हवन विधी आणि बलिदान

घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे.

Navratri is a Hindu festival, during which nine days and nights, nine forms of Shakti i.e. female divinity are worshipped.


हवन विधी

नवरात्रात अष्टमी पूजा-होमहवन करण्याची प्रथा पुराणकाळापासून भारतात प्रचलित आहे. चौकोनी विटा पूर्व दिशेला रचून यज्ञवेदी तयार करतात. यज्ञकुंड असे या वेदीला म्हणतात. यज्ञकुंडात चांगली शुध्द माती व सुगंधी द्रव्ये टाकतात. या यज्ञकुंडाच्या समोर एक पाट मांडून त्यावर तांदळाचे तीन पुंजके ठेवतात. उजव्या बाजूच्या दोन पुंजक्यावर दोन तांब्याचे कलश पाणी भरुन त्यावर दोन ताम्हणे ठेऊन त्यांत तांदुळ भरुन एक एक सुपारी ठेवतात . कलशपूजा ही वरुणदेवाची पूजा असते . डाव्या बाजूच्या तांदळाच्या पुंजक्यावर गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवतात. कलशासमोर पाच फळे , पाच पानांचे विडे, पाच खारका,बदाम, खोबरे व नारळ ठेवतात. पाटाच्या डाव्या बाजूला मातृका म्हणून १७ सुपार्‍यांची स्थापना करतात. यज्ञ करण्यासाठी ब्राम्हण गुरुजींना बोलावतात. हवन विधी करण्यासाठी यजमान व त्यांची पत्नी नवीन वस्त्रे धारण करुन दोन पाटांवर बसतात. नंतर गुरुजी मंत्रोच्चारण करुन हवन विधीला प्रारंभ करतात. देवीची प्रार्थना करुन संकल्प करतात.

संकल्प -

मम ( यरमानस्य ) सहकुटुंबस्य कायिक, वाचिक , मानसिक, ज्ञाताज्ञात सकलदोष परिहारार्थ

सकलकामनासिध्दयर्थमायुरारोग्यभिवृध्दयर्थ हवन कर्मा गत्वेन आदौ निर्विघ्नता सिध्दयर्थ

आधि व्याधि,जरा पीडा मृत्यु परिहार द्वारा समस्त अरिष्ट,ग्रहपीडा दोष निवारणार्थ स्थिर

लक्ष्मी , किर्ति , लाभ, शत्रु पराजय, रुद्राभीष्ट सिध्दयर्थ गणपति पूजनं करिष्ये ।

ॐ एकदंताय विद्‍मयहे वक्रतुंडाय धीमही । तन्नो दंती प्रचोदयात्॥

गणपतिपूजन करावे . म्हणावे--

हे हेरंब त्वमे ह्येंहि अंबिकात्र्यंबकात्मज । सिध्दिरिध्दियुतत्र्यक्ष सर्वलोकपित: प्रभो ॥

आवाह्यामि पूजार्थ रक्षार्थ च मम क्रतो:। इहागच्छ गृहाण त्वं पूजां रक्ष च मे क्रतु: ॥

विश्वेश्वराय वरदाय सुराधिपाय । लंबोदराय सकलाय जगध्दिताय । नागाननाय सितसर्पविभूषाय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते ।

सर्वेश्वराय शुभदाय सुरेश्वराय । भक्तप्रसन्न वरवाय नमो नमस्ते ॥ वक्रतुंड महाकाय सुर्यकोटीसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

यानंतर पुण्याहवाचन करतात. या वेळी वरुणाची पूजा करतात. आणि मग सुवासिनींकडून यजमान व त्याच्या पत्नीला औक्षण करतात.

मातृका पूजन -

यज्ञाचे संरक्षण व्हावे यासाठी मातृका देवतांचे पूजन करतात.

गौरी पद्‍मा शची मेधा सावित्री विजयाजया । देवसेना स्वधा स्वाहा मातरो लोकमातर: ।

धृति: पुष्टि: तथा तुष्टि आत्मन: कुलदेवता । ब्रह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा ।

वाराही च तथेंद्राणी चामुंडासप्त मातर: ।

नंतर गुरूजींनी यज्ञाला प्रारंभ करण्यापूर्वी लौकिक आचार म्हणून घरातील मंडळी व नातेवाईक यजमान व त्याच्या पत्नीला वस्त्र प्रदान करुन आशीर्वाद देतात.

स्थानशुध्दी -

तयार केलेल्या यज्ञकुंडाच्या जागेची गुरुजी गोमुत्र , पंचगव्य , पांढरी मोहरी टाकून शुध्दता करतात.

ॐ अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोपिऽवा । य: स्मरेत पुंडरिकाक्षम्‍ सबाह्याभ्यन्तर: शुचि: ॥

देवतापूजन -

ब्रह्मादिमंडळ देवतांचे पूजन मंत्राद्वारे केले जाते.

विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् । सरस्वती प्रण्षौम्यादौ सर्वकार्यार्थ सिध्दये ॥

पाण्याने भरलेल्या कलशावरील ताम्हनात तांदूळ पसरुन मध्यभागी देवीची मूर्ती स्थापन करतात. श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा या देवतांचे पूजन करतात.

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी । दुर्गा , क्षमा ' शिवा, धात्री, स्वहा, स्वधा नमोऽस्तुते ॥१॥

जय त्वं देवि चामुण्डे जय भूतार्तिहारिणी । जय सर्वगते देवि कालरात्रि नमोऽस्तुते ॥२॥

नंतर देवीचा ध्यानमंत्र म्हणावा.

ध्यानमंत्र-

ॐ अम्बे अम्बिके अम्बालिके न मानयति कश्चन । ससस्त्यश्वक सुभद्रिकां कांपीलवासिनीम ॥

श्रीदुर्गादैव्यै नम: ।

नंतर पीठदेवतांचे पूजन करतात.

अग्निस्थापना-

हवनासाठी अग्नीची स्थापना करण्याकरिता विशिष्ट लाकडावर लाकूड घासून अग्नी प्रज्वलित करतात. याला अग्निमंथन म्हणतात. अग्निमंथनाचे लाकूड, तुप , लोणी , चंदनाची व आंब्याच्या झाडाची काष्ठे होमकुंडात टाकतात. हवन पूर्ण होईपर्यंत अग्नी प्रज्वलित ठेवावा लागतो.

ॐ चन्द्र्मा मनसो जात: तत्तक्षौ: सूर्यऽअजायत । श्रोताद्वायुर प्राणश्च मुखदग्निर्जायत् ॥

हा मंत्र अग्नी प्रज्वलित करताना म्हणावा

अग्नीची पूजा करतात.

अग्निचा ध्यानमंत्र -

ॐ चत्वारि श्रृंगात्या यस्य पादा द्बे शीर्षे सप्त हस्तासोअस्य । त्रिधा बध्दो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्याऽअविवेश ।

ॐ मुखां य: सर्वदेवानां दव्यभुक् कण्यभुकं तथा । पितृणां च नमस्त्स्मै विष्णवे पावकात्मने ॥ पावकाग्नये नम: ।

या मंत्राने अग्नीची पंचोपचार पूजा करतात.

नवग्रहपूजन -

नवग्रहांच्या शांतीसाठी गंधपुष्प वाहून पूजा करतात. नंतर यज्ञकुंडामध्ये तूप , समिधा , तीळ, भात टाकून नवग्रहासाठी हवन करतात. या वेळी गुरुजी प्रत्येक ग्रहाचा मंत्रोच्चार करतात.

सप्तशती हवन

संकल्प -

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवता प्रसन्नतार्थ च त्रितापात् सर्वबाधा प्रशमनार्थ, सर्व दोष निवारणार्थ

सर्वविध मनोरथ कामना-सिध्दयर्थ ब्राह्मण द्वारा श्रीदुर्गादेवी प्रीतये दुर्गा सप्तशती मन्त्रैर्यथाविधि हवनं च करिष्ये ॥

देवी माहात्म्य दुर्गा सप्तशती ग्रंथाचे गंधपुष्प वाहून पूजन करावे.

ॐ नमो दैव्यै महादैव्यै शिवाय सततं नमः । नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम्

यानंतर गणपतीला

ॐ गं गणपतये स्वाहा

या मंत्राने १०८ आहुती देतात व शक्तिरुप देवीला

ॐ अंबिकायै स्वाहा

या मंत्राने १०८ आहुती देतात. आणि मग सप्तशतीच्या प्रत्येक श्लोकात बरोबर हवनामध्ये भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे व विडयाच्या पानाने ७०० वेळा 'स्वाहा' म्हणून आहुती देतात.

ॐ अम्बेऽअम्बिकेऽम्बालिके नमान्नयति कश्चन । ससस्त्यश्वक सुभद्रिकाकाम्पीलसिनीम् स्वाहा । श्री दुर्गादैव्यै परमाहुति समर्पयामि ॥

बलिदान

संकल्प - देशकालौस्मृत्वा कृतस्य दुर्गा सप्तशती हवनाख्येनकर्मणि सांगता सिध्दयर्थं बलिदानं करिष्ये

असे म्हणून देवीसमोर कोहळा कापतात. हेच बलिदान.

पूर्णाहुती -

नारळ व सौभाग्यवायन अग्नीला अर्पण करुन गुरुजी पूर्णाहुतीचे मंत्र म्हणतात.

ॐ मूर्धानं दिवो आरतिं पृथिव्या वैश्वानरमृत आ जांतमग्निम् । कविः सम्राज मतिथीं जनानामासन्ना पात्रं जनयन्त देवाः स्वाहा

उत्तरपूजा -

आहुती देणे पूर्ण झाल्यावर देवीला गंध, पुष्प, हळद्कुंकू वाहून धूप, दीप ओवाळून नैवेद्य दाखवतात.

यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च । तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे ॥

असे म्हणून प्रदक्षिणा घालतात. नंतर एका कुमारिकेची व सुवासिनीची पूजा करुन खणानारळाने ओटी भरतात.

प्रार्थना -

कलशातील पाणी यजमान व त्याची पत्नी आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांवर शिंपडून या सर्वांना हवनाचे पुण्य प्राप्त होवो अशी देवीला प्रार्थना करतात आणि होमकुंडातील भस्म सर्वांच्या कपाळी लावतात.

गोप्रदान -

सर्व कर्माचे फल प्राप्त व्हावे यासाठी गुरुजींना चांदीची गायीची प्रतिमा व वस्त्रे प्रदान करतात.

देवताविसर्जन -

कलशावर अक्षता वाहून गुरुजी यजमानाकडून कलश हलवतात.

यान्तुदेवगणास्सर्वे पूजामादाय पार्थिवात् इष्टकामप्रसिध्दयर्थ पुनरागमनाय च ॥

आशीर्वाद -

यजमान गुरुजींना दक्षिणा देतात आणि गुरुजी सर्वांचे कल्याण व्हावे, सुखशांती लाभावी, ऐश्वर्यवैभव प्राप्त व्हावे यासाठी आशीर्वाद देतात.

श्रीवर्चस्व मायुष्यमारोग्य भाविधात शोभमामं महीयते । धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सर दीर्घमायुः ॥

तर्पण व मार्जन -

एका मोठया पात्रात दूध, पाणी, पुष्प वा दूर्वा घालून तर्पण-मार्जनाचे मंत्र म्हणून ताम्हनात सोडतात.

ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुंडायै विच्चे । श्रीदुर्गादेवी तर्पयामि । ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुंडायै विच्चे । श्री दुर्गादेवी मार्जयामि॥

महादेव्यै च विद्‌महे दुर्गायै धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥ महिषासुरनिर्णाशि भक्तानां सुखदे नमः ।

रक्तबीजवधे देवि चण्डमुण्डविनाशिनी नमः । शुम्भनिशुम्भ धूम्राक्षस्य मर्दिनी नमः ।

सर्वशत्रुविनाशिनी सर्वसौभाग्यदायिनी नमः । देहि सौभाग्यमारोग्य देहि मे परमं सुखम्‌ । रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥

उदयोऽस्तु । जय जगदंब ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP