अष्टावक्र गीता - अध्याय १८

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

Ashtavakra gita is a perfect moral of life.


जो आत्मा शान्तरुप आहे, ज्याच्यांत संकल्प-विकल्प उत्पन्न होत नाहींत आणि जो सुखरुप आणि प्रकाशस्वरुप आहे, ज्याच्या स्वरुपाचें ज्ञान होतांच जगद्‌भ्रम स्वप्नाप्रमाणें मिथ्या होऊं लागतो, त्या आत्मस्वरुपाला नमस्कार असो. ॥१॥

सर्व तर्‍हेची व तर्‍हेनें संपत्ति मिळवून मनुष्याला खूप उपभोग मिळतात. पण या सर्वांचा त्याग केल्याशिवाय व त्यांच्याबद्दलची वासना नाहींशी झाल्याशिवाय मनुष्य सुखी होऊं शकत नाहीं. ॥२॥

कर्तव्यजन्य दुःखरुपी सूर्याच्या ज्वालांनीं ज्याचें मन भस्म झालें आहे त्याला शान्तिरुपी अमृतधारेच्या वृष्टीशिवाय सुख कसें मिळणार ? ॥३॥

हे जनक ! हें जगत् संकल्पमात्र आहे. परमार्थ दृष्टीनें आत्म्याशिवाय कुठलीच गोष्ट सत्यरुप नाहीं. संसार असत्य आहे. जो असत्यरुप संसार आहे तो कधींच सत्य होत नाहीं व जो आत्मा सत्यरुपच आहे तो कधीं असत्य-नश्वर होत नाहीं. ॥४॥

आत्मा सर्वांना सर्वांत जवळचा आहे. तो कुणापासूनही दूर नाहीं तो मनाच्या कल्पनेपलीकडचा, कल्पनेंत न मावणारा, आयासानें प्राप्त न होणारा ---आयास सुटतांच प्राप्त होऊं शकणारा, निर्विकार व दुःखरहित आणि उपाधिरहित सदैव एकरस आहे. ॥५॥

जीवनांतील सारे मोह, आसक्ति विरुन गेलेला, दुःखरहित, विकारांच्या अभावानें दृष्टि निर्मळ झालेला ज्ञानी पुरुष ’स्व’ रुपानें जगांत शोभून दिसतो. ॥६॥।

सर्व जगत् कल्पनामात्र आहे. आत्मा हा सनातन व मुक्त आहे, असा प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञानी पुरुष लहान बालकाप्रमाणें बागडत असतो. ॥७॥

जीवात्मा ब्रह्म आहे, भाव-अभाव कल्पित आहेत हें पक्कें अनुभवाला आल्यानें कसलीच कामना उरली नाहीं. त्यामुळें कुणाला कांहीं सांगावें किंवा कांहीं करावें असें ज्ञानी पुरुषाला कांहीं उरत नाहीं. ॥८॥

सर्वत्र आत्मरुप कोंदाटलें आहे या अनुभूतीनें तें ब्रह्म मी आहें, हें जग मी नाहीं अशा विकल्पना गळून पडल्यानंतर ज्ञानी आंत भरलेल्या अपार आनंदानें व तो व्यक्त करणें शक्य नसल्यानें मौनावस्थेंत असतो. ॥९॥

संकल्परहित, समचित्त-साक्षीभावानें असलेल्या योग्याला संशय-विक्षेप, एखाद्याच विषयाची एकाग्रता, एखाद्या गोष्टीचा खोल विचार, मूर्खता, सुख या दुःख यांपैकीं कांहींच उरत नाहीं. तो आत्मानंदांतच मग्न असतो. ॥१०॥

राज्याधिकारी असण्यांत, भिक्षावृत्तीनें राहाण्यांत, लाभहानि होण्यांत, मनुष्यसमूहांत किंवा निर्जन वनांत राहाण्यांत विकल्परहित झालेल्या योग्याला कांहीं विशेषता वाटत नाहीं--सगळीकडे समतोल वृत्तीनें राहातो. ॥११॥

अष्टावक्र म्हणतो कीं, स्थिरचित्त झालेल्या योग्याला धर्म, काम, अर्थ यांचें कांही प्रयोजन राहात नाहीं; व हें काम मी केलें आहे किंवा हें करणार आहें अशा प्रकारचें द्वंद्व गेल्यानें जीवन्मुक्त योगी निरामय राहातो. ॥१२॥

जीवन्मुक्त पुरुषाची कुठलीच क्रिया स्वतःच्या संकल्पानें होत नाहीं आणि त्याला करण्यायोग्य कर्म शिल्लक नसतें; कारण त्याला कशाचाच मोह नसतो आणि हेतु व आसक्तीशिवाय कुठलेंच कर्म होऊं शकत नाहीं. त्याची शरीरयात्रा प्रारब्धवश चालू असते. ॥१३॥

जीवन्मुक्ताचे सर्व संकल्प नष्ट झालेले असतात. त्यामुळें त्याला कसला मोह नसतो. त्यामुळें त्याच्या दृष्टीला संसार अनुभवाला न येतां ब्रह्मच अनुभवाला येतें. त्याला ध्यानाची वा मुक्तीचीही इच्छा नसते. कारण त्याच्या मनाला कसलें स्फुरण होत नसल्यानें तो आत्मानंदांतच मग्न असतो. ॥१४॥

मुक्त पुरुषाला सर्वत्र ब्रह्मानुभव येत असल्यानें हें विश्व पाहूनही त्याला तें जग न दिसतां ब्रह्मरुपच दिसतें. त्यामुळें निर्वासन झालेला मुक्त पुरुष जग पाहात असूनही पाहात नाहीं. ॥१५॥

ज्यानें ब्रह्माला पाहिलें तो तें ब्रह्म मी आहें असें चिंतन करतो. पण जो स्वतःच ब्रह्म होऊन सर्वत्र ब्रह्मानुभव घेत आहे, जो ब्रह्माशिवाय कांहीं पाहात नाहीं, तो कशाचें चिंतन करणार ? ॥१६॥

जो स्वतःमध्यें विक्षेप-संशय पाहातो, तोच चित्ताचे हे संशय-विक्षेप जावेत म्हणून चित्तनिरोधाचा प्रयत्‍न करतो. पण ज्याचे सर्व संशय-विक्षेप आत्मानुभवानें मावळले आहेत, विक्षेप-संशय घ्यायला मनच शिल्लक उरलें नाहीं तो कशाचा निरोध करणार ? ॥१७॥

ज्ञानी पुरुष संशय-विक्षेपरहित होऊन इतर लोकांप्रमाणेंच त्यांच्यांत वावरत असतो. पण त्यांच्यांत अलिप्तपणें राहून तो स्वतःत कुठला विक्षेप-संशय, समाधि किंवा बंधन यांचा अनुभव घेत नाहीं. ॥१८॥

ज्ञानी मनुष्य स्वतः आत्मानंदांत तृप्त असतो. लोकदृष्टीनें तो कांहीं करतांना दिसला तरी त्या करण्यामागें कांहीं करावें किंवा कांहीं करुं नये अशी कामना नसल्यानें, वासना नसल्यानें, त्यानें कांहीं केलें तरी तें न केल्यासारखेंच असतें. ॥१९॥

जेव्हां एखादें कर्म करायला येऊन ठेपतें तेव्हां ज्ञानी मनुष्य तें कुरकुर न करतां संतोषानें करतो. सहजसमाधींत असणार्‍या ज्ञानी पुरुषाचा प्रवृत्ति वा निवृत्तीचा कसलाच आग्रह नसतो. ॥२०॥

वासनारहित, निरालंब, स्वच्छंद, बंधनरहित असा ज्ञानी पुरुष प्रारब्धानुसार, सुकलेलें पान जसें वार्‍यानें स्वतःच्या इच्छेशिवाय, प्रयत्‍नाशिवाय उडत जातें तसा संसारांत राहात असतो. ॥२१॥

ज्ञानी माणसाल कधीं हर्ष होत नाहीं, कधीं खेद वाटत नाहीं. तो शांत मनानें विदेह स्थितींत असतो. ॥२२॥

आत्म्यामध्यें रममाण झालेल्या, शांत व निर्मल चित्ताच्या ज्ञानी पुरुषाला कांहीं टाकण्यासारखें नसतें वा कसलीही आशा नसते. ॥२३॥

स्वभावतः ज्याचें चित्त शून्यावस्थेंत आहे तो सामान्य संसारी माणसासारखा वागतांना दिसला तरी त्याला कशानें मान वाटत नाहीं वा अपमान वाटत नाहीं. ॥२४॥

होणारी कर्मे देहाकडून होतात, शुद्धरुप अशा माझ्या आत्म्यानें तीं केलीं नाहींत असें जो अनुभवतो तो ज्ञानी पुरुष कर्में करुनही तीं करीत नाहीं. ॥२५॥

कुठलेंही कर्म करण्याचा आग्रह नसलेला जीवन्मुक्त सहजप्राप्त कर्मे करीत असतो पण त्यांत बालिशपणा नसतो. त्यामुळें सांसारिक कर्में करुनही त्यांत लिप्त न झाल्यानें त्याची वृत्ति सदा प्रसन्न राहाते. ॥२६॥

नाना विचाररहित ज्ञानी मनुष्य अंतरांत परम शांति अनुभवीत असतो. त्यामुळें संकल्पादि मनाचे व्यापार, बुद्धीचे व्यापार व इंद्रियांचे व्यापार तो करीत नाहीं. ॥२७॥

ज्ञानी माणसाला विक्षेपच नसल्यानें विक्षेपनिवृत्तीकरितां त्याला समाधीचा प्रयत्‍न करावा लागत नाहीं. द्वैतभ्रम नष्ट झाल्यानें त्याला कुठलाही बंध असत नाहीं. हें सर्व जगत् कल्पित आहे हें जाणून तो निर्विकार चित्तदशेंत असतो. ॥२८॥

जो मनुष्य अहंकाररहित झाला तो लोकदृष्टीनें कर्म करीत नाहीं किंवा करतो असें वाटलें तरी कर्तृत्वाचा अहंभावाच नाहींसा झाल्यानें, त्याला संकल्पविकल्पांचे स्फुरण होत नाहीं. ॥२९॥

जीवन्मुक्तांचें चित्त कर्तृत्वरहित, संकल्पविकल्पविरहित, आशारहित व संदेहमुक्त असल्यानें त्याला कशाचा खेद होत नाहीं किंवा कशानें तो संतोष पावत नाहीं. ॥३०॥

ज्ञान्याचें चित्त संकल्प-विकल्परुप चाळे (चेष्टितें) करण्यास प्रवृत्त होत नाहीं, कारण चित्ताची निर्मळ व निश्चल अवस्था झाल्यानें तें ’स्व’ रुपांत लीन होतें. ॥३१॥

मन्द पुरुष तत् आणि त्वं पदांचे कल्पितभेद श्रुतींच्या उपनिषद्‌ ग्रंथांतून ऐकून संशय आणि विपरीतपणामुळें मूढतेला प्राप्त होतो आणि तत् आणि त्वं पदांचा अभेद अर्थ समजण्याकरितां समाधी लावतो. परंतु हजारोंतला कुणी एखादाच अंतराम्त शांतचित्त व संशय-विकल्परहित होऊन बाहेरचा व्यवहार वेडयासारखा करतो. ॥३२॥

अज्ञानी माणसें चित्ताचा निरोध करुन एकाग्रतेचा खूप अभ्यास करतात परंतु ज्ञानी पुरुष गतकालांतील कर्मांचा अथवा भविष्यकाळांतील संकल्पांचा विचार न करतां वर्तमानकाळांत राहून आपल्या ’स्व’ रुपांत लीन असतात. ॥३३॥

अज्ञानी पुरुश चित्तनिरोधानें अथवा कर्मानुष्ठानानें परमानंदाला प्राप्त होत नाहीं. ज्ञानी पुरुष तत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन निश्चिंत असल्यानें असा कांहीं प्रयत्‍न न करतांच कृतार्थ होतो. ॥३४॥

संसारपरायण सामान्यजन त्या शुद्ध, बोधरुप, प्रिय, पूर्ण असलेल्या, क्रियारहित व दुःखरहित अशा आत्मरुपाला जाणत नाहींत. ॥३५॥

अज्ञानी अभ्यासरुपी कर्मांनीं मोक्ष मिळूं शकत नाहीं. मनाच्या व शरीराच्या क्रियारहित होऊन भाग्यवान सत्पुरुष आत्म्याच्या प्रत्यक्ष अनुभवानेंच मुक्तावस्थेंत राहातो. ॥३६॥

अज्ञानी ब्रह्म होण्याची इच्छा करतो. पण कसलीही इच्छा-आशा करणें हेंच त्याच्या ब्रह्म होण्याच्या आड येतें. पण ज्ञानी पुरुष इच्छारहित झाल्यानें, प्रयत्‍न-क्रियारहित झाल्यानें ब्रह्म होण्याचा प्रयत्‍न न करतांही ब्रह्मस्वरुप होतो. ॥३७॥

’स्व’चा अनुभव अथवा अनुभवी गुरुचा आधार नसलेला अज्ञानी स्वतःचे पूर्वग्रह, समजुती यांत गुरफटून जें कर्मकाण्ड करुं जातो त्यानें संसारालाच पोषण मिळतें. पण ज्ञानी पुरुष या अनर्थाचें मूळ असलेल्या पूर्वग्रहांच्या समजुतींच्या जाळ्यांत न अडकतां, साक्षीवृत्तीनें असल्यामुळें, सर्वांपासून अलिप्त राहून ब्रह्म अनुभवतो. ॥३८॥

मन शांत व्हावें या इच्छेनें अज्ञानी मनुष्य नाना प्रयत्‍न, विचार व कर्मे करतो. इच्छा व प्रयत्‍न हींच निर्विचार अवस्थेला बाधक झाल्यानें त्याला शांति मिळत नाहीं. पण ज्ञानी पुरुष सर्व प्रयत्‍न व विचार सोडून साक्षी व तटस्थ भावानें वागत असल्यानें त्याला शांतता सहज प्राप्त होते. ॥३९॥

दृश्य वस्तूंशीं समरस होऊन जो विचारधारेंत अडकतो व ’स्व’ ला विसरुन विषय-विकारांत गुंतत जातो त्याला आत्मदर्शन कुठलें ? परंतु ज्ञानी पुरुष आत्मस्वरुपांत रममाण होऊन आत्मस्वरुपाचें अखंड दर्शन घेत असल्यानें त्याला बाह्य जगांतील गोष्टी न दिसतां सर्वत्र हरीच दिसूं लागतो. ॥४०॥

जो मनावर नाना बंधनें टाकून मनाचा निरोध करण्याचा यत्‍न करतो, तो प्रयत्‍नच त्याच्या मनाला भरकटवून टाकीत असल्यानें त्याला चित्ताची समता प्राप्त होत नाहीं. पण ज्ञानी मनुष्य चित्ताच्या निरोधाचा प्रयत्‍नच न करतां जें जसें आहे तें तसें-लिप्त न होतां पाहातो, त्यामुळें त्याचें चित्त अडोल राहातें. ॥४१॥

कुणी प्रपंचाला भावरुप असल्यानें सत्य समजतो तर कुणी प्रपंचाला शून्यरुप मानतो. पण संसाराला भाव-अभावरुप न पाहातां जो सर्वत्र फक्त आत्मरुपच पाहातो तो शांतचित्त असतो. ॥४२॥

कुबुद्धीचा पुरुष शुद्ध, अद्वैत आत्म्याला विकारी विचारांच्या द्वारां पाहूं बघतो पण मनाचे मोहमत्सरादि विकार व चलनवलन गेलेलें नसल्यानें जन्मभराच्या प्रयत्‍नानेंही त्याला आत्मरुपाचा अनुभव येत नाही. ॥४३॥

मुमुक्षु पुरुषाची बुद्धि सतत कशांत ना कशांत गुंतविल्याशिवाय, वासनेशिवाय राहूं शकत नाहीं. पण मुक्त पुरुषाची बुद्धि कशाचीच इच्छा करीत नसल्यानें मोकळी व स्वच्छ राहाते. ॥४४॥

मुमुक्षु मनुष्य विषयरुपी वाघाला पाहून भयभीत होतो व चित्तवृत्ति एकाग्र व्हावी म्हणून पर्वतगुहांत जाऊन राहातो. त्यानें त्याच्या चित्तवृत्ति एकान्तांत असूनही सर्वत्र फिरत असतात. पण मुक्त पुरुष विषयरुपी वाघ हे खोटे आहेत हें जाणून त्यांना भीत नाहीं. ॥४५॥

मुक्तपुरुषरुपी सिंहाला पाहून वासनाग्रस्त, चूपचाप पळून जातात. संसारी माणसें अशा ईश्वरी कृपा लाभलेल्या, वासनारहित सत्पुरुषाची स्वतः येऊन सेवा करतात. ॥४६॥

संशयरहित समतोल मनाचा ज्ञानी, यमनियमादिकांच्या कर्मकाण्डाचा आग्रह न धरतां सहजप्राप्त पाहाणें, ऐकणें, स्पर्श करणें, वास घेणें, खाणें इत्यादि कर्मे अलिप्तपणें करतो. ॥४७॥

चिदात्म्याच्या नुसत्या श्रवनानेंच, चिदात्म्याचें नांव ऐकतांच, ज्याची अखंडित शुद्धबुद्धि झाली आहे तो ज्ञानी आत्मरुपांतच स्थिर राहातो. तो मुक्त पुरुष मग आचार-अनाचार, शुभ-अशुभ यांच्या जंजाळांत पडत नाहीं. ॥४८॥

जेव्हां जें कुठलें शुभ अथवा अशुभ कर्म, ज्ञानी पुरुषाच्या दैववशात् वाटयाला येतें तेव्हां कसलाही आग्रह-तक्रा-न करतां तें तो सहज करतो. कारण त्याचे सर्व व्यवहार एखाद्या बालकाप्रमाणें कुठल्याही हेतूनें होत नाहींत. ॥४९॥

मनाचीं सर्व बंधनें तुटून मन पूर्ण विकार व विचाररहित झाल्यानें स्वतंत्र झालें. त्यामुळें ज्ञानी माणसाला आपोआप सुख मिळतें. कारण दुःख निर्माण करायला मनावर कसलाही ताण नसतो. त्यामुळें तो परम अनुभवाला प्राप्त होतो. प्रत्यक्ष ज्ञान अनुभवाला येतें, नित्य सुख वाटयाला येतें व तो परमपदाला पोहोंचतो. ॥५०॥

जेव्हां पुरुषाला आपल्या आत्म्याचें अकर्तेपण, अभोक्तेपण प्रत्यक्ष आत्मदर्शनानें अनुभवास येतें तेव्हां त्याच्या चित्ताच्या सर्व वृत्ती क्षीण होतात. ॥५१॥

ज्ञान्याचें एखाद्या बालकासारखें उच्छ्रंखल-तापट वागणें शोभून दिसतें पण कामनांनीं भरलेल्या माणसानें कांहीं हेतु बाळगून पाळलेली शांतता शोभादायक नसते. ॥५२॥

कल्पनारहित, बंधनरहित, मुक्तबुद्धीचा ज्ञानी कधीं प्रारब्धवशात्‌ ऐश्वर्ययुक्त भोगांत विलास करतो तर कधीं निर्जन गिरिगव्हरांत राहातो. ॥५३॥

विद्वान, देवता, तीर्थ, स्त्री, राजा, प्रिय व्यक्ति वगैरेंची पूजा होतांना पाहून ज्ञानी पुरुषाच्या हृदयांत कसलीही वासना निर्माण होत नाहीं. ॥५४॥

जीवन्मुक्ताची नोकरचाकर, स्त्री-पुत्र-कन्या, स्वगोत्राचे-जातीचे लोक, या सर्वांनीं हसून टवाळी व तिरस्कार केला तरी त्याचें चित्त क्षोभ पावत नाहीं. ॥५५॥

ज्ञानी पुरुष बाहेरुन संतुष्ट दिसला तरी संतुष्ट नसतो, तसेंच, बाहेरुन खिन्नसा वाटला तरी अंतरांत खिन्न नसतो. त्याची ती आश्चर्यकारक दशा फक्त त्या अवस्थेला पोहोंचलेल्या मुक्त पुरुषालाच समजूं शकते. ॥५६॥

संकल्परहित, विचारशून्य, दुःखरहित, शून्याकार, आकाररहित ज्ञानी पुरुषाला अमूक गोष्ट करायला हवी असें सांसारिक कर्तव्य उरत नाहीं-तें त्याला दिसत नाहीं. ॥५७॥

अज्ञानी शरिरानें कुठलीं कर्में न करतांही संकल्प-आशांनीं मन भरलेलें असल्यानें सतत व्यग्र असतो पण ज्ञानी शरीरानें सहजप्राप्त कर्में करीत असूनही संकल्प व आशारहित असल्यानें ’स्व’ स्थ असतो. ॥५८॥

आत्मसुखांत असलेला ज्ञानी जीवन्मुक्त उठणें, बसणें, येणें, जाणें, जेवणें, बोलणें आदि सर्व व्यवहार शांत चित्तानें सुखपूर्वक करतो. ॥५९॥

ज्ञानी मनुष्य व्यवहार करतांना संसारी माणसासारखा क्लेश पावत नाहीं. शांत महासरोवराप्रमाणें क्षोभरहित असल्यानें प्रसन्न असतो. ॥६०॥

वासना न सुटलेल्या मूढाचें कर्म टाकणें हें कर्म करण्याला-संसाराला उद्युक्त करतें तर सहजप्राप्त कर्में करणार्‍या ज्ञानी पुरुषानें कर्में केलीं तरी तीं निवृत्तीचीं फळें देणारीं होतात. ॥६१॥

संसारी मूढाचें वैराग्य घरदार सोडण्यांतच दिसून येतें पण अंतरांतील संसार तसाच राहातो. पण देहाबद्दलची आसक्ति सुटलेल्या ज्ञान्याला कशाबद्दल प्रेम नि कशाबद्दल वैराग्य येईल ? ॥६२॥

अज्ञानी माणसाची दृष्टि संसाराची आसक्ति व त्या संसारसाधनेंत येणारे अडथळे यामुळें सतत गढूळलेली राहून मन बैचेन असतें. पण सर्व संसाराचा हरिरुपानें अनुभव घेणार्‍या ज्ञानी माणसाला हरीचेंच दर्शन होत असल्यानें तो ’स्व’ रुपांत स्वस्थ असतो. ॥६३॥

जो ज्ञानी बालकाप्रमाणें कामनारहित होऊन कार्याला आरंभ करतो तो खरें म्हणजे कांहींच करीत नाहीं. तो अहंकाररुपी मलाच्या रहित असल्यानें त्याच्या ठिकाणीं कर्तृत्वभाव नसतो. ॥६४॥

तो आत्मज्ञानी पुरुष धन्य आहे, ज्याला सर्वत्र ब्रह्मरुपाचा अनुभव येतो. त्यामुळेंच पाहाणें, ऐकणें, स्पर्श करणें, वास घेणें, खाणें इत्यादि इंद्रियांनीं होणारीं कर्में तो करीत असला तरी तो त्याला ब्रह्मानुभवच ठरतो. ॥६५॥

जो ज्ञानी निरभ्र आकाशासारखा सर्वदा संकल्प-विकल्परहित आहे, त्याला संसार कुठला व स्वर्ग कुठला ? आत्मविद्‌ जीवन्मुक्ताच्या दृष्टीनें सर्वत्र एका आत्म्यानेंच परिपूर्ण विश्व व्यापलेलें असल्यानें-दुसरें कांहींच नाहीं---मग त्याला स्वर्ग-नरक आणि त्याला कारणीभूत असलेलें पाप-पुण्य कुठलें ? ॥६६॥

जो ज्ञानी पुरुष इहलोकांतील व परलोकांतील फलांच्या कामनेरहित आहे, जो संपूर्ण निष्काम आहे तोच पूर्णानंदस्वरुप आहे. ज्याची सहजसमाधि सर्वदाच चालू असते तो मुक्त पुरुष आपल्या अनवच्छिन्न समाधीनें--स्वरुपानें जगांत वावरतो. ॥६७॥

भोग व मोक्षाच्या इच्छेचा त्याग केलेला, कुठेंही, केव्हांही रागद्वेषाचा लवलेश नसलेल्या ज्ञानी महात्म्याचें महात्म्य अधिक काय सांगणार ? ॥६८॥

हें नामरुपात्मक-घटपटादि रुप-जें जगत् आहे तें सर्व कल्पनामात्र आहे. त्याचें अधिष्ठानरुप ब्रह्म हेंच सत्य आहे. ज्या शुद्ध बोधस्वरुप मुक्त पुरुषानें संपूर्ण कल्पनेचा त्याग केला आहे व जो केवळ शुद्धचैतन्य स्वरुपांतच राहात आहे, त्याला कुठलेंही कर्तव्य शिल्लक राहात नाहीं. ॥६९॥

हा सर्व संसार कल्पित व भ्रामक आहे, त्याला अस्तित्वच नाहीं व केवळ ब्रह्मच सत्य आहे असा ब्रह्मानुभव घेणार्‍या योग्याला सहज शांति मिळते. ॥७०॥

जो ज्ञानी शुद्धस्वरुप, स्वप्रकाश, चिद्रूप अशा ’स्व’ ला पाहातो, तो आणखी इतर कुठल्या दृश्य पदार्थाला पाहात नाही. मग त्याला कुठल्या विषयाबद्दल आसक्ति असेल, कुठला विधी करावा लागेल ? किंवा कशाबद्दल वैराग्य असेल किंवा कशाचा उपशम करावा लागेल ? ॥७१॥

जो चिद्रूप आत्म्यांत कार्यासहित माया पाहात नाहीं, त्याच्या दृष्टीला बंध कुठला ? मोक्ष कसला ? आणि हर्षविषाद

कसले ? ॥७२॥

आत्मज्ञान होईपर्यंतच मायाभ्रमरुप संसाराचें अस्तित्व असतें. त्यामुळें आत्मज्ञानी पुरुष ममतारहित, निरहंकार, कामनाशून्य अशा अवस्थेंत जगाला शोभायमान वाटतो. ॥७३॥

अविनाशी व खळबळ (राग-द्वेष-दुःख) रहित आत्म्याचें दर्शन घेणार्‍या मुनीला कसली विद्या, कुठलें शास्त्र, कुठलें जग, कशाचा देह आणि त्याबद्दलचा अहं-ममभाव असूं शकेल ? ॥७४॥

यदाकदाचित् अज्ञानी पुरुषानें चित्तनिरोधादि कर्मांचा त्याग केला तरीही मनोराज्यादि व वाणीचे प्रलाप तो करीत राहातो. ॥७५॥

मंद पुरुष आत्मवस्तूबद्दल ऐकूनही संसाराबद्दलची मूर्खपणाची आसक्ति सोडीत नाहीं आणी बाह्य गोष्टी न करण्याचें ठरवूनही त्याचें आंतल्या विषयलालसांचें चिंतन सुटत नाहीं. ॥७६॥

ज्ञानामुळें ज्याचीं सर्व कम व तीं करण्याची उर्मी गळून पडली आहे त्याला सहजप्राप्त नसलेलें कर्म करण्याची वा कांहीं बोलण्याचीही इच्छा होत नाहीं. ॥७७॥

ज्या धीरपुरुषाचे मोहादि सर्व विकार दूर झाले, त्याच्या दृष्टीला तम-अंधकार कुठला ? आणि अंधाराचा अभाव असल्यानें प्रकाश कुठला ? कारण हे दोन्ही सापेक्ष आहेत. अशा ज्ञानी पुरुषाला कालादिकांचें भय नसतें. न कुठें हानि न कुठें लाभ, न कशाबद्दल प्रेम असतें न द्वेष असतो, न कांहीं ग्रहण करणें न त्याग करणें असतें. ॥७८॥

अनिर्वचनीय व स्व-भावरहित योग्याला धैर्य कशाविरुद्ध, विवेक कशाबद्दल व निर्भयता कुणापासून ठेवण्याचें कारण नाहीं. कारण तो सदा एकरस ब्रह्म असतो. ॥७९॥

जीवन्मुक्त आत्मज्ञान्याच्या दृष्टीनें स्वर्गही नाहीं व नरकही नाहीं, तर सर्वंत्र एक आत्माच परिपूर्ण व्यापून आहे. आत्म्याव्यतिरिक्त ज्ञानाच्या दृष्टीला दुसरें कांहींच नाहीं. ॥८०॥

ज्ञान्याचें चित्त ब्रह्मामृतानें परिपूर्ण व शीतल असल्यानें त्याला कुठल्या लाभाकरितां प्रार्थना करावी लागत नाहीं किंवा हानि झाली तरी शोक करावा लागत नाहीं. ॥८१॥

कामनारहित ज्ञानी सज्जन शांत पुरुषाची स्तुति करीत नाहीं, किंवा दुष्टाची निंदा करीत नाहीं. आत्मतृप्त योगी सुख आणि दुःख समान झाल्यानें कुणाचेंच कुठलें कृत्य पाहात नाहीं. ॥८२॥

धीर जीवन्मुक्त पुरुष संसाराचा द्वेष करीत नाहीं किंवा संसार पाहातही नाहीं. कारण त्याला सर्वत्र ब्रह्मानुभव येत असतो. द्वैत नाहींसें झाल्यानें तो ब्रह्मरुप होतो, त्यामुळें तो स्वतःचें वेगळें आत्मरुपही पाहात नाहीं त्यामुळें तो हर्षविषादरहित होऊन जन्ममरणहित होतो. ॥८३॥

पुत्र-स्वस्त्रीबद्दल आसक्तिरहित आणि विषयाबद्दल कामनारहित व स्वतःच्या शरिराबद्दल चिंतारहित असलेला ज्ञानी शोभायमान असतो. ॥८४॥

मुक्त पुरुषाला प्रारब्धवशात् ज्या गोष्टी प्राप्त होतात, त्यांनींच तो संतुष्ट असतो; आणि प्रारब्धानुसार नाना प्रकारच्या देशांत, वनांत, नगरांत संतुष्ट राहून फिरतो. ॥८५॥

ज्या मुक्‍त पुरुषाला स्व-रुप हीच भूमि-विश्रांतिस्थान आहे त्याला कसलीच चिंता असत नाहीं, मग देह राहो अथवा

जावो ! ॥८६॥

जीवन्मुक्त निर्विकार होऊन संसारांत राहातो. तो स्वतःजवळ कांहीं ठेवीत नाहीं. तो विधिनिषेधाचा किंकर होत नाहीं. स्वच्छंद वागतो. निर्हेतुक भटकतो. सुखदुःखादि द्वंद्वें व संशयरहित होऊन कशांतच आसक्त नसतो. ॥८७॥

जो ममतारहित असून ज्याला माती व सोनें समान झालें आहे व ज्याच्या हृदयाच्या सर्व ग्रंथी तुटून जो संशयरहित आहे आणि ज्याच्या स्वभावांतील रज व तमोवृत्ती साफ धुवून निघाल्या आहेत, असा ज्ञानी दर्शनीय होतो. ॥८८॥

जो मुक्तात्मा सर्व विषयांबद्दल आसक्तिरहित आहे, ज्याच्या हृदयांत थोडीही वासना शिल्लक नाहीं, अशा संपूर्ण तृप्त ज्ञानी पुरुषाची तुलना कोणाबरोबर करणें शक्य आहे ? ॥८९॥

जीवन्मुक्त सर्वत्र फक्त ब्रह्मच अनुभवत असल्यानें पाहात असूनही संसार त्याला दिसत नाहीं. सांगत असूनही ब्रह्म अकथ्य असल्यानें सांगत नाहीं, जाणत असूनही तें अनुभवत असल्यानें जाणत नाहीं, ऐकत असतो तरी ब्रह्मच ऐकत असल्यानें सांसारिक गोष्टी त्याला ऐकूं येत नाहींत. निर्वासनिक ज्ञानी पुरुषाशिवाय असें कोण करुं शकेल ? ॥९०॥

उच्चनीचत्वाची भावना सर्वथा गळून गेलेला व कामनारहित असलेला ज्ञानी भिक्षु असो वा भूपति असो, सर्व अवस्थांत शोभूनच दिसतो. ॥९१॥

जो निष्कपट योगी आहे, कोमल स्वभावाचा आहे, आत्मनिष्ठ, पूर्णार्थी व स्वच्छंदपणें राहाणारा आहे, त्याला संकोच कसला ? वृत्तीचें येणें जाणें कुठलें नि कर्तृत्व कशाचें आणि अमूकच मार्ग व तत्त्व खरें आहे असा त्याचा आग्रह कसा असणार ? ॥९२॥

कसल्याही आशेशिवाय, आत्म्यांतच विश्रांतीनें तृप्त झालेल्या ज्ञानी पुरुषाला जो आनंदाचा अनुभव येतो तो शब्दांनीं कसा वर्णन करुन सांगणार ? ॥९३॥

ज्ञानी झोपेंतही साक्षी वृत्तीनें राहूं शकत असल्यानें त्याची झोप इतरांसारखी तमोमय नसते. तो त्याच जागृत साक्षीभावानें स्वप्नेंही पाहातो व जागृतींतले सारे व्यवहारही क्षणाक्षणांत जगत असल्यानें भूत व भविष्याचे विचार न करतां-साक्षीवृत्तीनें असल्यानें तृप्त वृत्तीनें चालतात. ॥९४॥

ज्ञानवान जीवन्मुक्त लोकांच्या दृष्टीनें चिंत्तायुक्त वाटला तरी चिंतारहित आहे; इन्द्रियांचे व्यवहार करीत असला तरी निरींद्रीय आहे, बुद्धियुक्त वाटला तरी बुद्धिरहित आहे, अहंकारयुक्त वाटला तरी अहंकाररहित आहे. कारण त्याची सर्वत्र आत्मदृष्टि आहे. जो आत्मानंदांत बुडून गेला आहे तो इतर कुठें गुंतत नसतो. ॥९५॥

ज्ञानी सुखीही नाहीं वा दुःखीही नाहीं, विरक्त नाहीं किंवा कोणाच्या संगांत नाहीं, मुमुक्षु नाहीं किंवा मुक्त नाहीं, त्याचा कांहीं विशेष नाहीं किंवा अविशेष नाहीं, कारण तो फक्त आत्मभावानेंच शिल्लक राहिला आहे. त्याच्या इतर सर्व गोष्टी गळून पडल्या आहेत. ॥९६॥

जगांत ज्ञानी मुक्त पुरुष धन्य आहे. कारण लोकदृष्टीनें एखादी गोष्ट संशयास्पद असली तरी तो संशयरहित असतो. कारण सर्वत्र ब्रह्मानुभव येत असल्यानें संशयाचें कारणच उरत नाहीं. लोकदृष्टीला तो समाधिअवस्थेंत आहे असें वाटलें तरी तो सहजावस्थेंत असतो. लोकदृष्टीनें तो जड वाटला तरी वास्तवांत तो आत्मदर्शनानें तृप्त असल्यानें, कांहीं करण्याची उर्मी शिल्लक नसते. लोकदृष्टीनें तो ज्ञानी-पंडित वाटला तरी त्याचे निघालेले बोल हे आत्मानुभूतीचे असल्यानें, त्यांत ग्रांथिक पांडित्य नसतें. ॥९७॥

ज्ञानी कर्मानुसार यथाप्राप्त गोष्टींबद्दल स्वस्थचित्त असतो, गतगोष्टींबद्दल व भविष्यांतील कार्याबद्दलही तो संतुष्ट असतो. तृष्णेच्या अभावामुळें केलेल्या कामांबद्दल त्याला प्रसन्नता वा उद्वेग नसल्यानें तो त्यांचें स्मरणही करीत नाहीं. ॥९८॥

कुणी स्तुति केल्यानें ज्ञानी प्रसन्न होत नाहीं किंवा कुणी निंदा केली म्हणून रागावत नाही. मरण आलें तरी व्याकुळ होत नाहीं किंवा जगल्याचा हर्ष करीत नाहीं. ॥९९॥

शांत बुद्धीचा ज्ञानी पुरुष माणसांनीं गजबजलेल्या स्थानाकडे अथवा अरण्याकडे धावत नाहीं तर तो जेथें ज्या परिस्थितींत असेल तेथेंच समभावानें राहात असतो. ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP