कथाकल्पतरू - स्तबक ६ - अध्याय १०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥श्रीगणेशाय नमः ॥

जन्मेजओ पुसे वचन ॥ कीं कैसें असे काळज्ञान ॥ मग सांगे वैशंपायन ॥ रायाप्रती ॥१॥

कीं जयाची वामनाडी वाहे ॥ आणि पवन रात्रीस जाये ॥ मग त्यासी मृत्यु होये ॥ तिसरे दिवशी ॥२॥

जरी वाहे शक्ररमण ॥ दोन्हीनाडीं जाय पवन ॥ त्यासी आयुष्य ऋतु तीन ॥ असे राया ॥३॥

वामनाडी वाहतां ॥ सत्यप्रस्थ निघे सविता ॥ कीं जन्मचंद्र असतां ॥ तत्काळ मृत्यु ॥४॥

जया मुखींची वायां वाहे ॥ तो दहाप्रहर जीवे ॥ ज्याची दक्षिणे छाया जाये ॥ तया मृत्यु दिवसां पांचं ॥५॥

काळा पिंवळा वर्ण दिसे ॥ तो नरू वांचे दोनवर्षे ॥ आणि दर्पणीं मुख न दिसे ॥ तो वांचे सहामास ॥६॥

कंठ ओष्ठ जिव्हा दांत ॥ हे जयाचे कोरडे होत ॥ तया षड्‍मासीं अंत ॥ पुरला पाहीं ॥७॥

नेत्र मुख आणि बुबुळें ॥ याचें वर्ण दिसती निळे ॥ तया मासें सांजवेळे ॥ मृत्यु होय ॥८॥

दृष्टीपुढें वर्ण येक ॥ विपरीत भासे आणिक ॥ त्याचा काळ जवळिक ॥ सामास पैं ॥९॥

सर्प पसरले दिसती गगनीं ॥ नानावर्ण भासती नयनीं ॥ तो चतुर्मास वांचे प्राणी ॥ सत्य जाणा ॥१०॥

बीज आणि मळमूत्रांसी ॥ येक वाट होय शिंकेसी ॥ तया तीनचतुर्मासासीं ॥ असे काळ ॥११॥

आपुलें प्रतिबिंब उदकांत ॥ दिसे शिरचरणविरहित ॥ तरी तया होय मृत्य ॥ पांचां मांसां ॥१२॥

देह निकोप असतां ॥ छाया दिसे सकोपत्ता ॥ त्यासी अवधी असे मृत्या ॥ चारी मास ॥१३॥

शुष्क होय स्नानावरी ॥ करचरण ह्रुदयावरी ॥ तो तीहीं मासां पावे यमपुरी ॥ कोरडीं होतां ॥१४॥

बुद्धिभ्रंश होय ज्यासी ॥ दोनी दिवसी रविशशी । गगनीं तारा न देखे निशी ॥ दिवसा देखे नक्षेत्रें ॥१५॥

आणि वृक्ष पर्वतांवरी ॥ नेत्रीं देखे गंधर्व नगरीं ॥ कीं भूतपिशाच परोपरी ॥ नाचतांदेखे ॥१६॥

जो चेवला बुद्धीपासून ॥ त्यासी येकमास अवधी जाण ॥ कीं ध्वनी न ऐकती श्रवण ॥ तया मृत्यु येकमासां ॥१७॥

रोडका वेगें मोठा होय ॥ कीं स्थूळ तो वाळूनि जाय ॥ तो यमपुरीसि प्राप्त होय ॥ मासां येके ॥१८॥

कर्तव्यकाम न होतां पूर्ण ॥ मध्येंच शिंक ये जाण ॥ तो निश्र्वयें पावे निर्वाण ॥ मासां पांचां ॥१९॥

अरुंघती ध्रुव गगनीं ॥ आणि विष्णुपदें तिन्ही ॥ मातृमंडळ न देखे नयनीं ॥ तो मरे शीघ्र ॥२०॥

हा विचार असे ब्रह्माडीं ॥ तोचि तुज दाखवूं पिंडीं ॥ तयावीण तरी सांकडी ॥ न फिटे तुझी ॥२१॥

अरुंघती ते जाण जिव्हा ॥ नासिकाग्र स्थान ध्रुवा ॥ भ्रूमध्य असे ठाव बरवा ॥ विष्णूपदाचा ॥२२॥

नेत्राग्रीं असे मातृमंडळ ॥ हें न दिसे तेचि काळवेळ ॥ आतां ऐकें पां सकळ ॥ स्वप्नचिन्हें ॥२३॥

भूतप्रेतसकळां ॥ श्र्वापदें आणि पक्षिकुळां ॥ शरीरा झोंबती तरी काळा ॥ अवधी येकमास ॥२४॥

जरी स्वप्नीं शरीर आपुलें ॥ गंधपुष्पीं वस्त्रीं वेष्टीलें ॥ तरे आठचि मास उरलें ॥ मरण तयाचें ॥२५॥

डोंगरावरी किंवा धूळी ॥उपविष्ट केला स्तंभी कीं शुळीं ॥ तरी सामास तया उरली ॥ आयुष्य‍अवधी ॥२६॥

स्वप्नीं देखे मस्तकी तृण ॥ नातरी शुष्क काष्ठें जाण ॥ तयासि होय गा मरण ॥ साहामासां ॥२७॥

आतां जरी पुत्र आपुला ॥ आश्र्वारुढ तैलें न्हाणिला ॥ तो बोडकाचि बोळविला ॥ यमदिशेसी ॥२८॥

काळा पुरुष वस्त्रा भरणीं ॥ ऐसा जरी देखिला स्वप्नीं ॥ तरी अवघी मास तिन्ही ॥ उरली असे ॥२९॥

वळंघोनिया आकाशें ॥ जात असे पूर्वदिशे ॥ तया मृत्यु दोपक्षीं असे ॥ अधिक पांच दिवस ॥३०॥

तंव ह्मणे जन्मेजयो ॥ येक आठवला संदेहो ॥ बरवा वोखटां स्वप्नभावो ॥ असे कैसा ॥३१॥

मग ह्मणे ऋषेश्र्वर ॥ बरवा पुशिला गा विचार ॥ तरी हाही सांगो विस्तार ॥ तुजकारणें ॥३२॥

रात्रीचे प्रथमप्रहरीं ॥ प्राणी स्वप्न देखे जरी ॥ फळ होय जाणिजे तरी ॥ वरुषां येका ॥३३॥

आणि दुसरे प्रहरीं ॥ प्राणीं स्वप्न देखे जरी ॥ तरी अष्टमासां भीतरीं ॥ फळ प्राप्त ॥३४॥

स्वप्न देखे तिसर्‍या प्रहरीं ॥ तरी येक मासांतीं फळ निर्धारी ॥ चौथे प्रहरीं देखे जरी ॥ तरी फळ तत्काळ ॥३५॥

उजाडतां येक पाहतां ॥ जरी स्वप्न होय देखता ॥ तरी तें फळ होय सांगता ॥ दहादिवसां ॥३६॥

दिवसामाजी उचित दिसे ॥ तरी दिवसांती फळ असे ॥ आणि दिवस होतां दिसे ॥ तरी फळ लौकरी ॥३७॥

उजाडतां जरी स्वप्न देखे ॥ तरी फळा दिरिंगं असे ॥ किंवा होय नित्य‍अभ्यासें ॥ तें निर्फळ पैं ॥३८॥

कुसरीयेचें स्वप्नीं कळे ॥ मनी कांहीं चित्त आतळे ॥ मग तें स्वप्नी जरी देखिलें ॥ तरी निर्फळ ॥३९॥

बरवें स्वप्न देखावें ॥ तरी पुढिल्यापाशीं सांगावें ॥ वोखटें जरी देखावें ॥ तरी न सांगावें कोणासी ॥४०॥

जरी अश्र्वातें देखिलें ॥ किंवा वनगाईसि पाहिलें ॥ तरी जाणावें वहिलें ॥ लाभ सत्य ॥४१॥

गाडा बैलांवरी बैसिजे ॥ गज अश्र्वांवरी स्वार होईजे ॥ ऐसें स्वप्न देखिजे ॥ जरी कोणीं ॥४२॥

आणिक देउळावरी ॥ कीं चढे धवलारावरी ॥ चढलों देखे डोंगरावरी ॥ तरी लाभ सांगे ॥४३॥

अंग विष्ठेसी लागलें ॥ रुदन करितां देखिलें ॥ आणि वारासि ऐकिलें ॥ तरी होय लाभ ॥४४॥

हीनयातीची वनिता ॥ देखे तयेसी गमन करितां ॥ तरीही लाभ सर्वथा ॥ सांगिजे गा ॥४५॥

बरवा वृक्ष देखे वोला ॥ कधीं नाहीं फळीं फळला ॥ तो जरी आथिला ॥ तरी अर्थ धन लाभ ॥४६॥

सर्प वा भलतें किरडूं देखिलें ॥ तें अंगासी लागलें ॥ तरी जय धर्मराज बोले ॥ कीं पुत्रलाभ ॥४७॥

धवलार कीं समुद्र तळें ॥ आपण जेविला ऐसें देखिलें ॥ आणि क्षीरभोजन देखिलें ॥ तरी राजा होय ॥४८॥

बाळें बालक कडे धरिला ॥ तरी स्त्रीलाभ सांगीतला ॥ ऐसें स्वप्न असे बोलिला ॥ तये वेळीं ॥४९॥

पांढरा साप आपुला ॥ उजवे लाथेनें हाणितला ॥ तरी दाहीदिशां सांगितला ॥ धनलाभ पैं ॥५०॥

आपणया सांखळ घातली ॥ किंवा बांधलें देखे बळी ॥ तरी पुत्रलाभ ते काळीं ॥ आणि थोरींव पावे ॥५१॥

आपुलें बैसकीचें आसन ॥ निजायाचा पलंग कीं स्थान ॥ घराचें देखे दहन ॥ तरी धनलाभ ॥५२॥

सूर्य कीं चंद्र देखिजे ॥ तरी रोगियें निरोगी होइजे ॥ रोगी नाहीं तरी पाविजे ॥ धनलाभ तो ॥५३॥

देखे तैल सुरा पीतां ॥ मत्स्यादिकांहीं भक्षितां ॥ व्याघ्र सुकरादिकीं विच्छिन्न करितां ॥ आणि देखे वानर ॥५४॥

एकाएकीं दीप भंगले ॥ ऐसें स्वप्न जरी देखिलें ॥ तरी राजभय सांगीतलें ॥ सत्य राया ॥५५॥

विडा दहीं तूप साखर ॥ श्रीखंड मोतीं फुलें अपार ॥ निळीं पांढरीं कमळें थोर ॥ देखे तरी धनलाभ ॥५६॥

स्वशरीराचे केश गळत ॥ दंत ढळले देखत ॥ तरी धनहानी होत ॥ कीं अपत्यहानी ॥५७॥

आपणासी उद्धरिता ॥ जरी देखे स्वप्न‍अवस्थां ॥ तरी ते गोष्टी सर्वथा ॥ रोग सांगे ॥५८॥

पोट सारितां दिसे ॥ ऐसें जरी स्वप्न असे ॥ तरी धनहानी विशेषें ॥ होय तया ॥५९॥

तांबडें वस्त्र गंधता श्रवणीं ॥ ऐसी नारीं देखिजे स्वप्नीं ॥ तरी ते सांगे तत्क्षणीं ॥ रोगभय ॥६०॥

हळदिवें सांवळें नेसली ॥ हळदिवें श्रीखंड ल्याइली ॥ ऐसी नारी स्वप्नीं देखिली ॥ तरी ब्रह्महत्या सांगे ॥६१॥

चितारिलें वस्त्र नेसली असे ॥ परोपरी श्रीखंड उटिलेंसे ॥ ऐसी नारी स्वप्नीं दिसे ॥ तरी रोग सांगे ॥६२॥

काळें साउलें नेसली ॥ काळे श्रीखंडाची उटी घेतली ॥ तरी तीं सकळ सांगीतलीं ॥ मरणचिन्हें ॥६३॥

पांढरें साउलें नेसली ॥ पांढरे श्रीखंडाची उटी लेइली ॥ ऐसी नारी स्वप्नीं देखिली ॥ तरी लक्ष्मी सांगे ॥३४॥

मुखास लागलीं राख हार्डे ॥ हे वोखटें दुष्ट ॥ हत्ती घोडा ब्राह्मण बरवंट ॥ जाणावे पैं ॥६६॥

सायें अथवा तूप तेलें ॥ येणें आपणासि माखिलें ॥ तरी तें असे सांगीतलें ॥ मरणभय ॥६७॥

पाउटे अथवा हो बाण ॥ छत्री उभा देखिजे स्वप्न ॥ तरी चाली सांगिजे गमन ॥ परी लौकर येइल ॥६८॥

स्वप्नीं दहीं मिळालें देखे ॥ तरी धनलाभ विशेषें ॥ आणि तूप मिळालें देखे ॥ तरी वाढे यश ॥६९॥

दहीं तूप भक्षण देखतां ॥ तरी किळत होय सांगता ॥ गहूं सातु दिसे मिळतां ॥ तरी धनलाभ ॥७०॥

धूमता अग्निमाजि दिसे ॥ ते हानी अशुभ असे ॥ निर्धूम जळतां अग्नि दिसे ॥ तरी लक्ष्मी सांगे ॥७१॥

दिवा अथवा फळ बरवें ॥ कमळ कीं कन्या जाणावें ॥ छत्र पताका मनीं हालवें ॥ तरी चिंतलें पावें ॥७२॥

मनुष्याचें मांस हिरवें ॥ खातां देखिजे बरवें ॥ तरी निश्र्वयें थोर पावे ॥ धनलाभ तो ॥७३॥

मनुष्याचें मांस सहजें ॥ जरी रांघूनि खातां देखिजे ॥ तरी मरण सांगिजे ॥ प्राणियासी ॥७४॥

मनुष्याचा पाय विशेषें ॥ खातों ऐसें स्वप्नीं दिसे ॥ तरी पांच शतांचें हरुषें ॥ लाभ सांगे ॥७५॥

नातरी कर खातों ऐसें ॥ जरी स्वप्नीं प्राणियां दिसे ॥ तरी सहस्त्रांचा लाभ असें ॥ सांगीतलें ॥७६॥

शिर खातों ऐसें देखिजे ॥ तरी राज्यलाभ पाविजे ॥ अंगीचें मांस खातां देखिजे ॥ तरी लाभ सांगे ॥७७॥

अंत्यजानीं घर वेष्टिलें ॥ ऐसें जरीं स्वप्नीं देखिलें ॥ तरी राज्य पावेल मेळें ॥ मांडलिक होय ॥७८॥

अंत्यजीं नगर वेढिलें आघवें ॥ ऐसें जरी स्वप्नीं देखावें ॥ तरी स्वयें राज्य पावावें ॥ भूमंडळीचें ॥७९॥

देवता कौतुकें हांसती ॥ किंवा स्वच्छंदे नाचताती ॥ आणिक देखे रडताती ॥ स्वप्नामध्यें ॥८०॥

कीं हाका देती धांवती ॥ ऐसें जरी स्वप्नी देखती ॥ तरी सांगे गा भूपती ॥ देशनाश ॥८१॥

देव ब्राह्मण तांबडे वस्त्र तें नव्हें भलें ॥ वोखटें जाणिजे वहिलें ॥ जन्मेजया गा ॥८३॥

आतां असो हें भारता ॥ तुज सांगीतली स्वप्नअवस्था ॥ तुवां पुशिली होती कथा ॥ ह्मणोनियां ॥८४॥

तरी ऐकें गा नृपनाथा ॥ हे काळज्ञानाची कथा ॥ भविष्योत्तरींचीं वार्ता ॥ सांगितली तुज ॥८५॥

आणि ह्मणें ऋषिनंदन ॥ राया तूं महाविचक्षण ॥ तुझिये प्रश्र्नें माझें मन ॥ संतोषलें गा ॥८६॥

जैसा आपुला श्रृंगार ॥ चोखटा सांभाळी जो नर ॥ त्याचा गुण आणि उपकार ॥ विसरावा कवणें ॥८७॥

माझिये मनींचें बीज ॥ तें तुवां प्रकट केलें सहज ॥ आतां पुढें ऐक पां निज ॥ परब्रह्मा तूं ॥८८॥

आतां याचिये पुढील कथा ॥ ऋषि रायासि होय सांगता ॥ तो ऐकावी सकळ श्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥८९॥

॥ इति श्रीकथाकल्पतरू ॥ षष्ठस्तबक मनोहरू ॥ काळज्ञानस्वप्नप्रकारू ॥ दशमाऽध्यायीं कथियेला ॥९०॥

॥ श्रीमज्ज्गदीश्र्वरार्पणम्तु ॥ ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ षष्ठस्तबके दशमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP