कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय ५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मग निशाणीं करुनि गजर ॥ वेगें निघाला दैत्यभार ॥ रणा चालिला जालंधर ॥ शिवावरी ॥१॥

ढोल दमामे मोहरी ॥ काहळा डफरी आणि भेरी ॥ नाद न माये अंबरीं ॥ वाजंत्रांचा ॥२॥

पादाती अश्व नर कुंजर ॥ अमित मिळाले रहंवर ॥ दळें दाटलें दिगंतर ॥ जालंधराचे ॥३॥

इकडे पाहोनि सुमुहूर्ती ॥ शुंभ निशूंभ दैत्यख्याती ॥ ते पावले शीघ्रगतीं ॥ शिवलोकासी ॥४॥

पुढें करुनि सेनापती ॥ जालंधर चढला रथीं ॥ तंव मुगुट पडिला क्षितीं ॥ मस्तकींचा ॥५॥

इकडे शिवासि जाणविती सुर ॥ कीं पैल आला दैत्यभार ॥ तेणें मेघापरी अंबर ॥ व्यापिलेंसे ॥६॥

मग हाकारिले शिवदूत ॥ महाप्रौढीचे अद्भुत ॥ ते युद्धा मिळाले समस्त ॥ भयानक गा ॥७॥

रुद्रें त्राहाटिला डौर ॥ रणीं चालिला शिवगणभार ॥ सेनापती वीरभद्र ॥ आणि गणेश ॥८॥

दळा जाहली समदृष्टी ॥ भेणें पाय निघाले पोटीं ॥ तंव मांडिली झटपटी ॥ आगळेयांसी ॥९॥

मिळाले दोनी सैन्यभार ॥ जाणों प्रळयींचे सप्त सागर ॥ कुंजरां मिळाले कुंजर ॥ रहंवरां रहंवर पैं ॥१०॥

वारुवांसीं ठेले वारु ॥ पायदळासीं वीरभारु ॥ ऐसा मांडिला संहारु ॥ दोहीं दळींचा ॥११॥

येकमेकां हाणिती वीर ॥ वीरभद्रादि थोर थोर ॥ रणीं लोटले डोंगर ॥ दैत्यरुंडांचे ॥१२॥

तंव तो शुक्र एकनयनी ॥ दैत्यांवरी टाकी संजीवनी ॥ तेणें उठती तत्क्षणी ॥ पडिलेजे ते ॥१३॥

मग येवोनि शिवगण ॥ शिवासि बोलती वचन ॥ कीं शुक्र उठवितो सैन्य ॥ परदळींचे ॥१४॥

तंव कोप आला जगन्नाथा ॥ मुखींहूनि काढिली कांता ॥ कृत्या नामें गा भारता ॥ महाविशाळ ॥१५॥

ते धांवली वेगें कामिनी ॥ तयेनें शुक्र दाटलायोनीं ॥ की ब्राह्मण मारावया मनीं ॥ कंटाळली ते ॥१६॥

मग शिवगण सुटले मारित ॥ दैत्यांचा करिती निःपात ॥ ह्नणोनि देवां आलें जैत ॥ तेणेंगुणें ॥१७॥

ऐसा मोडला दैत्यभार ॥ ह्नणती धरिला धरिला शुक्र ॥ तंव तो कळला विचार ॥ जालंधरासी ॥१८॥

मग चालिला जालंधर ॥ तंव रणभूमीसि आला रुद्र ॥ नंदीवरी होवोनि स्वार ॥ महाप्रौढी ॥१९॥

दोघां जाहले तुंबळ ॥ जाणों मिळाले मंदराचळ ॥ तैसेचि जाहले आदळ ॥ दोहीं दळांसी ॥२०॥

रुद्रें त्राहाटिला डमरु ॥ तेणें थरारिला महामेरु ॥ प्रळय मांडिला नव्हे धीरु ॥ जीवजंतूंसी ॥२१॥

रजें दाटलें गगन ॥ हाकें दुमदुमिलें त्रिभुवन ॥ उलंडूं पाहे जीवन ॥ सागरींचें ॥२२॥

तंव उठावला काळनेमी ॥ महाप्रौढीचा पराक्रमी ॥ तो साहिला रणभूमीं ॥ नंदिकेश्वरें ॥२३॥

एक एकाहूनि बळी ॥ परी काळनेमी आणिला तळीं ॥ मग केली पळापळी ॥ दैत्यवीरीं ॥२४॥

तंव कोप आला शुंभवीरा ॥ ह्नणोनि चालिला सामोरा ॥ ह्नणे साहें ढोरा ॥ तृणचरा तूं ॥२५॥

तो देखोनि शुंभवीर ॥ वरी उठावला लंबोदर ॥ दोघां जाहला निकर ॥ उसणघाई ॥२६॥

घाई केला जर्जर ॥ शुंभासि न धरवे धीर ॥ पळोनि गेला असुर ॥ तेणें त्रासें ॥२७॥

मग उठावला निशुंभ दैत्य ॥ ह्नणे साहें साहेंरे गणपत ॥ तंव उठावला रुद्रसुत ॥ कार्तिकस्वामी ॥२८॥

निशुंभा आणि शिवसुता ॥ युद्ध जाहलें गा भारता ॥ ते सांगतां समग्र कथा ॥ वाढेल ग्रंथ ॥ ॥२९॥

ऐसे दोघे महावीर ॥ हाणिताती शस्त्रप्रहार ॥ दोघेही जाहले जर्जर ॥ खङ्गघातें ॥३०॥

मग तेणें स्वामिकार्तिकें ॥ निशुंभ हाणितला महातबकें ॥ जया घायाचेनि धाकें ॥ पळाला निशुंभ ॥३१॥

तंव परतला काळनेमी ॥ तेणें वीरभद्र हाकारिला नेमीं ॥ दोघे मिळाले पराक्रमी ॥ निर्घातोसी ॥३२॥

दोघे मिळाले महामारा ॥ त्रिशूळ पठ्ठीश आणि चक्रा ॥ पाषाणखङ्गांचिया धारां ॥ पडती अग्नी ॥३३॥

रुधिरें रांपले परस्पर ॥ जाणों वसंतींचे तरुवर ॥ मग वीरभद्रें काढिलें शस्त्र ॥ रुद्रशक्तीचें ॥३४॥

तें देखोनि काळनेमी ॥ वेगें सांडित रणभूमी ॥ तंव वाद्यें लागलीं व्योमीं ॥ सुरवरांचीं ॥३५॥

तंव इकडे मागिलेकडे ॥ दैत्य धांवले देवढे ॥ जाणों साधावया कैंवाडे ॥ महादेवासी ॥३६॥

अश्वमुख आणि घस्मर ॥ गळहाक दुजा प्रचंडवीर ॥ खङ्गरोमा आणि पांढर ॥ आले वेगें ॥३७॥

त्यांही रुद्र टोंचिला शस्त्रीं ॥ कपटाचेनि महामंत्री ॥ विंधिला शरजाळीं त्रिपुरारी ॥ महाशौर्यं ॥३८॥

तें जाणोनियां महारुद्रें ॥ सोडिले शंखाचे पुकारे ॥ तेणें तुटले आंधारे ॥ शरजाळांचे ॥३९॥

अमारात्रीचे तम केवळ ॥ तें व्योमातें व्यापी सकळ ॥ तैसें जें होतें शरजाळ ॥ तें निवारलें ॥४०॥

दैत्य देखोनियां समोर ॥ त्रिशूळ उचली शंकर ॥ तें टाकिलें महाअस्त्र ॥ दैत्यांवरी ॥४१॥

तो नावरे कोणा त्रिशूळ ॥ जाणों काळाचें मुख केवळ ॥ तेणें भूमी पाडिले सकळ ॥ दैत्य वधोनी ॥४२॥

मग जाहला हाहाःकार ॥ रणीं मोडला दैत्यभार ॥ इतुक्यांत आला वीरभद्र ॥ शिवसेवेसी ॥४३॥

दैत्य मोडिले शिववीरीं ॥ यश आलें त्रिपुरारी ॥ ह्नणोनि देवी केली अंबरीं ॥ पुष्पवृष्टी ॥४४॥

परि आवेशें ह्नणे जालंधर ॥ आतां धरीन महारुद्र ॥ ह्नाणोनि हाकिला परिवार ॥ आपुले दळींचा ॥४५॥

कोपें सन्नद्धले वीर ॥ नादें गर्जिन्नलें अंबर ॥ तंव उठावले सुरवर ॥ दैत्यांवरी ॥४६॥

अवघे मिळालिया रणीं ॥ जाणों एकरुद्र दोहीं स्थानीं ॥ तेथें पराभवाची काहाणी ॥ करील कवण ॥४७॥

येक घन येक ऐरणी ॥ तयां भिडतां काय उणी ॥ देवढी होतसे पिटणी ॥ लोहा जैसी ॥४८॥

ऐसा मांडिला आवर्त ॥ देवढा होतसे निःपात ॥ परि उठावला दैत्यनाथ ॥ शिवावरी ॥४९॥

दैत्य ह्नणेरे शंकरा ॥ तुजसी साजे भस्मरा ॥ तो तूं युद्धा दिगंबरा ॥ जाणसी काय ॥५०॥

जोगड्या अगा ये नीलकंठा ॥ पिशाचा जटाजूटा पिंगटा ॥ त्रिनयनारे शरभटा ॥ न ठाकें रणीं ॥५१॥

आतां तुझी पंचवक्त्रें ॥ दहा भुजा दाही गात्रें ॥ मुंडमाळेशीं सह शिरें ॥ पूजीन जाण ॥५२॥

तूं हीं बापुडीं शिवगणें ॥ वायां मारविसी निःकारणें ॥ आतां तुजसी येथें उसणें ॥ युद्ध आहे ॥५३॥

परी शंभू न बोले वचन ॥ जैसा पर्वत न लेखी तृण ॥ सृष्टिसंहार होय आपण ॥ त्याचिमाजी ॥५४॥

दैत्य ह्नणे रे पंचानना ॥ साहें साहें माझिया बाणा ॥ ह्नणोनि विंधी त्रिनयना ॥ शतबाणीं तो ॥५५॥

परि कमळीं हाणिला कुंजर ॥ नातरी तरुपत्रीं गिरिवर ॥ तैसा न मानीच रुद्र ॥ संधान तयाचें ॥५६॥

मग कोप आला महेशा ॥ हात घातला धनुष्या ॥ ह्नणे साहें साहें रे कैसा ॥ राहसी रणीं ॥५७॥

ह्नणोनि सोडिले बारा बाण ॥ येरें त्याचे केलें खंडन ॥ मग दैत्यें केलें संधान ॥ सहस्त्रबाणांचे ॥५८॥

ऐशा कोटीचिया कोटी जालंधर टाकी शरवृष्टी ॥ तेणें गजबजिला धूर्जटी ॥ नावेक राया ॥५९॥

विपायें जाहला दुःखित ॥ नंदी सांडी जगन्नाथ ॥ तंव खङ्ग आला चाळित ॥ जालंधरु तो ॥६०॥

मग कोपोनि पशुपती ॥ तीन बाण घेतले हातीं ॥ तेणें पाडिले रथ सारथी ॥ आणि वारु ॥६१॥

दैत्यें हाणिला करवाळें ॥ तो वारिला जाश्वनीळें ॥ मग हदयीं हाणिला त्रिशूळें ॥ जालंधर ॥६२॥

परि तो न मानीच असुर ॥ मनीं रुद्र करी विचार ॥ महा शस्त्रास्त्रीं मांडिला मार ॥ दोघां जणासी ॥६३॥

आतां असो हा विस्तार ॥ सांगतां न सरे अपार ॥ येथेंचि ग्रंथ वाढेल फार ॥ सांगोंजातां ॥६४॥

सोडितां शस्त्रास्त्रांचे पूर ॥ दोघे न ढळती महावीर ॥ कीं ते दोघे मेरुमांदार ॥ भिडताती रणीं ॥६५॥

ऐसा तो दैत्य जालंधर ॥ रणीं नागवे शिवा असुर ॥ मग बोलिला महारुद्र ॥ देवगणासी ॥६६॥

ह्नणे माझिये पुरुषार्था ॥ दैत्य न मरे हा तत्वतां ॥ सर्वावांचोनि सिंधुसुता ॥ न घडे मृत्यु ॥६७॥

मग सर्वदेवांची तेजें ॥ मागोनि घेतलीं वृषभध्वजें ॥ तें सुदर्शन केलें वोजें ॥ महाचक्र ॥६८॥

त्या धगधगीत सुदर्शनें ॥ दैत्य हाणिला पंचाननें ॥ परी आंगीं नुठेचि वळवाणें ॥ जालंधरासी ॥६९॥

त्याचिये आयुष्याची दोरी ॥ ते असे वृंदेचे करीं ॥ जैसी खेळविजे अंतरीं ॥ वांवडी पैं ॥७०॥

ऐसी करितां झुंजारी ॥ रणीं नाटोपे त्रिपुरारी ॥ मग मांडिली वोडबंरी ॥ दैत्यरायें ॥७१॥

टाळ मृदंग नाचणीं ॥ गीत आलापलक्षणी ॥ दैत्यें रचिलीं तत्क्षणी ॥ रणामाजी ॥७२॥

तेणें भुली पडली रुद्रा ॥ विसरा पडला अस्त्राचारा ॥ मग दैत्य गेला मंदिरा ॥ भवानीचे ॥७३॥

धरोनियां रुद्राचा नट ॥ नंदीवरी जाहला उपविष्ट ॥ रणीं बाधिला रणवट ॥ काळनेमीसी ॥ ॥७४॥

वेगें पातला शिवभुवनीं ॥ तंव दृष्टी देखे अवानी ॥ ते राशी राहिली गजबजोनी ॥ शिवभावेंसी ॥७५॥

मग तयेसि ह्नणे दैत्यनाथु ॥ मग दे पां विहित ऋतु ॥ तुज कारणें हो धांवतु ॥ आलों असें मी ॥७६॥

रणीं झुंजतां जालंधरासी ॥ चित्त गुंतले तुजपाशी ॥ तेणे दुश्वित्तपणें तयासी ॥ नचले बळ ॥७७॥

मनीं विचारी भवानी ॥ दोघे मिळालिया समरंगणी ॥ तें सांडोनि शूळपाणी ॥ न करी ऐसें ॥७८॥

हा तंव महावंताचा विचार ॥ कीं रणदीक्षेसि असतां बीर ॥ तैं लागोंनेदी पदर ॥ स्त्रीजनाचा ॥७९॥

ऐसा करितां विचार ॥ तंव वीर्य द्रवला जालंधर ॥ मग जाणितला असुर ॥ भवानीयें ॥८०॥

देखोनि जयेचिया रुपका ॥ द्रव जाहला चतुर्मुखा ॥ येका वांचोनियां त्र्यंबका ॥ राखवें कवणा ॥८१॥

असो ऐसें देखोनि नयनीं ॥ अदृश्य जाहली भवानी ॥ मग चिंतिला चक्रपाणी ॥ अंतरामाजी ॥८२॥

ह्नणे अगा ये शारंगधरा ॥ भक्तजनां वज्रपंजरा ॥ अनाथाचिया आधारा ॥ मुकुंदा तूं ॥८३॥

तंव विष्णु आला तेक्षणीं ॥ तयासि सांगे भवानी ॥ कीं ऐसी केली पहा करणी ॥ जालंधरें ॥८४॥

ह्नणे अगा है ब्रह्मांडपाळा ॥ यासी वर्धी पां वहिला ॥ तंव हरी वचन बोलिला ॥ भवानीप्रती ॥८५॥

ह्नणे याची स्त्री पतिव्रता ॥ ते सत्वें जरी ढळेल सुरता ॥ तरीच मारीन सिंधुसुता ॥ सत्य अंबे ॥८६॥

आणिक एक अवधारीं ॥ यासी वधील त्रिपुरारी ॥ हा अंश असे निर्धारी ॥ शंभुवाची ॥८७॥

तुज अभिलाषिलें सिंधुसुतें ॥ तरी मी भोगीन त्याचे कांते ॥ ऐसे सांगोनि जगन्माते ॥ निघाला त्वरे ॥८८॥

तें मनी कल्पोनि श्रीहरी ॥ आला धांवत जालंधरपुरीं ॥ क्षणामाजी नटला शरीरीं ॥ मावरुप ॥८९॥

ऐसा नटला तापस ॥ आपण गुरु आणि शिष्य शेष ॥ श्रृंगारवाटिके रहिवास ॥ मांडिला दोघीं ॥९०॥

तंव ते वृंदा महासती ॥ स्वप्न सांगे सखियांप्रती ॥ कीं महिषारुढ दक्षिणेप्रती ॥ जातसे भ्रतार ॥९१॥

असे नग्न आणि उघडा ॥ माथां मोकळा केशजुंडा ॥ तेलें माखों चंडचूडा ॥ झोंबती येक ॥९२॥

ह्नणोनि ह्नणे हो वाटे उत्कंठा ॥ कीं हें दुष्ट स्वप्न वोखटा ॥ तरी नेणों काय सुभटा ॥ असेल जीवीं ॥९३॥

सखये दुःख वाटे मना ॥ चला जाऊं श्रृंगारवना ॥ कैशापरी अस्तमाना ॥ जाईल सविता ॥९४॥

मग ते सखियांचे मेळीं ॥ प्रवेशली वनस्थळी ॥ तंव दोघे राक्षस तात्काळी ॥ रचिले देवें ॥९५॥

वृंदा जंव पाहे तरुवर ॥ तंव दोन देखिले निशाचर ॥ ते तयेसि ग्रासावया शीघ्र ॥ धाविन्नले ॥९६॥

तेणें जाहली कासाविसी ॥ ह्नणोनि धाविन्नली राजसी ॥ तंव तेथें देखिले तापसी ॥ दोघेजण ॥९७॥

मग तयांतें जाहली शरण ॥ ह्नणे राखा राखा जी प्राण ॥ या राक्षसांचें हनन ॥ करा वेगें ॥९८॥

तंव तेणें दिगंबरें ॥ राक्षस मारिले दंडप्रहारें ॥ ह्नणोनि तापसासी सुंदरें ॥ केलें प्रणाम ॥९९॥

ते ह्नणे गा तापस मुनी ॥ तूं माझे जीवाचा दानी ॥ तरी कांहीं अंतःकरणीं ॥ उपजलेंसे ॥१००॥

माझा पती जालंधर ॥ तो केवळ प्राणेश्वर ॥ युद्द्य करीत वर्षे सहस्त्र ॥ तया रुद्रासी ॥१॥

युद्ध होतसे रुद्रभुवनी ॥ तें आह्मी नेणों कर्णी ॥ तरी कांहीं सांगा ज्ञानीं ॥ पाहोनियां ॥२॥

तंव देवें दोन वानर ॥ मावेचे रचिले गा शीघ्र ॥ ते घेवोनि आले शिर ॥ सिंधुसुतार्च ॥३॥

त्यांहीं येवोनियां पुढां ॥ धरणीं टाकिलें धडमुंडा ॥ ह्नणती दैत्य वधोनि चंद्रचूडा ॥ आलें जैते ॥४॥

त्या शिवाचे त्रिशूळचक्रीं ॥ जालंधर पडिला धरित्री ॥ मग तेथोनि गेला त्रिपुरारी ॥ शिवलोकासी ॥५॥

आह्मी तयाचें हें धडशिर ॥ घेवोनि आलों सत्वर ॥ तुज वल्लभ जाणोनि शीघ्र ॥ टाकिलें पुढें ॥६॥

मग सतीनें मांडिला शोक ॥ ह्नणे दैत्यकुळींचा नायक ॥ तुजसी वधोनि त्र्यंबक ॥ गेला कैसा ॥७॥

ह्नणे अगा ये जालंधरा ॥ माझिये श्रृंगारसागरा ॥ आजी सहस्त्र संवत्सरां ॥ जाहली तुटी ॥८॥

आतां असो हे विलापकथा ॥ सांगतां न सरे अवस्था ॥ शुक्ति सांडोनियां मुक्ता ॥ घ्यावें आतां ॥९॥

असो मग त्या तापसाप्रती ॥ विनवीतसे वृंदा सती ॥ कीं हा पडिला प्राणपती ॥ तो उठवीं माझा ॥११०॥

तंव मावेचा करुनि संचार ॥ आपणचि जाहला जालंधर ॥ मग सतीनें केला नमस्कार ॥ त्या भ्रतारासी ॥११॥

ऐसा जाहला सचेत ॥ परि मागों लागला येकांत ॥ ह्नणे सहस्त्रवर्षे निश्वित ॥ अंतरलों प्रिये ॥१२॥

जाहलें आलिंगन चुंबन ॥ तंव विचित्र देखिलें विदान ॥ शंख चक्र आयुधें पूर्ण ॥ कौस्तुभ कंठीं ॥१३॥

ह्नणोनि चमकली सुंदरा ॥ ह्नणे तूं पति नव्हेसि गा खरा ॥ मग शापिलें चक्रधरा ॥ पतिव्रतेनें ॥१४॥

ह्नणे अरे रे महानष्टा ॥ मज ठकविलें कर्मभ्रष्टा ॥ तरी तुज होईल वैकुंठा ॥ निश्वये विघड ॥ ॥१५॥

आणि त्वदंश हे राक्षस दोनी ॥ तुझी हरितील कामिनी ॥ ते रावण कुंभकर्ण व्यसनी ॥ पाडितील तुज ॥ ॥१६॥

आणि हा शिष्य फणिवर ॥ तुज होईल सहोदर ॥ तैसेचि दोनी हे वानर ॥ साह्यकारी तुज ॥१७॥

दुःखें ह्नणे वृंदासती ॥ आतां जिणें हे अपकीर्तीं ॥ निंदित मुख काय जगतीं ॥ दाखवावें ॥१८॥

मज नाहीं अभिलषिता ॥ परी मी दुराविलें सत्य ॥ कीं आम्र पडलिया अमृत ॥ नासे जैसें ॥१९॥

क्रकाटिकें गंधवहनिक ॥ कीं कावगंधीनें कनक ॥ तें शुद्ध परी सदोषी देख ॥ जाहलें जैसें ॥१२०॥

ज्या अभिलाषिती परपुरुषा ॥ त्यांचिया नेणवे पातका ॥ सहस्त्रवर्षे महानरका ॥ भोगिती त्या ॥२१॥

ह्नणोनि रचिलें सरण ॥ येवढें न साहवे लांछन ॥ मग केलें देहदहन ॥ तयामाजी ॥२२॥

परि सत्वतापें तापला हरी ॥ ह्नणे धन्य धन्य सती नारी ॥ मजनिमित्त हे सुंदरी ॥ पावली नाश ॥२३॥

परम संतोषोनि हरी ॥ ह्नणे मागवो सुंदरी ॥ तंव बोलिली धरित्री ॥ स्मशानींची ॥२४॥

ह्नणे अगा ये गोविंदा ॥ त्वां मजपाशीं असावें सदा ॥ मी तुळसी नामें वृंदा ॥ होईन जाण ॥२५॥

भारता मग तो हषीकेशी ॥ स्वयें जाहला स्मशानवासी ॥ कें उद्भवो पावेल तुळसी ॥ ह्नणोनियां ॥२६॥

सतीवाक्य धरोनि चित्तीं ॥ तेथे बैसला श्रीपती ॥ अंगीं लावोनियां विभूती ॥ स्मशानींची ॥२७॥

आतां असो हे वृंदासती ॥ जालंधर आला शिवापुढती ॥ मावेची करोनियां पार्वती ॥ रणामाजी ॥२८॥

शिवासन्मुख तो जालंधर ॥ भवानीसि करी मार ॥ ते आक्रोशें करी उच्चार ॥ महादेवाचा ॥२९॥

धांव धांव गा जगन्नाथा ॥ मज मांडली महाव्यथा ॥ कासया गा सिंधुसुता ॥ खवळिलें तुवां ॥१३०॥

ऐसी आठवोनि उत्तरीं ॥ विलाप करीतसे गौरी ॥ तें ऐकोनि त्रिपुरारी ॥ जाहला क्षीण ॥३१॥

सर्वेचि मग तो तीनबाणीं ॥ दैत्यें विंधिला शूळपाणी ॥ तंव सावध जाहला मनीं ॥ महादेव ॥३२॥

जंव ज्ञानीं देव विचारी ॥ तंव ते माया वोडंबरी ॥ मग धाविन्नला त्रिपुरारी ॥ वधावया असुरा ॥३३॥

रुद्रें मांडिलें निर्वाण ॥ दोघे करिती संधान ॥ शिवें बाणीं आटिलें सैन्य ॥ जालंधराचें ॥३४॥

येका बैसती बाणखंडें ॥ तंव ते होती दुखंढें ॥ येक नाचती रणीं रुंडें ॥ नुसतीच ॥३५॥

कितियेकांचे चरण शिरीं ॥ बाण नेताती चौफेरी ॥ जाणों चारा नेती घारी ॥ बाळकासी ॥३६॥

रुद्रें कापितां असुर ॥ शिरां होतसे व्यभिचार ॥ कीं नदीं दाटए महापूर ॥ शोणिताचे ॥३७॥

अश्वगजांचिया कोडी ॥ वोसनें लागती दरडी ॥ येकामागें येक मडीं ॥ वाहती वीरांची ॥३८॥

तेथे शिराचे तुटले केश ॥ तेंचि शेवाळ बहुवस ॥ की गजशुंडा तेचि मत्स्य ॥ गमले तेथें ॥३९॥

आता असो हा विस्तारु ॥ येणे नावरे कल्पतरु ॥ मापे मोजिता काय वोसरु ॥ वाळुवेसी ॥१४०॥

की छाया मोजिता पाडें ॥ ते न सरे धावता पुढें ॥ ह्नणोनि असो हें आडें ॥ विभासाचे ॥४१॥

ऐसा होतां रणनिकर ॥ जेवीं रासभावरी कुंजर ॥ तैसा कोपला महारुद्र ॥ दैत्यावरी ॥४२॥

ह्नणे अरे रे जालंधरा ॥ महानष्टा मावकरा ॥ साहें साहें रे या चक्रा ॥ तेजिष्ठासी ॥४३॥

ह्नणोनि सोडिलें सुदर्शन ॥ महातेजाचें दारुण ॥ जया आवडे भोजन ॥ आमिषाचें ॥४४॥

मग तें टाकिलें दैत्यावरी ॥ असुरें फोडिलें नानाशस्त्री ॥ परि ते नावरे भोंवरी ॥ दिव्यचक्राची ॥४५॥

चक्र लागलें कंठनाळी ॥ शिर उडालें नभमंडळी ॥ जाणों खेळे चेंडुफळी ॥ महादेव ॥४६॥

गरगरोनि पडिलें धरणी ॥ तें रुद्रे देखिले नयनी ॥ परी रुंड गेले लोटांगणी ॥ ईश्वराजवळी ॥४७॥

जालंधराची आत्मज्योती ॥ बाहेर निघाली दिव्यदीप्ते ॥ ते प्राशिली पशुपतीं ॥ आपुले मुखीं ॥४८॥

मग ते शुंभनिशुंभ दोनी ॥ रुद्रें शापिले क्रोधवचनीं ॥ की शक्तिपासाव निर्वाणी ॥ नासाल तुह्मीं ॥४९॥

वधिल्यावरी जालंधर ॥ हर्षे दाटला महारुद्र ॥ पुष्पीं वर्षला सुरेश्वर ॥ शिवावरी ॥ ॥१५०॥

मग रुद्र विचारी मानसीं ॥ कीं कोठे आहे हषीकेशी ॥ ह्नणोनि पुसे देवांसी ॥ महादेव ॥५१॥

तंव त्या वृंदेचा वृत्तांत ॥ देवीं कथिला समस्त ॥ कीं स्मशानीं असे अनंत ॥ तापसपणें ॥५२॥

सोडोनियां धांमा वैकुंठा ॥ मनी वृंदेची धरिली उत्कंठा ॥ कांहीं करितां नीलकंठा ॥ न उठे विष्णू ॥५३॥

मग ह्नणे पशुपती ॥ देव हो चिंता आदिशक्ती ॥ जे मूळमाया विख्याती ॥ तिहीं लोकीं ॥५४॥

शिवसंदेशें देवीं समस्तीं ॥ मायेची मांडिली स्तुती ॥ तंव आली शीघ्रगतीं ॥ अंबिका ते ॥५५॥

देव ह्नणती वो आद्यशक्ती ॥ स्मशानीं वसे श्रीपती ॥ आंगीं लावोनिया विभूती ॥ तापसपणें ॥५६॥

तरी सांडवोनियां तो वेध ॥ तुवां उठवावा गोविंद ॥ ऐसा कांहीं करीं प्रबोध ॥ अंबिके आतां ॥५७॥

मग ह्नणे आदिशक्ती ॥ माझी त्रिधा असे विभक्ती ॥ लक्ष्मी सावित्री हैमंवती ॥ जाणिजे मीची ॥ ॥५८॥

त्यां पासोनि बीजकणी ॥ घेवोनि पेरावी स्मशानीं ॥ ते उगवलिया चक्रपाणी ॥ उठेल जाणा ॥५९॥

मालतीबीज सिंधुकुमरी ॥ तुळसीबीज दीधलें गौरीं ॥ आंवळीबीज सावित्री ॥ घेवोनि आल्या ॥१६०॥

मग तें बीज सुरवर ॥ घेवोनि निघाले सत्वर ॥ भूमींत पेरितां अंकुर ॥ निघाले स्मशानीं ॥६१॥

परि कोणे एके पुराणीं ॥ तुळसीबीज सिंधुनंदिनी ॥ आणि बेलबीज भवानी ॥ आंवळी सावित्री ॥६२॥

धात्री मालती आणि तुळसी ॥ तिन्ही आलिया गर्भवासी ॥ त्या माथां धरी हषीकेशी ॥ संतुष्टपणें ॥६३॥

मग बोलिले श्रीपती ॥ तुळसीचिया गंधवृत्तीं ॥ माझी फिटली असे भ्रांती ॥ विकाराची ॥६४॥

तरी हे तुळसी साक्षात वृंदा ॥ इचिया दर्शने फिटली बाधा ॥ ह्नणोनि ईतें वंदावें सर्वदा ॥ सुरनरपन्नगीं ॥६५॥

तुळसी आणि धात्री ॥ या असते ज्याचिये घरीं ॥ तेथें मी असें निरंतरीं ॥ वासकरित ॥६६॥

जे जन पूजिती तुळसीसी ॥ ते न येती गर्भवासासी ॥ माझें मन अहर्निशी ॥ इचियेठायीं ॥ ॥६७॥

इयेचे काष्ठांचिया माळा ॥ जे घालिती आपुले गळां ॥ त्या जवळी असतां विटाळा ॥ यम करु न शके ॥ ॥६८॥

जो मज अर्पी तुळसीपत्र ॥ तेणें अर्पिलें गोसहस्त्र ॥ रोपी तरी तयाचें द्वार ॥ न सांडी मी ॥६९॥

ऐसी हे सती वृंदा तुळसी ॥ मस्तकीं खोंबी हषीकेशी ॥ मग सत्वर गेला वैकुंठासी ॥ देवांसहित ॥१७०॥

मुनि ह्नणे गा भारता ॥ त्वां पुसिली मूळकथा ॥ तरी शिवें वधिलें सिंधुसुता ॥ ऐशियापरी ॥७१॥

आतां असो हा जालंधर ॥ उमेसि भेटला ईश्वर ॥ तैसाचि लक्ष्मीसि शारंगधर ॥ इंद्र इंद्राणीसी ॥७२॥

ऐसी हे हरिहरकथा ॥ जो ऐके भावें श्रोता ॥ तो यमलोकाचिया पंथा ॥ न घाली चरण ॥७३॥

हें जालंधराचें आख्यान ॥ जया होय श्रवण पठण ॥ तया त्रिवेणी माघस्त्रान ॥ घडलें कीं पैं ॥७४॥

हे पद्मपुराणींची कथा ॥ महापवित्र पुण्यलता ॥ ऐसेंचि जाहलें गा भारता ॥ मदलसेसी ॥७५॥

आपुला असोनि प्राणपती ॥ वृंदा निमाली अपघाती ॥ तैसीच निमाली सती ॥ मदलसा ते ॥७६॥

तंव ह्नणे राजा भारत ॥ स्त्रियेसि असोनियां कांत ॥ कैसा जाहला देहघात ॥ तें सांगा मज ॥७७॥

आतां असो हे पुढती ॥ ऋषी सांगेल वित्पत्ती ॥ तें ऐकावें संत श्रोतीं ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥ ॥७८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ जालंधरवधप्रकारु ॥ पंचमोऽध्यायीं कथियेला ॥१७९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP