कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय १३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि पुसे पारिक्षिती ॥ कैसी जाहली चंद्राची उप्तत्ती ॥ तो अवसेसि जाय क्षयातीं ॥ पूर्णिमेसि कां पूर्ण ॥१॥

हें व्हावया काय कारण ॥ तें मजसी करावें ज्ञान ॥ मग ह्मणे वैशंपायन ॥ ऐक राया ॥२॥

चंद्र हा कश्यपाचा पुत्र ॥ ब्राह्मणीसी जाहला कुमर ॥ ऐसा मागील अनुसर ॥ सत्य राया ॥३॥

ब्राह्मण करिती अग्निहोत्र ॥ तें चंद्री पावे स्वतंत्र ॥ तेथें होवोनिया स्थीर ॥ अमृत होय पैं ॥४॥

हें चंद्राचें आदि अवसान ॥ तुजसी करीन गा श्रवण ॥ जें सर्वऋषीप्रति कथन ॥ केलें असे ॥५॥

चंद्राठायीं असे शीतळता ॥ तेणें अमृत होय तत्वतां ॥ त्याच्या कळा पसरती सर्वथा ॥ जाण राया ॥६॥

अठ्ठ्यायशीं सहस्त्र गावें जाण ॥ चंद्रमंडळाचें प्रमाण ॥ त्याच्या कळा असती पूर्ण ॥ पंश्र्वदश पै ॥७॥

आणि सोळावी कळा आपुली ॥ जे चंद्राजवळी असे वहिली ॥ ते तुज सांगोसकळ बोली ॥ कथेची पैं ॥८॥

आतां पूर्णिमेपासुन ॥ कळा दीधल्या असती वांटून ॥ तें सकळ ऐकें वचन ॥ जन्मेजया गा ॥९॥

प्रतिपदेची अग्नीसी ॥ मग द्वितीयेची सूर्यासी ॥ आणि तृतीयेची विश्र्वेदेवासी ॥ दीधली कला ॥१०॥

सलिलाधिपती जो वरुण ॥ त्यासी चतुर्थी देती विभागून ॥ आणि वासवालागुन ॥ पंचमी देती ॥११॥

षष्ठीची वासुदेव जाण ॥ कळा घेतसे वांटून ॥ सप्तमीसि भागगुण ॥ मुखमोद्वेती ॥१२॥

मग अष्टमीसि गा भारता ॥ कला देती अजैकपातां ॥ नवमीसी प्रेतनाथा ॥ दीधली असे ॥१३॥

आणि तिथीद्वयपंचमीसी ॥ ते कळा देती वायूसी ॥ आणि एकादशी देवासी ॥ श्रीविष्णूसि पैं ॥१४॥

द्वादशीसी जाण पितर ॥ त्रयोदशीसी कुबेर ॥ चतुर्दशीसी शंकर ॥ पशुपती जो ॥१५॥

पूर्ण कळा पौर्णिमेसी ॥ षोडशीसह पंचद्शी ॥ त्या स्वयें भोगितसे शशी ॥ वरिष्ठपणें ॥१६॥

आतां प्रजापतीं ब्रह्मा जाण ॥ तो आमावास्येसि घे वांटून ॥ ऐसा षोडशकलांचा प्रश्न ॥ कथिल राया ॥१७॥

परि अमावास्येसि चंद्रमा ॥ न प्रकशे गा उत्तमा ॥ आणि शुद्धपक्षीं पौर्णिमा ॥ सर्वप्रकाश ॥१८॥

जैं शोषी कळा विरिंची ॥ तें तृप्ती होय पांचाची ॥ वाटणीं केली अंवसेची ॥ तीस घटिका ॥१९॥

प्रथम सूर्य दुजें जळ ॥ तिजा गंवसी भाग सकळ ॥ ऐशा चंद्रकला प्रबळ ॥ चौथा भाग वनस्पती ॥२०॥

ह्मणोनि अमावास्या तिथीं ॥ वावो न घालावा वनस्पतीं ॥ तोडील तयासी घडती ॥ ब्रह्महत्या ॥२१॥

परि समिधा दूर्वा गौतृण ॥ आणि तुळसी कार्याकारण ॥ यांवेगळें फळपर्ण ॥ न तोडावें ॥२२॥

तैं दंतधावन करी नर ॥ तेणें ग्रासिला शीतकर ॥ अधोगती जाती पितर ॥ तयाचे पैं ॥२३॥

तैं जो बैलां वाहे उत्तमा ॥ त्याचे पितर न येती धामां ॥ स्त्रीसंगें पितर जाती अधमां ॥ गतीप्रती ॥२४।

तें कर्मलोपीं मार्ग चालती ॥ त्यांचिये पितरांसी अधोगती ॥ मासामास पचती ॥ रौरवीं पैं ॥२५॥

अंवसेसि जेवी परान्ना ॥ त्याचें पुण्य लाधे यजमाना ॥ येकमासाचे स्नानदाना ॥ होय क्षय ॥२६॥

कीं स्नानेंविण भोजन ॥ तो येकमास प्रेतजाण ॥ आणिक करितां महिकर्षण ॥ नासती धेनु ॥२७॥

जो करी उदीम व्यापार ॥ त्याचे अधोगती जाती पितर ॥ आणि त्या घडे अक्षेत्र ॥ ब्रह्महत्येचें ॥२८॥

जो अमावास्येसि वाढवी धन ॥ तेणें योजिलें नरकस्थान ॥ काहीं न कीजे हा प्रश्न ॥ व्यासऋषींचा ॥२९॥

ह्मणवूनियां गा भारता ॥ तें उदीम न करावा सर्वथा ॥ आणिक प्रस्थानें मार्गीं जातां ॥ असे विघ्न ॥३०॥

एकदां पितृश्राद्धासी ॥ सहदेव निघाला द्वारकेसी ॥ तंव विघ्न आरंभिलें त्यासी ॥ चालतां मागीं ॥३१॥

ऐकोनि ह्मणे भारत ॥ हा कैसा घडला जी अर्थ ॥ मग ह्मणे ऋषिसुत ॥ ऐक राया ॥३२॥

पंडूचें श्राद्ध मांडलें ॥ सहदेव धर्में बोलविलें ॥ ह्मणे श्रीकृष्णा आणीं वहिलें ॥ श्राद्धाकारणें ॥३३॥

धर्मसंदेशें सहदेव निघाला ॥ परमोत्साहें मार्ग क्रमिला ॥ तंव देखता जाहला ॥ वृद्धस्त्रीतें ॥३४॥

आमावस्या ते दिवशीं ॥ हें न कळेचि सहदेवासी ॥ मागीं घेवोनि कापुसासी ॥ बैसली वृद्धा ॥३५॥

ह्मणे मज उचलोनि घ्यावी पाठीं ॥ ऐसें ऐकोनि कर्णपुटीं ॥ सैन्य झोंबे लक्षकोटी ॥ परि न उश्र्वले ते ॥३६॥

सैन्य लागलें समस्त ॥ परि पाठीं न उचले किंचित ॥ तेणें जाहला विस्मित ॥ सहदेव तो ॥३७॥

ह्मणोनि सहदेवही लागला ॥ तंव न उचलेचि चांचरी गेला ॥ मग तये वृद्धनें हाणितला ॥ कर मुखावरी ॥३८॥

तेणें तो कोपला क्षेत्री ॥ थाप हाणितली मुखावरी ॥ तंव मस्तक फुटोनि ते अवसरीं ॥ निघालें रक्त ॥३९॥

त्या रक्ताचे जितुके बिंदु ॥ तितुके यक्ष जाहले विविधु ॥ विशाळ गगनचुंबित अगाधु ॥ भयानक ॥४०॥

ते त्या सहदेवा वेढिती ॥ खाऊं गिळूं ऐसें ह्मणती ॥ तेणें कोपला असे चित्तीं ॥ पांडव तो ॥४१॥

मग करीं खड घेउनी ॥ मारीत चालिला रणीं ॥ तंव त्या होती लक्ष क्षोणी ॥ स्त्रिया नानारुपांच्या ॥४२॥

त्यांचें रुप विपरीत ॥ भयानक विशाळ बहुत ॥ भयंकर मुखें पसरित ॥ सहदेवावरी ॥४३॥

त्यांहीं सहदेवासि घरुनि ॥ बांधूनि हाणितला वदनीं ॥ हे वार्ता नेली सेवकजनीं ॥ धर्मापाशीं ॥४४॥

धर्में पाठविलें भीमासी ॥ देखे तंव बंधन सहदेवासी ॥ मग हाक देवोनि क्रोधेंसी ॥ चालिला भीमा ॥४५॥

येक मर्दिल्या भूमीसी ॥ येक टाकिल्या आकाशीं ॥ येक गदेनें मृत्तिकेसीं ॥ मेळविल्या पैं ॥४६॥

ऐशापरी सर्व वधोनी मुख्यनायिका धरिली धावोनी ॥ ऐस पराक्रम करोनी ॥ भीमें बंधु सोडविला ॥४७॥

तंव भद्रा ह्मणे माग प्रसन्न ॥ ऐकोनि भीमा बोले वचन ॥ कीं सहदेवा दीजे वरदान ॥ साह्यकारी हो‍उनी ॥४८॥

जयजयहो रविआत्मजे ॥ तुवां साह्यकारी होइजे ॥ आपुली बळशक्ति देइजे ॥ आह्मांलागी ॥४९॥

तूं भास्करसुते आत्ममुखे ॥ सप्तकरे कपिलपुच्छे ॥ त्रिचरणे ऊर्ध्वमुखे ॥ भक्षी सर्व विघ्नांतें ॥५०॥

ऐसें ऐकोनि ह्मणे प्रसन्न ॥ माझें पावलें तुह्मां वरदान ॥ मग अदृश्य जाहली आपण ॥ अमावास्या ते ॥५१॥

अदृश्य जाहलीं देवता ॥ भीमा गेला वारुणावता ॥ तैसाचि सहदेवही भारता ॥ आल द्वारकेसी ॥५२॥

दृष्टी देखतां माधव ॥ त्यासी नमस्कारी सहदेव ॥ ह्मणे चाल गा धर्मराव ॥ बोलवीतसे ॥५३॥

कृष्ण ह्मणे बळदेवा पुसावें ॥ तयासि पुसिलें सहदेवें ॥ परि तोही ह्मणे बोलावावें ॥ कृष्णाप्रंती ॥५४॥

ह्मणोनि आला कृष्णापाशीं ॥ येरू दाखवी वसुदेवासी ॥ तेणें राग आला पांडवासी ॥ ह्मणे नेईन बळेंची ॥५५॥

ऐकतां कोपला मुरारी ॥ सहदेवा हाणितलें मुखावरी ॥ तंव येरे खड घेवोनि करीं ॥ हाणितलें देवा ॥५६॥

मग देवें चक्र सोडिलें ॥ तेणें सहदेवमस्तकीं अशुद्ध निघालें ॥ त्यापासाव सहदेव जाहले ॥ कोट्यानकोटी ॥५७॥

ते द्वारकेंत न मावती ॥ युद्ध मांडलें निर्घातीं ॥ परि पांडवं नावरती ॥ कृष्णदेवासी ॥५८॥

तेणें देव व्याकुळ जाहला ॥ मग सहदेवों धांवोनि धरिला ॥ ह्मणे भक्तासि मान दीधला ॥ देव राया ॥५९॥

जंव कृष्णासि पांडवे धरिलें ॥ तंव सर्व यादव पळाले ॥ ऐसें विदान थोर केलें ॥ पुरुषार्थपणें ॥६०॥

असो जें देवो आकर्षिलें ॥ तेव्हां नवतैसेंचि जाहलें ॥ मुख्यरूप तेंचि राहिलें॥ येर विराले अभ्रवत् ॥६१॥

मग तो कृष्णासि घेउनी ॥ वारुणावता आला तेक्षणीं ॥ ऐसी जाहली नवलकरणी ॥ अंवसेनिमित्त ॥६२॥

या अंवसेसि बिजें केलें ॥ यास्तव येवढें जाहलें ॥ ऐसें वैशंपायन बोलिले ॥ जन्मेजयाप्रती ॥६३॥

ह्मणोनीच गा भारता ॥ अंवसेसि कार्य न कीजे सर्वथा ॥ कृष्णाऐशियाही समर्था ॥ घडला अनर्थ ॥६४॥

स्यमंतक मणियासाठीं ॥ अंवसे निघाला जगजेठी ॥ सत्राजितादि निमाले शेवटीं ॥ देवासि आला आळ वृथा ॥६५॥

तैसाचि श्रावण काशीस जातां ॥ वनीं दशरथ पारध्री खेळतां ॥ घात जाहला गा भारता ॥ अंवसेचे दिवशीं ॥६६॥

आणिक तया इंद्रधुम्रासी ॥ शाप घडला त्याचदिवशीं ॥ तैसाचि दंडकारायासी ॥ घडला अनर्थ ॥६७॥

परि हें बहुत सांगतां ॥ कथा वाढेल ग अगाधता ॥ असो अमावास्येसि आन आचरता ॥ असे अनर्थ ॥६८॥

अमावास्ये करी सुरापान ॥ त्यासी गौरक्ताचें प्राशन ॥ आणि ब्रह्महत्येचें लांछन ॥ घडे सत्य ॥६९॥

जरी अंवसेचिये दिवशीं ॥ येकांत घडे स्त्रीपुरुषांसी ॥ तरी कोटिवथें पूर्वजांसी ॥ घडे नरक ॥७०॥

तेदिनीं जरी असत्य बोले ॥ तरी देवासि चरणें हाणिलें ॥ विपत्तीचे तयासि घडले ॥ नानादोष ॥७१॥

अंवसेसि करी उदीमधन ॥ तरी सहस्त्रवर्षें पतन ॥ पूर्वजांसी नरकस्थान ॥ व्यापार करितां ॥७२॥

तें ऐकावें हरीकीर्तन ॥ संतमेळीं देवभजन ॥ आणि उदीम न करावा जाण ॥ भारताराया ॥७३॥

हें अमावस्येचें आख्यान ॥ भविष्योत्तरपुराणींचे ज्ञान ॥ श्रावण करितां दोषदहन ॥ होय सत्य ॥७४॥

ऐकतां अमावस्येचें कथन ॥ घडे सहस्त्रनाम‍उच्चारण ॥ मग पावे पुण्यस्थान ॥ या पुण्यें करोनी ॥७५॥

तेदिनीं करी जो आचार ॥ होमहवनाचा अनुसर ॥ परि करावा निर्धार ॥ वैश्र्वदेव पैं ॥७६॥

मग ते अग्निमुखींची आहुती ॥ पावे निशापतीप्रती ॥ तेणें गुणे पूर्ण होती ॥ चंद्रकला पैं ॥७७॥

हे असे व्यासाची वाणी ॥ परि अनारिसें ब्रह्मपुराणी ॥ कीं चंद्र जाहला असे नयनीं ॥ अत्रिऋषीच्या ॥७८॥

आणिकही असे मत ॥ कीं चंद्र होय सिंधुजात ॥ तो समुद्रमंथनी सत्य ॥ निघाला पैं ॥७९॥

सकळ देव प्रलयांती ॥ रत्‍ने सागरीं उडविती ॥ आणि उत्पत्ति जाहलिया घेती ॥ मागुतेनी ॥८०॥

आणिक असे विचार ॥ कीं चंद्र हा कश्यपाचा कुमर ॥ तो ब्राह्मणीचा निर्धार ॥ गर्भजात पैं ॥८१॥

हें अवघेंही साचार ॥ कल्पतरू चालवी ईश्र्वर ॥ म्यां सांगीतलें भविष्यातर ॥ पुराणीचें ॥८२॥

मुनि ह्मणे राया भारता ॥ हे प्रसंगें जाहली चंद्रकथा ॥ आतां पुढिलिया वचनार्थ ॥ देई चित्त ॥८३॥

तंव राव ह्मणे हो वेदमूर्ती ॥ दशरथविवाहो कवणेरीतीं ॥ ते कथा अपूर्वस्थितीं ॥ सांगा मज ॥८४॥

समुद्रांत लागलें लग्न ॥ ह्मणोनियां ऐकों वचन ॥ तें कैसें जाहलें कथन ॥ पूर्वापारीं ॥८५॥

ऐसा ऐकोनिया प्रश्न ॥ मग सांगती वैशंपायन ॥ जे कां नारदभाषवचन ॥ रावणाप्रती ॥८६॥

असो आता हा प्रश्न ॥ आमावास्यामाहात्म्य जाहलें संपूर्ण ॥ पुढें ऐका सावधान ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥८७॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ अमावास्याकथनप्रकारू ॥ त्रयोदशाऽध्यायीं कथियेला ॥८८॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके त्रयोदशोऽध्याय: समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP