कथाकल्पतरू - स्तबक ७ - अध्याय २

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जन्मेजय ह्मणे कर जोडोन ॥ मुने तूं महाज्ञानघन ॥ तुज‍ऐसा आन कवण ॥ नसे भूमंडळी ॥१॥

नानापुराणींची वाणी ॥ कल्पतरू रचिला विचारूनी ॥ कीं स्वर्गीहूनि भुवनीं ॥ आणिली भागीरथीं जेवीं ॥२॥

आवडीं पुसें राजा भारत ॥ चौदामनूंचा कैसा वृत्तांत ॥ निर्माण आणि कल्पपरियंत ॥ किती आयुष्य ब्रह्मयाचें ॥३॥

तंव ह्मणें वैशंपायन ॥ राया चारयुगाचें प्रमाण ॥ मागांचि केलें असे कथन ॥ प्रथमस्तबकीं ॥४॥

असो चारियुगांची येक चौकडी ॥ ऐसें बोलिला मार्कडीं ॥ आतां मनु ह्मणीजे चौदा चौकडी ॥ प्रमाण होय ॥५॥

चौदा चौकडिया येक मनु ॥ छपन्नयुगें अनुमानु ॥ तेंचि येका मनूचें प्रमाणु ॥ येकत्रपणें ॥६॥

चौदामनूंचा येक कल्प होय ॥ तैं पृथ्वी आकाश विलया जाय ॥ मेरु उदकमय होवोनि राहे ॥ चंद्रसूर्य विरोनि जाती ॥७॥

तेथें कैंची दिनराती ॥ प्रळयो ना गुप्तशांती ॥ न दिसे चराचरस्थिती ॥ येकमय सर्व ॥८॥

आतां दैवयुगीं येकाहात्तरीं ॥ काळ भोगे येके मन्वंतरीं ॥ ऐशा चौदा मनूंच्या येकत्रीं ॥ येक कल्प ॥९॥

ऐसे कल्प अनंत ॥ तें ब्रह्मयाचें आयुष्यगणित ॥ मागुती विधि नाश समस्त ॥ होतसे पैं ॥१०॥

ब्रह्मा असो सृष्टिकरिता ॥ विष्णु जाणिजे प्रतिपाळिता ॥ आणि रुद्र संहारिता ॥ अंतीं होय ॥११॥

तंव बोलिला जन्मेजयो ॥ मुनें तूं ज्ञानगंगेचा डोहो ॥ तरी अनंतब्रह्मयां येवोजावो ॥ कवणे गुणें ॥१२॥

येणें जाणें ॥ तें सांग गा कवणे गुणें ॥ कीं गंगावाळुवेचें सांडणें ॥ तैसा इंद्राचा येवोजावो ॥१३॥

ईश्र्वरासि नाहीं गर्भवास ॥ हा कवण जाणे उपदेश ॥ तरी श्रीकृष्णासि गर्भवास ॥ कवणें गुणें ॥१४॥

मग ह्मणे मुनेश्वर ॥ ब्रह्मयासि शास्त्री व्यापार ॥ ह्मणोनि गर्भवासाचा भर ॥ पडे मागुता ॥१५॥

शास्त्रे शोधावया लागला ॥ तेणे मूळध्यान विसरला ॥ तंव शुभाशुभीं गुंडाळला ॥ सृष्टिलागोनी ॥१६॥

इंद्राची तरी वासना ॥ घेवों पाहे त्रिभुवना ॥ ह्मणोनियां कर्मबंधना ॥ पडे फांसां ॥१७॥

कोटिविष्णूंचें येणें जाणें ॥ गुंतला सृष्टीचे प्रतिपाळणें ॥ तैं आदिरूपासि विसरणें ॥ ह्मणोनि गर्भवास ॥१८॥

आतां ईश्वराचा अंश ॥ तो राहिला आदिपुरुष ॥ ह्मणोनि किंचित ध्यानें महेश ॥ मिळाला विश्वरूपीं ॥१९॥

तेणें कामक्रोध माया ॥ तोडोनि कल्पनेची छाया ॥ मग कर्मव्यापार विलया ॥ दवडिला सर्व ॥२०॥

आतां असो हा संकेत ॥ राया त्वां पुसिला वृत्तात ॥ तयाची ऐक गा मात ॥ गुप्तार्थपणें ॥२१॥

आतां असो हे येथ कथा ॥ बहुकाळांची जीर्ण भारता ॥ प्रसंगमात्रें नसे अनुचिता ॥ कथिली तुज ॥२२॥

असो चौदामनूंची रचना ॥ ते तुज सांगों गा सुजाणा ॥ येकवीस कल्प गणना ॥ मार्कडेया आयुष्य ॥२३॥

तया मार्कडेया कारणें ॥ साक्षी ठेविला नारायणें ॥ कीं चतुर्दशमनुंचें करणें ॥ सांगावया सकळां ॥२४॥

तंव ह्मणे वैशंपायन ॥ ब्रह्माया कथी मार्कडेय आपण ॥ तेचि कथा विस्तारून ॥ बोलिली असे ॥२६॥

हें मार्कडेयपुराणींचे विदित ॥ तेणें ब्रह्मया केलें श्रुत ॥ ब्रह्मयानें कथिलें समस्त ॥ व्यासमुनीसी ॥२७॥

ते तुज सांगों मूळकथा ॥ व्यासमुखीचीं तत्वता ॥ तरी ऐकें गा भारता ॥ येकचित्तें ॥२८॥

कीं पूर्ण जालिया वोते घट ॥ नदी भरलिया पूरासि वोहट ॥ अथवा तंतु तुटलिया पट ॥ नासे जैसा ॥२९॥

नातरी जगतीं चढलिया कळस ॥ कीं पूणिंमेअंतीं चंद्रकरां नाश ॥ तैसें पूर्ण जालिया आयुष्य ॥ नाश जीवांसी ॥३०॥

तैं सकळ नासे चराचर ॥ परि येक वांचे निर्गुण अक्षर ॥ तया दृष्टांत द्यावया येर ॥ आथीच ना ॥३१॥

असो सतरालक्ष अठ्ठवीस सहस्त्र अंग्री ॥ बारालक्ष शाण्णव सहस्त्रीं ॥ लक्ष आठ चौसष्टी द्वापारी ॥ कली बत्तीस सहस्त्र चारलक्ष ॥३२॥

ऐसीं चारीयुगें येकवटलिया ॥ ते चौकडी बोलिये राया ॥ चौदा चौकडी मिळालिया ॥ होय येक मनु ॥३३॥

ते चौदामनु गुणिलिया ॥ येक कल्प बोलिजे तया ॥ ऐसे येकवीस कल्प जालिया ॥ ब्रह्मयाचा स्वल्प काळ ॥३४॥

येकवीस कल्प चौगुण केलिया ॥ विरिंचिदेवाची येक घडिया ॥ असो चौदा मनु मेळविलिया ॥ ब्रह्मयाचा दिवस येक ॥३५॥

सहस्त्र कल्प जालियावरी ॥ ब्रह्मया होय संहारी ॥ मग विधि नासे चराचरीं ॥ उप्तत्तिस्थितीचा ॥३६॥

ऐसें ब्रह्मयाचें पुरे गणित ॥ तैं पातकांचें होती पर्वत ॥ मग स्वयें होय निद्रिस्थ ॥ आदिमूर्ती ते ॥३७॥

तेव्हां योगमायेचे संगतीं ॥ सर्वींच्या येकवटती शक्ती ॥ तो सृष्टीनाश गा भूपती ॥ चराचराचा ॥३८॥

कळा मिळती बारादिनकरां ॥ तृतियनेत्रीच्यां वैश्र्वानरा ॥ सर्वांगर्भीचिया अंगारा ॥ येकवट होय ॥३९॥

येकचि उठे प्रळयज्वाळा ॥ ते शोषी सर्वत्र जळा ॥ समुद्र वनें अष्टकुळाचळां ॥ सहपृथ्वीनाश ॥४०॥

ऐसें दाहोनि भूमंडळीं ॥ तो अग्नि जाय पाताळीं ॥ मग अमृत शोषिनि नागकुळीं ॥ करी नाश ॥४१॥

तेव्हां पंचतत्वांची नाश ॥ दशप्राणांचा ओरस ॥ होवोनि राहे येका‍अंश ॥ सर्वात्मपणें ॥४२॥

त्या उपरी महावात उठी ॥ तो अग्नीसी घाली पोटीं ॥ रक्षा येकवटोनि वरी वृष्टी ॥ होय पैं ॥४३॥

तो वर्षाव महाधारीं ॥ तेव्हां पाताळ ना स्वर्ग धरित्री ॥ उदकमय दिगंतरीं ॥ पसरे तेव्हां ॥४४॥

मग जाणोंनये दुसरें ॥ येकचि तेज निद्राकरें ॥ तें प्रळयांती सर्वेश्वरें ॥ केलें धारण ॥४५॥

उदकामध्यें शून्यस्थानीं ॥ तेथें तयाची राजधानी ॥ स्वयें असे सुखशयनीं ॥ विराट तो ॥४६॥

मग तो दिव्यसहस्त्रयुगें ॥ निद्रिस्थ योगमायेचे संगें ॥ परि उत्पत्तिबीजें सहांअंगें ॥ तयाचेनी ॥४७॥

सकळही देहदेवता ॥ तेथें मिळती गा भारता ॥ जैसी गंगानदी दृष्टांता ॥ सागरासी ॥४८॥

वात प्राण चक्षुरदिती ॥ सर्व मिळती इष्टदैवतीं ॥ आणि त्या देवता कल्पांतीं ॥ मिळती अनंता ॥४९॥

परि शुभाशुभ कारणस्थिती ॥ हे जीवरूपीं घनभूती ॥ अयागमनासि कारण ती सर्वजीवां ॥५०॥

सर्वजीवांचा जालिया क्षयो ॥ उदकें डळमळे ब्रह्मकटाहो ॥ परि येक राखिजे मार्कडेयो ॥ गोविंददेवें ॥५१॥

जो चौदाही प्रळयांची वार्ता ॥ सुषुप्तिअवस्थें असे देखता ॥ तो मार्कडेय गा भारता ॥ राखिला देवें ॥५२॥

ऐसें प्रथमप्रळ्याचें मान ॥ अवसानीं होय सृष्टि निर्माण ॥ तें येकामनूचें प्रमाण ॥ जाण राया ॥५३॥

मार्कंडेय जंव उघडी लोचन ॥ तंव सृष्टीविना देखे तारागण ॥ असो जन्मेजय ह्मणे आपण ॥ सांगा पुढील ॥५४॥

कैसा भानु प्रकाशला ॥ कैसा सृष्टिक्रम विस्तारला ॥ कवण मनु प्रथम जाहला ॥ लोकांमाजी ॥५५॥

मुनि ह्मणे ऐकें भारता ॥ हे मार्कंडेयप्राणींची कथा ॥ तरी स्वायंभुव मनु प्रथमतः ॥ जाहला सृष्टिप्रर्तक ॥५६॥

पर्वत वनें अग्नि जीवन ॥ पंचभूतें दश प्राण ॥ वाच देव सत्वादि त्रिगुण ॥ स्वायंभुमनु प्रसवला ॥५७॥

मनुची उठिली श्र्वासज्योती ॥ तेणें पंचभूतांची उत्पत्ती ॥ तो सहजकला स्वयंज्योती ॥ प्रसवे मनु ॥५८॥

सप्तसमुद्रादि पर्वती ॥ फळीं पुष्पीं पूर्ण वसुमती ॥ परि उद्दस गा भूपती ॥ देखे ऋषी मागिल्या ऐसें ॥५९॥

मग तो मनुप्रळयनीरीं ॥ मार्कडेय फिरे विश्वोदरीं ॥ हिंडतां हिंडतां तीर्थयात्रीं ॥ मुखाबाहेर पडीयेला ॥६०॥

ऐसी स्वायंभुमनूची कथा ॥ मार्कडेयें देखिली अवस्था ॥ पुढें ऐकें गा भारता ॥ येकचित्तें ॥६१॥

मार्कंडेय देखे अंधकार ॥ चंद्र तारा ना दिनकर ॥ उदकमय ऋषेश्वर ॥ देखे सकळ ॥६२॥

मग भिवोनियां ऋषिरावो ॥ ह्मणे जाहला मनुप्रळयो ॥ ह्मणोनि करी मार्कंडेयो ॥ स्मरण देवाचें ॥६३॥

जयजयाजी सर्वेशा ॥ तूं उप्तत्तिस्थितिनाशां ॥ करिता अससी आद्यपुरुषा ॥ अनंता जी ॥६४॥

जयजयाजी महद्भूता ॥ सगुणनिर्गुणा अव्यक्ता ॥ त्राहें त्राहें अनंता ॥ कृपाळुवा ॥६५॥

ऐसी ऋषीनें स्तुति करितां ॥ देवो जाहला जागृता ॥ तये अवस्थे सरिसा अवचिता ॥ पडिला स्वारोचिष मनु ॥६६॥

तवं वासना उपजली ॥ तेजेंविण सावली भली ॥ ते मनूशीं विस्तारूं लागली ॥ अभिलाषपणें ॥६७॥

असो नमन करोनि शिरसा ॥ मुनि ह्मणे गा दिव्यप्रकाशा ॥ तुह्मी कवण आदिपुरुषा ॥ सांगिजे मज ॥६८॥

तंव सहस्त्रशीर्षा दे उत्तर ॥ ह्मणे मी अभेद अक्षर ॥ यज्ञवराह पुरुषेश्वर ॥ तोचि मी जाण ॥६९॥

तेज वायु षोडश‍अंश ॥ पृथ्वी आप चंद्र दिनेश ॥ समुद्र वनें आसमास ॥ उत्पत्ति माझी ॥७०॥

ऋत्विज आणि बीजप्रकाश ॥ औषधींचे अंशाशं ॥ तारा मेरु दिशा अंश ॥ सर्व माझीं ॥७१॥

ऐसा बोघोनि मार्कंडेयो ॥ अदृश्य जाहला देवाधिदेवो ॥ तैं द्वितीयमनूचा प्रभवो ॥ जाहला मग ॥७२॥

त्याचिये प्रळयीं ऋषि चिंतातुरु ॥ ह्मणे मी येकला काय करूं ॥ तंव मुखीहूनि मुनेश्र्वरू ॥ पडला मागुता ॥७३॥

तयासि जाहलें स्वप्नगत ॥ तीर्थयात्रा असे करित ॥ मागील विसरला समस्त ॥ सचिंतपणें ॥७४॥

ऐसा जाहला दुसरा मनु ॥ जो संचला सर्वगुणु ॥ तंव सकळ आयुष्य पुरोनु ॥ जाहला क्षयो ॥७५॥

क्षय जालिया नंतरीं ॥ स्वर्ग पाताळ ना धरित्री ॥ प्रळयोदकीं निराकारीं ॥ अंधकार सर्व ॥७६॥

मागुता मुनी तीर्थें करितां ॥ मुखाबाहेर पडिला अवचिता ॥ तंव उदकमय गा भारता ॥ देखिलें सर्व ॥७७॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ फेडाजी मनींचा संदेहो ॥ तिसरा मनु मार्कंडेयो ॥ देखे कैसा ॥७८॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं श्रोता विचक्षण ॥ तरी ऐकें चित्त देऊन ॥ तिजा मनु उत्तम तो ॥७९॥

जैं तो मनु आकारला ॥ तैं चंद्रसूर्याचा प्रकाश जाहला ॥ तयांचा असे जन्म जाहला ॥ तेजापासाव ॥८०॥

ऐसा तिजा मनुरावो ॥ तया अवसानीं जाहली दिवटी ॥ आणि त्या आदिपुरुषाचे दृष्टीं ॥ पडला प्रकाश ॥८१॥

ऐसा तिजा मनुरावो ॥ तया अवसानीं जाहला प्रळयो ॥ मग यात्रा करी मार्कडेयो ॥ प्रळयो दकीं ॥८२॥

आतां जाणीजे चौथा मनु ॥ तामस नामें प्रभाधनु ॥ तया प्रसवला आदिविष्णु ॥ चंद्रसूर्यासह ॥८३॥

विष्णूचि असतां जळशयन ॥ आप प्रसवलें तेजपूर्ण ॥ मुक्ताफळापरि बिंबवर्ण ॥ जाहलें आपाचें ॥८४॥

असो त्या आपापासुनी ॥ बिबें जाहले चंद्र दिनमणी ॥ मग सृष्टिविस्तारखाणी ॥ जाहली पंचतत्वमय ॥८५॥

त्याचिये प्रळयीं वट येक अकल्पित ॥ उदकावरी असे तरत ॥ बाळक येक असे निद्रिस्थ ॥ वटाचे पत्रीं ॥८६॥

तंव तो मार्कडेय मुनी ॥ मागुता पडे उदरभुवनीं ॥ परि वटवृक्षाची खांदी देखोनी ॥ जाहला विस्मित ॥८७॥

तो वृक्ष उदकावरी तरत ॥ सर्वसृष्टीचा विस्तार तेथ ॥ स्वर्ग मृत्यु पाताळ भरित ॥ पुरोनि उरला ॥८८॥

वृक्षा तीन पेडें येक मुळी ॥ सहा फांटे चार डहाळी ॥ अठरा पारंबे पत्री फुलीं ॥ अनंत तो ॥८९॥

पत्रीं बाळ देखतां नयनीं ॥ मार्कंडेयो हरुषला मनीं ॥ चरणांगुष्ठ घालोनि वचनीं ॥ करीत पान ॥९०॥

तेणें विस्मयो जाहला ऋषिवरा ॥ ह्मणे मी जागा कीं निजसुरा ॥ तंव बाळ ह्मणे ऋषीश्वरा ॥ मार्कडेयासी ॥९१॥

ह्मणे मार्कंडेया बाळका ॥ अरुंता येई न घरीं शंका ॥ तंव ऋषि कोपोनि तवका ॥ बोले तयासी ॥९२॥

ह्मणे येकवीसकल्प तत्वतां ॥ जन्म गेलें मज देखतां ॥ तरी मज ह्मणसी बालकता ॥ कवणे गुणें ॥९३॥

मग ह्मणे तो वटेश्वर ॥ तुझे जनकें मागीतला वर ॥ कीं चिरायु करावा कुमर ॥ माझा तुह्मीं ॥९४॥

ह्मणोनि येकवीसकल्प गणना ॥ तूं चिरायु जालासि ब्राह्मणा ॥ परि बाळ ह्मणतां साभिमाना ॥ पाडलासि कीं ॥९५॥

ऐसें वचन ऐकोनि मुनी ॥ धांवोनि लागला तयाचे चरणीं ॥ सन्ददित बोले वचनीं ॥ तया बाळकासी ॥९६॥

ह्मणे तूं कोण गा प्रसिद्ध ॥ येरु ह्मणे मी बालमुकुंद ॥ हा दावाया प्रळयविनोद ॥ रक्षिलें तुज मीचि पैं ॥९७॥

चौदा प्रळयांचें अवसान ॥ तें दाखवाया रक्षिलें जाण ॥ प्रसिद्ध कराया सकळां लागुन ॥ मार्कंडेया तुज ॥९८॥

हें माझें प्रळयचरित्र ॥ जगीं करावया विस्तार ॥ तरी सृष्टिरचना चराचर ॥ सांगें जगासी ॥९९॥

मग मार्कंडेयो करी स्तुती ॥ जयजयाजी कमळापती ॥ तंव अदृश्य जाहली मृर्ती ॥ बालमुकुंदाची ॥१००॥

ऐसा जाहला मनुप्रळयो ॥ अंधकारामध्यें सुदेवो ॥ मग राहिला सृष्टिउपावो ॥ विस्ताराचा ॥१॥

याचिये पुढें पांचवा मनु ॥ भारता सांगे वैशंपायनु ॥ रायें ऋषि सन्मानुनु ॥ बोलती गुज ॥२॥

ह्मणे जंव मार्कडेय मुनी ॥ पडिला देवाचिये वदनीं ॥ उदकमय सर्व देखोनी ॥ करी तीर्थयात्रा तो ॥३॥

जव आला सृष्टिरचनेचा अवसर ॥ तंव देवें केला हुंकार ॥ तो महाशब्द गंभीर ॥ त्रिभुवनीं गा ॥४॥

नादें जाहला महाशब्द ॥ तेणें प्रलयजळा पडिलें छिद्र ॥ तेंचि बोलिजे निराकार ॥ आकाश पैं ॥५॥

आतां रैवत मनु परिस ॥ तयाचा हुंकारें जाहला विकास ॥ सवें चंद्र्सूर्याचा प्रकाश ॥ जाहला हुंकारें ॥६॥

तें आकाश प्रसवलें मारुता ॥ तेणें उदक आटलें भारता ॥ तंव वायुउदकासि होतां अन्विता ॥ उपजला वन्ही ॥७॥

तया अग्नीची उठिली ज्वाळा ॥ तयेनें शोषिलें प्रळयजळा ॥ मग वायु अग्निसवें निर्मळा ॥ उपजलें जीवन ॥८॥

मग हरीचें नाभिकमळ ॥ माजी उदेलें सहस्रदळ ॥ कनककांती अति निर्मळ ॥ आन‍उपमा ॥९॥

तया अठरा केसर सोज्ज्वळ ॥ मध्यस्थानीं असे निर्मळ ॥ तो महामेरु श्रीशैल ॥ त्रिभुवनावरी ॥११०॥

त्याचिये गर्भाचा आमोद ॥ ते समुद्र जाहले अगाध ॥ आणि मळविकार ते प्रसिद्ध ॥ जाहली पृथ्वी ॥११॥

ऐसा कमळा जाहला विकास ॥ तयामाजी ब्रह्मा हंस ॥ चतुर्मुखांहें महाघोष ॥ चहूंवेदांचा ॥१२॥

तंव जन्मेजय ह्मणे वचनीं ॥ कीं त्रिगूण जाहलें कैसेनी ॥ हें स्वामी कृपा करोनी ॥ सांगिजे मज ॥१३॥

मग ह्मणें वैशंपायन ॥ राया तयांचा ऐकें प्रश्न ॥ सत्व रज तम हे त्रिगूण ॥ युकत जाहला आदिदेवो ॥१४॥

तो सत्वें विष्णू अवतरला ॥ रजें ब्रह्मा विस्तारला ॥ तमगुणें रुद्र जाहला ॥ आदिमूर्तीं ॥१५॥

आदिमूर्तींचा अंशवाबो ॥ ब्रह्मा नाभिकमळीं देवो ॥ शंकरा ललाटीं सामावो ॥ हृदयीं विष्णु देखा ॥१६॥

ऐसा देव त्रिगुणात्मक ॥ विचारितां तरी तो येक ॥ आदिविष्णु स्वयंप्रकाश ॥ विश्वंभर तो ॥१७॥

मग विष्णूचे कर्णमळापासून ॥ दैत्य उद्भवले दोघेजण अ॥ महाबळिये मदघन ॥ मघुकैटभ ॥१८॥

तये मधुकैटभांची कथा ॥ प्रथमस्तबकीं अस भारता ॥ कथिलेंचि कथणें यथार्था ॥ अनुचित होय ॥१९॥

असो त्याचिये मेदाची घाणी ॥ जीवन गोठोनि जाहली अवनी ॥ तेणे गुणनाम जाहलें मेदिनी ॥ मेदास्तव ॥१२०॥

मग ब्रह्मयानें समग्र ॥ हें रचिलें चराचर ॥ पूर्वकर्माचें गळसर ॥ बांधिलें तया ॥२१॥

परि ते बंधु उभयतां ॥ देवें धाडिले मुक्तिपंथा ॥ हे हरिवंशींची कथा ॥ सांगीतली तुज ॥२२॥

ऐसें ऐकतां जन्मेजयो ॥ पुसी करिता होय रावो ॥ ह्मणे सांगा जी पुढील भावो ॥ वैशंपायना ॥२३॥

पांचव्या मनूचिये अंतीं ॥ सांगा कैसी जाहली स्थिती ॥ आणि साहवा मनु कवणे गतीं ॥ विस्तारला ॥२४॥

मग ह्मणे वैशंपायनु ॥ चाक्षूष नामें साहवा मनु ॥ तो हुंकारपवनापासुनु ॥ जाहला राया ॥२५॥

पवना प्रसवला ॥ आदिपुरुष ॥ तंव आकारले चंद्र दिनेश ॥ चाक्षुषमनूचा आदि प्रकाश ॥ जाहला तेथें ॥२६॥

परि कोणे येके कल्पांतीं ॥ कीं हिरण्यगर्भापासूनि उप्तत्ती ॥ हे विष्णुपुराणींची मती ॥ कथिली असे ॥२७॥

हुंकारगर्भीचा मारुत ॥ तो प्रसवला लवथवीत ॥ मग बुहुद जाहला अकल्पित ॥ बहुतां काळें ॥२८॥

आतां असो हा चाक्षुषमनु ॥ पुढें सांगेल वैशंपायनु ॥ ती कथा नाम सगुणु ॥ ह्मणे कॄष्णयाज्ञवल्की ॥२९॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ सप्तमस्तबक मनोहरू ॥ मनुउत्पत्तिप्रळयविस्तारू ॥ द्वितीयाध्यायीं कथियेला ॥१३०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP