वेंकटेश्वर माहात्म्य - अध्याय पंधरावा

वेंकटेश महात्म्याचे पारायण केल्यास प्रत्यक्ष बालाजीचे दर्शन घेतल्याचा अनुभव येतो.


यानंतर सर्व लोकांच्या कल्याणासाठी श्रीनिवासासमोर दीप दाने उभी करून श्रीनिवासाची प्रार्थना केली की, हे श्रीनिवासा जोपर्यंत कलियुग आहे तोपर्यंत हा दीप अखंड तेवत राहील. ज्यावेळेस आपले विमान पडेल व हा दीप विझेल त्यावेळेस आपला अवतार पूर्ण होईल. याप्रमाणे ब्रह्मदेवाने प्रार्थना केली असता श्रीनिवासाने ते मान्य करीत म्हटले की, हे लोकपितामह ध्वजारोहणापासून रथारोहणापर्यंतचा सर्व उत्सव करण्याची सिद्धता करा. नऊ दिवसाच्या उत्सवासाठी व मिरवणूकीसाठी वेगवेगळी वाहने तयार करा. तिन्ही काळी भक्तीपूर्वक निरनिराळे भक्ष्यभोज्यादि पदार्थ नैवेद्यासाठी सिद्ध करा. याप्रमाणे सांगितल्यावर ब्रह्मदेवाने तोंडमानास बोलावून त्यास सांगितले निरनिराळ्या प्रकारची वाहने व उत्कृष्ट लाकडाचा उत्तम रथ, चामरे, पंखा इत्यादि वस्तु विश्वकर्म्याकडून तयार करवा. याप्रमाणे ब्रह्म देवाच्या आज्ञेवरून तोंडमानाने सर्व करविले. या उत्सवासाठी नाना देशाचे राजे-महाराजे ब्रह्मर्षि वगैरे आले. त्यावेळी ब्रह्मदेवाने चारहि वेदातील मंत्राने १ उत्सवमूर्ति, २ उग्र श्रीनिवास, ३ भोग श्रीनिवास, ४ लेखक श्रीनिवास अशा चार प्रतिमा तयार करविल्या. त्यात श्रीनिवास हे मुख्यमूर्ति झाले. त्या नंतर ब्रह्मदेवाने नऊ दिवस नानाप्रकारे उत्सव साजरा केला व दहावा दिवस हा श्रीनिवासाचा अवतार दिवस असल्याने अवभृत स्नान देवास होऊन नानाप्रकाराने श्रीनिवासाची पूजा करवून उत्सव समाप्त केला. मग सर्वजण श्रीनिवासाची अनुमति घेऊन आपआपल्या गावी परत गेले.

राजा तोंडमानाने आपल्या राजवाड्यात नित्यपूजेसाठी श्रीनिवासाच्या प्रतिमेची स्थापना केली. याप्रमाणे तो धर्मपरायण तोंडमान राज्य करीत असता एके दिवशी वशिष्ठगोत्री कुर्म नावाचा ब्राह्मण आपली गर्भिणी स्त्री व पाच वर्षांचा पुत्र यांचेसह राजाकडे येऊन म्हणाले- हे राजा, मी माझ्या पित्याच्या अस्थि गंगेत टाकण्यासाठी काशीस जात आहे. म्हणून मी परत येईपर्यंत माझ्या गर्भिणी स्त्रीचे व माझ्या बालकाचे पालन कर. तोंडमान राजाने ब्राह्मणाचे म्हणणे मान्य केल्यावर आपल्या स्त्रीपुत्रांस राजाजवळ ठेवून तो यात्रेस निघून गेला. ब्राह्मण यात्रेस गेल्यानंतर राजाने त्या ब्राह्मणाच्या स्त्रीपुत्रास एकांतस्थळी एका घरात नेऊन ठेवले. त्या घरात सहा महिने पुरेल इतकी धान्यसामुग्री ठेवून त्या घरात बाहेरून कुलूप लावले व राजा राज्यकारभारात मग्न झाला. दोन वर्षानंतर तीर्थयात्रा संपवून त्या कूर्म ब्राह्मणाने राजाकडे परत येऊन आपली पत्नी व मुलगा यांची मागणी केली तेव्हा तोंडमानास या ब्राह्मणाच्या स्त्रीपुत्राचे स्मरण झाले. कारण तो राजा राज्यकारभाराच्या गडबडीत त्यांना विसरला होता. तो घाबरून ब्राह्मणास म्हणाअल, "तुझी पत्नी व मुलगा हे श्रीनिवासाच्या दर्शनास शेषाचलावर गेली आहेत. ती एक दोन दिवसात परत येतील, असे सांगून त्या ब्राह्मणास ठेवून घेतले. व आपल्या राजकुमारास, एकांतस्थळी ठेवलेल्या ब्राह्मण स्त्रीपुत्रांना आणण्यासाठी पाठविले असता त्याठिकाणी त्या स्त्रीपुत्रांच्या अस्थि मात्र दिसल्या. तेव्हा त्या राजपुत्राने राजास तसे कळविले. ते ऐकून राजा घाबरला व लगेच श्रीनिवासाकडे येऊन त्याचे पाय धरले. दीनपणे रडत श्रीनिवासास सर्व हकीकत सांगितली. तेव्हा श्रीनिवासाने त्यांच्या अस्थि आणविल्या व त्या अस्थि उपरण्यात बांधून पांडुतीर्थाजवळ असलेल्या गुहेतील तीर्थाजवळ आणल्या व त्या तीर्थजलाने आपल्या अमृतस्त्रविहस्ताने त्या अस्थीवर प्रोक्षण करताच ती मृत माणसे जिवंत झाली. त्याबरोबर आकाशातून सर्व देवांनी पुष्पांची वृष्टि केली. तेव्हापासून त्या तीर्थास अस्थितीर्थ असे नाव पडले. नंतर श्रीनिवासाने त्या ब्राह्मणाच्या स्त्रीपुत्रांस राजाच्या स्वाधीन करून तोंडमानास उद्देशून म्हटले- हे राजा, तुझा ज्येष्ठबंधू आकाशराजा हा माझा सासरा म्हणून तुझ्यावर शेकडो उपकार केले. तुम्ही भयंकर अशी पापकृत्ये करून माझ्याकडे येता. तुमच्यावरील प्रेमामुळे मी त्यातून तुम्हास पार करतो. त्यामुळे मी अतिशय दुःखी होतो. याकरिता आतापासून मी मौनव्रत धारण करीत आहे. एकांती मी माझ्या प्रियजनाशिवाय कोणाशीहि बोलणार नाही. या कलियुगात अन्यवाणीनेच मी बोलेन. हे राजा, तू आता तुझ्या राज्यास जा ही ब्राह्मणपत्नी व त्याचा पुत्र त्या ब्राह्मणाच्या स्वाधीन कर, याप्रमाणे श्रीनिवासाने सांगितले असता त्या ब्राह्मणस्त्री पुत्रास घेऊन राजा आपल्या राजधानीत आला. त्याने त्या स्त्रीमुलास ब्राह्मणाच्या स्वाधीन करून सर्व हकीकत सांगितली. तेव्हा ब्राह्मणाने आपल्या पत्नीस "इतके दिवस तुम्ही कोठे होता?" असे विचारले असता ती स्त्री म्हणाली- देवाची माया कोण जाणू शकतो? मी श्रीनिवासाचे उदरात होते. तेथे अनेक लोक, सप्त समुद्र, अनेक पर्वत, नद्या, अनेक देवासह ब्रह्मदेव हे पाहिले. अशाप्रकारचे आपल्या पत्नीचे भाषण ऐकून "साक्षात परमात्म्याची लीला पाहणारी तू अतिशय पुण्यवान आहेस," याप्रमाणे बोलून तो ब्राह्मन आपल्या पत्नीपुत्रासह तेथुन स्वतःच्या गावी परतला.

श्रीनिवास आपल्यावर रुष्ट झाले आहेत असे पाहून त्यांना प्रसन्न करण्यासाठी काय करावे असे त्याने अनेक तपस्वी ऋषींना विचारले असता "श्रीनिवासाचा अनुग्रह संपादन करण्यासाठी तू वेंकटेशाचे सहस्त्र तुलसीदलाने तू पूजन कर" असे सांगितले असता राजाने ते मान्य करून त्यासाठी सुवर्ण व रत्ने यांची तुलसीदले तयार करविली. त्या तुलसीदलाने श्रीनिवासाची पूजा करू लागला असता मध्येच तुलसीदलात एक मातीचे तुलसीदल दिसू लागले. तेव्हा तोंडमान श्रीनिवासास म्हणाला- हे श्रीनिवासा, तुम्ही माझी उपेक्षा का करता? असे म्हणून तोंडमान रडू लागला. तेव्हा श्रीनिवास तोंडमानास म्हणाले- हे राजा माझे अनेक भक्त आहेत. येथून उत्तरेला एक योजनावर एक भीम नावाचा एक कुंभार आहे. तो माझा मोठा भक्त आहे. तो दररोज आपल्या मातीच्या देव्हार्‍यात माझी लाकडी मूर्ति ठेवून मातीच्या तुलसीदलाने माझी अतिशय भक्तीने पूजा करीत असतो. ती तुलसीदले येथे येऊन पडतात. तुला स्वतःला आपण फार मोठे भक्त आहोत असा गर्व झाला आहे. तू त्याच्याकडे जाऊन त्याची भक्ती पहा. याप्रमाणे श्रीनिवासाने सांगितले असता तोंडमान त्या कुंभाराकडे आला असता तो कुंबार एकाग्र मनाने वेंकटेशाची स्तुति करीत होता. तोंडमानाबरोबर वेंकटेश आलेले पाहण्याबरोबर कुंभारास अतिशय आनंद झाला. त्याने श्रीनिवासाची भक्तिपूर्वक पूजा केली. नानाप्रकारचे भक्ष्य भोज्यादि पदार्थ श्रीनिवासास समर्पण केले. तो स्तुति करीत आनंदमग्न होऊन देहभान विसरला. तेव्हा त्याची ती एकांतिक भक्ति पाहून संतुष्ट अशा श्रीनिवासाने त्यास मोक्ष दिला म्हणजे तोंडमान राजा पाहात असतानाच दिव्य विमानात बसवून तो भीमनामक कुंभार व त्याची पत्नी या उभयतांना वैकुंठास पाठविले. तेव्हा तो तोंडमान राजा म्हणाला- हे प्रभो, तुम्ही माझ्या राज्यातील हीन जातीत जन्मास आलेल्या कुंभारासहि वैकुंठास नेले. मी मात्र तसाच राहिले आहे. माझा उद्धार केव्हा करणार? त्याचा प्रश्न ऐकून श्रीनिवास म्हणाले- हे राजा तू आपला देह सोड म्हणजे तुला मोक्ष प्राप्त होईल, याप्रमाणे श्रीनिवासाने सांगितले असता त्या स्वामिपुष्करणी तीर्थामध्ये आपल्या देहाचा त्याग केला. तेव्हा श्रीनिवासाने त्यास मोक्ष दिला. हे जनक राजा, याप्रमाणे श्रीनिवास वेंकटचलावर आपला अ‌द्‌भुत महिमा दाखवीत तेथे वेंकटाचलावर आहेत. ब्रह्मरुद्रेन्द्रादि देवाकडून वंद्य असा श्रीनिवास तेथे भक्तांचे मनोरथ पूर्ण करीत कलियुगाच्या अंतापर्यंत राहणार आहेत.

पंधराव्या अध्यायाचे सार समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP