कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय ९

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

रायासि ह्नणती मुनीश्वर ॥ पूर्वी नृप होता उपरिचर ॥ तयानें कालाहल नामें गिरिवर ॥ हाणिला चरणघातें ॥१॥

तेणें तयासि पडिलें छिद्र ॥ तेथें उगवली मनोहर ॥ शक्तिमती नामें पवित्र ॥ आपगा जे ॥२॥

तिचे पोटीं जाहली कन्यका ॥ पर्वतापासाव नामें गिरिका ॥ ते दीधली चैद्यवसुटिळका ॥ भ्रातृमजी जे ॥३॥

महा सुंदरा ते गुणवंती ॥ समयीं जाहली ऋतुवंती ॥ परि भ्रतार गेला वनाप्रती ॥ पारधीसी ॥४॥

पारधीचें न सुटे आर्त ॥ ऋतु न देतां तरी प्रायश्वित्त ॥ मग लिहूनियां लिखित ॥ पाठविला शुक ॥५॥

त्याचे कंठीं बांधिलें लिखित ॥ कीं आपण गेलिया जालें ऋतुस्त्रात ॥ हें जरी मी न करी श्रुत ॥ तरी प्रायश्वित्त घडेल मज ॥६॥

आतां विनंति हे शुका करीं ॥ तुह्मीं यावें झडकरी ॥ उदईक असे भेटी यावरी ॥ ऋतुसमयाची ॥७॥

शुक उडाला घेवोनि पत्र ॥ रायाजवळी पातला शीघ्र ॥ येरु वाची तंव सत्वर ॥ बोलाविलेंसे ॥८॥

मग विचारोनि शास्त्रधर्म ॥ रायें केलें उलटीकर्म ॥ तें सकळही जाणे वर्म ॥ तोचि येक ॥९॥

मग ते रेतपुडी घटी ॥ रायें बांधिली शुकाचे कंठीं ॥ ह्नणे तुवां हे नेवोनि मठीं ॥ द्यावी माझे कामिनीसी ॥१०॥

मग तो निघाला द्विजवर ॥ तंव स्वजाती भेटला तस्कर ॥ मनीं ह्नणे हा नेतसे आहार ॥ आमिषांचा ॥११॥

ह्नणोनि झडपी नानापरी ॥ तेणें कंठींची तुटली दोरी ॥ ते पुडी फाडोनि पडली सत्वरीं ॥ यमुनेमाजी ॥१२॥

तंव तेथें अद्रिका नामें अप्सरा ॥ ब्रह्मशापें झाली मीनशरीरा ॥ तयेनें जाणोनि आमिषआहारा ॥ भक्षिलें रेत ॥१३॥

तेणें ते जाहली गरोदरी ॥ जाळां धरिली ढीवरीं ॥ चिरुनि पाहती तंव उदरीं ॥ अपत्यें दोनी ॥१४॥

त्यांतील मत्स्येंद्र नामें सुता ॥ तया उपरिचरें नेलें त्वरिता ॥ आणि ते मत्स्योदरी गा भारता ॥ राखिली ढीवरें ॥१५॥

ते कन्याभावें सुंदरी ॥ ढीवरें रक्षिली आपुले घरीं ॥ परि कौतुकें नावेवरी ॥ बैसविलीसे ॥१६॥

मग कोणेयेके अवसरीं ॥ नाव ठेवोनियां तीरीं ॥ ढीवर गेला असतां घरीं ॥ भोजनातें ॥१७॥

तंव इकडे पातला पाराशर ॥ तो ह्नणे मज नेई पार ॥ ह्नणोनि बैसविला नावेवर ॥ कन्यकेनें ॥१८॥

तिचा देखोनि मुखचंद्र ॥ कामें व्यापिला ऋषीश्वर ॥ मग सांडोनि ब्रह्मचर्याचार ॥ बोलिला तीतें ॥१९॥

ह्नणे मज दे कां रतिसंगा ॥ तेणें नाश होईल दुर्गधा ॥ आणि कुमारीपण प्रसंगा ॥ न भंगे तुझें ॥२०॥

माझे पूर्ण करीं या शब्दा ॥ मग तूं होसी योजनगंधा ॥ तंव लाजोनि बोले मुग्धा ॥ ऋषीप्रती ॥२१॥

ह्नणे हें न कीजे अकाळीं ॥ भानुप्रभा असे सोज्वळी ॥ तंव ऋषीनें आकर्षिली धूळी ॥ मंत्रोनियं ॥२२॥

पाडिला अंधकार थोर ॥ जाणों निशीचा अवसर ॥ मग भोगिता झाला पाराशर ॥ मत्स्योदरीतें ॥२३॥

त्याचिया सरतां रतिरसा ॥ जन्म जाहला वेदव्यासा ॥ ऐशा करोनियां तपनाशा ॥ निघाला ऋषीश्वर ॥२४॥

जंव गर्भ पाहे मत्स्योदरी ॥ तंव भीतीनें जाहली घाबरी ॥ मग तो सांडिला सवरी ॥ बेटामाजी ॥२५॥

तोचि ह्नणिजे कृष्णद्वैपायन ॥ जो वेदविद्येचा पूर्णघन ॥ अंशें बोलिजे नारायण ॥ साक्षात जो ॥२६॥

मग व्यास ह्नणे वो माते ॥ थोर कष्टलीस गर्भव्यथे ॥ परी कांहीं पडलिया अवस्थे ॥ स्मरावें मज ॥२७॥

मग घेवोनि तयेचा आयास ॥ निघता जाहला ऋषिव्यास ॥ तंव आला ढीवरदास ॥ नावेजवळी ॥ ॥२८॥

प्रथम बोलिजे मत्स्योदरी ॥ ढीवरें पोशिली ह्नणोनि ढीवरी ॥ योजनगंधा पाराशरशरीरीं ॥ व्यासें सत्यवती ते ॥२९॥

मुनि ह्नणे गा भारता ॥ तुवां पुसिली मूळकथा ॥ तरी हे प्रसवली व्याससुता ॥ ऐसियापरी ॥ ॥३०॥

तंव जन्मेजय करी विनंती ॥ ह्नणे येक फेडा जी भ्रांती ॥ तया पाराशराची उत्पत्ती ॥ सांगा मज ॥३१॥

मग ह्नणे मुनीश्वर ॥ गाधिरायाचा कुमर ॥ प्रतापें आथिला थोर ॥ विश्वामित्र जो ॥३२॥

तो कोणेयेके अवसरीं ॥ पारधी खेळे वनांतरीं ॥ तंव आला वसिष्ठमंदिरीं ॥ सेनेसहित ॥३३॥

तयासि वसिष्ठ ह्नणे निगुती ॥ आपण आरोगू जी पंक्ती ॥ ह्नणोनि मांडिली आयती ॥ ऋषीश्वरें ॥३४॥

मग ते नंदिनी कामधेनू ॥ तये प्रार्थिता जाहला ब्राह्मणू ॥ तंव ते प्रसवली अन्नघनू ॥ ऋषिगृहीं ॥३५॥

भोजना बैसविला विश्वामित्र ॥ सवें प्रधान परिवार ॥ समस्तां केला पाहूणेर ॥ षड्रसअन्नाचा ॥३६॥

राव ह्नणे कैंची आयती ॥ ऋषी ह्नणे धेनुप्रसूती ॥ ऐकतां उपजली खंती ॥ विश्वामित्रासी ॥३७॥

वसिष्ठासि ह्नणे विश्वामित्र ॥ नंदिनीसाठीं येकसहस्त्र ॥ गाई देईन परि पाहुणेर ॥ करीं मज ॥ ॥३८॥

मग ह्नणे वसिष्ठमुनी ॥ इचेचि घृतें होमितों वन्ही ॥ मज सहस्त्रगाईचें श्रेणीं ॥ काय काज ॥३९॥

जंव तें न माने गाधिसुता ॥ मग धेनू जाहला सोडिता ॥ तंव ते प्रसवली आकांता ॥ सैन्यसबळ ॥४०॥

गाई करीतसे हुंबरा ॥ धांव धांव गा ऋषीश्वरा ॥ येरु ह्नणे या नरेंद्रा ॥ न चले माझें ॥४१॥

मग धेनु प्रसवली तियेवेळीं ॥ नासिकापासाव कोळी ॥ तुर्क जाहले मुखकमळीं ॥ फेनास्तव ॥४२॥

इंगळ उदेले पुच्छीं ॥ मूत्रापासाव पौंड्रदेशी ॥ कर्णापासाव गोकर्णवासी ॥ कर्नाटक जे ॥४३॥

नेत्रांपासाव नैनिषारण्यी ॥ खुरांपासाव खुरासनी ॥ मळापासाव नानावणीं ॥ उठिले सैन्य ॥४४॥

दोन्ही मिळालिया रणीं ॥ शस्त्री दाटली मेदिनी ॥ भिजली शोणितें करोनी ॥ मेदिनी तेथें ॥४५॥

भंग जाहला नृपसेने ॥ राव पळाला तीन योजनें ॥ परी रामायणींचें कथणें ॥ अनारिसें गा ॥४६॥

विश्वामित्र आणि वसिष्ठ ॥ शस्त्रास्त्रीं जाहले रणवट ॥ मग दंड टाकोनि भरिला घोंट ॥ रावसैन्याचा ॥४७॥

ऐसा मोडिला विश्वामित्र ॥ मग तेणें गांवा धाडिला परिवार ॥ परि अहंतापें विचार ॥ करिता झाला ॥४८॥

ह्नणे माझें धिग् जळो जिणें ॥ मज मोडिलें या ब्राह्मणें ॥ ह्नणोनि बैसला तपसाधने ॥ साभिमानेंसी ॥४९॥

मग तेणें येकसहस्त्र वर्षे ॥ उदकीं राहोनि मौनमुखें ॥ जप केला कोटिलक्षें ॥ गायत्रीचा ॥५०॥

सामर्थ्ये जाहला महातापस ॥ त्यासि शंकले ब्रह्मा ईश ॥ कीं हा करुं शकेल स्थितिनाश ॥ त्रिभुवनाचा ॥५१॥

तया वसिष्ठासि विश्वामित्रू ॥ दृष्टीं पाहे जैसा शत्रू ॥ ह्नणे कधीं करीन संहारु ॥ विप्राचा या ॥५२॥

मग कोणेयेके दिवशीं ॥ कल्माक्षी राव सूर्यवंशी ॥ तो आला पारधीसी ॥ सहजें वनीं ॥५३॥

तेथें तो वसिष्ठाचा पुत्र ॥ शतकीर्ति नामें ऋषीश्वर ॥ मार्गी जातअसतां सत्वर ॥ रोधिला कल्माक्षीरायें ॥५४॥

राव ह्नणे गा ऋषेश्वरा ॥ मार्ग सोडोनि परतें माघारा ॥ परि ऋषी ह्नणेगा नरेंद्रा ॥ परतावें तुवांची ॥५५॥

ऐसी होड करितां येकमेकें ॥ राव कोपला महातबकें ॥ मग ऋषीसि हाणिलें चाबुकें ॥ कल्माक्षिरायें ॥५६॥

तंव ऋषी वदे शापोत्तर ॥ तूं होसील रे निशाचर ॥ तेंचि वैर स्मरोनि विश्वामित्र ॥ आला तेथें ॥५७॥

तेणें तो वोळखोनि वासिष्ठी ॥ राक्षस आव्हानिला रायाचे पोटीं ॥ मग शतकीर्ती खादला उठाउठी ॥ राक्षसें तेणें ॥५८॥

ऐसे वसिष्ठाचे सुत ॥ राक्षसें खादले येकशत ॥ तेणें जाहला दुःखित ॥ वसिष्ठमुनी ॥५९॥

येवढें केलें विश्वामित्रें ॥ परी वसिष्ठ न बोले उत्तरें ॥ मग अनुतापें ऋषेश्वरें ॥ दंडिलें देहा ॥६०॥

मेरुवरुनि टाकिलें धड ॥ परी न होयचि दुखंड ॥ अग्नीसि घालितां अग्निकुंड ॥ शीतळ झालें ॥६१॥

मग टाकितां जीवनीं ॥ तंव तें न स्पर्शे मुखघ्राणी ॥ मग स्नुषा घेवोनि वसिष्ठमुनी ॥ जाहला निघता ॥६२॥

मार्गी चालतां वेदश्रुती ॥ वसिष्ठें ऐकिली अवचितीं ॥ विस्मयें ह्नणे काय शतकीर्ती ॥ आला येथें ॥६३॥

ह्नणोनि करी अवलोकन ॥ तंव पुत्रस्त्री बोलिली वचन ॥ कीं गर्भ करीतसे पठण ॥ उदरीं माझे ॥६४॥

तेणें संतोषला ऋषीश्वर ॥ मग पूर्णदिनीं उपजला कुमर ॥ तो शतकीर्तीचा पाराशर ॥ महातपस्वी ॥६५॥

इतुक्यांत आला निशाचार ॥ तो ग्रासीन ह्नणे कुमर ॥ परि वसिष्ठें उदक शिंपोनि नरेंद्र ॥ केला मागुता ॥६६॥

तेणें सावध जाहला नृपवर ॥ ऋषीसि करी नमस्कार ॥ ह्नणे मज द्यावाजी हा कुमर ॥ नगरावरी ॥६७॥

मग तो घेवोनि पाराशर ॥ अयोध्येसि गेला नृपवर ॥ सुखी जाहला परिवार ॥ निर्दोषपणे ॥६८॥

तो कल्माक्षीराव चक्रवर्ती ॥ तयातें नाहीं पुत्रसंतती ॥ ह्नणोनि भजनीं लाविली युवती ॥ पाराशराच्या ॥६९॥

महासती ते राजपत्नी ॥ पाराशरें पाहिली नयनीं ॥ तंव ते जाहली गर्भिणी ॥ क्षणामाजी ॥७०॥

तेथोनि ऋषी आला स्वनगरा ॥ तंव ते गर्भे दाटली सुंदरा ॥ परि गर्भ होता वर्षे बारा ॥ तिचे उदरीं ॥७१॥

मग ते कल्माक्षाची राणी ॥ पाषाण घेवोनियां पाणीं ॥ तेणें उदर पिटितां धरणी ॥ पडिला गर्भ ॥ ॥७२॥

त्याचें नांव बोलिजे युष्मा ॥ तो अयोनिसंभव नरोत्तमा ॥ मग राक्षसांचिये होमा ॥ निघे पाराशर ॥७३॥

राक्षसां जाणोनि पितृघाती ॥ पाराशर आव्हानी मंत्रशक्तीं ॥ होमीं घालितसे आहुती ॥ राक्षसांची ॥७४॥

ऐसी मांडिली राक्षसशांती ॥ शेवटीं तेथें आला पौलस्ती ॥ नमन करोनियां पुढती ॥ बुझाविला पाराशर ॥७५॥

मग तेथोनियां समाप्ती ॥ यागाची करवी पौलस्ती ॥ ह्नणोनि रावणादिक निश्विती ॥ वांचविले तेणें ॥७६॥

कीं राक्षसांचा नाहीं दोष ॥ आतां यांवरी न करीं रोष ॥ तुझा पिता मारविला निःशेष ॥ विश्वामित्रें ॥७७॥

मग ते यज्ञाची विभूती ॥ ऋषीनें टाकिली मेरुपर्वतीं ॥ आणि ह्नणे त्वां राखावें पुढती ॥ राक्षसांतें ॥७८॥

वैशंपायन ह्नणे गा भूपती ॥ ऐसी पाराशराची उत्पत्ती ॥ आतां कथा ऐकें पुढती ॥ शंतनूची ॥७९॥

शंतनू आणि सत्यवती ॥ दोघां लागली स्नेहप्रीती ॥ तंव ते प्रसवली युवती ॥ पुत्र दोनी ॥८०॥

प्रथम जाहला चित्रांगदु ॥ विचित्रवीर्य धाकुटा बंधू ॥ तंव शंतनु निमाला वृद्धू ॥ काळवंशें ॥८१॥

मग मिळोनि परिवार ॥ राज्यीं बैसविला कुमर ॥ नीतींने चालवी राज्यभार ॥ चित्रांगद तो ॥८२॥

पृथ्वीमंडळींचे भूपती ॥ झुंजी जिंकिले पुरुषार्थी ॥ दानशूर अंगशक्ती ॥ तया वीराची ॥८३॥

तंव गंधर्व नामें चित्रांगदू ॥ झुंजो आला वीरसिंधु ॥ युद्ध जाहलें तो अनुवादु ॥ असो आतां ॥८४॥

तया कुरुक्षेत्रप्रदेशीं ॥ हिरण्यनदीचा तीरवासी ॥ चित्रांगदें पाडिला सोमवंशी ॥ गंधर्वे तेणें ॥८५॥

तंव हाहाकार करी सत्यवती ॥ ते समजाविली राजनीतीं ॥ मग बैसविला हस्तनावतीं ॥ विचित्रवीर्थ ॥८६॥

त्याचे हातीं राज्य नीतीं ॥ भीष्में चालविली घरस्थिती ॥ मग मांडिली आयती ॥ वर्‍हाडिकेची ॥८७॥

जंव भीष्म करीतसे चिंता ॥ तंव जासूद आला अवचिता ॥ ह्नणे सैंवर मांडिलें जी तत्वतां ॥ काशीश्वररायें ॥८८॥

तें जाणोनि देवव्रत ॥ रथीं बैसला गंगासुत ॥ जो अरिवीरांसि धूमकेत ॥ भीष्मदेवो ॥८९॥

तया काशीश्वराच्या नंदिनी ॥ श्रृंगारे आथिल्या तिघीजणी ॥ सकळरायां पाहती नयनीं ॥ घेवोनि माळा ॥९०॥

तेथें गंगासुत ॥ रथ ठेविला मंडपांत ॥ कन्या वाहोनियां पुरुषार्थ ॥ दाविला तेणें ॥९१॥

रायांचिया सहस्त्र कोटी ॥ धांवणें लागलें पाठोपाठी ॥ तें निवारिलें शरवृष्टीं ॥ भीष्मदेवें ॥९२॥

शाल्व धांवला महात्राणें ॥ तंव तो भीष्में विंधिला बाणें ॥ मग मांडिले उसणें ॥ युद्ध दोघां ॥९३॥

दोघे भिडती निकुरें ॥ भीष्में आव्हानिलीं दिव्य शस्त्रें ॥ रथ उडविला देशांतरें ॥ तया रायाचा ॥९४॥

मारिले अश्व आणि सारथी ॥ भीष्में आपुले बाणघातीं ॥ शाल्व ह्नणे जाहली शांती ॥ या भीष्मासवें ॥९५॥

मग तेणें राहिली झुंजारी ॥ भीष्म आला हस्तनापुरीं ॥ रथीं वाहोनियां कुमरी ॥ काशीश्वराच्या ॥९६॥

अंबा अंबिका अंबालिका ॥ महासुंदरी अलोलिका ॥ ह्नणे तिन्ही करीन स्नुषा देखा ॥ सापत्नमातेसी ॥९७॥

मग लग्न धरोनि सुमुहूर्ती ॥ घटिका घातली पुरोहितीं ॥ तिन्ही केलिया युवती ॥ विचित्रवीर्यातें ॥९८॥

तंव ते वडील अंबा सुंदरा ॥ ह्नणे म्यां चिंतिलें शाल्ववीरा ॥ या करितांचि व्यभिचारा ॥ महादोष ॥९९॥

तें ऐकोनियां दूषण ॥ भीष्में अंबा सोडिली जाण ॥ मग दोहींचें लाविले लग्न ॥ विचित्रवीर्यासीं ॥१००॥

मग ते वडील अंबा सुंदरा ॥ वेगें आली काशीपुरा ॥ कीं वरावें शाल्ववीरा ॥ ह्नणोनियां ॥१॥

ते शाल्वातें प्रार्थी अबळा ॥ ह्नणे तवकंठीं घालितें माळा ॥ तंव तो ह्नणे हें कुश्विळा ॥ बोलूं नको ॥२॥

तुज जिंकोनि समरंगणीं ॥ भीष्में नेलें मजपासोनी ॥ तरी तुज पर्णितां पतनीं ॥ पडणें लागे ॥३॥

मग ते आली हस्तनापुरा ॥ वरावयासी भीष्मवीरा ॥ तंव तो ह्नणे तूं सहोदरा ॥ भगिनी माझी ॥४॥

मग ते वसिष्ठऋषीसि ह्नणे ॥ ऐसियातें काय जी करणें ॥ तो ह्नणे भार्गबाचेनि वचनें ॥ वरील भीष्म तुज ॥५॥

मग भार्गवातें प्रसन्न करोनी ॥ सर्व निवेदी पैं कामिनी ॥ तंव भार्गव आला तत्क्षणीं ॥ भीष्मापासीं ॥ ॥६॥

परशुरामें तो गंगासुत ॥ एकांतीं नेवोनि बोधिला बहुत ॥ परि येरु ह्नणे तेणें पतित ॥ होईन नरकीं ॥७॥

जये औषधें होय मरण ॥ तें सेवावें कां रसायण ॥ तरी ऐसें करितां पतन ॥ होईल मज ॥८॥

तूं माझा श्रीगुरुपिता ॥ हें न बोलावें स्वामिनाथा ॥ ऐकोनि क्रोध आला तत्वतां ॥ परशुरामासी ॥९॥

ह्नणे अगा ये गंगाकुमरा ॥ तूं अवमानिसी माझिये उत्तरा ॥ जरी पर्णिसी ना हे सुंदरा ॥ तरी संग्राम करीं मजसीं ॥११०॥

भीष्म ह्नणे जी भृगुनंदना ॥ म्यां तीन बाण दीधले गुरुदक्षिणा ॥ मग चढला साभिमाना ॥ अविनाश तो ॥११॥

दोघां जाहला आदळ ॥ जाणों मिळाले मेरुमंदराचळ ॥ परि भीष्में केला व्याकुळ ॥ परशुराम ॥१२॥

तया भीष्माचे बाणजाळे ॥ जेव्हां राम गेला व्याकुळें ॥ तेव्हां वारा घालोनि अंचळें ॥ उठविला भीष्में ॥१३॥

ते पहावया झुंजारी ॥ देव दाटले अंबरीं ॥ मग लाजोनि ब्रह्मचारी ॥ गेला भार्गव ॥१४॥

क्रोधें शापिलें भृगुसुतें ॥ भीष्मां तूं जाशील पुण्यपंथें ॥ परि क्लीबाचेनि हातें ॥ मृत्यु तुज ॥१५॥

मग ते काशीश्वराची सुता ॥ तयेनें देह जाळिलें गा भारता ॥ तो जाहला पुरुष ना कांता ॥ शिखंडी नामें ॥१६॥

ह्नणे म्यां बधावा गंगासुत ॥ ह्नणोनि केला देहपात ॥ तो शिखंडिया बोलिजे सुत ॥ द्रुपदरायाचा ॥१७॥

मग अंबिका आणि अंबालिका ॥ त्या दोन्ही केलिया स्नुषा ॥ तंव राज्य करितां राजटिळका ॥ लागली व्याधी ॥१८॥

राज्य केलें सातसंवत्सर ॥ तंव क्षयें व्यापिलें शरीर ॥ यापरी तोही निमाला पुत्र ॥ विचित्रवीर्य ॥१९॥

कटकटा करी सत्यवती ॥ ह्नणे कैसा कोपला पशुपती ॥ वंश न वाढेचि पुढती ॥ शंतनूचा ॥ ॥१२०॥

मग ह्नणे गंगानंदना ॥ या दोघी भोगीं पां अंगना ॥ रतिरमणीं पुत्रदाना ॥ द्यावें यांतें ॥२१॥

तंव भीष्म ह्नणे वो माते ॥ मी सहोदरु स्त्रीजनातें ॥ हे बोलतांचि नरकपातें ॥ लिंपेन मी ॥२२॥

आतां राहिली हे कुसरी ॥ मागें म्यां भाषिलें तवसैंवरी ॥ कीं राज्य न करीं आणि ब्रह्मचारी ॥ राहणें मज ॥२३॥

तत्वेंही सांडितीं पंचगुण ॥ आणि ध्रुव ढाळील आसन ॥ परंतु माझें बोलिलें वचन ॥ न ढळे सत्य ॥२४॥

आतां ऐकें येक विनंती ॥ येखादा ब्राह्मण वो प्रार्थी ॥ त्यापासाव वाढवीं संतती ॥ वंशालागीं ॥२५॥

पूर्वी परशुरामाचे शरीं ॥ पृथ्वी केलीसे निक्षेत्री ॥ तैं वंश वाढविला स्त्रीं ॥ विप्रवीर्ये ॥२६॥

दीर्धतमापासाव कोणीं ॥ वंश वाढविला सेदिनीं ॥ तैसा प्रार्थूनियां मुनी ॥ करीं काज ॥२७॥

तंव ह्नणे राव भारत ॥ दीर्धतमा हा कोणाचा सुत ॥ वंश वाढला तो वृत्तांत ॥ सांगिजे मज ॥२८॥

मुनि ह्नणे गा भूपती ॥ भीष्में प्रबोधिली सत्यवती ॥ तें ऐक पां येकचित्तीं ॥ कथानक ॥२९॥

सांगतों ऐक अनुवाद ॥ बृहस्पतीचा ज्येष्ठबंधू ॥ उतथ्य नामें प्रसिद्धू ॥ ऋषी थोर ॥१३०॥

त्याची ममता नामें पत्नी ॥ पतिसंगे जाहली गर्भिणी ॥ ते बृहस्पतीनें धरिली पाणीं ॥ कामाभिलाषें ॥३१॥

तंव ते ह्नणे हा अनाचारु ॥ येरु ह्नणे पती तैसाचि दीरु ॥ मग पूर्ण जाहला आचारु ॥ कामसंगाचा ॥३२॥

तयेतें भोगी बृहस्पती ॥ परी लागली गर्भाखंती ॥ लिंग हाणिलें चरणघातीं ॥ तया गर्भे ॥३३॥

त्याचें द्रवलें अमोघ रेत ॥ तेथें स्थिरता नाहीं होत ॥ ह्नणे मी आहें येक अपत्य ॥ गर्भकमळीं ॥३४॥

तैं बृहस्पतीस जाहला खेद ॥ गुरु बोले शापविषाद ॥ ह्नणे तुज घडेल रे संबंध ॥ परस्त्रियेचा ॥३५॥

आणि तूं होसील रे गर्भाघ ॥ दीर्घतमा नामें महामंद ॥ तुवां खंडिला कंदर्पकंद ॥ ममवीर्याचा ॥३६॥

मग तो उतथ्याचा नंदन ॥ दीर्घतमा नामें कृष्णवर्ण ॥ ऋषी जन्मला विलक्षण ॥ विदूप तो ॥३७॥

तो घालोनि नावेभीतरीं ॥ ते नाव सोडिली गंगेचे उदरीं ॥ तो वाहतवाहत गेला दूरी ॥ देशांतरा ॥३८॥

तंव बळी नामें महाराजा ॥ तयासि नव्हती पुत्रप्रजा ॥ तेणें तो काढोनियां वोजा ॥ नेला मंदिरीं ॥३९॥

तयातें तो पुसे नरेंद्र ॥ तूं गा कोणाचा कुमर ॥ तो ह्नणे मी उतथ्यपुत्र ॥ दीर्घतमा नामें ॥१४०॥

मग संतोषला नृपवर ॥ ह्नणे भाग्य माझें कीं थोर ॥ आतां यापासाव करुं विस्तार ॥ पुत्रप्रजेचा ॥४१॥

मग बोलावूनि कामिनी ॥ राव ह्नणे हा भोगीं रतिरमणीं ॥ तंव तिणें धाडिली श्रृंगारोनी ॥ दासी येक ॥४२॥

ते प्राप्त होतां सैरंध्री ॥ दीर्घतमें भोगिली शेजारीं ॥ तिचे पोटीं झाले निर्धारीं ॥ अकरा पुत्र ॥४३॥

परि राणीसि कोपला राजा ॥ ह्नणे हे नव्हे आपुली प्रजा ॥ क्षेत्रपुत्र होईल तो माझा ॥ सत्य जाण ॥४४॥

मग ते बळीची राणी ॥ तयेनें अंध धरिला वामपाणीं ॥ तो भोगिला रतिरमणीं ॥ मनोधर्मे ॥ ॥४५॥

तये जाहले पंच पुत्र ॥ परमक्षेत्री धनुर्धर ॥ पुराणीं पढती ऋषीश्वर ॥ नामें जयांची ॥४६॥

चीन भोट आणि कलिंग ॥ अंग आणि वडील वंग ॥ तें गुणनाम बोलती जग ॥ देशांसि त्यांचें ॥४७॥

मुनी ह्नणे गा भूपती ॥ ऐसी प्रबोधिली सत्यवती ॥ भीष्में सांगीतली उत्पत्ती ॥ मजसी येक ॥४९॥

तेणें केला असे संकेत ॥ कीं जेव्हां मांडेल अनर्थ ॥ तेव्हां पावेन वो क्षणांत ॥ स्मरणीं तुझिये ॥१५०॥

तो पाराशराचा रेतजात ॥ कृष्णद्वैपायन विख्यात ॥ तंव बोलिला गंगासुत ॥ तियेप्रती ॥५१॥

ह्नणे पाराशराचा रेतजात ॥ वरी तुझा वो गर्भसंभूत ॥ हा दावितां दृष्टांत ॥ असे भाग्य मोठें ॥५२॥

मग स्मरिला वेदव्यास ॥ जो अष्टादशांचा कळस ॥ वेगें आला तो आयास ॥ ऐकोनियां ॥५३॥

नमन करोनियां मातेसी ॥ ह्नणे कां सिणलीस सायासीं ॥ तें आणीं पां सत्वर मानसीं ॥ माझिये माते ॥५४॥

ऐकोनि ह्नणे सत्यवनी ॥ पुत्र नासले दैवगती ॥ वंशीं नाहीं गा संतती ॥ शंतनूचिये ॥५५॥

या दोघी असतां स्नुषा ॥ तरुणी आणि चंद्रमुखा ॥ परी पुत्रेंवीण सदोषा ॥ जालिया जाण ॥५६॥

तरी येक ऐकें विनंती ॥ यांसी देई वीर्यरती ॥ पुत्रप्रजेची संतती ॥ वाढवावया ॥५७॥

हा ह्नणसी निंद्यपंथू ॥ तरी तूं नव्हसी क्षेत्रजातु ॥ पाराशर वसिष्ठाचा नातू ॥ तो जनिता तुझा ॥५८॥

ह्नणोनि नाहीं गा दूषण ॥ तुवां प्रतिग्रह घ्यावा दान ॥ जेणें प्रजा होय निर्माण ॥ शंतनुकुळीं ॥५९॥

सत्यवती ह्नणे गा सुता ॥ आतां इतुकी न लावावी कथा ॥ या मातृवचनासी पाळितां ॥ निर्दोषी तूं ॥१६०॥

मग चित्रांगदाची नोवरी ॥ तेथें गजमंचकाचे अरुवारीं ॥ जावोनि बैसला ब्रह्मचारी ॥ व्यासदेवो ॥६१॥

जटा विशाळ मुगुटीं ॥ कृष्णवर्ण पिंगट भृकुटी ॥ आरक्त नेत्र ललाटीं ॥ महाविशाळ ॥६२॥

प्रथम पाठविली अंबिका ॥ तिचेनि न साहवे तेजाधिका ॥ ह्नणोनि नेत्र झांकिले देखा ॥ रतिसमयीं ॥६३॥

मग धाडिली अंबालिका ॥ तिनें भोगाची मानिली शंका ॥ तेणें पांडुर झाली नायका ॥ अंगकांतीं ॥६४॥

परि ते तैशीच रतिरमणीं ॥ व्यासें भोगिली कामिनी ॥ पुत्रप्रजा देवोनि वनीं ॥ गेला व्यास ॥६५॥

प्रथम जाहला धृतराष्ट्र ॥ रुपें आगळा बळें थोर ॥ परी तो गर्भाधचि कुमर ॥ अंबिकेचा ॥६६॥

मग दुसरा जाहला नातु ॥ रुपें केवळ मन्मथु ॥ परी पांडुरवर्ण सुतु ॥ अंबालिकेचा ॥६७॥

मग ते सती सत्यव्रती ॥ नातू पाहोनि पावली खंती ॥ ह्नणोनि स्नुषांतें जाहली पुसती ॥ धर्मरती ते ॥६८॥

तंव आपुलाल्या रतिचेष्टा ॥ त्यांहीं सांगितल्या प्रगटा ॥ मग करीतसे कटकटा ॥ सत्यवती ते ॥६९॥

मागुता चिंतिला नंदन ॥ तंव तो पावला ततक्षण ॥ मग ते दाविले नंदन ॥ तयालागीं ॥१७०॥

मातेसि व्यास बोले पुढती ॥ ह्नणे भाव तैसी प्राप्ती ॥ इहीं इच्छिली पुत्रसंतती ॥ ऐसीच जाण ॥७१॥

मग अंबिकेसि ह्नणे सत्यवती ॥ मागुती घेई वो रती ॥ ह्नणोनि धाडिली पुढती ॥ व्यासाजवळी ॥७२॥

परि तें न ये तिचे विचारा ॥ जैसें ज्वरित विटावे मधुरा ॥ कीं उलूक भावी दिनकरा ॥ प्रकाशपणें ॥७३॥

जया नाहीं ज्याची चाड ॥ त्यासी वृथा लवडसवड ॥ तें न साहवे तेजजुंवाड ॥ व्यासाचें पैं ॥७४॥

तेणें तो टाळिला ऋषी शंके ॥ तेथें धाडिलें परिचारिके ॥ ते नग्न होवोनि निःशंके ॥ रमली रती ॥७५॥

मग तेथोनि गेला व्यास ॥ दासीच दाटला गर्भकोश ॥ तेथें जन्मला यमअंश ॥ विदुर ज्ञानी ॥७६॥

हें असत्य न ह्नणावें चतुरीं ॥ व्यास रमला हो निर्धारीं ॥ नातरी बोलावया वैखरी ॥ समर्थ केवीं ॥७७॥

येथें मनाचिया प्रौढी ॥ ग्रंथ दोषितील पाखांडी ॥ तरी तयातें हाणेलतोंडी ॥ कल्पतरु हा ॥७८॥

ऋषिवाक्याहूनि उंचनीच ॥ तें कोणा न गमे गा साच ॥ ऋतुकाळें वीण मेघ साच ॥ कोण मानी ॥७९॥

ऋषिमतावेगळें वचन ॥ तें अजाकंठींचे वृथा स्तन ॥ कीं स्मशानीं सांडिले वसन ॥ अमंगळ जैसें ॥१८०॥

असो ऐसा वाढळा वंश ॥ पुढें रायासि सांगे तापस ॥ तो ऐकावा कथारस ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥ ॥८१॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ पंडुधृतराष्ट्रउत्पत्तिप्रकारु ॥ नवमोऽध्यायीं कथियेला ॥१८२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP