारता आतां याचिये उपरी ॥ पुढील कथा अवघारीं ॥ ऐसें बोलिलें ऋषीश्वरीं ॥ ह्मणे कृष्णाज्ञवल्की ॥५८॥

॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ सप्तमस्तबक मनोहरु ॥ शरभआख्यानप्रकारू ॥ सप्तमोऽध्यायीं कथियेला ॥१५९॥

॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP