अष्टावक्र गीता - अध्याय १३

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

Ashtavakra gita is a perfect moral of life.


जनक म्हणाला

सर्व विषयांबद्दलच्या आसक्तीचा साक्षी वृत्तीनें जो सहजगत्या त्याग घडला व त्यामुळें चित्ताला जी स्थिरता आली ती भगवीं वस्त्रें धारण करणार्‍या संन्याशालाही दुर्लभ आहे. त्यामुळें साक्षी वृत्तींत राहून, गृहण व त्यागाची आसक्तीही संपली व मी आत्मानंदांतच उरलों. ॥१॥

कुठें कर्मकांडानें शरीर शिणलें आहे, कुठें पाठ-पाठांतरानें वाणीला शीण आला आहे, तर कुठें मनन-चिंतनानें मन मरगळून गेलें आहे हें पाहून या सर्वांचा त्याग करुन मी निर्धारानें आत्मानंदांत राहिलों आहें. ॥२॥

शरीरादींनीं होणारीं कर्में आत्मा करीत नसतो हें जाणून घेतल्यानें मी सहजप्राप्त कर्में अलिप्त राहून, साक्षीभावानें करुनही मी आपल्या सुख ’स्व’रुपांतच राहातों. ॥३॥

ज्याला देहासक्ति आहे त्यालाच कर्म करण्याची अथवा न करण्याचीं बंधनें असतात पण देह राहो किंवा जावो अशा माझ्या अवस्थेमुळें मी सहजसुखांत असतों. ॥४॥

लौकिक व्यवहार म्हणजे चालणें, फिरणें, बसणें, उठणें यांपासून अभिमानरहित झाल्यानें मला लाभ अथवा हानि नाहीं. त्यामुळें मी झोपलेला असो, बसलेला असो वा फिरत असो, या क्रियांमुळें माझी आत्मानंद अवस्था मोडत नाहीं. ॥५॥

सारीं कर्में सोडून मी झोपलों तरी माझी कांहीं हानि होत नाहीं, किंवा कर्मे करुन मला कांहीं प्राप्त करण्याची कामना नाहीं. त्यामुळें लाभहानीचा विचारच नसल्यानें मी सहजसुखांत असतों. ॥६॥

निरनिराळ्या परिस्थितींतील सुखांचीं आंदोलनें पाहून, मी सुख व दुःख यांत भेद मानीनासा झाल्यामुळें सुखी आहें. ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP