अथ मानस पूजा

घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणजे ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे.

Navratri is a Hindu festival, during which nine days and nights, nine forms of Shakti i.e. female divinity are worshipped.


अथ मानस पूजा

श्री महाकाली - महालक्ष्मी - महासरस्व्तीभ्यो नम: ॥

ॐ लं पृथिव्यात्मकं गन्धं परिकल्पयामि ।

ॐ हं आकाशात्मकं पुष्पं परिकल्पयामि ।

ॐ यं वाय्वात्मकं धूपं परिकल्पयामि ।

ॐ रं अग्न्यात्मकं दीपं परिकल्पयामि ।

ॐ वं अमृतात्मकं नैवद्यं परिकल्पयामि

रुपं देहि, जयं देहि, यशो देहि, द्विषो जहि

श्री शक्तीने महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा तीन रुपांत प्रकट होऊन तीन वेळा दानवांचा संहार करुन पीडा दूर केली तेव्हा देवांनी प्रार्थना केली की, 'वेळोवेळी अशीच पीडा दूर कर. आमचे रक्षण कर ' यावर देवीने आश्वासन दिले की, 'जेव्हा दानवांची पीडा होईल तेव्हा अवतार घेऊन मी शत्रुनाश करीन. माझे हे सर्व माहात्म्य माझे सान्निध्य प्राप्त करुन देणारे आहे. माझे माहात्म्य श्रवण - पठण करणार्‍यांना सर्व सुखे प्राप्त होतील.'

श्री शक्तीने सांगितले आहे की, ' युध्दातील माझे पराक्रम ऐकून आणि देवांनी व ऋषिमुनींनी केलेली माझी स्तुती ऐकुन शुभबुध्दी प्राप्त होईल. त्या बुध्दीप्रमाणे वागून जसा विष्णूला इ देवांना विजय मिळाला तसाच त्या बुध्दीप्रमाणे वागणार्‍या मनुष्यालादेखील प्राप्त होईल हे निश्चित.

देवीने महान पराक्रम करुन महिषासुराचा वध केला. धूम्रलोचन , चण्ड्मुण्ड , रक्तबीज , निशुंभ आणि शुंभ या बलाढ्य दैत्यांचा वध केला. तेव्हा सर्वत्र आनंदीआनंद झाला. देवीवर पुष्पवृष्टी झाली. देवांनी देवीची स्तुती केली, ' हे देवी, तू शरणागताची पीडा दूर करणारी आहेस. हे जगन्माते , तू प्रसन्न हो आणि विश्वाचे कल्याण कर. तू चराचराची स्वामिनी आहेस. सर्व मांगल्याचे मांगल्य असणार्‍या , सर्व इच्छा पूर्ण करणार्‍या नारायणी , तुला नमस्कार असो. तू शरण आलेल्यांचे रक्षण करतेस. भक्तांच्या पीडा दूर करतेस. हे देवी, तू आमचे भयापासून रक्षण कर. शरण आलेल्यांची पीडा दूर कर. लोकांना वरदा हो.'

ही स्तुती ऐकून देवी प्रसन्न झाली. तिने लोकांना कल्याणकारक असा वर दिला.

देवी म्हणाली, ' पुढे भविष्यकाळात शुंभ निशुंभा सारखे राक्षस निर्माण होतील, त्या वेळी मी अवतार घेऊन त्यांचा नाश करीन. प्रत्येक अवतारात माझे नाव निरनिराळे असेल. असा वर देऊन देवी अदृश्य झाली असे मार्कंडेयमुनीने ' 'दुर्गासप्तशती ' या ग्रंथात देवीचे महात्म्य कथन केले आहे. त्यात सातशे मंत्र असून त्यांत देवीचा गौरव आहे. या ग्रंथाच्या श्रवण - पठणाने दु:ख-दारिद्र्य दूर होते. ऐश्वर्य - वैभव प्राप्त होते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. शत्रुचा नाश होतो. देवीची आराधना , पूजन जिथे केले जाते तिथे ती नित्य असते. आश्विन महिन्यात नवरात्रात देवीचे माहात्म्य जे पठण करतात,घटस्थापना करुन देवीचे पूजन करतात त्यांना कसलीही पीडा होणार नाही. त्यांना सुखसमृध्दी लाभेल. त्याना इच्छित फळ मिळेल असे असंख्यांचे अनुभवाचे बोल आहेत.

नवरात्र उत्सव आश्विन शुध्द प्रतिपदेपासून साजरा करण्याची प्रथा पौराणिक काळापासून असल्याचा उल्लेख ऋग्वेदात आलेला आहे. दुर्गेची पूजा अनेक कुटुंबात होत असते. दुर्गा ही अनेक कुटुंबाची कुलदेवता आहे. ही देवी विश्वजननी आहे.

'या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ॥

अशा सर्वात्मक भावनेने या जगन्मातेला शरण जाऊन तिची पूजा, उपासना करतात. देवी त्या सर्वांचे मनोरथ पूर्ण करते.

वेदान्त्यांनी या महाशक्तीला ' शिवा" असेही संबोधिले आहे. ' हे शिवे , तूच परब्रम्हाची पराकृती आहेस. तुझ्यामुळेच सर्व जगाची उत्पत्ती होते. तूच जगज्जननी आहेस. अशा शब्दांत शास्त्रकारांनी देवीचा गौरव केला आहे.

सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते ॥

हे नारायणी , तू सर्व प्रकारचे मंगल करणारी मंगलमयी आहेस. तू कल्याणदायी शिवा आहेस. सर्व पुरुषार्थ सिध्द करणारी , शरण आलेल्यांना अभय देणारी गौरी असून , तुला नमस्कार असो.

देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परम् सुखम। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥

हे देवी , मला सौभाग्य दे. आरोग्य दे. परम सुख दे आणि माझ्या कामक्रोधादी शत्रुंचा नाश कर. ' सप्तशती' ग्रंथात देवीचे असे स्तवन केले आहे.

जिच्या सहायतेमुळे मधु व कैटभ दैत्य नाश पावले, ती महाकाली देवीचा हा पहिला अवतार . महाकाली ही तमोगुणी. देवीने महिषासुर दैत्याशी युध्द करुन त्याचा वध केला. हा देवीचा दुसरा अवतार, महालक्ष्मी . महालक्ष्मी ही रजोगुणी. शुंभ निशुंभ , या दैत्याशी युध्द करुन त्यांचा वध केला हा देवीचा तिसरा अवतार महासरस्वती . महासरस्वती ही सत्वगुणी . या त्रिशक्तीनी दैत्यनाश करुन स्वर्ग पृथ्वीवर देवांचे राज्य निर्माण केले म्हणुनच या देवतांचे स्मरण या नवरात्र उत्सवात करण्यात येते.

महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती अशा तीन रूपांत प्रकट होऊन तीन वळा दैत्यांचा संहार करून श्रीशक्तीने देवांचे रक्षण केले तेव्हा देवीचे स्तवन केले. देवी आनंदित होऊन म्हणाली , 'शरद ऋतूत नवरात्रात माझे माहात्म्य आणि युध्दातील माझे पराक्रम जे श्रवण - पठण करतील, माझे मनोभावे पूजन करतील त्यांचे शत्रु नष्ट होतील. त्यांची सर्व पीडा दूर होईल . त्यांचे कल्याण होईल. त्यांचे कूळ आनंद पावेल. "

देवीने सांगितल्याप्रमाणे आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव भारतात आजतागायत चालू आहे.

नवदुर्गा ही आद्यशक्ती सत्व , रज, तम या गुणांच्या द्वारे अनुक्रमे महाकाली , महालक्ष्मी, महासरस्वती अशा तीन रूपांत अविर्भूत होते. यातील प्रत्येकीची तीन तीन रूपे मिळून एकंदर नऊ रूपे होतात. नऊ हे श्रीशक्तीचे अंक प्रतीक आहे. शैलपुत्री , ब्र्ह्मचरिणी , चंद्रघण्टा , कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी , कालरात्री , महागौरी , आणि सिध्दीदात्री हे प्रसंगोपात

श्रीशक्तीने घेतलेले नऊ अवतार , म्हणुन तिला नवदुर्गा म्हणतात. दुर्गा हा देवीचा नववा अवतार आहे.

नवदुर्गा हा शब्द्च मुळी नऊ महाशक्तींचा समुहवाचक एकेरी शब्द आहे. या एकाच शक्तीच्या उपासनेत नऊही देवींची उपासना घडते. या नऊही भगवती भक्तांचे सदैव संरक्षण करतात.

भगवती दुर्गेच्या त्रिगुणात्मक शक्तीची तीन रुपे महाकाली, महालक्ष्मी , महासरस्वती असली तरी महिषाकुरमर्दिनी हे तिचे रुप विख्यात आहे. तिच्या रुपात शौर्याच्या गाथा सामावल्या आहेत. भक्तांच्या रक्षणासाठी दुर्गेने अनेक दिव्ये केली,

महत्कार्ये केले म्हणूनच ती आदरणीय झाली आहे. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ही दुर्गेची आरती भक्त मोठ्या प्रेमाने गातात.

दुर्गेची प्रतिमा हे राष्ट्रशक्तीचे प्रतिरुप आहे. राष्ट्राचे शरीर, मनोबल , सर्वांगीण समृध्दी आणि अध्यात्मसंपदा यांचा संयोग या प्रतिमारुपात सामावला आहे.

आसुरी शक्तीवर दैवी शक्तीच्या विजयाचे प्रतीक म्हणुन नवरात्रात शक्तीपूजा करतात. दुर्गापूजेचा उद्देशच बलसंचार व्हावा हा आहे. भारतीय युध्दाच्या प्रसंगी विजय मिळावा म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला ' दुर्गास्तोत्र' म्हणायला सांगितले. अर्जुनाने रथावरुन उतरुन 'दुर्गास्तोत्र' म्हणले . रावणाशी युध्द करायला निघताना श्रीरामाने दुर्गेचे पूजन करुन प्रार्थना केली.

भगवती दुर्गेने असुरशक्तीशी नऊ दिवस युध्द केले. दहाव्या दिवशी विजय मिळाल्याने त्या दिवसाला ' विजयादशमी ' हे नाव मिळाले. याच दिवशी श्रीरामाने रावणाशी युध्द करुन त्याच्या दहा शिरांचे छेदन केले. म्हणून या दिवसाला ' दशहरा ' असे नाव पडले. पुढे या शब्दाचे रुप ' दसरा' असे झाले.

'विजयादशमी ' हा देशाचा सैनिकी सण आहे. शौर्य , संपत्ती आणि विद्या देणार्‍या दुर्गेच्या वरदानाचे प्रतीक म्हणुन विजयादशमीला अतिशय महत्व आहे.

रुपं देहि, जयं देहि, यशो देहि, द्विषो जहि ॥

अशी दुर्गेची प्रार्थना करतात. संकटावर मात करता यावी म्हणून दुर्गेची मनोभावे प्रार्थना करतात. दुर्गापूजा ही शक्तिपूजा आहे. या रुपातच ईश्वराचे रुप आहे.

या चण्डी मधुकैट्भप्रमाथिनी या महिषोन्मूलिनी । या धूम्रेक्षण चण्ड्मुण्ड्मथिनी या रक्तबीजाशिनी ।

शक्ति: शुम्भनिशुम्भदैत्यदलिनी या सिध्दल्क्ष्मी परा । सा दुर्गा नवकोटिमूर्तिसहिता मां पातु विश्वेश्वरी ॥

हा एकश्लोकी सप्तशती मंत्र आहे. हा मंत्र नवरात्रात भक्त मोठया श्रध्देने म्हणतात.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP