कथाकल्पतरू - स्तबक ५ - अध्याय ६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

रायासि ह्नणती वैशंपायन ॥ तूं श्रोत्यांमाजी विचक्षण ॥ तरी पुशिले पुशीचा प्रश्न ॥ ऐक आतां ॥१॥

गंधर्वराज विश्वावसु ॥ त्याची कन्या विष्णुअंशू ॥ जे बोलिला ऋषी व्यासू ॥ मदलसा नामें ॥२॥

ते आचारधर्माची पेटी ॥ वैराग्याची बरवंटी ॥ कीं लावण्यरुपाचे मठीं ॥ विरुढली ते ॥३॥

आणि वज्रपादाचा नंदन ॥ पुष्करमाळी विचक्षण ॥ त्याची कन्या कामबाण ॥ कुंडला नामें ॥४॥

ते मदलसेची प्राणसखी ॥ भिन्न नव्हती येकमेकी ॥ शयन करिती मंचकीं ॥ अर्धयुगुळीं ॥५॥

तंव पातालकेतू नामें असुरा ॥ तया श्रुत जालिया सुंदरा ॥ ह्नणोनि तेणें गंधर्वनगरा ॥ घातली धाडी ॥६॥

घालोनियां तनाचा पदर ॥ सर्वही मोहिला दळभार ॥ मग घेवोनि गेला असुर ॥ कन्या दोनी ॥७॥

त्या दैत्यें पाताळभुवनीं ॥ येके उद्वसपाटणीं ॥ नेवोनि घातल्या दोनी ॥ गोपुरावरी ॥८॥

तिये भोगुं पाहे असुर ॥ परी मदलसा नेदी अनुसर ॥ ऐसा क्रमिला संवत्सर ॥ दोघीजणींसी ॥ ॥९॥

तेणें शोक करी मदलसा ॥ तें श्रुत जाहलें हषीकेशी ॥ मग धाडिली तिचिये प्रवासा ॥ कामधेनू ॥१०॥

ते धेनु ह्नणे हो कुमरी ॥ माझें वचन अवधारीं ॥ शोक न करीं सुंदरी ॥ मदलसे तूं ॥११॥

धेनु ह्नणे जो येवोनि येथ या दैत्याचा करील घात ॥ तोचि होईल तुझा कांत ॥ मदलसे सत्य ॥१२॥

कामधेनु ऐसे कथोन ॥ मग निघाली तेथून ॥ आतां असो हा येथें प्रश्न ॥ मदलसेचा ॥१३॥

कोणी गाल्व नामें ऋषीश्वर ॥ तो घेवोनि विप्र सहस्त्र ॥ करीतसे घराचार ॥ कालिंदीतटीं ॥१४॥

तंव हा वज्रकेतूचा कुमर ॥ पातालकेतू नामें असुर ॥ तो रुपे होवोनि सूकर ॥ विचरे तेथें ॥१५॥

ब्राह्मणांची यागकुंडें ॥ उच्चाटोनि टाकी तोंडें ॥ बळें ढकलोनि कवाडें ॥ खाई पक्कान्नें ॥ ॥१६॥

ऐसें नित्यानित्य होतां ॥ तेणें गाल्वा वाढली चिंता ॥ मग प्रसन्न केला सविता ॥ नानापरी ॥१७॥

ऊर्ध्व करोनियां दृष्टी ॥ श्वास रोघोनि हदयसंपुटीं ॥ ऐसें केलें दिवस साठी ॥ सूर्यस्तवन ॥१८॥

तेणें प्रसन्न जाहला सविता ॥ ह्नणे पुरेपुरे गा आतां ॥ श्वास सोडितां खालता ॥ पडिला अश्व एक ॥१९॥

तो श्वासासारिसा वारु ॥ सूर्ये टाकिला पवित्रू ॥ तें देखतसे ऋषीश्वरु ॥ महाराज ॥२०॥

तंव जाहली गगनवाणी ॥ जे याची गती असे त्रिभुवनी ॥ हा कुवलयाश्व मेदिनीं ॥ करील भ्रमण ॥२१॥

मग ह्नणे ऋषीश्वरु ॥ हें रत्न मी काय करुं ॥ सर्पाघरी महाकुंजरु ॥ पाहुणा जैसा ॥२२॥

तरी सूर्यवंशी नृपवर ॥ शक्रजित नामें पवित्र ॥ त्यासी उचित हा सत्वर ॥ देऊं अश्व ॥२३॥

आणि त्या शक्रजिताच कुमर ॥ ऋतुध्वज नामें महावीर ॥ तो मागावा धनुर्धर ॥ रक्षणासी ॥२४॥

ऐसें ह्नणोनि ऋषीश्वरु ॥ हातीं धरोनियां वारु ॥ वेगें आला जेथें आवारु ॥ शक्तजिताचा ॥२५॥

येतां देखोनि ऋषीश्वरु ॥ रायें केला नमस्कारु ॥ तंव दीधला तुरगवरु ॥ गाल्वें तयासी ॥२६॥

दृष्टी देखोनियां वारु ॥ राव हर्षे जाहला निर्भरु ॥ ह्नणे येवढा केला उपकारु ॥ कवणे गुणें ॥२७॥

मग बोलिला मुनीश्वर ॥ आह्मां उपद्रवितो असुर ॥ तरी रक्षणासाठीं गा कुमर ॥ देई तुझा ॥२८॥

तें मानवलें नृपवरा ॥ पुत्र दीधला ऋषीश्वरा ॥ मग त्या आरुडोनि तुरगवरा ॥ निघे ऋतुध्वज तो ॥२९॥

घेवोनि ऐशा राजकुमरा ॥ गाल्व आला निजमंदिरा ॥ येतां दाविलें त्या सूकरा ॥ पातालकेतूसी ॥३०॥

मग धनुष्या लावोनि शर ॥ कुमरें विंधिला तो सूकर ॥ बाण जाहला दुस्तर ॥ हदयस्थानीं ॥३१॥

तया घायाचेनि व्यथें ॥ दैत्य पळे पाताळपंथें ॥ तंव कुमर गेला सांगातें ॥ अश्वासहित ॥३२॥

लंघीतसे नानाविवरें ॥ पर्वत गुहा अंधकारें ॥ तंव पुढां देखे चौबारे ॥ तया उद्वसपाटणीचे ॥३३॥

रायासि वाटे विचित्र ॥ ह्नणे कैसें वोस नगर ॥ तंव दृष्टी देखिली सुंदर ॥ उपरीवरी उपवरी ॥३४॥

मग वारु बांधोनियां द्वारीं ॥ कुमर ह्नणे वो सुंदरी ॥ तूं कोण गे कैशा परी ॥ आलीस येथें ॥३५॥

तंव ते बोलिली वचनीं ॥ मी पुष्करमालीची नंदिनी ॥ कुंडला नामें सांगातिणी ॥ मदलसेची ॥३६॥

मग तयातें पुसे कुंडला ॥ तूं कोठील गा भूपाळा ॥ तंव तो बोले मंजुळा ॥ तयेप्रती ॥३७॥

ह्नणे मी चक्रवती राजेश्वर ॥ शक्रजिताचा ज्येष्ठ कुमर ॥ पातालकेतू नामें असुर ॥ विंधिला म्यां ॥३८॥

तयाची घेतां चाहुळी ॥ येथें मागोनि आलों पाताळीं ॥ बाण लाविला वक्षःस्थळी ॥ तया दैत्याचे ॥३९॥

दैत्य तो सूकर जाहला होता ॥ पळोनि येथें आला आतां ॥ त्यांचे वधानिमित्त तत्वतां ॥ केला प्रयत्न ॥४०॥

तंव मदलसा आली सत्वर ॥ दृष्टीं देखिला राजकुमर ॥ देखतां उपजला विरहज्वर ॥ तयेलागीं ॥ ॥४१॥

दृष्टीं वेधली उतावेळ ॥ आंग जाहलें विव्हळ ॥ तळहातें पिटोनि निढळ ॥ टेंकली मंचकीं ॥४२॥

तैसेंचि जाहलें राजकुमरा ॥ दृष्टी पाहोनि त्यां सुंदरा ॥ ह्नणोनि विरहें गेला चांचरा ॥ धरणीवरी ॥४३॥

मग ते ह्नणे कुंडला ॥ तुझा मनोरथ सफळ झाला ॥ आतां कामधेनूचिये बोला ॥ आठवीं मदलसे ॥४४॥

तरी निश्वयें राजकुमर ॥ हा तुझाचि जाण भ्रतार ॥ येणे पिटिला महाअसुर ॥ पातालकेतू ॥४५॥

मग इतुकिया सौरसा ॥ सावध जाहली मदालसा ॥ दृष्टीनें पाहिले डोळसा ॥ ऋतुध्वजासी ॥४६॥

तंव कुमारासि बोले कुंडला ॥ आह्मी दोघी कुमरी अबला ॥ येणें धाडी घालोनि पाताळा ॥ आणिलें दैत्यें ॥४७॥

तरी आतां हाचि विचारु ॥ तुजसी दोघी शेंस भरुं ॥ कीं पद्मिणीलागीं भ्रमरु ॥ तूंचि आह्मां ॥४८॥

तो जाणोनियां अनुसर ॥ मनीं हर्षला राजकुमर ॥ तंव चिंतिला गुरुवर ॥ मदलसेनें ॥४९॥

चिंतिता पातला तुंबर ॥ जो उपाध्याय पूर्वापर ॥ तयासि कथिला समाचार ॥ मदलसेनें ॥५०॥

तें मानवलें तुंबरा ॥ दृष्टीं देखोनि राजपुत्रा ॥ मग गंधर्वलग्न वधुवरां ॥ वेदमंत्रीं लाविलें ॥५१॥

ऐसा करोनियां सोहळा ॥ निघालीं तुंबर आणि कुंडला ॥ त्यांहीं निरविली अबळा ॥ ऋतुध्वजासी ॥ ॥५२॥

मग ते राणी मदलसा ॥ घोडां वाहोनिया डोळसा ॥ निघाला जावया स्वदेशा ॥ ऋतुध्वज तो ॥५३॥

इतुक्यांत सकळ दैत्यांसहित ॥ झुंजा पातला पातालकेत ॥ आला करावया घात ॥ वधुवरांचा ॥५४॥

तंव तो राजकुमर ॥ धनुष्या करोनि टणत्कार ॥ येतांचि विंधिला असुर ॥ महात्राणें ॥५५॥

खळबळलें दैत्यकुळ ॥ हा येकला ते सकळ ॥ जैसे अग्नीवरी टोळ ॥ घालिती झेंपा ॥५६॥

तैसा जाहला आंवर्त ॥ दैत्याचा केला निःपात ॥ वधोनियां पातालकेत ॥ निघे रावो ॥५७॥

तो मदलसेसह राजपुत्र ॥ नगरा आला सत्वर ॥ दोघें करिती नमस्कार ॥ शक्रजितसी ॥५८॥

मग सकळ वृत्तांत ॥ कुमरें कथिला संकलित ॥ मदलसा देखोनि हर्षभरित ॥ जाहला रावो ॥५९॥

ते मदलसा राजकुमरी ॥ सातांखणांचे दामोदरीं ॥ तिये ऋतुध्वज क्षणभरी ॥ न विसंबे कदा ॥ ॥६०॥

परस्परें जडली प्रीती ॥ जैसा प्रान आणि प्रकृती ॥ कीं छाया न सांडीं संगती ॥ शरीराची ॥६१॥

तैसा तो राजकुमर ॥ जेवी कमळिणीसि मधुकर ॥ नीतिमंत परि राज्यभार ॥ विसरला तेणे ॥६२॥

तंव ह्नणे शक्रजित ॥ पुत्र जाहला कामरत ॥ मग धाडोनियां दूत ॥ आणविला तो ॥६३॥

तयासि राव ह्नणे रे कुमरा ॥ त्वां राखावें ऋषेश्वरां ॥ अर्श्वी वेंधोनि वसुंधरा ॥ फिरावी सकळ ॥६४॥

मग तो कुवलया नामें वारु ॥ पालाणोनि निघे कुमरु ॥ अस्ता न जातां दिनकरु ॥ फिरे मेदिनी ॥६५॥

न भरतांचि दोन प्रहर ॥ फिरे पृथ्वीचें महाचक्र ॥ भोजनाकारणें निरंतर ॥ येत घरासी ॥६६॥

तंव इतुकिया अवसरीं ॥ तालकेतु नामें दुराचारी ॥ तो पातालकेतूचा निर्धारी ॥ होय पुत्र ॥६७॥

तालकेतु तो महाअसुर ॥ रुपें जाहला ऋषेश्वर ॥ सर्वे शिष्य येकसहस्त्र ॥ मावरुपी ॥ ॥६८॥

ऐसा तो यमुनेचे तीरीं ॥ माव नटलासे शरीरीं ॥ तंव तेथें आली फेरी ॥ ऋतुध्वजाची ॥६९॥

कुमरें केला नमस्कार ॥ तंव बोलिला मावकर ॥ कीं तुझे कंठीचा हार ॥ देई मज ॥७०॥

मजसी बोलाविले वरुणें ॥ नेणों कार्य असे कवणेगुणें ॥ तरी भेटोनियां तत्क्षणें ॥ येईन राया ॥७१॥

आह्मांसि दैत्यांचे भय थोर ॥ तुवां राखावे ऋषीश्वर ॥ मी जळीं जपोनिया मंत्र ॥ येईन त्वरां ॥७२॥

मग तूं घेई आपुला हार ॥ आह्मां कासया हा श्रृंगार ॥ तरी नावेक राहें स्थीर ॥ आमुचे मठीं ॥७३॥

मग तो कंठींचा दिव्य हार ॥ ऋषीसि देतसे राजकुमर ॥ तंव निघता जाहला असुर ॥ यमुने माजी ॥७४॥

भारता तेथोनि तो मावकर ॥ कंठीं घालोनियां हार ॥ बुडी देतांचि सत्वर ॥ जाहला अदृश्य ॥७५॥

तो शक्रजिताचे नगरीं त्वरित ॥ तालकेतु गेला धांवत ॥ जेथें होता नृपनाथ ॥ पिता त्याचा ॥७६॥

हातीं धरोनियां हार ॥ रायासी सांगे तो असुर ॥ ह्नणे ऐकपां समाचार ॥ तवपुत्राचा ॥७७॥

आह्मां ऋषेश्वरांचे मठीं ॥ दैत्य आले लक्षकोटी ॥ करुं लागले लुटालुटी ॥ पुस्तकांची ॥७८॥

तंव ऋतुध्वज आला धांवणे ॥ दैत्य मारिले खङ्गबाणें ॥ नदी दाटली वोघानें ॥ शोणिताचे ॥७९॥

आणिक आला असुर ॥ तेणें मारिले शस्त्रप्रहार ॥ प्राण सांडिता तवकुमर ॥ बोलिला अक्षरे चारी ॥८०॥

ह्नणे अगा ये ऋषेश्वरा ॥ जावोनि सांगें पितृनगरा ॥ कीं या हारासवें सुंदरा ॥ घालावी अग्नीत ॥८१॥

तरी हा घेपां त्याचा हार ॥ आपुला सांभाळी श्रॄंगार ॥ आह्मीं तिकडे जाळिला कुमर ॥ ऋतुध्वज तो ॥८२॥

ऐकतां जाहला हाहाःकार ॥ रणीं पडला राजपुत्र ॥ तेणें सहगमनीं धाडिल हार ॥ मदलसेसी ॥८३॥

येरी देखे कंठमाळा ॥ ह्नणे पति काय निमाला ॥ मग तात्काळ प्राण त्यागिला ॥ त्या मदलसेनें ॥८४॥

जैसें प्राणेवीण शरीर ॥ कीम उदकेंवीण सरोवर ॥ तैसें मानी ते सुंदर ॥ मदलसा सती ॥८५॥

मदलसेचें करुनि दहन ॥ शोक करिती माताजन ॥ मग बोलिला राव वचन ॥ शक्रजित तो ॥८६॥

ह्नणे धन्यधन्यरे आत्मजा ॥ वीरांमाजी ऋतुध्वजा ॥ रणीं कांडिला विभाजा ॥ दैत्यदळाचा ॥ ॥८७॥

आजि ब्राह्मणाचिये काजीं ॥ प्राण वेंचिला तुवां झुंजीं ॥ माझिये पूर्वजांची वोझीं ॥ निवारिली तेणें ॥८८॥

तैसीच हे पतिव्रता धन्य ॥ पतिसवेंचि त्यागिला प्राण ॥ आतां शरीराचा निःकारण ॥ काय शोक ॥८९॥

तीर्थ तप वन क्षेत्रीं ॥ देह पडावा उपकारीं ॥ तूं भलाभला गा संसारीं ॥ ऋतुध्वजारे ॥९०॥

रायेम वरिले स्त्रीजन ॥ ऐसें ऐकोनि निर्वाण ॥ मग निघाला तेथून ॥ तालकेतु ॥९१॥

तो यमुनेचिये तीरी ॥ तालकेतु आला झडकरी ॥ ह्नणे भलारे साह्यकारी ॥ ऋतुध्वजा तूं ॥९२॥

आतां जाई नगराप्रती ॥ सिद्धी पावली तुझी भक्ती ॥ मग मावेची दीधली हातीं ॥ कंठमाळा ॥९३॥

परि ह्नणे राजकुमर ॥ दीधल्या मी नोडवीं कर ॥ हा म्यां दीधला रत्नहार ॥ तुह्मालागीं ॥९४॥

तयासि करोनि नमस्कार ॥ नगरा गेला राजपुत्र ॥ अश्वीं होवोनियां स्वार ॥ पावला वेगीं ॥९५॥

परि न देखे महागजर ॥ मंत्रध्वनींचा उच्चार ॥ ह्नणे सामावला परिवार ॥ कवणेगुणें ॥९६॥

नगर देखे हीनकळ ॥ ध्वजारहित नाहीम मांदळ ॥ इतुक्यांत पावला राउळ ॥ ऋतुध्वज तो ॥९७॥

भेटला जंव मातापितरां ॥ तंव विस्मय झाला समग्रां ॥ मग मदलसेचे चौबारां ॥ शिणलें जग ॥९८॥

कटकटां बोलती समग्र ॥ कपटियेम विघडिले वधुवर ॥ कैंसें सांगावें दैव विचित्र ॥ मदलसेचें ॥९९॥

तंव इतुकिया उपरी ॥ कुमर उठिला सत्वरी ॥ जावयालागीं मंदिरीं ॥ मदलसेचे ॥१००॥

ऐसा गेला पदें चारी ॥ तंव बापें धरिला करीं ॥ मग सकळ कथिली कुसरी ॥ मदलसेची ॥१॥

ह्नणे येक आला ऋषेश्वर ॥ तेणें दाविला रत्नहार ॥ ह्नणाला रणीं पडिला कुमर ॥ ऋतुध्वज तुझा ॥२॥

ते ऐकोनियां मात ॥ मदलसा प्राण त्यागित ॥ थोर जाहला आवर्त ॥ नगरामाजी ॥३॥

आतां पुत्रा न करी खंती ॥ ऐसें पिता शिकवी पुढती ॥ देह वाचलिया बहुती ॥ होतील दारा ॥४॥

तेणें भ्रमित जाहला कुमर ॥ ह्नणे मी जी काय निष्ठुर ॥ स्त्री भली त्याचा संसार ॥ सत्य जाणा ॥५॥

स्त्रीसरिसें पुरुषें मरणें ॥ हें तो जाण निंद्यवाणें ॥ रुदन करितां मेहुणें ॥ होय जगा ॥६॥

तरी आतां हेंचि निर्धारीं ॥ मदलसेवीन ब्रह्मचारी ॥ तये वांचोनि सहोदरी ॥ सकळा मज ॥७॥

ह्नणोनि घातला संकल्प ॥ सकळकन्यांचा मी बाप ॥ ऐसा धरोनि अनुताप ॥ राहिला कुमर ॥८॥

तंव कोणे एके काळीं ॥ कंबल अश्वतर पाताळीं ॥ पुराणीक शेषाजवळी ॥ असती दोघे भुजंग ॥९॥

त्या दोघांचे दोनी कुमर ॥ महाप्रवीण फणिवर ॥ स्वर्गा जाती निरंतर ॥ रुद्रसेवेसी ॥११०॥

ते नित्य येतां भूमंडळी ॥ ऋतुध्वजासी खेळती सारीफळी ॥ स्त्रान भोजन आणि केली ॥ करिती क्रीडा ॥११॥

तंव ते नाग ह्नणतीऋतुध्वजा ॥ सदा खेळसी विनोद वोजा ॥ परि आजि कां मुखचंद्र तुझा ॥ कोमाइला ॥१२॥

मग तो सर्व समाचार ॥ सर्पासि सांगे राजकुमर ॥ कीं मदलसेवीण सहोदर ॥ स्त्रीजन मज ॥१३॥

हें सांगावे कोणाप्रती ॥ मदलसा आणील कोण मागुती ॥ जे मेली ते नये हातीं ॥ मित्रराया ॥१४॥

ह्नणोनि वाटे दुस्तर ॥ तुह्मी माझे प्राणमित्र ॥ तरी ऐसिया कारणें वक्त्र ॥ कोमाइलें ॥१५॥

मग बोलती दोघेजण ॥ ऋतुध्वजा तूं आमुचा प्राण ॥ तरी पाताली येवोनि जाण ॥ सुख भोगीं तूं सदा ॥१६॥

मित्रा तुझिये संगतीं ॥ आह्मा लागीं अतिप्रीती ॥ ऐसें ते बोलोनि त्वरितीं ॥ गेले पाताळीं ॥१७॥

तंव त्यांसि पिते पुसती ॥ कीं तुह्मी कोठे करितारें वस्ती ॥ मग ते वृत्तांत सांगती ॥ ऋतुध्वजाचा ॥१८॥

ते पुराणीक बोलती पुत्रां ॥ तुह्मीं वर्णितसा स्वमित्रा ॥ तरी झालिया उपकारा ॥ व्हावें उत्तीर्ण ॥१९॥

मग ते सांगती कुमर ॥ तो महाराज दिगंतर ॥ नवनिधीनीं भांडार ॥ भरलें असे ॥१२०॥

परि त्याची मदलसा राणी ॥ ते मेली जी आपमरणीं ॥ आतां ऐसिये स्त्रियेची मिळणी ॥ दुर्लभ तया ॥२१॥

ते कथा सांगतां विचित्र ॥ जे विरिंचि विष्णुसि अगोचर ॥ वार्ता ऐकोनियां धीर ॥ सांडिला आह्मीं ॥२२॥

तंव पिते देवोनि अभयहस्तु ॥ ह्नणती सिद्धि पार्वावेता जगन्नाथु ॥ अल्पकाळें मनोरथू ॥ पुरेल तुमचा ॥२३॥

ते कंबल आणि अश्वतर ॥ त्यांहीं हदयीं चिंतिला नरकुंजर ॥ मग सेविला गिरिवर ॥ हिमवंत तो ॥२४॥

तर्पी बैसले नेमस्थीं ॥ आराधोनि सरस्वती ॥ तंव ते ह्नणे मागा पुढती ॥ कांहीं इच्छित ॥२५॥

देवीसि ह्नणती फणिवर ॥ तूं संगीतवनाचें माहेर ॥ तरी रुद्र तोषेल ऐसें सुस्वर ॥ द्यावें आह्मां ॥२६॥

तंव ह्नणे ब्रह्मबाळी ॥ गीतवाद्यनृत्यकाळी ॥ तुह्मापासाव रसागळी ॥ जाणिजेल सदा ॥२७॥

मग तेथोनि ते फणिवर ॥ कैलासा गेले सत्वर ॥ शिवा नमोनियां सत्वर ॥ मांडिती गायन ॥२८॥

आरोहण अवरोहण ॥ वोडव तांडव संपूर्ण ॥ वागश्रुतीचें गायन ॥ सुस्वरें करिती ॥२९॥

गांधार षङ्ज मध्यम संचार ॥ तंत वितंत घन सुस्वर ॥ लास्य तांडव सर्व तंत्र ॥ दाविते झाले ॥१३०॥

मग ह्नणे शूळ पानी ॥ भला रंग आणिला गायनीं ॥ तरी येकेवांचोनि भवानी ॥ मागा मातें ॥३१॥

फणिवर ह्नणती देवा महेशा ॥ मेली आणावी मदलसा ॥ सजीवरुपी आणि वयसा ॥ द्यावी राजपुत्रासी ॥३२॥

मग ह्नणे जगन्नाथ ॥ हें होईल हो तथास्तु ॥ त्याचा पुरेल मनोरथू ॥ अल्पकाळें ॥३३॥

तुह्मीं करावें पितृश्राद्धा ॥ तो पिंड खाइजे द्विगुणअर्धा ॥ मग फडे पासावरे मुग्धा ॥ पडेल जाणा ॥३४॥

ऐकतां दोघे फणिवर ॥ गृहीं पातले सत्वर ॥ श्राद्ध जाणोनियां पितर ॥ आवंतिले तिहीं ॥३५॥

समस्त करोनि तर्पण ॥ मधीलपिंडाचें केलें भोजन ॥ तों फडेपासव निधान ॥ पडली मदलसा ॥३६॥

वस्त्रालंकारभूषणीं ॥ माथां मळिवंट मोकळी वेणी ॥ उन्नत स्तन चंद्रवदनी ॥ देखिली नागीं ॥३७॥

मग दोघीं नागकुमरीं ॥ मदलसा देखिली सामोरी ॥ तंव येरीनें सरसाविली अंजिरी ॥ लाजलेपणें ॥३८॥

ऐसी ते उद्भवली मदलसा ॥ जातिस्मर ज्ञान भाषा ॥ जे रुद्राचिया आयासां ॥ उत्पन्न जाहली ॥३९॥

मग तया कंबलाचे चरणीं ॥ माथा ठेवी कामिनी ॥ ह्नणे मी असें गा पोषणी ॥ कन्या तुझी ॥१४०॥

तंव पुत्रांसि ह्नणती कंबलाश्वतर ॥ वेगें आणावा राजकुमर ॥ परि हा न सांगावा विचार ॥ तयालागीं ॥४१॥

मग निघाले नागकुमर ॥ ॠतुध्वजा भेटले सत्वर ॥ क्षेम कुशळ परस्पर ॥ जाहलें तिघां ॥४२॥

नाग ह्नणती गा सुभटा ॥ चला जाऊं आमुचे मठा ॥ आमुचे पितयांसी उत्कंठा ॥ आहे तुझी ॥४३॥

ऐकोनि ह्नणे नरेंद्र ॥ मी स्त्रियेवीण अपवित्र ॥ लटिकाचि आहे भूमिभार ॥ मग नेतां कासया ॥४४॥

तंव ते ह्नणती फणिवर ॥ हें न कळे देवचरित्र ॥ होणार तें जाहलें सूत्र ॥ विधातयाचें ॥४५॥

तुझी असतां क्षेम कांता ॥ अग्नीत नासली अकल्पिता ॥ तरी मागुती तिची चिंता ॥ न करावी तुवां ॥४६॥

ऐसें बोलिले वातभुज ॥ तें रायें जाणोनि गुज ॥ ह्नणे पाताळ पाहों सहज यांचेनि प्रसंगें ॥४७॥

मग ते गोमतीचे तीरा ॥ तिघे प्रवेशले विवरा ॥ वेगें पातले नगरा ॥ कंबलाचिया ॥४८॥

मित्रीं दाविले सत्वर ॥ कंबल आणि अश्वतर ॥ मग रायें केला नमस्कार ॥ शिरसाष्टांगें ॥४९॥

जाहलें क्षेमालिंगन ॥ कुशळ पुसतां स्वस्तिप्रश्न ॥ बैसावया घातलें आसन ॥ ऋतुध्वजासी ॥१५०॥

तो देखोनि राजकुमर ॥ सुखी जाहला अश्वतर ॥ ह्नणे माग गा पाहुणेर ॥ आह्मापाशीं ॥५१ ॥

तंव राव बोले वचन ॥ तुमचे प्रसादें आहे संपूर्ण ॥ परि खालावोनि मान ॥ पाहे मित्रांकडे ॥५२॥

मग ह्नणती नागसुत ॥ यासी येक असे अपेक्षित ॥ मदलसा भेटेल तरी चित्त ॥ स्थिरवे याचें ॥५३॥

पिते ह्नणती पुत्रांतें ॥ ते मेली दिसे कपटावस्थें ॥ परि ईश्वराचिये संकेतें ॥ भेटेल यासी ॥५४॥

मग राव विनवी करसंपुटीं ॥ मदलसे मज करा जी भेटी ॥ तेणें करुनि संतुष्टी ॥ होईल सत्य ॥५५॥

विरहानळाची आगिटी ॥ जळतसे जी माझिये कंठीं ॥ अधरामृताचिये भेटी ॥ बोलावेन ॥५६॥

मग त्या मदलसेप्रती ॥ नाग ह्नणती येईं आरुती ॥ दृष्टीं पाहें वो भूपती ॥ वर आपुला ॥५७॥

तंव ते आली पद्मिणी ॥ जैसी विद्युल्लता गगनीं ॥ कीं चंद्ररेखे उभवणी ॥ पौर्णिमेची ॥५८॥

दृष्टीं देखोनि रुपडें ॥ राव उलटला लवडसवडें ॥ मग आलिंगनाचेनि कोडें ॥ धांविन्नला ॥५९॥

नाग ह्नणती स्थीर स्थीर ॥ नावेक धरावा जी धीर ॥ तें ऐकोनि राजकुमर ॥ पडिला मूछेंनें ॥१६०॥

जैसा गरुडाचिये धाकें ॥ भुजंग भूमीसि टेके ॥ तैसा कंदर्पाचेनि विखें ॥ व्यापला रावो ॥६१॥

मग तो शिंपोनि तुषारें ॥ पदरें वारिती वारे ॥ ह्नणती भेटभेट वो सुंदरे ॥ मदलसे यासी ॥ ॥६२॥

ऐसें ऐकोनियां श्रवणीं ॥ सावध जाहला तत्क्षणीं ॥ तंव पायां लागली कामिनी ॥ मदलसा ते ॥६३॥

ह्नणे जिवलगा प्राणनाथा ॥ देह दमिला माझिये व्यथा ॥ मग केंशीं झाडोनि माथा ॥ ठेविला चरणीं ॥६४॥

म्यां पतींचे व्यथें अबळा ॥ प्राण त्यागिला तात्काळा ॥ परी मजसाठीं निर्वाळा ॥ त्वांही केला ॥६५॥

परी साच न मानी कुमर ॥ ह्नणे हा मायामय श्रृंगार ॥ तंव बोलिला फणिवर ॥ नाभीनाभी ॥६६॥

हे सत्य गा मदलसा ॥ प्रसन्न करोनि महेशा ॥ आह्मीं आणिली सायासा ॥ तुजकारणें ॥६७॥

मग चौक भरोनिया दाट ॥ मध्यें मांडिला कन कपाट ॥ आणि भरिला शेंसपाट ॥ दोघांजणासी ॥६८॥

वाहिलीं वस्त्रें भूषणें ॥ नागिणी करिती अक्षयवाणें ॥ कुरवंडीचें केलें सांडणें ॥ दीपकेंसीं ॥६९॥

ते राणी सुखसेजारीं ॥ रायासि मीनली अंतुरी ॥ त्या आनंदाची लहरी ॥ सांगवे कवणा ॥१७०॥

ऐसी भेटली मदलसा ॥ मग राव निघाला स्वदेशा ॥ घेवोनियां संदेशा ॥ फणिवरांच्या ॥७१॥

त्या कंबलअश्वतरांचे आसनीं ॥ लागे मदलसा कामिनी ॥ मग राव उतरला उपवनीं ॥ पितृनगराचे ॥७२॥

तें दृश्य जाहलें वनकरां ॥ त्याहीं जाणविलें नृपवरा ॥ कीं मदलसा आणिली सुंदरा ॥ ऋतुध्वजकुमरें ॥७३॥

दूतमुखींची ऐकोनि मात ॥ हर्षभरित शक्रजित ॥ जैसा सिंधु होय उन्मत्त ॥ पूर्णचंद्रें ॥७४॥

मृदंग आणि काहळा ॥ हाकारिला सैन्यमेळा ॥ पुत्र भेटीसी उताविळा ॥ चला चला ह्नणे ॥७५॥

भेटी होतां समूळकथा ॥ ऋतुध्वज सांगे नृपनाथा ॥ ह्नणे हे नागीं दीधली कांता ॥ मदलसा मज ॥७६॥

ऐसे भेटले पितापुत्र ॥ मदलसा आणिली सुंदर ॥ वेगें श्रृंगारिलें नगर ॥ प्रधानवर्गी ॥७७॥

उभविलीं गुढिया तोरणें ॥ घरोघरीं वाधावणें ॥ रायें दीधली असंख्य दानें ॥ सर्वाभूर्ती ॥७८॥

मांडोनियां कनकपाट ॥ वोहरें बैसविलीम सुभट ॥ द्विजीं केला शांतिपाठ ॥ अभिषेकाचा ॥७९॥

वस्त्रें भूषणें अलंकार ॥ दास दासी घेवोनि सहस्त्र ॥ धांवताती जन समग्र ॥ उत्साहमेळीं ॥८०॥

आतां असो हे अवस्था ॥ मदलसा भेटली प्राणनाथा ॥ पुत्र जाहले तयेसि भारता ॥ तें सांगूं तुज ॥८१॥

हे मार्कडेयपुराणीची कथा ॥ पुढें मदलसा उपदेशील सुतां ॥ तें ऐकावे सकळ श्रोतां ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥८२॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ पंचमस्तबक मनोहरु ॥ मदलसाआख्यान विस्तारु ॥ षष्ठोध्यायीं कथियेला ॥१८३॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP