वेंकटेश्वर माहात्म्य - अध्याय तिसरा

वेंकटेश महात्म्याचे पारायण केल्यास प्रत्यक्ष बालाजीचे दर्शन घेतल्याचा अनुभव येतो.


शतानंद म्हणतो- हे राजा, त्या पर्वतावर एक उत्तम व मंगलप्रद असे स्वामी पुष्करिणी या नावाचे तीर्थ आहे. ॥१॥

त्यात मासे, कासव व पाणकोंबडे आहेत; त्यांत बेडक्याहि असुन तीरावरील वृक्षसंघ आकाशाला जाऊन भिडेल इतका उंच आहे. ॥२॥

हे स्वामि पुष्करिणी तीर्थ गंगादि सर्व नद्यांची जन्मभूमि शोभेल. या पुष्करिणीमध्ये जे मानव स्नान करतील ते अत्यंत धन्य व पुण्यवान होत. ॥३॥

धनुर्मासामध्ये शुद्धपक्षात येणार्‍या द्वादशीच्या दिवशी अरुणोदयाचे वेळी या तीर्थाच्या पवित्र जलात स्नान करण्याची इच्छा सर्व देव करतात. ॥४॥

मग मानवाना स्नान करण्याकरिता? कालाचा नियम कशाकरिता? या तीर्थात जे आपल्या पितृगणांना संतोष व्हावा यासाठी श्राद्ध केल्यास त्यांचे पितृगण संतुष्ट होऊन वैकुंठात आनंदाने नाचतात? ॥५॥

सुदैवाने प्राप्त झालेल्या या मानव देहाने या तीर्थात स्नान न केल्यास त्या मानव देहास काय करावयाचे आहे? ॥६॥

त्या तीर्थामध्ये स्नान व दान जे करतात ते मानव भाग्यशाली होत. शंख नावाचा एक राजा नुसत्या स्नान मात्राच्या योगाने स्वर्गास गेला. ॥७॥

पूर्वी आंगिरस ऋषीचा पुत्र नारायण नामक ब्राह्मण स्वामि पुष्करिणी तीर्थात स्नान करण्याच्या माहात्म्यामुळे त्यास मिळालेल्या वराने परमात्म्याचे दर्शन झाले व तो वैकुंठास गेला. रामचंद्रासहि या तीर्थात केलेल्या स्नानाच्या पुण्यानेच रावणाने नेलेली सीता परत मिळाली. ॥८-९॥

याप्रमाणे तीर्थामध्ये श्रेष्ठ व पुण्यदायक असे हे स्वामिपुष्करणितीर्थ आहे. त्या तीर्थांच्या पश्चिम दिशेला वराहरूप परमात्मा, धरादेवीला आलिंगन देऊन पिंपळवृक्षाने शोभित अशा वारुळात वास्तव्य करून आहे. तो पर्वत म्हणजे तीन कोटी तीर्थांचे जन्मस्थान आहे. ॥१०-११॥

अशा या पर्वतावर आल्यानंतर वैकुंठापेक्षाहि हे स्थान अधिक चांगले आहे असे समजून सर्वत्र फिरू लागले. ॥१२॥

पण या ठिकाणी गुप्त होऊन राहण्यासाठी चांगली जागा सापडेना. तेव्हा आता काय करावे अशा विचारात असतानाच स्वामिपुष्करिणी तीर्थाच्या दक्षिणेस चिंचेच्या झाडाखाली असलेले एक वारुळ पाहून जगदीश्वर भगवान श्रीहरि संतुष्ट झाले. ॥१३-१४॥

व हे स्थान श्रेष्ठ आहे. असे मानून त्या वारुळात गुप्त झाले. याप्रमाणे वैकुंठ सोडून या पर्वतावर श्रीहरी येऊन राहिल्याला दहा हजार वर्षे उलटली. ॥१५॥

त्यानंतर द्वापरयुग संपून अठ्ठाविसाव्या कलियुगाचीहि काही वर्षे गेली असता कोणी एक चोल देशाचा राजश्रेष्ठ राजा, नागकन्येच्या पोटी जन्मला. तो राजा राज्य करीत असताना सर्व पृथ्वी अतिशय पुण्यदायक होती. ॥१६-१७॥

गाई पुष्कळ दूध देत होत्या. सर्व मुले आपल्या पित्याविषयी आदर बाळगीत असत. योग्यवेळी पाऊस पडत असल्याने भूमीवर मुबलक धान्य पिकत असे. ॥१८॥

सर्व स्त्रिया पतिव्रता होत्या तसेच पुरुषहि परिमित स्त्रियाशी विवाहित होत असत. तो राजा राज्य करीत असता ब्राह्मणहि यज्ञयागादि कर्माचा आनंद मिळविण्यात दक्ष होते. ॥१९॥

अशा वेळी (श्रीहरीचा शोध घेण्यासाठी) साक्षात ब्रह्मदेव सवत्स असे गाईचे रूप घेऊन विकत देण्याकरिता त्याठिकाणी आले. ॥२०॥

ब्रह्मदेव गाय, महादेव वासरु व महालक्ष्मी गवळणीचे रूप घेऊन श्रीहरीचा शोध करीत चोलराजाकडे आले. ॥२१॥

महालक्ष्मीने ती गाय चोलराणीस विकून आपल्या स्थानास परत गेली. पुष्कळ दूध देणारी म्हणून आपल्या मुलांसाठी चोलराणीने ती गाय विकत घेतली होती. ॥२२॥

पुढे ती गाय हजारो गाईसह वेंकटाचलास नित्य येऊ लागली. ॥२३॥

त्या गाईने (गाईचे रूप धारण करणार्‍या ब्रह्मदेवाने) नित्य श्रीहरीचा त्या त्या ठिकाणी त्या पर्वतावर हुंगत हुंगत शोध घेण्यास प्रारंभ केला. ॥२४॥

अशा तर्‍हेने शोध घेत असतानाच पुह्कळ दिवसांनी स्वामि पुष्करिणीतीरी एका वारुळात श्रीहरि आहेत असे समजल्यावर ब्रह्मदेवाच्या मनास संतोष वाटला. ॥२५॥

मग त्या वारुळात दुधाच्या धारा त्या गाईने सोडल्या. ॥२६॥

तेव्हापासून राजाच्या हजारो गाईंसह त्याठिकाणी आल्यावर एकटीने अत्यंत भक्तीने त्या वारुळात जगन्नाथाची प्रीति व्हावी याकरिता धेनुरूपी ब्रह्मदेवाने त्या वारुळात दुधाच्या धारा सोडाव्यात. ॥२७॥

आणि त्यामुळे राजवाड्यात अजिबात ती गाय दूध देईनाशी झाली. अशा पुष्कळ दिवसात गाईने दूध दिले नाही हे पाहून त्या चोलराणीने धेनुपालास म्हटले की, हे दुष्टबुद्धे गोपालका, ह्या गाईचे दूध तू काय करतोस? ॥२८-२९॥

तू हे दूध पीत असावास, अथवा वासरू पीत असावे यातील खरे काय ते तू सांग. याप्रमाणे राणीचे बोलणे ऐकून भयविव्हल झालेला तो गवळी राजभार्येला गद्‌गद् कंठाने म्हणाला- मी त्या गाईविषयी काहीच जाणत नाही. पण मी मात्र गाईचे दूध पीत नाही ॥३०-३१॥

स्वतः गाय पिते अथवा वासरू पिते हे मला माहीत नाही. हे मी अगदी खरे सांगत आहे- तू विचार कर. ॥३२॥

याप्रमाणे त्या गोपालाचे भाषण ऐकून चोलराजाची पत्‍नी अतिशय रागावली. (तो खोटे बोलत आहे असे वाटून) तिने चामड्याच्या दोरीने तयार केलेल्या चाबकाने त्या गोपालास मारले. ॥३३॥

नंतर दुसर्‍या दिवशी राजभार्येकडून ताडन केल्या गेलेल्या गोपालाने त्या गाईच्या गळ्यात लोढणे बांधून तिला चरण्यास सोडले व त्या गाईच्या मागोमाग स्वतः गेला. ॥३४॥

त्या गाईने रोजच्याप्रमाणे वेंकटाचलावर येऊन श्रीहरीचे वास्तव्य असलेल्या वारुळात दुधाच्या धारा सोडण्यास प्रारंभ केला. ॥३५॥

ते पाहून रागावलेल्या गवळ्याने हाताएवढी लांब फरशी घेऊन त्वरेने तो गाईला ठार मारण्यास उद्युक्त झाला. ॥३६॥

त्यावेळी वारुळात असणारा श्रीहरी वात्सल्य दाखवीत लोकामध्ये स्वताःसाठी आपल्या भक्तांची हत्या पाहणारा मनुष्य सूर्य चंद्र असेपर्यंत नरक भोगतो. हा दुष्ट गोपाल माझ्याकरिता या गाईला मारील. ॥३७-३८॥

याप्रमाणे मनात विचार निर्दोष असे रमापति श्रीनिवास 'एका तुलसीदलमात्रानेहि जो मानवश्रेष्ठ अत्यंत भक्तिभावाने पूजा करील त्याचे मी कल्याण करीन अशी माझी प्रतिज्ञा आहे." याप्रमाणे विचार करून श्रीहरीने गाईवर केलेला प्रहार स्वतःच्या मस्तकावर धारण केला. धारदार अशा कुर्‍हाडीने वेंकटेशावर प्रहार त्या गोपालाने केला. ॥३९-४०-४१॥

तीक्ष्ण धारदार कुर्‍हाडीच्या प्रहाराने श्रीनिवासाचे मस्तक फुटले. त्यामुळे भयंकर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. ॥४२॥

याप्रमाणे तो गोंधळ पाहून तो गोपालक मरण पावला. तो गोपाल मरण पावला असता ती गाय पर्वत उतरून राजाजवळ आली. अतिशय दुःखी पण काहिहि न बोलू शकणारी ती गाय राजवाड्यात गडबडा लोळू लागली. ॥४३-४४॥

राजासमोर गडबडा लोळणार्‍या, वासरू मृत झाल्याप्रमाणे दाखविणार्‍या गाईला पाहून राजा म्हणाला- आपल्या वासराला सोडून आलेली गाय गडबडा का बरे लोळत आहे? ॥४५॥

हे दूता, या गाईबरोबर जाऊन गाईच्या समुदायास एकत्र कर- ॥४६॥

याप्रमाणे राजाने आज्ञा दिली असता तो दूत गाईच्या मागोमाग वेंकटगिरीवरील वारुळाजवळ आला. त्याठिकाणी गवळी मरून पडला असून वारूळाच्या तोंडाशी भयंकर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आहेत असे त्या दूताने पाहिले व त्याने त्यापावलीच परत जाऊन राजास ते वर्तमान सांगितले. त्यानंतर वारुळाच्या तोंडाजवळ भयंकर रक्त पसरले आहे हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. ॥४७-४८-४९॥

मग तात्काळ मेण्यामध्ये बसून वेंकटगिरीवर येऊन "अहो हे भयंकर असे कर्म कोणत्या दुष्टाने केले असावे बरे?" ॥५०॥

या गोपालाचा मृत्यु, रक्ताने भरलेले हे वारुळ, वेंकटाचलावरगाईने केलेले वार्ताकथन हे काय बरे असावे? याप्रमाणे आपआपसांत चाललेले राजाचे बोलणे ऐकून वारुळात असणारा जगत्पति, अतुल पराक्रमी श्रीहरी, श्रीस्वामितीर्थांच्या दक्षिणेस असलेलय वारुळातून बाहेर येऊन म्हणाला. ॥५१-५२॥

तो गदगदाक्षराने ज्याचा कंठ दाटून आला आहे, ज्याचे नेत्र दुःखाश्रूनी भरले आहेत अशा, शंखचक्र इत्यादि धारण करणार्‍या श्रीनिवासाने, मोठ्या कष्टाने चोलराजास म्हटले. ॥५३॥

राज्यैश्वर्याने उन्मत्त झालेल्या हे दुराचार्‍या, तू अत्यंत पापी आहेस. अनाथ, न खालेल्या, अरण्यात राहिलेल्या दरिद्री अशा, आईबाप नसलेल्या भार्याबंधू यांनी सोडलेल्या सौभाग्यहीन अशा माझ्यावर तीक्ष्ण धारेच्या कुर्‍हाडीने प्रहार केलास. ॥५४-५५॥

प्रहार करण्यास योग्य नसलेल्या माझ्यावर प्रहार करून मला तू अतिशय दुःख दिले आहेस. तुझ्या निर्दय गवळ्याने माझे डोके फोडले. ॥५६॥

याप्रमाणे सांगून "तू मला जे दुःख दिले आहेस त्यामुळे हे दुर्बुद्धे, तू पिशाच हो." असा शाप दिला. ॥५७॥

याप्रमाणे आपणास श्रीनिवासाने शाप दिलेला पाहून राजा मूर्च्छित पडला. एका मुहूर्ताने तो राजा मूर्च्छेतून सावध होऊन म्हणाला. ॥५८॥

याप्रमाणे भविष्य पुराणान्तर्गत वेंकटेश माहात्म्याचा तिसरा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP