मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन ५ ते १०

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - ६

राहु दे, मन हे तुझ्या पदि राहु दे ।

भेद सगळे जाउ दे, तव रूप निर्मळ पाहु दे ॥धृ॥

आस नाही दुसरी, हा जन्म सगळा वाहता ।

होउ दे सेवा प्रभू ! या नश्वरा देहे अता ॥१॥

कोण नेइल संपदा ही, अंतकाळी बांधुनी ?

राहतिल हे जगि सारे, विषयसुख दिसते जनी ॥२॥

दास तुकड्या वांच्छितो, विसरू नको गरिबा हरी !

दीन आम्ही तव पायिची, या बालकासी सावरी ॥३॥

भजन - ७

भगवंता ! लक्ष्मीकांता ! तारि बालका ॥धृ॥

मोहविकारे जीव थरारे, कोणि ना सखा ।

संसारी दुःख भारी, कावला फुका ॥१॥

तुझिये स्वरूपी चित्त वसू दे, घेउ दे सुखा ।

मन रंगो नाम गाता, न घे आणिका ॥२॥

मरणी मरू दे पाहता तुलाचि, नाहि पारखा ।

तुकड्याचि हाक घ्या हो, विसरू नका ॥३॥

भजन - ८

कुणि दत्त पाहिला का माझा ? अवधूत पाहिला का माझा ? ॥धृ॥

दंड-कमंडसु त्रिशूल हाती, औदुंबर-तटि वास करी ।

पायी खडावा भस्म तनुवरि, भक्तांच्या धावे काजा ॥१॥

कोल्हापुर ला मागत भिक्षा, वास करी माहुरधामा ।

स्नान करी जान्हवी तटाकी, योगिराज सद्गुरुराजा ॥२॥

जपता भावे प्रसन्न होई, फळ देई झणि धावुनिया ।

तुकड्यादासा आस तयाची, पुरविल तो अमुच्या काजा ॥३॥

भजन - ९

भाललोचना ! रे गड्या ! भेटि देइ आज ।

उध्दरिली महानंदा कृपेने सहज ॥धृ॥

उपमन्यु बाळासाठी केला दुग्धसिंधू ।

हलाहल प्राशूनिया राखियली लाज ॥१॥

ऎसी वेदग्रंथ कीर्ति वर्णिती अनंत ।

ऋषिमहंतांचे तुवा पुरविलेसि काज ॥२॥

घेउनि त्रिशूल डमरू, नंदिस्वार होत ।

अर्धांगि सती पार्वती, गणपती सिध्दिराज ॥३॥

भूत डाकिणी पिशाच, घेउनी सहीत ।

तुकड्या म्हणे कैलासी, उभारिला ध्वज ॥४॥

भजन - १०

त्या प्रीय शंकराला, जिव पाहण्या भुकेला ।

कैलासिच्या शिवाला, कुणि भेटवा अम्हाला ॥धृ॥

नरमुंड-माळधारी, विष-सर्प ते शरीरी ।

अवधूत वेषवाला, जिव पाहण्या भुकेला ॥१॥

व्याघ्रासनी विराजे, लल्लाटे चंद्र साजे ।

डमरू-त्रिशूलवाला, जिव पाहण्या भुकेला ॥२॥

शोभे जटेत गंगा, राही पिवोनि भंगा ।

अलमस्त बैलवाला, जिव पाहण्या भुकेला ॥३॥

नाचे पिशाच्च संगे, जो भिल्लिणीशि रंगे ।

वश होय भाविकाला, जिव पाहण्या भुकेला ॥४॥

करि शंख, नाद रुंजे, मुखि राम-राम गुंजे ।

क्षणि जाळिले मदाला, जिवे पाहण्या भुकेला ॥५॥

तुकड्या तयास ध्यायी, ध्यानी दिसो सदाही ।

हा हेत पुरविण्याला, जिव पाहण्या भुकेला ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 01, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP