अष्टावक्र गीता - अध्याय १

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

Ashtavakra gita is a perfect moral of life.


जनक म्हणाला,

हे प्रभो, ज्ञान कसें प्राप्त होईल, मुक्ति कशी मिळेल व वैराग्य कसें प्राप्त होईल हें मला समजावून सांगा. ॥१॥

अष्टावक्र म्हणाला

हे प्रिय, तुला जर मुक्तीची इच्छा असेल तर विषयांना विष समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमा, आर्जव, दया, संतोष व सत्य यांना अमृत समजून त्यांचें सेवन कर. ॥२॥

तूं स्वतः पृथ्वी नाहींस, पाणी नाहींस, अग्नि नाहींस, वायु नाहींस किंवा आकाशही नाहींस. मुक्ति मिळविण्याकरितां, या सर्वांचा साक्षी जो चैतन्यरुप आत्मा तो तूं आहेस असें जाण. ॥३॥

जर तूं देहाला स्वतःपासून अलग करुन चैतन्यांत स्थिरावलास तर आत्तां-या क्षणींच--तूं सुखी, शान्त व बंधमुक्त होऊन जाशील. ॥४॥

तूं ब्राह्मणादि वर्ण असलेला नाहींस किंवा तूं चार आश्रमांतलाही नाहींस, तसाच तूं डोळे आदि इंद्रियांचा विषय नाहींस. तूं असंग, निराकार विश्वाचा साक्षी आहेस हें जाण व सुखी हो. ॥५॥

हे व्यापक, धर्म-अधर्म, सुख-दुःख हे सर्व मनाचे आहेत. तुला-आत्मरुपाला-ते लागू नाहींत. तूं कर्ता नाहींस आणि भोक्ताही नाहींस. तूं तर सदा सर्व काळ मुक्तच आहेस.॥६॥

हे राजन्‌, तूंच एक सर्वांचा द्रष्टा आहेस व सदैव सर्वार्थानें मुक्त आहेस. पण स्वतः स्वयंप्रकाश व सर्वांचा साक्षी असतांना, स्वतःला सोडून इतरांना तूं द्रष्टा मानतोस हेंच बंधन आहे. ॥७॥

’मी कर्ता आहें’ अशा अहंकाररुपी कृष्णसर्पानें दंश केलेला तूं, ’मी कर्ता नाहीं’ अशा विश्वासरुपी अमृताचें सेवन करुन सुखी हो. ॥८॥

’मी एक विशुद्ध बोध आहें’ या निश्चयरुपी अग्नीनें अज्ञानरुपी वनाला जाळून शोकरहित व सुखी हो. ॥९॥

दोरीवर जसा सापाचा आभास होतो तसा ’ज्या’ वर ह्या संसाराचा आभास होतो, ’तो’ बोध तूं आहेस हें जाण व सुखानें विहार कर. ॥१०॥

मुक्तीचा निर्धार (अभिमान) ठेवणारा मुक्तच होतो व बद्ध असण्याचा न्यूनगंड (अभिमान) बाळगणारा बद्धच होतो. कारण ’जशी मति तशी गति’ ही लोकोक्ति खरीच आहे. ॥११॥

आत्मा साक्षी आहे, व्यापक आहे, पूर्ण आहे, एक आहे, मुक्त आहे, चैतन्यरुप आहे, क्रियारहित आहे, संगरहित आहे, इच्छारहित आहे, शांत आहे, पण श्रमामुळें संसाववान आहे असा भासतो. ॥१२॥

हे जनका, ’अहं’ च्या आभासानें सर्व बाह्य वस्तूंशीं ममत्व भाव निर्माण होतो, त्याचा त्याग करुन, मी कूटस्थ, असंग, ज्ञानस्वरुप, अद्वैत व व्यापक आत्मा आहें असा ध्यास घे-तीव्र भावना राहूं दे. ॥१३॥

हे पुत्रा, फार काळापासून ’मी देह आहें’ या-देहाच्या अध्यासपाशानें तूं बांधलेला आहेस पण मी बोधरुप आहें या ज्ञानाच्या तरवारीनें तो धारणापाश तोडून टाक व सुखी हो. ॥१४॥

तूं असंग, क्रियाशून्य, स्वयंप्रकाश आणि निर्दोष आहेस. पण समाधीचे प्रयत्‍न करण्याची क्रिया हेंच बंधन आहे. तूं फक्त मुक्त असल्याची घोषणा कर, क्रिया नको. ॥१५॥

हें सारेम विश्व तूंच व्यापलें आहेस, तें तुझ्यांतच सामावलें आहे, तूं यथार्थतः शुद्ध चैतन्यस्वरुप आहेस. म्हणून संकोचून क्षुद्र मनाचा-चित्ताचा होऊं नकोस. ॥१६॥

तूं अपेक्षारहित आहेस, निर्विकार आहेस, स्वनिर्भर (स्वतःपरिपूर्ण-चिद्‌घनरुप) आहेस, शांतीचें आणि मुक्तीचें स्थान आहेस, अगाध बुद्धि आहेस, क्षोभरहित आहेस, म्हणून चैतन्यमात्रावर श्रद्धा ठेवणारा हो. ॥१७॥

साकाराला मिथ्या समज, निराकाराला निश्चल-नित्य-ओळख. या यथार्थ (तत्त्व) उपदेशानें पुन्हा तुझी संसारांत उत्पत्ति होणार नाहीं. ॥१८॥

ज्याप्रमाणें आरशांत पडलेल्या प्रतिबिंबामध्यें आरसाच आंत व बाहेर असतो, त्याप्रमाणे या शरिराच्या आंत व बाहेर परमेश्वरच भरलेला आहे. ॥१९॥

ज्याप्रमाणें सर्वव्यापी आकाश घटाच्या आंत व बाहेर असतें, त्याप्रमाणेंच नित्य आणि निरंतर ब्रह्म सर्व भूतमात्राला व्यापून आहे. ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP