कथाकल्पतरू - स्तबक ७ - अध्याय ४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

रायासि ह्मणे वैशंपायन ॥ कीं तुजसी सांगो येक प्रश्न ॥ जेणें सुखिया होय मन ॥ वैष्णवाचें ॥१॥

तरी चारीवाचांची कवणे गुणीं ॥ जाहली राया उभवणी ॥ आतां परावाचा बोलोनी ॥ पश्यंती मग ॥२॥

मध्यमा वैखरी अणुरवाचा ॥ ऐशा बोलिजे चारी वाचा ॥ तरी अनुभव ऐकें तयांचा ॥ भारता गा ॥३॥

या पंचतत्वांपासूनी ॥ मन बुद्धी अहंकार आणी ॥ ऐसा विस्तार त्रिभुवनीं ॥ जाहला राया ॥४॥

अहंकारें आकाशापासूनी ॥ बुद्धितेजातें प्रसवली खाणी ॥ आणि मन अपमाचे भुवनीं ॥ प्रसवलें असे ॥५॥

चित्त वायुपोटीं उपजलें ॥ परि पंचतत्वीं प्रकाशलें ॥ मग ज्ञानें बोध पावलें ॥ जन्मेजया गा ॥६॥

आकाशाचें मुख कर्ण ॥ वायूचें मुख त्वचा जाण ॥ तेजाचें मुख असती नयन ॥ ऐसी विस्ताररचना ॥७॥

आपाचें मुख असे रसन ॥ ते जिव्हा बोलिजे जाण ॥ आणि पृथ्वीचें मुख वदन ॥ असे राया ॥८॥

आतां ऐकें विषयविचार ॥ आकाशाचा शब्द आहार ॥ स्पर्श रूप रस गंध परिकर ॥ अनुक्रमेंसीं ॥९॥

फळादिकीं आपाचें वर्तन ॥ ते पृथ्वी षड्रसपक्कन्न ॥ आतां चवी सांगों विस्तारून ॥ भारता तुज ॥१०॥

आप गोड पृथ्वी आंबट ॥ तेज चोखट वायु तुरट ॥ आकाश असे कडवट ॥ आतां वर्ण परियेसीं ॥११॥

पृथ्वी पीत आप श्वेत ॥ वायु नील अग्नी लोहित ॥ आकाश कृष्णलोहित मिश्रित ॥ असे राया ॥१२॥

पृथ्वी गुणें निद्रा करी ॥ आप रुचि घे सेवोंपरी ॥ तेजें देखत असे नेत्रीं ॥ वायु गती आकाश पोकळ ॥१३॥

ऐकें यांचें आतां प्रमाण ॥ तेजे अंगुळे आठ चारी जीवन ॥ वायु अंगुळें बारा जाण ॥ आकाश षोडशांगुळ ॥१४॥

आपाचें शस्त्र असे सुरी ॥ वायुंचे तरी तरवारी ॥ पृथ्वी फरस अंकुशघरी ॥ आकाशाचा बाण ॥१५॥

ह पंचतत्वांचा पंचविंश ॥ विस्तारला असे अंश ॥ आतां ऐकें त्रिगुणप्रकाश ॥ वाढला कैसा ॥१६॥

सत्व रज तम परियेसें ॥ तीन गुण असती ऐसे ॥ सत्व विष्णु रज ब्रह्मा असे ॥ शूळपाणी तम ॥१७॥

सत्व गौर रज सांवळें ॥ तम तें कृष्णवर्ण काळें ॥ आतां सांगों जन्में निर्मळें ॥ त्रिगुणांचीं पैं ॥१८॥

सत्व पृथ्वी पासोनि जन्मलें ॥ रज आपीं उपजलें ॥ तमासि तेज प्रसवलें ॥ ऐसा त्रिगुणातील विष्णु हा ॥१९॥

सत्वें सात्विक रजें राजसू ॥ तमें बोलिजे तामसु ॥ ऐसी त्रिगुणलक्षणीं अशेषु ॥ जाहली रचना ॥२०॥

नाभीं वसिन्नला समान ॥ हृदयीं स्थापिला असे प्राण ॥ आणि गुदद्वरीं अपान ॥ कंठी उदान राहिला ॥२१॥

आतां वासना नानामूळ ॥ अहंकार‍अंश निर्मळ ॥ ते त्रिगुणां व्यापूनियां सकळ ॥ प्रसवली राया ॥२२॥

मनाचें मुख निशापती ॥ पवनाचा जाणिजे गभस्ती ॥ तेथें चित्तविकासस्थिती ॥ उद्भवे राया ॥२३॥

चित्त हृदयीं सर्वांगीं ॥ हेतु असे पांचां अंगीं ॥ बुद्धिमनाचेनि भोगीं ॥ आतां असो हीं पंचतत्वें ॥२४॥

ते कुंडलिनी आधारिक ॥ जाणों आकाशाचें मस्तक ॥ पृथ्वी अधिष्ठान वायु नासिक ॥ आप तें कंठमध्य ॥२५॥

ऐसीं पिंडब्रह्मंड स्थिती ॥ ब्रह्मांडा ऐसी पिंडोत्पत्ती ॥ स्वाधिष्ठान बोलिजती ॥ उपकंठी राया ॥२६॥

तये स्वाधिष्ठान‍उपकंठीं ॥ मणिपूराचे तळवटीं ॥ शोणीतशुक्र येकवटीं ॥ गर्भोप्तत्ति होय ॥२७॥

तयासि फुटतां अंकुर ॥ तेथें पंचईद्रियां विस्तार ॥ निर्वाळपणें निर्धार ॥ तत्वांसहित ॥२८॥

पोटीं पाठीं पवन उठत ॥ मग शब्दकळा उमटत ॥ अशेषपणें शुक्रसहित ॥ शोणिता भेटी ॥२९॥

प्रथममासीं होय आकार ॥ अष्टधातु पांच सर ॥ संचित क्रियमाण प्रारब्ध थोर ॥ वर्तमान पैं ॥३०॥

कलल अंड दुसरे मासीं ॥ अंकुर‍उप्तत्ती तिसरियासी ॥ चवथ्या बाह्मनाडी स्थानासी ॥ उद्भवणी होय ॥३१॥

यानंतरें पंचतत्वांसहित ॥ अस्थिमांस होती पांचव्यांत ॥ आणि साहव्या मासीं गणित ॥ होय आंगोळिया रोमावळीं ॥३२॥

नासिक आणि नेत्रठसा ॥ सातवे मासीं जीवप्रकाशा ॥ प्रात्प होय पवनां दशा ॥ आठव्यांत ॥३३॥

पुढें आठवे मासावरी ॥ पिंडब्रह्मंड सविस्तरीं ॥ संपूर्ण अंश जीवा भीतरीं ॥ मासीं नववे ॥३४॥

दाहव्याची पडतां छाया ॥ मग प्रसुती होय माया ॥ परि या पिंडा जालिया ॥ नाश प्रळयीं ॥३५॥

ऐसा पिंड रचिन्नला ॥ माजी सूक्ष्मजीव संचरला ॥ तो शंखिनीनळिकें ओतिला ॥ गर्भस्थानीं ॥३६॥

ऐसा ऐकोनियां बोला ॥ ह्मणे प्रळयांतीं कोठें सामावला ॥ हें जन्मेजय पुसों लागला ॥ वैशंपायनासी ॥३७॥

मग ह्मणे वैशंपायन ॥ राया तूं महाविचक्षण ॥ तरी ऐकें चित्त देऊन ॥ निर्गमस्थिती ॥३८॥

स्थूळपिंड ब्रह्मांडीं मिळे ॥ पृथ्वीसि पृथ्वी भेंसळें ॥ तेजीं तेज वायु अनिळें ॥ आकाशीं आकाश ॥३९॥

पांचांपाठिये पंचविशी ॥ तीहीं मिळती येकयेकासी ॥ अस्थित्वचा मांस मेदेंसीं ॥ नाडी मिळती पृथ्वीतें ॥४०॥

लाळ मूत्र शुक्र शोणित ॥ हीं पांचत आपीं मिळत ॥ तेजपंचक तेजीं मिश्चित ॥ होय सहजें ॥४१॥

चळणवळण घावन ॥ आकुंचन आणि प्रसरण ॥ हीं पांचही वायूसि जाण ॥ मिळती मग ॥४२॥

राग द्वेष चिंता भय ॥ यांचा आकाशीं होय लय ॥ ऐसी पिंड ब्रह्मांडीं जाय ॥ येकवटोनी ॥४३॥

मग चंद्र आकाश मिश्रित ॥ चित्त सूर्य ओंकारजात ॥ ओंकार वायुरुपें सामावत ॥ विस्तारपणें ॥४४॥

तंव जन्मेजयो बोलिला ॥ कीं पिंड ब्रह्मांडीं सामावला ॥ तरी येवढा ब्रह्मांडगोळा ॥ सामावला कोठें ॥४५॥

तरी तें कैसें मानावें ॥ ब्रह्मांड शून्यांत सामावे ॥ हें कृपा करोनि सांगावें ॥ मजलागीं जी ॥४६॥

मग बोलिलें ऋषीश्वरें ॥ कीं पृथ्वी आपीं संचरे ॥ आप तेजी तेजा समीरें ॥ ग्रासिजे पैं ॥४७॥

तो वायु आकाशीं मिळोनी ॥ आकाश मिळे शून्यभुवनीं ॥ ब्रह्मांड ऐशा लक्षणीं ॥ मिळे देखा ॥४८॥

येकचि शून्य होवोनि राहे ॥ तें आदिविष्णु निद्रिस्थ होय ॥ मग तो मार्कंडेय पाहे ॥ चराचरस्थिती ॥४९॥

येकवीस कल्प आयुष्यगणन ॥ तया कैंचें जन्ममरण ॥ चौदा मनूचें स्थितिनाशन ॥ देखे उदराभीतरीं ॥५०॥

जंव हिंडों लागला उदरीं ॥ तंव पडिला मुखाबाहेरी ॥ परि साशंकमनें जठरीं ॥ राहे मागुता ॥५१॥

यानंतरें गा आदिपुरुष ॥ कोणैककाळीं अविनाश ॥ निद्रा भंगलिया सृष्टिप्रकाश ॥ होईल ऐसें भासलें ॥५२॥

ह्मणोनियां तो मार्कंडेय मुनी ॥ बाहेर निघाला गजबजोनी ॥ तंव देखे आदिकारणी ॥ परमेश्र्वर ॥५३॥

देव उठिला हांसोनी ॥ तंव वाचा जाहली गगनीं ॥ तेणें नादें जीवन गोठोनी ॥ मुरालें नीर ॥५४॥

आकाशीं उठिला महाध्वनी ॥ मुखज्योती प्रकाशली गगनीं ॥ तेणें चंद्रतारादिनमणी ॥ प्रकाशलीं सर्व ॥५५॥

आणिक देवाचेनि जागरीं ॥ परा वाचा निराकारीं ॥ पश्यंती जाहली नासाग्रीं ॥ काकिणीमुख ॥५६॥

आणि देवाचे चहूं देहीं ॥ मध्यमा जाहली हृदयीं ॥ वैखरी जाहली ब्रह्मद्दारठायीं ॥ आदिपुरुषाचे ॥५७॥

मनसहित पवन उसळे ॥ तेचि परा पश्यंती खेळे ॥ तेथोनि जाय पश्विमनाळें ॥ काकिणीमुखासी ॥५८॥

वाचा बोलिजे पश्यंती ॥ ते नासिका जाय उसळती ॥ वैखरी तेचि रुद्रशक्ती ॥ बोलिजे राया ॥५९॥

मग ते शून्यांत सामावे ॥ ते मध्यमाशक्ति बोलावें ॥ ऐशी शक्ति असंभाव्य ॥ प्रकटली देखा ॥६०॥

परा पश्यंती मध्यमा वैखरी ॥ पांचवी अनिर्वाच्यनिराकरीं ॥ परेउद्भवें पश्यंती उच्चारी ॥ मध्यमावैखरी अनुवादें ॥६१॥

तंव ह्मणे राजा भारत ॥ कैसा वेदांचा वृत्तांत ॥ कवणे वाचे कोण वेदार्थ ॥ तो सांगें ऋषी ॥६२॥

ऐसें ऐकोनि ह्मणे मुनी ॥ आतां सांगों वेदवाणी ॥ अभ्यंतरीं परेपासुनी ॥ सुक्ष्म वेद राया ॥६३॥

परेपासूनि अथर्वण वेद ॥ सामवेद पश्यंती अनुवाद ॥ मध्यमें पासूनि यजुर्वेद ॥ उपजला राया ॥६४॥

ऋग्वेद वैखरीपोटीं जन्मला ॥ ह्मणोनि सर्वीं श्रेष्ठ मानवला ॥ मध्यमेनें उच्चारिलां ॥ यजुर्वेद सम्यक ॥६५॥

आणि जे पश्यंती आथिली ॥ ती सामवेदातें बोलिली ॥ अथर्वण वेदासि बोलिली ॥ परा वाचा ॥६६॥

अभ्यंतरीं परेपासुनी ॥ सुक्ष्मवेदांची होय वाणी ॥ या चहूंवेदांचे मिळणीं ॥ जाहला मन तेथें ॥६७॥

देवो वाचा प्रसवला ॥ ह्मणोनि रुद्रक मनु बोलिला ॥ मग तो जगीं प्रवेशला ॥ सृष्टिआगम ॥६८॥

ईद्रियें मनु बुद्धि अहंकार ॥ कार्य कारण आचार ॥ ऐसा जाणावा निर्धार ॥ राया तुवां ॥६९॥

आतां पांच अवस्था जनीं ॥ जागॄती स्वप्न सुषुप्ती तूर्या उन्मनी ॥ या जाहल्या कैसेनी ॥ तें सांगों तुज ॥७०॥

जागृती बोलिजे धरणी ॥ स्वप्न अवस्था स्वतंत्रपणीं ॥ सुषुप्ति ते उभयस्थानीं ॥ अवस्था असे ॥७१॥

तुर्या प्रबोधी जागृतीसी ॥ उन्मनी होय आकाशीं ॥ आतां मुद्रा परियेसीं ॥ येकचित्तें ॥७२॥

खेचरी भूचरी चांचरी ॥ अगोचरी आलेख यापरी ॥ माजी समरसली खेचरी ॥ नादबिंदूसी ॥७३॥

भूचरी मुद्रेचा रहिवास ॥ नासाग्रीं सामावे सौरस ॥ पावे स्वानंद सुख‍अंश ॥ भूचरी ते ॥७४॥

चांचरीमुद्रेचें स्थान ॥ तें नेत्रयुगांचें दर्शन ॥ सामानपणें देखतीं नयन ॥ ते मुद्रा चांचरीं नेत्रीं ॥७५॥

आगोचरीचा सौरस ॥ कर्णमंडळीं तियेसि वास ॥ सृष्टबुद्धीचा समावेश ॥ ते मुद्रा अगोचरी ॥७६॥

आलेख मुद्रेचें राहणें ॥ गगनमंडळीं पाहणें ॥ तये जरामरण भोगणें ॥ आथीच ना ॥७७॥

जेंचि आलेखीचें स्थान ॥ तेंचि उन्मनीचें भुवन ॥ तेथें तुर्या होय लीन ॥ जन्मेजया गा ॥७८॥

जें उन्मनीचें घर ॥ तेथें काळनिद्रिसि नाहीं बिढार ॥ तेथें जरामरण विकार ॥ चुकती प्राणियां ॥७९॥

आतां घडिघडि वासना ॥ बुद्धिजीवासि उपजवी जाणा ॥ मग धांवे चळणवळणा ॥ घेवोनि इंद्रियें ॥८०॥

बिंदुत्रिकुट स्वाधिष्ठानीं ॥ जाणों कमळपुष्प जीवनीं ॥ माजी सत्वादि त्रिगुणीं ॥ हुंकार‍उत्तरे ॥८१॥

ज्यज्यादळीं जीव जाय ॥ तैसी तैसी वासना होय ॥ आतां दशवायूंचे ठाय ॥ ऐकें राया ॥८२॥

प्राण अपान व्यान ॥ समान उदान पंचप्राण ॥ आणिक पांच उपप्राण ॥ असती तेथें ॥८३॥

नाग कूर्म आणि कॄकलयो ॥ देवदत्त धनंजयो ॥ ऐसे असती पंच वायो ॥ पिंडब्रह्मांडीं ॥८४॥

हृदयीं प्राण अपान गुदद्वारीं ॥ समान असे नाभिअंतरीं ॥ उदान कंठाभीतरीं ॥ व्यान सर्वशरीरगत ॥८५॥

नाग कुर्म इडेभीतरीं ॥ कृकल देवदत्त पिंगळासरी ॥ धनंजय सुषुम्रेभीतरीं ॥ विस्तारलासे ॥८६॥

आतां सांगों द्श नाडी ॥ इडा पिंगळा सुषुम्रा वोढी ॥ गांधारी जीवनी दशतूंडी ॥ सातवी ते ॥८७॥

दीक्षाबाणदशा शंखिनी ॥ द्वितीया आणि सौक्षिणी ॥ ऐशा नाडी हृदयस्थानीं ॥ शरीरगत ॥८८॥

आतां असो दाहवा मनु ॥ जो कृतयुगाचा आगमनु ॥ प्रथमयुगीं तो निर्माणू ॥ केला देवें ॥८९॥

दाहवा मनु जालिया ॥ सॄष्टिरचना विस्तारावया ॥ आयुष्य पुरल्या ब्रह्मया ॥ मग होय प्रळय ॥९०॥

पुढें कितीकाळ योगशयनीं ॥ आदिदेव असे निद्रभुवनीं ॥ तरी जागृती नसतां करणी ॥ कोणासि होय ॥९१॥

आतां याचिये पुढील कथा ॥ वैशंपायन सांगेल भारता ॥ ती ऐकावी संतश्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥९२॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ सप्तमस्तबक मनोहरू ॥ मन्वंतरचरित्रप्रकारू ॥ चतुर्थोऽध्यायीं कथियेला ॥९३॥

॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP