सैगल

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


भर मार्गात कधी ऐकता तव मंजुळ गान

अडखळुनी जागी थांबतो क्षणभर बेभान

शब्दाशब्दाच्या घटातुन ओसंडे भाव

पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षाव !

मंद लयीमधली आर्तता अन् मोहक झार

तप्त कांचनाची जणू तू खेचतोस तार !

प्रशान्त ओहळते स्वरातिल सुंदर मार्दव हे

गहन भावनांची गमे ही जान्हवीच वाहे !

घालविल्या रात्री आठवे, त्या गोदाकाठी

घाटावर माथे टेकता विश्रांतीसाठी,

काळोखातुनि ये दुरोनी दिव्य तुझा नाद

जीर्ण देवळांच्या तटावर घुमवित पडसाद !

ह्रदयातील रणे जाहली क्षणामधे शान्त

आणि विस्मृतीच्या नाहली चांदण्यात रात

अशीच संगीते आळवी तुझी कलावन्ता,

घडिभर जागव रे आमुची अशीच मानवता !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - मुंबई

सन - १९४०

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP