वेंकटेश्वर माहात्म्य - अध्याय सातवा

वेंकटेश महात्म्याचे पारायण केल्यास प्रत्यक्ष बालाजीचे दर्शन घेतल्याचा अनुभव येतो.


सूत म्हणाला हे शौनकादि ऋषी हो, मी तुम्हांस पद्मावतीचा व विशेषतः वसुधानाचा जन्मवृत्तांत कथन केला. आता मी तुम्हांस पद्मावतीचा विवाहमहोत्सवाचा पुण्य वाढविणारा वृत्तांत सांगतो ते श्रवण करा. ॥१॥

गजश्रेष्ठाच्या मागोमाग घोड्यावर बसून, ज्याचे वक्षःस्थळ श्रीगंधाच्या लेपाने तांबुस झाले आहे व त्यामुळेच प्रातःकालीन सूर्याच्या किरणाप्रमाणे जो भासतो असा वेंकटेश त्या मुलींच्याजवळ प्राप्त झाला. ॥२॥

गर्जना करीत येत असलेल्या हत्तीला पाहून पद्मावतीप्रमुख त्या मुली अतिशय भीतीने एका झाडाच्या आश्रयाने लपून बसल्या. ॥३॥

भीतीने आपले डोळे मिटून व आपला समुदाय त्या मुलींनी केला. झाडाच्या आड लपलेल्या मुलींनी त्या हत्तीकडे पाहावे व पुनः भीतीने झाडाआड व्हावे. ॥४॥

इतक्या अवकाशात हत्तीमागे असलेल्या, प्रातःकालीन सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा रत्नांच्या अलंकारांनी सुशोभित अशा पुरुषश्रेष्ठास त्या मुलींनी पाहिला. ॥५॥

मदनाप्रमाणे सुंदर अशा, घोड्यावर बसलेल्या त्या पुरुषश्रेष्ठास पाहून त्या गजराजानेहि यथायोग्य नमस्कार करीत व गर्जना करीत अरण्यांत पलायन केले. ॥६॥

नंतर त्या पुरुषाला पाहून अतिशय आश्चर्यचकित झालेल्या त्या मुलीनी एकमेकींचे हातात हात घालून भयाने घाबरून कांपत असलेल्या त्या मुली एका झाडाखाली आल्या आणि परस्परांस म्हणू लागल्या. ॥७-८॥

हे कमललोचने, वरारोहे, सखे, कोण बरे हा किरात आहे? याला आपण पूर्वी कधीहि पाहिले नाही. ॥९॥

घोड्यावर बसून हा येत आहे. याप्रमाणे परस्परंत बोलत असताना ती पद्मावती हलक्या आवाजात आपल्या मैत्रिणींना म्हणाली- या पुरुषाला त्याचे आईबाप, बांधव. त्याचा देश, कुल, जात, शील, नाव गोत्र वगैरे सर्व विचारा. याप्रमाने पद्मावतीने आपल्या मैत्रिणींना विचारण्यास सांगितले असता त्या मैत्रिणींनी त्या पुरुषास विचारले. ॥१०-११-१२॥

हे भद्रा, तू कोण आहेस? तू कोण आहेस? याठिकाणी तू का आला आहेस? काय काम आहे? हे प्रभो, हे सर्व तू सांग. ॥१३॥

याठिकाणी कोणीहि पुरुष नसल्याने तू येथून निघून जा. याप्रमाणे त्या मुलीचे भाषण ऐकून घोड्यावर बसलेला पुरुष म्हणाला. ॥१४॥

श्रीनिवास म्हणाला- हे मुलींनो, राजकन्येजवळ माझे काम आहे. याप्रमाणे त्याचे उत्तर ऐक्न त्या मुली पुनः म्हणाल्या, तुझ्या मनात जे काय काम आहे? ते तू लवकर सांग. तू राहणारा कोठचा, तुझे नाव काय? तुझी आई कोण? तुझा पिता कोण? ॥१५-१६॥

तुझा बंधु कोण? तुझी बहीण कोण? तुझे कुळ व गोत्र कोणते? याप्रमाणे त्या मुलींचे प्रश्न ऐकून जगदीश्वर श्रीनिवास म्हणाला, ॥१७॥

मुख्य काम म्हणजे मला कन्येची अपेक्षा आहे. नंतर मी अवांतर कामे सांगतो. याप्रमाणे बोलत पद्मावतीकडे पाहात श्रीनिवास म्हणाला- पूर्वीचे ज्ञानी लोक आमचे कुल हे चंद्रकुल होय असे समजतात. ॥१८॥

माझा पिता वसुदेव, माता देवकी, माझा थोरला भाऊ बलराम, धाकटी बहीण सुभद्रा, माझा मेहुणा अर्जुन, पांडव हे माझे आप्त होते. माझ्या मातेला माझ्या अगोदर सहा मुले होऊन ती सर्व मुले नामकरण झाल्यावर मृत झाली. ॥१९-२०॥

त्या मृतमुलांच्या वियोगाने माझे माता पिता दुःखी झाले असता सातवा राम झाला. पित्याप्रमाणे तो दिसत असल्याने त्याचे नाव राम ठेवले. ॥२१॥

आणि मी आठवा, अष्टमीच्या दिवशी जन्मलो. माझ्यानंतर सुभद्रा झाली. मी आईच्या वर्णाचा व कृष्णपक्षांत जन्मलो म्हणून हे देवि, माझे नाव सार्थ कृष्ण म्हणून ठेवले आहे. वर्णाने व नावानेहि मी कृष्ण आहे असे पंडित म्हणत आले आहेत. ॥२२-२३॥

याप्रमाणे मी माझा पंडितसमुदायात ऐकलेला सर्व जन्मवृत्तांत सांगितला आहे. आता तुमचे कुल, गोत्र, वगैरे सर्व काही सांगा. ॥२४॥

याप्रमाणे आपला वृत्तांत सांगितल्यावर पद्मावतीस आपली सर्व माहिती देण्याबद्दल सांगितले. तेव्हा पद्मावती म्हणाली- हे निषादाधिपते, मी आकाशराजकन्या होय असे समज. माझे नाव पद्मावती असून माझे चन्द्रकुल होय. व आमचे गोत्र अत्रि असे आहे. हे किरातेन्द्रा मी तू विचारल्याप्रमाणे सर्व माहिती सांगितली आहे तेव्हा तू येथून निघून जा. ॥२५-२६॥

याप्रमाणे तिने म्हटल्यावर श्रीनिवास म्हणाला, "येथून निघून जा" असे कथोर भाषण का करतेस ? सौम्यपणाने का बोलत नाहीस? जो अन्नाची इच्छा करतो त्यास जो ते देतो तो नरश्रेष्ठ होय. ॥२७॥

असा पुरुष पुण्य मिळवितो. जो पाणी प्यावयास मागतो त्यास पाणी प्यावयास जो देतो त्यासहि उत्तम फल प्राप्त होते. त्याप्रमाणे मी कामाची इच्छा करतो. मी त्यास पात्र आहे. ॥२८॥

या तुझ्या दानाने इहलोकी तू सुखी होऊन अंती स्वर्गास जाशील. असे निराकरण कठोर भाषण करण्यापेक्षा तुझे दान मला दे. याप्रमाणे श्रीनिवासाचे ते भाषण ऐकून पद्मावती अतिशय रागाने डोळे लाल करून म्हणाली. हे मूढा, तू असे भलतेसलते काय बडबडत आहेस. तुला जिवंत राहण्याची इच्छा नाही काय? तुला अशातर्‍हेने बोलत असलेले पाहून आकाशराजा ठार मारील यात बिलकुल संशय नाही. ॥२९-३०॥

याकरिता तो याठिकाणी यायच्या आत तू येथून निघून जा- याप्रमाणे पद्मावतीचे ते रागाचे बोलणे ऐकून श्रीनिवास म्हणाला- आपण इच्छिलेले कार्य सफल झाल्यानंतर येणारा मृत्यु हा सुखकारक होतो. कार्य सफल न झाल्याने मृत्यु आलेल्या पुरुषास सर्व जगत् तृणसमान वाटते. ॥३१॥

शिवाय अधर्माभिमुख होऊन राजा माझा वध कोणत्या कारणासाठी करील? तू कन्या आहेस व मी वर आहे. (तेव्हा मी तुला मागणी घातली) यात राजकन्ये, अन्याय काय आहे? ॥॥३२॥॥

तेव्हा पद्मावती म्हणाली हे मूढा, मी काय सांगते ते नीट ऐक. तू वस्तुस्थिति न जाणता लहानमुलाप्रमाणे बडबडत आहेस. आकाशराजा, तुलापाहिल्याबरोबर साखळदंडाने बाधील. ॥३३॥

हे मूर्खा, तू तुरुंगात अडकशील हे तुझे भविष्य मी सांगते-याप्रमाणे तिचे बोलणे ऐकून श्रीनिवास म्हणाला- जगद्‌गुरु स्वामी, मानवाचे मरण निश्चित करून क्रीडा करतो. ॥३४॥

जो प्राणी जन्मास आला आहे त्यात त्याच्या पूर्व कालाप्रमाणे मरणहि असते निरपराधी अशा मला, धर्माप्रमाणे वर्तन करणारा राजा मला का ठार मारील? ॥३५॥

तेव्हा पद्मावती म्हणाली- हे निषादाधिपते, तुला राजा, श्रीहरी, वराहदेव, श्रीरंगनाथ, वेंकटेश यांची शपथ आहे. ॥३६॥

हे महाबाहो, तू स्वतःचे संरक्षण कर. व सुखाने तू आपल्या स्थानास जा. याप्रमाणे पद्मावतीने म्हटले असता तो निषाददेव धारण करणारा श्रीहरी तिचा इशारा मनावर न घेता घोड्यावरूनच तो पुढे आला. ॥३७॥

घोडा पुढे आलेला पाहून ती कन्या पुनः म्हणाली. हे वनचरा, आईबाप, आप्तेष्ट, बंधु इत्यादि प्रमुखांना सोडून एखाद्या अनाथाप्रमाणे तू का मरतोस? निष्कारण कावळ्याच्या भक्ष्यस्थानी का पडतोस? याप्रमाणे पद्मावतीचे बोलणे ऐकून कमलाप्रमाणे नेत्र असलेला श्रीनिवास पद्मावतीला म्हणाला. ॥३८-३९॥

दैवाने आपल्याविषयी जे लिहिले आहे ते व्यर्थ कधीहि होत नाही. माझा जय होवो अथवा माझा पराभव होवो मी तुझा भोग घेणारच. ॥४०॥

याप्रमाणे श्रीनिवासाचे भाषण ऐकून मैत्रिणींनी परिवेष्टित अशी पद्मावती रागाने डोळे तांबडे लाल करून श्रीनिवासाची निर्भत्सना करित आपल्या हातात दगड घेऊन पुढे सरसावली. ॥४१॥

आणि मोठेमोठे दगड श्रीनिवासास मारू लागली. शिलावर्शावाने पद्मावती श्रीनिवासावर प्रहार करीत असता श्रीनिवासाचा घोडा त्याठिकाणी (मृतवत् ) पडला. ॥४२॥

आपला घोडा मृत झाला हे पाहून केस मोकळे सुटलेला श्रीनिवास वारंवार चोहोकडे पहात भ्रमिष्ट माणसासारखे 'आज माझ्या अपराधामुळे संकट प्राप्त झाले आहे' असे म्हणत उत्तरदिशेकडे निघून गेला. ॥४३-४४॥

निरोगी असणारा सर्वव्याप्त श्रीनिवास, मानवाप्रमाणे वागणारा त्या पर्वताच्या पायर्‍या चढून आपल्या वारुळातील शय्येवर आला. आनंदपरिपूर्ण असूनहि दुःखी झाल्याप्रमाणे जसा प्रलयकाली वटपत्रावर शयन करतो त्याप्रमाणे शय्येवर येऊन झोपला. ॥४५॥

याप्रमाने भविष्योत्तरपुराणांतील वेंकटेशमहात्म्याचा सातवा अध्याय समाप्त झाला

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP