मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन १८६ ते १९०

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - १८६

भक्ति अम्हाला देई, भक्ति अम्हाला देई । हरिची ॥धृ॥

आणिक नलगे धन-सुत-दारा, मान जगाचा काही ॥१॥

खाउनिया कळणा अणि कोंडा, रंगवु देह सदाही ॥२॥

राहु कुठेही दरी-कंदरी, वृक्ष-वेलिच्या छायी ॥३॥

तुकड्यादास म्हणे ही पुरवी, आशा श्रीगुरुआई ! ॥४॥

भजन - १८७

प्रेमळ हरिची गीता, प्रेमळ हरिची गीता । गा रे ! ॥धृ॥

कष्ट हराया संसाराचे, साधुनि घ्या या हीता ॥१॥

हरिस्मरणाचा महिमा जाणे, तोचि तरे भव रीता ॥२॥

संसारी जणु संजिवनी ही, मनुजा ! साध उचीता ॥३॥

तुकड्यादास म्हणे मन लावी, मिळचि अंति भगवंता ॥४॥

भजन - १८८

निववाना, दिना या जिवा देवा ! घडवाया अपुली सेवा ॥धृ॥

जन्म हा मग येइ कैसा, नाहि तिळभरही भरवसा ।

घ्या करुणा प्रभु ! न्या चरणांबुजि, काय अवघड घनश्यामा ! ॥१॥

कठिण गमे हा मोह-पसारा, भवसागर ही बिकटचि धारा ।

तुकड्यादासा तुझा आसरा, तारा अथवा जगि या मारा ।

थोडि तरि कृपा का हो द्याना ? ॥ निववाना ० ॥२॥

भजन - १८९

नलगे मज आणिक काही, सद्गुरुआई भेटवा ॥धृ॥

नच मनी धनाची आशा, नच मानपान-आकांक्षा ।

हा अवघा व्यर्थ तमाशा, आशा-पाशा सोडवा ॥१॥

नच पुत्र-पौत्र ते काही, घरदार नको मज तेही ।

मी सन्मुख गुरुच्या राही, सुख द्या ऎसे या जिवा ॥२॥

जरि राज्य मिळे भू सारी, तरि सुख नसे संसारी ।

भवि सोडवुनी निर्धारी, लावा हृदयी या दिवा ॥३॥

हे क्षणिक सौख्य मिळवावे, मग अंती व्यर्थ मरावे ।

तुकड्याला भय हे ठावे, दुस्तर पाशा तोडवा ॥४॥

भजन - १९०

कोणा म्हणशिल 'घ्या कैवार', जेव्हा पाहशि यमाचे द्वार ?॥धृ॥

येइल कोण आडवा बाप ? चुकविल काय तुझा रे ! ताप ? ।

करिशी काय असा व्यवहार ? जेव्हा ० ॥१॥

येतिल काय आई-गणगोत ? दावाया कर्तव्य-सुज्योत ।

करिशी काय व्यर्थ हा प्यार, जेव्हा ० ॥२॥

चोरी करुनी पाळी लोक, त्यातुनि भोगतील का एक ? ।

पहा वाल्मीकऋषी-उद्गार, जेव्हा ० ॥३॥

तुकड्यादास म्हणे रे ! शोध, घेई सत्संगाचा बोध ।

नश्वर हे सगळे जाणार, जेव्हा ० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP